भिकारी
परवा ट्रीपला गेलो होतो. यु पी साईडला. यु.पी. पंजाब. जम्मू. काश्मीर.
जम्मू काश्मीर बद्दल खूप उत्सुकता होती. भारतातलं नंदनवन. हिंदू राजा. मुस्लिम जनता. भारताची फाळणी. 370 कलम. बरच काही वाचलं होतं. शिवाय यु.पी कडील कल्चर. देव देवतांच्या वेगवेगळ्या परंपरा.....
दोन तीन दिवस प्रवास. एकदाचं मेरठला पोहोचलो. त्या रात्री विश्रांती घेतली.
दुसऱ्या दिवशी जम्मूला गेलो. तेथून वैष्णोदेवीला 13 कि.मि. चालत प्रवास. दोन-तीन कि. मी. प्रवास झाला असेल. अचानक रस्त्यावर मला चिनाप्पा सारखा एकजण दिसला. मी चमकलो. पुढे जाऊन बघितलं तर अनोळखी भिकारी होता. तसेच पुढे चालत राहिलो. पण चिनाप्पा डोळ्यासमोरुन हालत नव्हता.
चिनाप्पा हिवऱ्याचा. माझा क्लासमेट. डोळ्यानं अधु. तोंडानं बोबडा. शरीरानं अपंग. कसातरी खुरडत तो शाळेत येई. पार शेवटच्या कोपऱ्यातील बाकावर बसे. त्याच्या शेजारी कुणीही बसत नव्हतं. शिक्षक पण त्याला लांबूनच छडी मारायचे. अभ्यासात सुमार. पण दिवसभर तो गुणगुणत असायचा. आपल्याच तंद्रीत. आभाळाकडं डोळे लावून. तो शाळेत असला काय, नसला काय, कुणालाचं फरक पडत नसे.
माझ्याशी तो कधीतरी बोलायचा. गणिताची वही मागायचा. शाळा सुटली की परत द्यायचा. एकदा त्यानं अशीच वही घेतली. पण त्या दिवशी परत दिली नाही. उद्या देईल म्हणून मी गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी तो शाळेतच आला नाही. असेच दोन तीन दिवस गेले. मग मी त्याच्या घरी जायचे ठरवले.
एका रविवारी मी आणि चंदू त्याच्या घरी गेलो. जुनाट मोडकळीस आलेलं घर. आई भाकरी करीत होती. वैलावर कालवणाच डीचकं. तव्यात एक भाकरी. चुलीचा आर बाहेर ओढून त्यावर उभी केलेली दुसरी भाकरी. दोन्ही हात पिठानं भरलेलं. केसं भुरभुरतेली. घामानं कुंकू विस्कटलेलं. डाव्या हातानं केसं माग सारत त्याची आई भाकरी थापतेली....आणि चिनाप्पा खुडूक होऊन झोपलेला.
आम्ही आल्याचं बघून आई म्हणाली, कुठलं रं तुमी? का आलाय? आम्ही सांगितलं, "वही न्यायला आलोय". आईनं दोन शिव्या हासडल्या. त्याला उठवलं. चिनाप्पानं वही दिली. आम्ही निघून आलो.
पुढे बरेच दिवस चिनाप्पाच्या आईचं विस्कटलेलं कुंकू सतत नजरेसमोर दिसायचं.
नंतर नंतर चिनाप्पाने जवळीक वाढवली. कधी कधी बोलु लागला. मागं मागं फिरू लागला. चिनाप्पाला सख्खी आई नव्हती. त्याच्या लहानपणीच आई वारलेली. बापानं दुसरं लग्न केलं. चिनाप्पाला दोन सावत्र भाऊ. एक सावत्र बहीण. पण ते याला जवळ करत नव्हते. त्याच्याशी बोलत पण नव्हते. बाप दारूडा. कधी तर बाजारातून खायला आणायचा. फक्त तीन पोरांना. उरलं तर चिनाप्पाला. नाही तर चिनाप्पा त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचा.
आई खरकटी भांडी घासायला सांगायची. त्याशिवाय भाकरी नाही. चिनाप्पा उपडं बसून कसातरी घासायचा.
