Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

१०१

माळीणीच्या पोरी, फुलं तोड कूपाकाठी

बाळीच्या साजासाठी !

१०२

मावळण आत्याबाई तुमच्या ओटीला सुपारी

भाचा लाडका उडया मारी

१०३

सुरतेचं मोती रूपयाला सात

चिमण्या बाळाचा अंगठीजोगा हात

१०४

संभाळ शेजीबाई दारीच्या जाईजुई

बाळी अवखळ, हात लावी

१०५

घडीघडी लिंबलोण उतरते कोण

बाळाची मावशी, मावळण

१०६

घडीघडी लिंबलोण उतरते तुझी आत

बाळ तुझ जावळ किती दाट

१०७

जळो जळो दृष्ट, मिठाच्या झाल्या लाह्या

दृष्ट झाली बाजीराया

१०८

जळो जळो दृष्ट, मिठाचं झाल पानी

दृष्ट कोमेलं फुलावानी

१०९

दृष्ट झाली म्हनु, मीठ मोहर्‍या काळी माती

बाळा दृष्ट झालीया काळ्या राती

११०

जळो जळो दृष्ट, मीठ मोहर्‍या पिवळ्या मेथ्या

तान्ह्याला पहाया, कोन पापिनी आल्या होत्या

१११

दृष्ट मी काढते, मीठ मोहर्‍या कांदा

दृष्ट झालीया माझ्या चांदा

११२

दृष्ट झाली म्हनु झाली तान्ह्याच्या जावळा

माझा निशिगंध कोवळा

११३

दृष्ट झाली म्हनु झाली तान्ह्या बाळा

आणू मीठ मोहर्‍या बिबा काळा

११४

माळ्याच्या मळ्यामंदी इसुबंधाचे वेल गेले

बाळाकारनं गोळा केले

११५

दृष्ट म्हनु झाली पाळन्यावरनं गेली'

माझ्या धनियांनी लिंबलोणाची गर्दी केली

११६

दृष्ट झाली म्हनू झाली पाळण्याच्या फळी

आंत निजली पुतळी

११७

जळली माझी दृष्ट गेली पाळन्यावरून

तान्हुली उभी कळस धरून

११८

दृष्ट मी काढीते पाळन्या कळसासुध्दां

जावळाची यसवदा

११९

बाळा दृष्ट झाली, झालं दृष्टीचं कोळसं

मोडलं बाळाचं बाळसं

१२०

बाळा दृष्ट झाली कुनाच नांव घेऊं

विसुबंधाला किती जाऊ

१२१

बाळा दृष्ट होती होती जवां तवां

विसुबंधाला जाउं कवां

१२२

कुना पापिनाची दृष्ट पाळन्यावरनं गेली

वाकी दंडाची सैल झाली

१२३

दृष्ट झाली म्हनु लावा भुंवयामंदी काळं

बाळाया दृष्टीचा आला जाळं

१२४

जळो तुझी दृष्ट, तुझ्या डोळ्यांत पडूं माती

तान्हा माझा बाळ कोमेला एक्या राती

१२५

शेजी लेणं लेती इस पुतळ्या वर मोती

कडेवर बाळ मला सोभा देतं किती

१२६

संभाळ शेजीबाई दारीचा सबजा

लई अवखळ माझी गिरजा

१२७

शेजारीणबाई नको बोलूं तूं तुटून

तान्ही माझी मैना आली झोपेची उठून

१२८

शेजी शिव्या देते माझ्या बाळाला देखून

तिच्या तोंडावर देते कडूलिंब मी फेकून

१२९

शॆजी शिव्या देते, तूं आणिक दे बाई

तान्ह्या माझ्या राघूला, चिर्‍याला भंग न्हाई

१३०

शेजी शिव्या देते, तिची तिला मुभा

माझा बाळराय, कडव्या लिंबार्‍याखाली उभा

१३१

खेळुनी मेळुनी बाळ उंबर्‍यांत बसे

सोन्याचा ढीग दिसे

१३२

अंगनी खेळे तान्ही कुनाची बछडी

सोन्यामोत्याची खिचडी

१३३

देवाचा देवपाट, फुलानं शोभिवंत

नार पुत्रानं भाग्यवंत