Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२१

माह्याराला जात्ये, मला इसावा कशाचा

दारी पलंग भाच्यायाचा

२२

माह्याराला जात्ये नको जाऊ लिडीलिडी

सासुबाई बोलत्यात, येऊ दे बंधुची बैलगाडी

२३

माहेरघरामंदी, हायती, आजाआजी

लाडक्या भाचीला मामा वाटीनं दूध पाजी

२४

दुधातुपानं भरल्या वाट्या, वर साखर निवायाला

माझा राघु बसला, मामासंगट जेवायाला

२५

दुधातुपानं भरल्या वाट्या, वर साखरेची सोजी

मैना लाडीयेला, जेवु वाढिते तिची आजी

२६

नातवंडाची आजी पंतुंडं पावली

सयानु किती सांग ? माझी भाग्याची माउली

२७

लेकीच बाळ हाती, ल्येकाचा घेई कडे

भाग्याची माऊली सैधवा जाती पुढे

२८

पहिली ग ओटी माता सैधवा लाभली

जेठी सून कामा आली

२९

माह्यार माझं केलं बंधु माझ्या हंबीरानं

समदी पाठ झाकीली जरीच्या पदरानं

३०

माह्यार माझं केलं दुही पदर गोपिकाचं

माझ्या बंधुजीचं घर लौकीकाचं

३१

माहेराला जाते घोडं लागलं चढणीला

माझी मैनाबाई देते निरोप गडणीला

३२

लक्षुमी आई आली धरते मी पदराला

चल माझ्या माह्याराला

३३

तांबड्या लुगड्याच्या निर्‍या घालते हौशीनं

केलं माह्यार मावशीनं

३४

माहेरच्या देवा न्हाई तुला इसरत

माझ्या बंधुजीचा वेल जाऊ दे पसरत

३५

कान भरीलं कापानं, ओटी भरली नारळानं

केलं माहेर मावळ्यानं

३६

कंथ पुशित्यात, रानी माहेरवास कसा ?

केळीच्या पानावर अंबेमोहराचा भात जसा

३७

दुरून दिसे बाई दिवा देऊळाचा

कळस माझ्या माहेरीचा