धडपडणारा श्याम 41
मधली सुट्टी झाली. मी खोलीवर आलो. मी पडलो. मध्येच मी डोळे मिटी होतो, मध्येच उघडीत होतो. तेथे दोरीवर एक फडका होता. एकदम मला तो दिसला. मी उत्कंठेने, भवभक्तीने उठलो. तो फडका घेतला व माझ्या डोक्याला गुंडाळला पुन्हा सोडून तो हदयाशी धरला. नंतर त्या फडक्याने माझे हात मी बांधले. त्या फडक्याशी मी खेळत होतो. शेवटी पुन्हा तो डोक्याला बांधून, मी निजलो.
''श्याम, निजलाससा?'' सखारामने विचारले.
''सहज,'' मी म्हटले.
''डोकं का दुखतंय? ही कसली घाणेरडी चिंधी बांधली आहेस? माझा मफलर आणून देऊ का?'' त्याने विचारले.
''नको,'' मी म्हटले. '' सोड हे फडकं. हे वाईट दिसंतं,'' असे म्हणून त्याने ते फडके ओढले. '' राहू दे रे सखाराम,'' मी म्हटले.
'' घामट वास येतोय त्याला,'' तो म्हणाला.
''अत्तराचा वास आहे त्याला,'' मी म्हटले.
''किती डाग पडले आहेत,'' तो म्हणाला.
''किती पवित्र आहे,'' मी म्हटले.
''श्याम, तू बावळट आहेस. तू आज कुठे गेला होतास ते खांदयावर ओझं घेऊन?'' त्याने विचारले.
''थोर, पवित्र माणसांना निरोप द्यायला,'' मी म्हटले.
'' सारी मुलं तुला हसत होती,'' तो म्हणाला.
'' परंतु देव हसत नव्हता,'' मी म्हटले.
'' तो कुठे तुला दिसला?'' त्योन थट्टेने विचारले.
'' माझ्या हदयात,'' मी शांतपणे म्हटले.
'' वेडा आहेस तू.ऊठ, वेळ झाली.'' असे म्हणून सखाराम निघून गेला.
मी ती चिंधी पुन्हा घेतली. माझ्या मस्तकाभोवती गुंडाळली. म्हातारबायचे ते फडके होते. त्यातच तिने माझ्यासाठी पहिल्या दिवशी पीठ आणले होते. ते फडके जगाला अपवित्र, घाणेरडे होते. परंतु माझे प्रेमसर्वस्व त्यात होते. माझ्या उशाखाली तो मळका रुमाल मी ठेवून दिला. मी शाळेत गेलो.
संध्याकाळी घरी आल्यावर, साबण लावून लावून, तो मळका रुमाल मी धुतला. तो स्वच्छ झाला; परंतु फाटला. स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते. पवित्र होण्यासाठी जळावे लागते. अंकुरित होण्यासाठी मातीत गाडून घ्यावे लागते. माझ्या ट्रंकेत ती चिंधी मी ठेवून दिली. कितीतरी दिवस ती चिंधी माझ्याजवळ होती.
गडयांनो, माझ्या जीवनात असे सहज प्रेम मला ठायी ठायी मिळाले आहे म्हणूनच माझ्या एका श्लोकात मी म्हटले आहे:
कशास चिंता करिशी उगीच
जिथे तिथे माय असे उभीच।
जिवा कशाला करितोस खंत
जिथे तिथे हा भरला अनंत॥