Get it on Google Play
Download on the App Store

फेब्रुवारी १ - नाम

आपली आपल्याला ओळख करुन घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुध्दी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहाः जीव मुळात परमेश्वरस्वरुपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, " मी तो, म्हणजे परमेश्वर आहे. " इथपासून घसरत तो म्हणतो, " मी त्याचा आहे "; आणि अखेर " त्याचा माझा काही संबंध नाही " इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुध्दीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, ‘ आमचे स्नेही गेले ! याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून, त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वत:च्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे समजून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा ‘ मी ’ आहे त्याचा विसर पडून देहबुध्दी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरुप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे ‘ मी तोच आहे ’ ही भावना होणे. हे कसे साधावे? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वत:ची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे.

मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरुप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीत व्हायला? म्हणून देहबुध्दी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरुप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरुप व्हायला? यालाच ‘ साधू होऊन साधूस ओळखावे ’, ‘ शिवो भूत्वा शिवं यजेत ’, असे म्हणतात.

ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास

स्तोत्रे
Chapters
फेब्रुवारी १ - नाम फेब्रुवारी २ - नाम फेब्रुवारी ३ - नाम फेब्रुवारी ४ - नाम फेब्रुवारी ५ - नाम फेब्रुवारी ६ - नाम फेब्रुवारी ७ - नाम फेब्रुवारी ८ - नाम फेब्रुवारी ९ - नाम फेब्रुवारी १० - नाम फेब्रुवारी ११ - नाम फेब्रुवारी १२ - नाम फेब्रुवारी १३ - नाम फेब्रुवारी १४ - नाम फेब्रुवारी १५ - नाम फेब्रुवारी १६ - नाम फेब्रुवारी १७ - नाम फेब्रुवारी १८ - नाम फेब्रुवारी १९ - नाम फेब्रुवारी २० - नाम फेब्रुवारी २१ - नाम फेब्रुवारी २२ - नाम फेब्रुवारी २३ - नाम फेब्रुवारी २४ - नाम फेब्रुवारी २५ - नाम फेब्रुवारी २६ - नाम फेब्रुवारी २७ - नाम फेब्रुवारी २८ - नाम फेब्रुवारी २९ - नाम