Get it on Google Play
Download on the App Store

महर्षि कर्व्यांच्या स्मृतींना अभिवादन-- प्रा.हरी नरके

महर्षि कर्व्यांच्या स्मृतींना अभिवादन-- प्रा.हरी नरके


महर्षि धोंडो केशव कर्वे एक फार मोठा भला माणूस. अतिशय द्रष्टा. प्रांजळ. आजच्याच दिवशी 3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 

18 एप्रिल 1858 चा त्यांचा जन्म. ते 104 वर्षे जगले. 29 आक्टोबर 1958 रोजी त्यांचा भारत रत्न देऊन सन्मान करण्यात आला.


मात्र पुरस्कार घ्यायला कर्वे दिल्लीला वेळेत पोचू शकले नाहीत. कारण हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलेलं होतं, महर्षि कर्वे नावाचा इसम या गावात आढळून आला नाही.

पुढे त्याची विभागीय चौकशी झाली तेव्हा त्यानं सरकारी उत्तर दिलं, मला श्री धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षी कर्वे हा इसम कोण ते मला माहित नव्हतं. माझ्या दप्तरात तशी नोंद नव्हती.


कर्व्यांनी शतकापुर्वी विधवांसाठी होस्टेल काढणं, महिला विद्यालय व त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना करणं, स्वत: एका विधवेशी लग्न करणं ही सारीच क्रांतिकारक पावलं.


बोटी बंद होत्या म्हणून ते कोकणातून [मुरूड] मुंबईला शिकायला चालत गेले. केव्हढी ही ज्ञाननिष्ठा.  

गावानं त्यांना तालुक्याचं भूषण म्हणून गौरवलेलं असताना कर्व्यांनी एका विधवेशी लग्न केलं म्हणून ब्राह्मण जातीनं त्यांना "जिल्हादूषण" म्हणून वाळीत टाकलं.


कर्व्यांच्या पुनर्विवाहाने नाराज झालेल्या नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहिले, "कर्वे हा खर्‍या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार." जातीबंधने व पुर्वापार चाली पाळूनच अशी लग्ने व्हावीत असे कर्वे मानत असत.


सं. शारदा हे नाटक लिहुन ज्यांनी मराठी रंगभुमीवर सुधारणवादी विचार मांडला त्या देवलांनी कर्व्यांच्या संस्थेला देणगी दिली. त्यातून बांधण्यात आलेल्या मंदिरात हिंदू अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी अट लिहिलेला बोर्ड लावलेला असे.


"पण लक्षात कोण घेतो?" ही विधवांबद्दलची बंडखोर कादंबरी लिहिणार्‍या ह.ना.आपटे यांचा महिला विद्यापीठाला विरोध होता.


मुंबईत शिकवण्या करून राहताना खुप गरीबी कर्व्यांच्या वाट्याला आलेली.

 

फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाल्यावर त्यांनी पुण्यात ब्राह्मण विधवांसाठी आश्रम काढला. त्यासाठी निधी जमवण्याकरिता ते देशभर फिरले. अनेकदा अपमान सोसले. जननिंदा तर कायमचीच पदरात पडायची. 


मुर्ती छोटी पण धीराची. जिद्दीची.


ज्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यांच्याच विधवा लेकीबाळींच्या भल्यासाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही.


त्यांनी 1915 साली आपले आत्मवृत्त लिहिले. 1928 साली त्याला पुरवणी जोडून त्याची सुधारित आवृत्ती काढली. 1958 मध्ये त्यांच्या शतकमहोत्सवानिमित्त 1928 ते 1958 च्या नोंदीच्या आधारे पटवर्धनांनी त्यांचे चरित्र लिहिले. 


ते वाचताना गलबलायला होते.

 

एखाद्यानं समाजासाठी किती सोसावं? 


3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 


वयाच्या सत्तरीत त्यांनी निराश होऊन लिहिलं, भारतीय स्त्रीयांच्या उच्च शिक्षणाला हजारो वर्षे जावी लागतील.


आज स्त्रियांनी उच्च शिक्षणात घेतलेली आघाडी बघून कदाचित आपला अंदाज चुकला याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली असती.


कर्वे बुद्धीने बेताचे होते असे  प्रस्तावनाकारांनी, रॅंग्लर परांजपे यांनी लिहून ठेवलंय. एव्हढा त्याग करणारा बंडखोर माणूस बुद्धीने बेताचा असेल असं मला वाटत नाही. कर्वे यांच्या तीक्ष्ण बुद्धीचंच हे द्रष्टे काम.


मुलींना उच्च शिक्षण का द्यायचं यामागचं कर्व्यांचं म्हणणं असं, "बायकांना प्रपंच चांगला करता यायला हवा. प्रत्येक बाईला किमान 5 माणसांचा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता यायला हवा. त्याशिवाय तिला पदवी मिळता कामा नये. गृहीणीची कर्तव्ये व जबाबदार्‍या यांचे शिक्षण पदवीला दिलेच पाहिजे. स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा बाईला अत्यावश्यक."


या कामाला लोकमान्य टिळकांचा पाठींबा मिळावा म्हणून कर्वे त्यांना भेटले. स्त्रीयांना उच्च शिक्षण देता कामा नये अशी भुमिका टिळकांनी घेतली. ते म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रिया संशयवादी बनतील व आपले गृहसौख्य लयाला जाईल."


शिक्षणखात्यातले एक उच्च अधिकारी तर म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रीया स्वैराचारी बनतील आणि वाट्टेल तसले बूट आणि कपडे घालून नाचरेपणा करायला लागतील."


1927 साली अखिल भारतवर्षीय स्त्रीयांची पहिली शैक्षणिक परिषद झाली. तिने ठराव केला, "बायकांना मातृत्वाचा आदर्श आणि घर सुंदर, आकर्षक व स्वच्छ कसे ठेवावे याचे उच्च शिक्षण दिले जावे."


मुंबई विद्यापीठात स्थापनेपासून वकिलीची, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत होती. 1871 पासून विद्यापीठाने मराठी शिकायला बंदी घातली.


कर्वे म्हणतात, मराठी माणूस हा भांडखोर असणार हे ठरलेलेच आहे. त्याने मराठी भाषेची साथ सोडल्यानेच त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे.

कर्वे एम.ए. ला गणितात नापास झाले होते. आपण फार भित्रे आणि लाजाळू होतो असेही कर्वे म्हणतात.


त्यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले तेव्हा त्यांच्या बायकोचे वय 9 वर्षे होते. ती एका मुलाला,रघुनाथाला जन्म देऊन अकाली गेली.


कर्व्यांच्या आईची चार मुले जन्मत:च गेली म्हणून पुढे त्यांच्या आईने एका मुलाचे नाव भिकू ठेवले व कर्व्यांचे नाव धोंडा ठेवले. अशी नावे शूद्रांमध्येच ठेवली जात.

 

कर्व्यांनी गावी शाळा काढली तेव्हा त्या शाळेत ब्राह्मणेतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता.


कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महर्षि वि.रा.शिंदे यांच्या विधवा बहिणीला  प्रवेश दिला गेला नाही. कारण संस्थेचा नियम होता फक्त ब्राह्मण विधवांनाच प्रवेश मिळेल.


पुढे विद्यापीठात मात्र तो शिथिल करण्यात आल्याने पहिल्या 25 वर्षात तिथे शिकलेल्या 201 मुलींपैकी 1 धनगर, 1 तेली, 4 वाणी, 11 मराठा व 184 ब्राह्मण होत्या.


ब्राह्मणांनी बेटीव्यवहार हा फक्त ब्राह्मणातच करावा, पंक्तीव्यवहारात पुर्वपरंपरा पाळावी असे कर्वे सांगतात.


अस्पृश्य जर स्वच्छ, संभावित आणि रितीभाती पाळणारा असेल तर त्याच्यासोबत भोजन करायला मात्र आपली हरकत नाही असेही कर्वे म्हणतात.


स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सर्व भारतीयांचा कर्वे आवर्जून ऋणनिर्देश करतात मात्र ते चुकूनही महात्मा फुल्यांचा अथवा सावित्रीबाईंचा उल्लेख करीत नाहीत.


या पुस्तकात फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या नावाला जागासुद्धा नाही याने मन खंतावते.


कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिकवणारे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे पहिले लेखक म्हणजे प्रा. गं.बा. सरदार होत. त्यांनी आपले हे पुस्तक कर्व्यांना सप्रेम भेट दिलेले होते. 


ते मला 25 वर्षांपुर्वी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातील रद्दीच्या दुकानात मिळाले. ते आजही माझ्याकडे सुरक्षित आहे.


महर्षि कर्व्यांच्या कामाला काही व्यक्तीगत आणि काही काळाच्या मर्यादा असतीलही पण त्यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री-पुरूष समतेच्या वाटा सुकर केल्या हे विसरता कामा नये.


102 वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी महिला विद्यापीठाची पुण्यात पायाभरणी करणार्‍या महर्षि कर्व्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.


- प्रा.हरी नरके