शाळेत त्याला दप्तर नसायचं. वायरची पिशवी. त्यात फाटक्या दोन वह्या. बिन टोपनाची एखादी पेन. झालं याचं दप्तर. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो मागे मागे यायचा. आम्ही जेवताना आशाळभूतपणानं बघत बसायचा. कुणी दिली तर भाकरीला नाही म्हणायचा नाही. गपचिप खाली मान घालून खात राहायचा.
एकदा खूप पाऊस झाला. दुपारीच शाळा सुटली. आम्ही सगळे घरी गेलो. पाऊस झाला की ओढ्याला पाणी येई. मग गावात जाता येत नसे. म्हणून लवकर शाळा सुटायची.
त्या दिवशी चिनाप्पा शाळेतच झोपला. उपाशी. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यावर कळालं. हा इथेच होता. रात्रभर. एकटाच. त्याचं धाडस बघून त्याचीच धास्ती वाटायला लागली. त्याची विचारपूस करायला कुणी आलं नाही. चौकशीला ही कुणी आलं नाही. असा हा चिनाप्पा. घरात असूनही बेवारस. जिवंत असूनही नसल्यासारखा.
चिनाप्पा नववीपर्यंत आमच्या वर्गात होता. कधी शाळेत यायचा. कधी नाही. नववीच्या सहामाही नंतर तो एकाएकी गायब झाला. वर्गातील तो कोपरा कायमचा रिकामा पडला. त्याने शाळा सोडली. आम्ही सर्व विसरून गेलो.
पुढे खूप वर्षांनी एकदा चिनाप्पाचा बाप भेटला. सहज विचारलं तर, म्हणाला " तो घर सोडून गेलाय" जिवंत आहे की नाही हे ही माहित नाही".
खूप वाईट वाटलं. सावत्र आईची क्रूर वागणूक. बापाची दारू. सावत्र भावांची शिवता शिवत होऊ नये म्हणून धडपड. अपंग शरीर. अधू डोळे. घरदार..आईबाप...भाऊ-बहीण... समाज.. गाव... सगळ्यांतून उठवलेला एक शापित जीव. अर्थच नव्हता जिंदगीला.
पण तरी सहन करत तो जगत होता. आता मात्र कुठे असेल काय माहिती?
कधीतरी गेट- टुगेदरला चिनाप्पाची आठवण यायची. वर्गमित्र म्हणायचे, "कुठे असेल काय माहित?" एकजण म्हणाला,.अरे तो यु.पी.त आहे. हरिद्वार, वैष्णोदेवी या साईडला. भिक्षा मागतो. बाप जाऊन पैसे घेऊन येतोय, वगैरे...
आज या साईडला फॅमिली ट्रिप आहे. त्यामुळे चिनाप्पाची आठवण येत होती.
कदाचित असेल कुठेतरी.....
भेटेल का ?
ओळखल का ?
त्याची नजर असेल की पूर्ण गेली असेल ?....
पण तो कुठे दिसलाच नाही.
ट्रीपच्या नादात माझ्याही नंतर लक्षातूंन गेलं....
आम्ही मसुरीला गेलो. निसर्ग सौंदर्य अनुभवायला. तिथे दोन दिवस काढले. नंतर हरिद्वारला जायचं ठरलं. गंगानदीचं महात्म्य अनुभवायला.
सायंकाळी ४ चा सुमार. आभाळ दाटून आलेलं. आम्ही हरिद्वारला पोहोचलो. रुमवर साहित्य ठेवलं. गंगा नदीवर गेलो. ही$$ गर्दी. नदीचं बर्फासारखं थंड पाणी. घाटावर उभा होतो. म्हातारीचा कापूस. चणेफुटाणे. आईस्क्रीम. आभाळात उडणारे भोवरे. गाणी म्हणणारे भिकारी.
आम्ही पुढे चालत होतो. थोड्या अंतरावर एक भिकारी गाणं म्हणत होता. दोन्ही पायाने उपडी केलेली बरणी. त्यावर दोन्ही हाताच्या बोटांनी ढोलकीचा आवाज. "क्या हुआ तेरा वादा" या चालीचं सुरातलं गाणं. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं.
.....।।आणि वीजच चमकली.
लख्खं प्रकाश पडावा तसा मला चिनाप्पा दिसला. होय चिनाप्पाच तो.
