Get it on Google Play
Download on the App Store

हो मी जात लपवली होती..

हो मी जात लपवली होती..

शाळेतल्या सहलीला , डबापार्टी च्या पंगतीत..
गुढद्याला गूढघा घासून तुझ्या बाजूला जागा करताना..!
माझी भाकर सोडून .. तुझ्या पुरण पोळीचा मोह धरतांना
त्या पुरणपोळीच्या एका घासासाठी .. !
मी माझी जात लपवली होती.. !!
 
हळदी कुंकवाच्या गर्दीत शिरुन
त्या मूठभर बोरांसाठी.. !
तेवढाच काय , तुझ्या वर लुटल्या जाणाऱ्या
2 लिमलेट च्या गोळ्यांसाठी.. !
प्रसादात मिळणाऱ्या खडीसाखरेच्या दाण्यासाठी ..
मी माझी जात लपवली होती..!!

तुझी ना ना तऱ्हेची भजनं रटून
तुझ्या पालखीत बेधुंद होण्यासाठी..!
त्याच पालखीच जोखड इवल्याश्या खांद्यावर वाहण्यासाठी..!
त्यातुन मिळणाऱ्या घासभर गोपाळ काल्यासाठी
मी माझी जात लपवली होती..!!

कॉलेज च्या पाहील्या दिवशी
तुझ्या कट्ट्यात घुसण्यासाठी..!
फाटका खिसा लपवत ..
तुझ्या पार्टीत बसण्यासाठी.. !!
एवढंच काय ,
 तर तुझी कापडं -चपला घालुन बिनधास्त मिरवण्यासाठी .. !!
गळ्यातल लॉकेट शर्टात दडवत..
मी माझी जात लपवली होती...!!!

वर्गात लवकर जाऊन तिच्या बाकावर बसण्यासाठी,  नकळतच तिच्या करंगळीला स्पर्श करण्यासाठी..!
स्वप्नात का होईना तिला मिठीत घेण्यासाठी..
आणखी एखादं स्वप्नाचा परवाना मिळवण्यासाठी .. !!
मी स्वतःच देवळाचा हट्ट धरत ,
माझी जात लपवली होती..!

पण आता.. आता वाटत..
परत जाऊन सगळं काही खोडून यावं..!
भाकर -पुरणपोळी सह.. विचारांना जोडून यावं..
माझ्या घरच्या पौर्णिमेला तुला हात धरून ओढून न्यावं..!
जयंतीच्या निमित्यानं तुला त्याच महात्म्य कळू द्यावं.. !!

आता वाटत ,
 कॉलेजाच्या कट्ट्यावर सगळं सांगावं टाकून !
एक आलिंगन देत  मित्रा , 'जयभिम' घ्यावा वाकून !!

चला , झिजावं मरेपर्यंत , माझ्यासारख्या असंख्य भेकाडांसाठी.. जी लपलीत अजूनही जात अंधारात.. !

अन निघावं तिचा हात धरून  , नवे स्वप्न बघायला..
 जगातून जात खोडायला.. समतेचा पूल बांधायला.. !!!

#माझ्याडायरीचंएक_पान