Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२६

पहिल्यांदा गरभार रायबोरांचे काकडे

आंबे हिरवे गावाकडे

२७

पहिल्यांदा गरभार कंथ पुसे खांबाआडून

माझ्या मैनाईला देतो सुपारी फोडून

२८

पहिल्यांदा गरभार डोळं लागलं चिचंचं

चिन्ह दिसत लेकीचं

२९

पहिल्यांदा गरभार डोळं लागलं ताकाचं

चिन्ह दिसत लेकाचं

३०

पहिल्यांदा गरभार डोळं लागलं बोराचं

माझी मैना पाय धरीते दीराचं

३१

पहिल्यांदा गर्भार डोळं लागलं मेथीभाजी

हौशा दीर मळं खंडाया झालं राजी

३२

पहिल्यांदा गर्भार अन्नाची येते कीकू

हिरवं डाळिंब घाला पिकूं

३३

पहिल्यांदा गरभार खाऊं वाटतं काईबाई

हिरवा आंबा बाजारी आला न्हाई

३४

गर्भीणी नारी तुझा गरभ लाडाचा

अंबा लागतो पाडाचा

३५

गर्भीणी नारी, डोळं लागलं कारल्याचं

हौशा कंथ मळं धुंडितो मैतराच

३६

बाळ माझी गर्भीणी, माझ्या जिवाला उल्हास

आणा कोकनी फनस

३७

अंबट अंबिल ताकानं केली गार

गर्भीणीबाई, उठ चल न्यारी कर

३८

आंब्याचा आंबरस केळ्याच्या करुं वडया

जाते मी गर्भिणीच्या वाडया

३९

गर्भिणीला डोळं , खाउं वाटं डाळकांदा

कळ्या पाडून लाडू बांधा.

४०

गर्भीण नारीयेल सहावा महिना सरावण

डाव्या कुशीला नारायेन

४१

गर्भीण नारीला खाउ वाटतं कारं बोरं

घेतीया सवाशेर

४२

गर्भीण नारीला गर्भाची येते घेरी

चाफाचंदन माझ्या दारी, साउलीला बस नारी.

४३

गर्भीण नारीला गर्भाचा उल्लास

हौशा कंथ तिचा न्हानी लावितो गलास

४४

गर्भीण नारीयेला खाउं वाटतं उंबर

सखा धुंडितो डोंगर

४५

हिरवी चोळी दंडामंदी उसवली

माझी गर्भीण दृष्टावली

४६

गर्भीण नारी गर्भ तुझा डौलदार

उदराला येऊंदे कृष्ण्देवाचा अवतार

४७

हिरव्या चोळीनं दंड करी रसारसा

माझ्या बाळाईचा आळ पुरवीण हवा तसा

४८

गर्भिण नारीच्या अंजीर ओटयामंदी

कंथ विचारी गोठयामंदी

४९

आंब्याची आंबराई, चिंचबाईला तेगार

नंद कामिनीला डोळं लागल्याती जबर

५०

गर्भीण नारी भरल्या दोन कुशी

चोळी दंडांत आंबरसी