संग्रह १
१
आंब्याला मोहर, चिंचेबाईला मोगर
माझी मैनाबाई आली नहानाला गौर
२
पहिल्यांदा न्हान आलं शिंद्यच्या लष्करांत
बस- मोत्याच्या मखरांत
३
वाजंत्री वाजत्यात, वाड्यांत काय झालं ?
मैना गुजरीला न्हान आलं
४
पहिल्यांदा न्हान आलं अंगन लोटतांना
येळाचा येळ गेला साकर वाटतांना
५
सांगुन धाडते, गावीच्या जिनगराला
कोरे कागद, मैनाच्या मखराला
६
समूरल्या सोप्या दिली मखराला जागा
आली न्हानुली चंद्रभागा
७
पहिल्यांदा पदुर आला हौस तुझ्या सासर्याला
केळी लाविल्या मखराला
८
हिरव्या चोळीसाठी जाणं झालंया मिरजेला
न्हान आलंया गिरजेला
९
लगीन न्हाईयेवं ! मला कशाची मूळचिठ्ठी
बंधुजी पहिल्या न्हानाची भरती आटी
१०
वाजंत्री वाजत्यात, अंगनी आले माळी
राधिकेच्या मखराला लावा केळी
११
मखराच्या दारी वाढपाची झाली दाटी
हिरवा चुडा तुझ्यासाठी
१२
वाजंत्री वाजत्यात दुही दाराला गजर
आला ताम्हनीला पदर
१३
पहिल्यांदा गरभार तोंडावर लाली
कुन्या महिन्याला राधा न्हाली ?
१४
पहिल्यांदा गरभार कंथ पुशितो जिव्हाळ्यानं
तोंड कामेलं डव्हाळ्यानं
१५
पहिल्यांदा गरभार कसं कळालं भरताराला
रंगीत पाळन्याची ताकीद सुताराला
१६
भर तूं कासारा बांगडी हिरवीगार
मैना पहिल्यांदा गरभार
१७
लेण्यालुगडयापरीस तान्हियाची महिमा मोठी
माझ्या बाळाईची भरा पाळण्याखाली आटी
१८
गर्भिनीला डोळं हिरवं येलदोडं
हौशा बंधुजीची गाडी बंदराच्या पुढं
१९
पहिल्यांदा गर्भीन आस लागली माहेराची
माउलीनं ओटी भरली सजुर्याची
२०
हळदकुंकवानं अंगन झालं लाल
ओटीभरन झालं काल
२१
पहिल्यांदा गरभार नाही म्हणते लोकाला
पोट निरीच्या झोकाला
२२
पहिल्यांदा गरभार मातेशी करी चोरी
पाचव्या महिन्याला उचलली निरी
२३
पहिल्यांदा गरभार डोळं लागलं अवघड
बया म्हणे चल गावांकडं
२४
पहिल्यांदा गरभार लिंबनारळी तुझ पोट
मैना डाळिंबी चीट नेस
२५
पहिल्यांदा गरभार डोळं लागलं जिनसाचं
आंबा डोंगरी फनसाचम