फेब्रुवारी २० - नाम
आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥ व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत करीत जावे। बाकी रामावर सोपवावे ॥ कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण॥ असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर॥ देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची शांति ॥ कर्तव्याचा कधी न पडावा विसर। हृदयी धरावा रघुवीर ॥ ऐसे वागेल जो जनी । त्याने जोडला चक्रपाणि ॥ उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चूकू नये। पण त्यात रामाला विसरू नये॥ ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास॥ देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान । हेच भक्तीचे मुख्य लक्षण ॥ देह करावा रामार्पण । स्वतःचे कर्तेपण सोडून॥ शास्त्री पंडीत विद्वान् झाला। भगवत्पदी न रंगला। व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे॥
भगवंतापाशी राहावे रात्रदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥ रामाचे चरणी घ्यावी गति। ह्हच विचार आणावा चित्ती॥ सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास॥ सर्व कर्मांत अधिष्ठान असे देवाचे। तोच कल्याण करील साचे ॥ भले बुरे जे असेल काही। ते सोडावे रामापायी॥ चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥ आपण व्हावे रामार्पण । सुखदुःखास न उरावे जाण ॥ धन्य त्याची जननी। ज्याने राम आणिला ध्यानी मनी॥ रामावीण दुजे काही । आता सत्य उरले नाही ॥ भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात ॥ ज्याने जिणे केले रामार्पण। त्यासी व्यवहार हेच खरे योगदान ॥
‘माझे ते सर्व रामाचे’ । मानून जगात वागणे साचे। अशास कष्ट नाही फार । मागे पुढे रघुवीर ॥ आपण व्हावे मनाने रामाचे। राम जे करील तेच घडेल साचे॥ चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात न आणावे काही ॥ आता न सोडावी हरीची कास। होऊन जावे त्याचे दास ॥ दास्यत्वाचे मुख्य लक्षण । मालकावाचून न दुसर्याची आठवण॥ भगवंताचा दास झाला । सारे जग मानत त्याला ॥ म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास । हे उरी बाळगावे खास ॥ ‘एकच जगती माझा रघुपति’ । याहून दुजा न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥ भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही ॥ मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दुःखाचे कारण ॥ राम माझा मातापिता । बंधु सोयरा सखा । तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहुन दुजा विचार मनात न आणी ॥