फेब्रुवारी १० - नाम
अखंड रामसेवा ज्यास लाभली । धन्य धन्य त्याचे माऊली ॥ स्वार्थरहीत रामसेवा । याहून दुजा लाभ न जीवा ॥ वाचावे भगवंताचे नाव । कायेने भगवंतसेवा । चित्ती भगवंताचे ध्यान । आपण रहावे रामार्पण । याहून अन्य सेवा । कोणतीही नाही जाण॥ जे जे दिसते ते ते नासते । हा बोध घेऊनी चित्ती। सज्जन लोक वर्तती। तैसे तुम्ही आता वागा जगात ॥ मुला बाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात उदास न व्हावे ॥ प्रपंचाची उपाधि । आता मनात न आणावी ॥ उपाधिवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥ उपाधीत राहिला । परी चित्ताला न वास दिला । ऐसे ठेवा मनीं । राम आणावा ध्यानीं ॥ आता यापरते हित । नाहीं दुसरे जगात । हा माझा बोल । न मानावा फोल ॥ आता राम तुझा झालो । कर्तेपणातून मुक्त झालो । ऐसे आणावे मनात । शक्य तितके राहावे नामात । याहून दुसरे न आणावे मनात ॥ लौकिकांतील मानापमान । यांचे सोडावे उदक । ध्यानी आणा रघूनंदन एक ॥ बायको मुलाबाळांत राहावे । चित्त रामाकडे ठेवावे । होईल तेवढे नाम घ्यावे ॥ अंतरी परमात्मा त्यास । ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास ॥ न सोडावा मनाचा धीर । मागे आहे रघुवीर ॥
वृद्धपण आले । सरीर क्षीण झाले । तरी आपण अभिमान घेऊनच राहिले । त्यास सोडावे दूर ॥ प्रपंचात वृद्धपणी फारसे न पहावे । मुलांस मार्ग दाखवून सूखी राहावे॥ औषध पथ्यपाणी सांभाळावे । पण दुःखी अष्टी कधी न व्हावे ॥ शरीरसंपत्ती क्षीण झाली । तरी वृत्ती क्षीण नाही बनली ॥ जोवर देहाची संगती । तोवर ’मी-माझे’ ही वृत्ती ॥ आता वृत्ती राखावी रामापाशी । दुजी उठू न द्यावी त्यापरती ॥ आजवर जें घडलें । ते प्रापंचिक, पारमार्थिक, असो भले । ते रामकृपेने झाले । हे ठेवावे चित्ती । आता न सोडावा रघुपति॥
वयोमानाने श्रीर होते क्षीण । वागणे आहे फार जपून ॥ देह आळशी न ठेवावा हे खरे । तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे ॥ आता आपण झालो शरीराची अधीन। हे वयोमानाने दृश्य भासत । तरी भाव ठेवा रामापायी । ज्याला क्षीणता कधी आली नाही ॥ चित्ती राखावे समाधान । आनंदाने संसार करावा जाण॥ समाधानाचे करावे जतन । ते नसावे कशावर अवलंबून ॥ लाभहानीत न गुंतवता मन । राखता येईल समाधान ॥ समाधानाला अडवणूक जाण । माझा मीच आपण ॥ देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी । समाधानात राखावी वृत्ति ॥ सर्व कर्ता राम हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम । हे सर्व जुळते म्हणता राम ॥ तरी सर्वांनी घ्यावे रामनाम । व्हावे परमात्म्याचे आपण । कृपा करील रघुवीर ॥