धडपडणारा श्याम 13
सखाराम सोवळे नेसून भांडी घेऊन गेला. ती दुसरी मुलेही गेली. मी खोलीत एकटाच होतो. माझा आशावाद मी एकटा बसलो असता टिकला नाही. खरोखरच आपण दुदैवी आहोत, असे मला वाटले. दहा रुपये मला हाताने स्वंयपाक करायला दोन महिने पुरले असते. दादाने येताना पाच रुपये मला दिले होते. मी नको नको म्हणत असता त्याने माझ्या खिशात ठेवले होते.
''श्याम, घे हो. माझ्याजवळ जास्त नाहीत. एकटा दूर जात आहेस. असू देत जवळ. मी घरी भाऊंना पाच रुपये पाठवतो,'' असे म्हणून दादाने ते दिले होते. मावशीनेही पाच दिले होते. मावशीने दिलेल्या पाचांतून मी तिकीट वगैरे काढले. घरचे वडिलांनी दिलेले दहा रुपये शिल्लक होते. परंतू ते गेले. आता मी कोणाकडे पैसे मागू? जेवायचे कोठे? खोलीचे भाडे? मी सचिंत बसलो होतो.
सखाराम आला. त्याने ताकही आणले होते.
''आज ताकही आहे,'' मी म्हटले
''जरा लवकर गेलं म्हणजे मिळतं. उशिरा गेलं म्हणजे संपतं,'' तो म्हणाला.
''तिथे सारं प्रमाणात असंत ना?'' मी विचारले.
''ताकं बेताचं असतं. ते एखादवेळेस खुंटतं. परंतु मी कोकणातला, म्हणून माझ्यावर जरा कीव करुन, मला अधिक देतात. माझी आठवण ठेवून एखादवेळेस काढूनही ठेवतात,'' सखाराम म्हणाला.
''आजची आमटीही बरी दिसत्येय,'' मी चव घेऊन म्हटले.
''तिथे आमटीसाठी कोण धडपड? जे आधी येतात. ते वरची फोडणी-फोडणी घेऊन जातात!ढवळून घ्या, ढवळून घ्या असं कुणी सांगत असतात. भाकरी भाजून तिथे जमिनीवर टाकलेल्या असतात. चांगल्या चांगल्या भाजलेल्या लवकर जाणारे घेऊन जातात. उशिरा जाणा-यांस गाळगाळ मिळतो,'' सखाराम म्हणाला.
''उशिरा जाणा-यास जास्तही मिळत असेल, उरलंसुरलं त्याला मिळत असेल,'' मी विचारले.
''आचारी घेऊन जात असेल, त्याच्या घरी उपयोगाला येत असेल,'' सखाराम म्हणाला.
''फुकट घ्यायचं नि पुन्हा निंदायचं हे पाप आहे. जाऊ दे. सखा, आपण दुसरीकडे खोली घ्यायची ना? इथे नको,'' मी म्हटले.
''संध्याकाळी पाहू,'' तो म्हणाला.
''त्या मशिदीच्या तिकडे आहे म्हणत होतास ना?'' मी विचारले.
''एक खोली आहे, तिला फक्त दार आहे. आत खिडकी बिडकी काही नाही. महिना आठ आणे भाडं आहे. लहानशी खोली आहे, दोघांना ती कशी पुरेल?'' सखाराम म्हणाला.
''मी तिच्यात राहीन. स्वस्त आहे. स्वस्त भाडं व चांगली खोली, असं सारं कस जमणार? मी म्हटले.
''त्या खोलीच्या शेजारी दुसरं एक घर आहे. तिथेही एक खोली आहे. तिच्यात उजेड आहे. बारा आणे आहे तिचं भाडं. पण तीही दोघांना पुरणार नाही.'' सखाराम म्हणाला.
''तीत तू रहा. आठ आण्यांचीत मी राहीन. चार आण्याची कुठे असली तर तीही मला चालेले. आपण शेजारी-शेजारी राहे, आपण संध्याकाळी पाहू हो,'' मी म्हटले.
आम्ही दोन्ही मुदा व सर्व भाक-या संपवल्या.
''सखाराम, संध्याकाळी काय करायचं? मी म्हटले.
''थंडा फराळ! नहीतर आणा दोन आण्याचे आणू आंबे नि करुन फलाहार,'' तो म्हणाला.
''सखाराम, मी तुझ्यावर भार घालता काम नये. माझं मन मला खातं,'' मी म्हटले.
''तू उपाशी आहेस, असं माहीत असता, मला तरी एकटयाला खाववेल का रे? किती झालं, तरी दापोलीच्या शाळेतले आपण वर्गबंधू, एवढं मनाला लावून घेऊ नकोस,'' सखाराम म्हणाला.