Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२६

अंगडं टोपड अंगीवरी निळ्या

कुना श्रीमंताच्या बाळा

२७

अंगडया टोपडयाचं बाळ खेळे वसरीला

सुर्व्या गगनी दीपला, रत्नं बाळाच्या टोपडयाला

२८

अंगड टोपडं टकुच्यावर टोपी

सरते तुला लेकाचा साज, लेकी

२९

ल्येकाच नवस, लेकीबाळ तुला केलं

पानपुतळ्या नवं केलं कडीलंगर वाया गेलं

३०

हातांत कडीतोडं कमरे कडदोरा सव्वाशाचा

ल्येक कुना हौशाचा

३१

हातांत कडीतोडं बाळ कुना राजाचं

नांव सांगतं आजाच

३२

हातांत कडीतोडं कमरे कडदोरा कवां केला ?

बाळ गुजराती लेण ल्याला

३३

हातांत कडीतोड दंडाला बाजुबंद

बाळाला दृष्ट होती लावा गंध

३४

साखळ्यावाळीयचा पाय रूतला चिखलांत

बाळ खेळतं गोकुळांत

३५

साखळ्यावाळीयाचा बाळ चालतो तोर्‍यायानं

जाऊळ उडे वार्‍यायानं

३६

साखळ्यावाळीयाचा नाद येतो झुनझुनं

मामाला पानी देतं तान्ह

३७

सुरतेचं मोती रूपयाला आठ

तान्हुल्याचा कडीकरदोडयाचा थाट

३८

साखळ्यावाळीयाचा नाद येतुया माझ्या कानी

आली खेळू माझी रानी

३९

साखळ्यावाळीयानं दणाणली माझी आळी

सावळे सोनूबाई नको खेळू संध्याकाळी

४०

दिस उगवला, किरनं टाकी सोप्यांत

तान्हुलं खेळे झोक्यांत

४१

दिस उगवला, किरनं टाकीतो चुडयावरी

बाळ माझ्या कडेवरी

४२

सूर्ये उगवला, झाडाझुडाच्या वसरीला

तान्हयासाठी म्यां पदर पसरीला

४३

सूर्ये उगवला हात जोडियेते दोन्ही

सुखी राखावी माझी तान्ही

४४

माकनीचं पानी कुण्याच्य वाड्या जातं

तान्हं माझं बाळ जावळाचं तिथ न्हातं

४५

थोरलं माझं घर, पुढं लोटिता मागं केर

बाळं झाल्याती खेळकर

४६

माझ्या अंगनांत सांडिला तूपसांजा

तिथ जेवला बाळराजा

४७

माझ्या अंगनांत मोत्यापवळ्याची रांगोळी

बाळ बसला अंगुळी

४८

अंगुळीला पानी इसानाला गंगा

करा अंगुळ श्रीरंगा

४९

अंगुळीला पानी हंडा ठेवते कुलपाचा

बाळ न्हातो झुलपाचा

५०

अंगुळीला पानी हंडा तपेलं न्हानीपाशी

तान्हं बाळ झुलपाला लिंबू घाशी