संग्रह १
१
चोळीया काकनाच, दिसे माह्यार हालकं
बंधुजी दिंड काढाव शेलकं
२
माह्यार माझं केलं, नवं आगळ शंभराचं
बंधुजीचं नाव, कागदी हंबीराचं
३
माह्यार माझं केलं, एका गावाचा वसूल
सया पुशित्यात, बंधु सम्रत असंल
४
लुगड्याचं मोल एका चोळीला माझ्या दिलं
वडील बाप्पाजींनी उंच माहेर मला केलं
५
लुगडं घेतलं दुही पदर रामाचं
पहिलं माह्यार मामाचं
६
लुगडं घेतलं दुही पदर खांबाचं
बाप्पाजींनी केलं माह्यार डिंभाचं
७
लुगडं घेतलं पदरी रामसीता
करतो माह्यार माझा पिता
८
जाते माह्यारी, कसं रमलं माझं मन
भाऊभाच्यांनी भरलं घर
९
माह्याराला जाते, जीवाला इसावा
बापजी बयाबाई सारा संजोग असावा
१०
सया पुशित्यात्म तुझ्या माह्यारी काईकाई
बंधूपरास भाचं लई
११
माह्याराला जाते, न्हाई मुराळ्याचं कोडं
बंधु सत्तेचा गाडीपुढं
१२
जाते माह्याराला, माझं बसनं जोत्यावर
भावजय पडे पाया, नंदेच्या नात्यावर
१३
माहेरची वाट, कुना गवंड्यानं खंडली
वाट मुराळ्या दंडली
१४
माहेराची वाट टाक्या लावूनी घडली
बाप्पाजींनी मला गाडी बुरख्याची धाडली
१५
माहेराच्या वाटे, कोन चालतो लागवेगी
हौशा बंधु माझं हिरं झळकीत जागजागी
१६
माहेराच्या वाटे कळकीच बेट
बयाबाई माझी लेकीची वाट पहात
१७
माहेराच्या वाटे अंबचिंचेची बन दाट
माझी मायबाई पहाते माझी वाट
१८
माझी अंगलोट सया पहात्यात न्याहाळुनी
सयानु किती सांगु, होतो माहेरी खेळूनी
१९
माह्यार म्हनु केलं, पाठ झाकीली पदरानं
केलं माहेर बंधु गुजरानं
२०
बंधुजी गेला काल, भाचा पाव्हना आला राती
मला म्हनितो, तू माह्यारी चल आती !