मी पळतच गेलो. त्याच्या हाताला धरलं. त्याने क्षणातच गाणं थांबवलं. किलबिलत्या डोळ्यांनी बघू लागला. मी म्हटलं अरे मी kp . तुझा क्लासमेंट. त्याने माझ्या दोन्ही हाताला धरून गप्पकन् खाली बसवलं. अधू डोळ्यांनी बघू लागला. पण त्याला नीट दिसत नव्हतं. मग त्यानं थोडं जवळ ओढलं.
काही वेळाने म्हणाला, " काय करतोस आता? कुठे नोकरी बिकरी लागली का न्हाय ? किती वर्षांनी भेटतोय आपण ?"
मी म्हटलं, "मी आता वकील झालोय". तो थोडा बाजूला झाला. थोडा वेळ असाच गेला. त्यानं त्याचं सगळं साहित्य गोळा केलं. बिन टोपणाची बरणी. हातरायची सतरंजी. एक काठी. जर्मनची पाटी. मोकळं पोतं. हातातली दोन कडी. स्टीलचा डबा. गुंडाळून ठेवलेली मळकी लुंगी. सगळं झोळीत भरलं. झोळी खांद्यावर टाकून तो उठला. म्हणाला, "या माझ्या मागोमाग". मी म्हटलं, "अरे स्नान करतो.मग जाऊया. पण तो ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, "मी आता सोडणार नाही. चला लवकर".
आम्ही चालत चालत मेन रोडला आलो. स्टेशन सोडून आणखी पुढे लांब गेल्यावर टॅक्सी उभी होती. दोघेही टँक्सीत बसलो. टॅक्सी धाऊ लागली. थोडे अंतर गेले.
मी विचारलं, कुठे निघालोय? तो म्हणाला, घरी. माझ्या घरी. स्वतःच्या घरी.
थोड्या वेळाने मी विचारलं,.गावी का येत नाहीस ? त्याच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. म्हणाला, " नको जखमेवर मीठ टाकूस. मी बेवारस. कोण आहे गावाकडे ?"
तो बाहेर बघू लागला. गार वारा सुटलेला. त्याची फाटकी कपडे फडफडतेली....आणि तो सांगू लागला,
"सहामाईची परीक्षा संपली आणि मला एका घरात कामाला ठेवलं. आई शाळा सोड म्हणू लागली. माझा शिकण्याचा आग्रह होता. पण ते ऐकत नव्हते. एके दिवशी आई आणि भावानं खूप मारलं. रात्रभर उपाशी ठेवलं. दुसर्या दिवशी तोंड सुद्धा धुवू दिलं नाही. हाकलूनच काढलं.
शेजारी-पाजारी गोळा झाले. पण ते तरी काय करणार?
मग मी गाव सोडलं....
खुरडत खुरडत दुसऱ्या गावी जायचं. कुणीतरी रुपया दोन रुपये द्यायचे. मग त्याचा भजीपाव घ्यायचा. कुठल्यातरी देवळात झोपायचं. पुन्हा पूढच गाव. मजल-दरमजल करीत इथं आलो. इथं मला आता २२ वर्षे झाली. पहिल्या पाच-दहा वर्षांतच गावाकडे बातमी कळली. मी हरिद्वारला आहे. घरपण घेतलय. मग बाप शोधत आला. गाठ पडल्यावर घरी नेलं. नवीन कपडे घेतले. दोन दिवस ठेवून घेतलं.जाताना हातावर पाच हजार रुपये ठेवले. म्हणलं, प्यायची कमी कर. त्यानंतर महिन्या-दोन महिन्याला गावाकडून कोणीतरी येत राहिलं. कधी बाप. कधी भाऊ. कधी सावत्र आई. कधी बहीण. कधी कधी सगळं घरदार.
आता गावाकडचं जुनं घर पाडून नवीन बांधलय. स्लॅबच आहे. थोरल्या भावाचं लग्न झालं. त्यानं बायकोला यातलं काही सांगितलेलं नाही. फक्त पैसे न्यायला येतो. मी पण कधी विचारलं नाही. बाप काही सुधारला नाही. उलट जास्त पेतोय. भाऊ काहीही काम धंदा करत नाही. माझ्याकडे अधुन मधून येