धडपडणारा श्याम 4
इंग्लंडवर स्वारी करणारा वुइल्यम किना-यावर उतरताना पडला. त्याच्या सैनिकांस तो अपशकुन वाटला. परंतु वुइल्यम काय म्हणाला? ''हे पाहा, इंग्लंड माझ्या हातात आलं आहे. हे मी आता कधी तरी सोडीन का?'' असे वीरोचित उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडले.
बाहेरची सारी सृष्टी मनुष्याच्या हदयावर, बुध्दीवर पदोपदी परिणाम करु पाहात असते. आकाशात ढग येतात, मनुष्यही खिन्न होतो.' आज दुर्दिन आहे' असे तो आंबट तोंड करुन म्हणतो. उकाडा फार होत असला, म्हणजे माणसाचा जीवही गुदमरतो. बाहेरची वादळे पाहून त्याच्या मनातही वादळे उत्पन्न होत असतात. बाहेरचे हास्य पाहून तो हसतो. बाहेरचे रडे पाहून तो रडतो. डोक्यावर पागोटे असले, म्हणजे त्याला शुभ वाटते. कोणी बोडका आला, तर त्याला अशुभ वाटते. केवढी ही गुलामगिरी आहे! बाहेर कसलीही परिस्थिती असो, तिच्यावर स्वार होण्यासाठी धडपडणे, हे मानवी आत्म्याचे जन्मसिध्द कर्म आहे. कसले शुभ नि कसले अशुभ! शुभाशुभांचा जन्मदाता मी आहे. मी मानले तर हे शुभ आहे. मी मानले तर हे अशुभ आहे. मी मानले तर हे दु:ख आहे, नाही तर हे सुख आहे. पवहारीबाबांना साप चावला. ते म्हणाले, '' प्रियकर चुंबून गेला!'' राणाजीने दिलेला विषचा पेला मीरेला अमृताप्रमाणे वाटला!
परिस्थिती की माझी चित्शक्ती? शेवटी माझी चित्शक्तीच विजयी झाली पाहिजे. मी मृत्युतून अमृतत्व निर्माण करीन. मातीतून अमरावती घडवीन. अंधकारातून प्रकाश प्रगटवीन. जगातील सर्व महान विभूतींनी हे महान सत्य जीवनात अनुभविले आहे. त्यांचा आत्मा कधीही कशानेही चिरडला गेला नाही. कृष्णाच्या अंगावर भगदत्ताने जोराने, रागारागाने अंकुश फेकून मारला. परंतु त्या अंकुशाचे काय झाले? श्रीकृष्णाच्या वक्ष:स्थळावर त्या अंकुशाची वैजयंती माळ झाली! ह्याचा अर्थ काय? श्रीकृष्णाला का लागले नाही? त्याच्या छातीतून का भळाभळ रक्त बाहेर आले नाही? रक्त बाहेर आले, प्रहार झाला; परंतु तो प्रहार श्रीकृष्णांना फुलांप्रमाणे सुखस्पर्शद झाला! ध्येयासाठी धडपडणा-या जीवाला सारे आघात, सारे प्रहार, सारे कटू अनुभव, म्हणजे मंगल-मधुर पूजाच वाटत असते. ती महादेवाची महापूजा असते.
लोकमान्यांना आठ साली अटक झाली. त्यांच्या स्नेह्यांना अपरंपार दु:ख झाले. त्यांना चैन पडेना; परंतु रात्रीच्या वेळी त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या स्नेह्यांना लोकमान्य कोणत्या स्थितीत दिसले? तो महापुरुष शांत झोपला होता. 'शांताकांर भुजगशयनम्।' महापुरुष सहस्त्र फणांच्या सर्पावरही शांत पहुडतो. बाणंच्या शय्येवर भीष्म सुख-संवाद करीत पडून राहातात! महात्माजींना पूज्य विनोबाजीच्या बंधूंनी एकदा विचारले, ''लोक तुमच्यावर वाटेल ती टीका करतात. तुम्हांला काय वाटंत?'' ते म्हणाले, '' हदयात जिवा-शिवाचे संगीत अखंड सुरुच आहे. लेशही शांती अंतरीची ढळत नाही. वरती हजारो लाटा उसळत असतात; परंतु खाली, आत, अंतरी, अनंत सागर शांत, गंभीर असतो. आकाशात वादळे येतात, जातात; कधी पौर्णिमा तर कधी अमावास्या; परंतु आकाश निळे निळे, पाठीमागे अभंग, निर्लेप असे असते''.
अशी ही आत्म्याची स्वयंभू महान शक्ती आहे; परंतु संस्कारांनी, भ्रामक कल्पनांनी ही दिव्य शक्ती आपण मारत असतो. अमूक पक्षी ओरडला, अमूक पशू रडला, अमूक प्राणी आडवा गेला, की आमच्या आत्म्याचे सामर्थ्य लगेच खच्ची होते. कोणाची रिकामी घागर पाहिली,की आमचे सामर्थ्य रिते होते! भरलेला उदक-कुंभ पाहिला, म्हणजे आत्म्यात सामर्थ्य भरते! असल्या बाहेरच्या रिकाम्या वर भरलेल्या मडक्यावर का माझे सामर्थ्य अवलंबून आहे? मग मीही एक मडकेच आहे म्हणायचे!
मित्रांनो, आपल्या समाजातून हा सारा प्रकार झाडून, फेकून दिला पाहिजे. स्वत:चे सामर्थ्य, स्वत:चा आशावाद, स्वत:ची दिव्यता, स्वत:चा ध्येयवाद, स्वत:च्या आकांक्षा; हयांना आपण आपल्याच भ्रामक कल्पनांनी पुरुन टाकू नये. आपण ध्येयनिष्ठाने झगडत राहिले पाहिजे. मारणाला शरण न जाता जरी मरण आले तरी ते मरण नव्हे; ते जीवनच होय. मरण तेव्हाच मारते, जेव्हा ते मला रडवते, मला विवश करते, मला दुबळे करते, ज्या मरणाला मी हसत मिठी मारली, त्या मरणाने मला न मारता, ते मरणच मी मारिले, असा त्याचा स्वच्छ अर्थ आहे! परंतु हा विचार त्या वेळेस मजजवळ होता का? डोक्यावर टोपी नाही, एवढ्याने का माझे डोके अमंगल झाले? मी लहान होतो. मला रडू आले. माझी अशी का फजिती व्हावी, देवाने असा दावा का साधावा, असे मला वाटले.