संग्रह ३
५१
सोनियाची मुदी कशानं झिजली
माझ्या राघुबानं रास भंडार्याची मापली
५२
नऊ लाख पायरी जेजुरी गडाला
खंडोबाचा वाघ्या लागला चढायाला
५३
आठ दिसा आदितवारी सडा देते गुलालचा
देव जोतीबाचा मला शेजार दलालाचा
५४
आठां दिसां आदितवारी देव जोतिबा घोडयावरी
टाकी नजर खेडयावरी
५५
देवामंदी देव जोतीबा लई मोठा
चैताच्या महिन्यांत त्याच्या फुलल्या चारी वाटा
५६
जोतीबाच्या वाटे, तांबडया करवंदी
तान्हीयाचं माझ्या गुलालाचं गेलं नदी
५७
जोतीबाला जाते, अंबा लागतो इसाव्याला
देव जोतिबाचा डोंगर चढते गोसाव्याचा
५८
सुभानसन्तुबाई, आडरानी तुझा मठ
पोटीच्या पुत्रासाठी मी केली पायवाट
५९
सुभानसंतुबाई, लोटिते तुझी न्हाणी
सुखी ठेव माझी तान्ही
६०
सुभानसंतूबाई, लोटिते तुझी गाडी
बाळाकारणं करते गाडी
६१
सुभानसंतुबाई न्हाणी तुझी ढवळते
पोटीच्या बाळासाठी लोटांगण तुझी घेते
६२
सन्तुबाइला जातां रान लागलं हरभर्याचं
बाळ सांगाती, माझ्या सरदाराचं
६३
सुभानसंतुबाई, यावीस माझ्या घरा
सुखी ठेव माझा हिरा
६४
सन्तुबाईला जाता, रान लागलं जवसाचं
सावळा तान्हा संगं, बाळ नवसाचं
६५
आई तूं मरीमाता तुला लिंबार्याची पाटी
बंधुच्या जीवासाठी मी शेल्यानं खडे लोटी
६६
आई तूं मरीमाता तुला जरीचं पाताळ
आमुच्या खेडयातून स्वारी जाऊंदे शीतळ
६७
आई तूं मरीमाता नांदावे सत्यानं
कर नगरी जतन
६८
आई मरगुबाई, तुला शेवयाचं बोनं
संभाळ माझं तान्हं , तुझ्या नगरीं त्याचं राहणं
६९
मरगुबाई आली सुटे गार वारा
दुनव्या कापती थरथरा
७०
सरगुबाई आली सारी गांवं भ्याली
माझ्या बंधुजीनं तिच्या गाडयाला बैल दिली
७१
देवामंदी देव जमदग्नि वाईट
त्येन बाळाला दिलं खरुजखोकलं नाईटं