संग्रह ६
२६
वांटेवरी ईट, युंग झाल्याती अठ्ठाईस
देवा माझ्या इठ्ठला, कुनी म्हनंना खाली बैस
२७
पंढरपुरी इटेवरी उभा, कडूसरीवर सोगा
इठु मोहन माळेजोगा
२८
माझ्या अंगनात कुनी सांडिला जाईबुका
इठूदेव माझा पोथी वाचून गेला सखा
२९
सरलं दळायाचं मी आणिक घेणार
देव इठ्ठलाचे वारकरी येणार
३०
सोळा सतरा शाका, त्याची परात माझ्या किती
देवा तुमची संतमंडळी हाईती किती ?
३१
पाचीपरकाराचं ताट, रातीं गव्हाचं केलं होतं
माझं इठुद्व जेवाया आलं हुतं !
३२
पाहाटेच्या पारामंदी कर्णा वाजतो दादडीचा
माझ्या इठ्ठलाला निविद खिचडीचा
३३
मध्यानरात्री तुरा रस्त्यामंदी पडला हुता
सावळा इठुराणा गस्तीला आला होता'
३४
आषाढीला न्हाई गेले कार्तिकीला जाईन
देव रथी बैसला पाहीन
३५
अबीरबुकयाचा वास शेल्या अजून कुठला
बारा वरसं झाली मला पंढरी गेल्याला
३६
चला जाऊं पाह्याला पंढरी पाषाणाची
हौस मला दरसनाची
३७
पंढरीला जाते, वाटखर्ची झाली थोडी
सख्या इठ्ठलानं धाडीली घोडागाडी
३८
पंढरीला जाते, संगे भरतार सासुबाई
मला तीर्थाला उणं काई ?
३९
पंढरीच्या वाटे टाळवीणेची गर्दी भारी
नवं निघालं वारकरी
४०
आषाढकार्तिकेला चालते बारा वाटा
माझा इठुदेव पंढरीचा साधु मोठा
४१
पंढरीला जाते कशाला पीठकुटं ?
देव खजिन्याचा उठं !
४२
पंढरीला जातां साधुचा शेजार
टाळवीणेचा गजर
४३
पंढरीला जाते तुम्ही सयानु येतां कोन ?
माझ्या इठूची मला पत्रं आल्याती दोन
४४
पंढरीच्या वाटे सगळी पताक जरायाची
दिंडी आळंद करायाची
४५
नाचत नाचत दिंडी येउंद्या माझ्या वाडया
माझ्या साधुंना पायघडया
४६
पंढरीला जाते तुम्ही सयानु येतां कुनी ?
हरीच्या नामाची तिथं उसवली गोणी
४७
पंढरीला जाते, चंद्र्भागा भावजई
येतां जातां पाय धुई
४८
पंढरीला जातें तुम्ही सयानु येतां कोनी ?
इठु भरला मझ्या ध्यानी
४९
पंढरीला जाते, सोबत नको कुनी
पुढं इठ्ठल , मागं जनी
५०
पंढरीला जाते माझ्या मनी भाव
आधी दरसन घ्यावं, पायरीला नामदेव