संग्रह ४
७६
धनसंपदेची नार, मला जातीया खेटून
नेणन्ता बाळ माझा आयना दाविते उठून
७७
तिन्हीसांज झाली सांजाई तिचं नांवु
बाळा बाहेर नग जाऊ
७८
तिनीसांजा झाल्या तिनीच्या तीन परी
घरी जाउळाचा हरी
७९
लोक पुशित्यात, कुनाचं हे घर
बाळराय माझा जाई-मोगरा समोर
८०
मध्यान्हरात्रीचं रडतं माझं तान्हं
रात कळंना चांदण्यानं
८१
बोबडया बोलाचं येतं मला हंस
बाळा फिरून बोल तसं
८२
दुपारच्या कामा एवढी रात कांहो झाली
तान्हुल्यानं रडी केली
८३
हातात कडीतोडं कमरे कटदोरा सरीगोफ
सया पुशित्यात कुना हौशाचा लेक
८४
उन्हाळ्याचं ऊन थंडीचा गारवा
तान्हुल्याला घेऊं रेशमी दारवा
८५
लाडक्या लेकीनं मांडला भंडवाडा
मुलाशेजारी तिचा गाडा
८६
लेकीचा खेळ चुलभानुशी कोनामंदी
तान्ह्याबाळायाचा जंगी भंवरा उन्हामंदी
८७
लेकुरवाळीयेच्या कामाच्या हेळणा
जात्याशेजारी तान्ह्याचा पाळणा
८८
लेकाचे हे खेळ, विटी दांडूच्या लगोर्या
माझ्या राघूच्या चेंडूला घागर्या
८९
माळ्याच्या मळ्यामंदी माळी बाळाला येऊं दीना
तान्हुलं माझं कळी जाईला राहुं दीना
९०
बिंदीन खेळे राघु बिदाई झाली लाल
मंदिलाचं दिलं पाल
९१
किती नटशील जून जरबट केकती
बघ राघूला रंग किती ?
९२
साखळ्यावाळीयाची मैना येते दनदना
नाद येतुंया माझ्या काना
९३
समूरल्या सोप्या कुनी मांडिला ताटपाट
तान्हुल्याचा माझ्या जेवनाचा थाट
९४
बाळा दृष्ट झाली माझ्या सुरतीच्या सोन्याला
इसुबंधासाठी गेला जासूद पुन्याला
९५
दृष्ट झाली म्हनु झालीया तान्या सख्या
विसुबंधाचा आनुं वोफा
९६
दृष्ट झाली म्हनु गोर्यापर्यास काळ्याला
कुनी चंद्र माझा न्याहाळीला
९७
दृष्ट झाली बाळा, अंगनी अंग धुता
गोर्या माझ्या रजपुता
९८
अंगनी खेळत्यात सयाचे गोरे दाजी
झग्यापोलक्याची मैना माझी
९९
लेकाचा खेळ खेळून लेते लाडी
रथामागं तिची गाडी
१००
बिदीनं खेळतात, बिदाईचा खेळ मोडा
मैना भुकेली घरी धाडा