Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३

५१

माळ्याच्या मळ्यामंदी मेथीबाई डहुळती

तान्ही माझी, गर्भीण पाण्या जाती

५२

माळीण साद देई चन्नुल्या घेवडयाची

राणी गर्भीण केवडयाची

५३

साखरशेरणी वाटती दीवाणा

बंधुजीला लेक झाला दैववान

५४

भावजई बाळांतीण, बंधु दिसे चिंतागती

गवंडयाला काकुळती, न्हानी बांधावी चिरेमती

५५

भरल्या बाजारांत घेते तिघीला तीण खण

मैना गुजर बाळंतीण

५६

भावाला झाला पुत्र साखर आली माझ्या गांवा

वाटीन जावाभावां, रामचंदर नांव ठेवा

५७

बंधुला झाला पुत्र, आगाशी लावा दिवा

धनी राज्याला झाला नवा

५८

भावजय गुजर बाळंतीण, साखर मला आली

पुत्र न्हवं, कन्या झाली !

५९

बंधुला झाला पुत्र मला यावं घोडं

बहीना, तुझ्या कुयर्‍या, माझं तोंड

६०

बंधुला झाला लेक, वाटुं साखर पसापसा

ल्येक झाला लई दिसा

६१

बंधुला झाला लेक आम्हां बहिणींना बरं झालं

माह्यार दुणावलं

६२

बंधुला झाला लेक आम्हाला झाला भासा

सरी बिंदुल्यावर ठसा

६३

बंधुला झाला लेक बहिणीला आली पानं

करूं बाळाला बाळलेण

६४

बंधुला झाली लेक जाते हुंबर्‍या सारवाय

लेक त्याची हरबाय

६५

नवस मी केले नवसासारिखं झालं

बंधुचं बाळ माझ्या अंगणी पाणी न्हालं

६६

माहेरच्या वाटे सरीबिंदुल्या झोळण्यातं

बाळ तान्हुलं पाळण्यांत

६७

सोन झालं स्वस्त रूपै आलं मोडी

करूं बाळाला वाक्याकडी

६८

बंधुला झाला लेक, बहिणींना झाला भाचा

नेऊं पाळ्ना कुलपाचा

६९

दिवस बुडियेला येल फुलला वाळकाचा

माझ्या बाळाईच्या घरी आनंद बाळकाचा

७०

भरल्या तीनसांजा तीनसांजाच्या तीनयेळा

बाळ माझी बाळांतीण तान्या बाळाला संभाळा

७१

बाळांतीणबाई तुझ्या उशाला कवळी पानं

बाप इच्यारी कौतुकानं

७२

परसूत व्हावं आपुल्या माउलीच्या घरी

ईस दीस झालं तरी येउ देईना सदरेवरी

७३

बाळंतीणबाई तुझी पिवळी पाउलं

सुख बाळानं दाविलं

७४

बाळांतीणबाई तुज्या टाचा त्या पीवळ्या

सुख न्हाणी जातांन देखिल्या

७५

बाळंतीणबाई, बारसं कोन्या दिशी ?

चाफा फुलला न्हानीपाशी