संग्रह ८
७६
सावळी सुरत माझ्या इठुची बगाबगा
कानींच्या चौकडयाचं मोती करितं झगाझगा
७७
पंढरपुरमंदी कशाचा गलबला
रुक्माई चोळ्या घेते नामदेव शिंपी आला
७८
पंढरपुरामंदी धोबिनी नाटयेका
चंदरभागेला धुन धुत्यात, श्रीहरीचा पटका
७९
रेशमाचं गोंडं शोभं टाळेच्या टोपणा
इठुदेव माझा समद्या दिंडींत देखणा
८०
पंढरपुरामंदी कशाचा गोमकाला
पंढरीराया माझा दह्यादुधानं न्हाला
८१
संतांचा मेळा हा ग राउळांत थोपला
इठुदेव माझा हजरी घ्येतुंया एकला
८२
पंढरपुरामंदी बडव्यांनी केला घेघा
इठु जनीच्या महालीं बघा
८३
तेतीस कोटी देव इठूच्या माडीवर
तजेला पडे त्यांचा, चंदरभागा लाडीवर
८४
साखरेचे लाडू रखमबाइच्या भानवशी
माझ्या इठुरायाला एकादशी
८५
एकादशीबाई, पंधरा दिसाची पाहुणी
इठुसख्याची मेहुणी
८६
एकादस केली न्हाई वाया गेली
म्होरल्या जल्माची सोडवण झाली
८७
एकादशीबाई, तुझं नांव ग सरस
केळीच्या पानावर इठु सोडितो बारस
८८
एकादशीबाई, तुझं नांव ठेवलं ग कुठं ?
माझ्या इठ्ठलाच्या पेठं
८९
आखाडी एकादस विठ्ठल लालाला
रुक्मीण शिडी लावी वाघाटीच्य येलाला
९०
एकादशीबाई किती निर्मळ तुझा धंदा
गुणाबाई लागली तुझ्या छंदा
९१
सरगीचा देव पापपुन्याच्या घेतो राशी
जल्माला येऊन किती केल्याती एकादशी ?
९२
विठ्ठ्लाला एकादशॊ, येई रुक्माई झरझर
तिच्या ओटीला राजगीर
९३
सकाळी उठून उघडते दारफळी
दारी तुळस चंद्रावळी
९४
सकाळी उठून तोंड पाहिलं एकीचं
दारी तुळस सखीचं
९५
सकाळी उठ्य़्न उघडते दरवाजा
दारी तुळस सारजा
९६
माझ्या अंगनात तुळसी मालनी तुझा वोफा
देव गोविंद घाली खेपा
९७
तुळशी ग बाई तुला न्हाई नाकडोळे
सावळ्या रूपाला देव गोविंद भाळले
९८
तुळसीची माळ कुना हंबिराची बाळ
हरीच्या हृदयावरी लोळं
९९
सकाळी उठून कट्टा लोटते तुळशीचा
तिथं रहिवास गोविंदाचा
१००
तुळसीमाय बहिणी, राहा ग माझ्या दारी
त्रिकाळ दरसन देवाजींचं माझ्या घरी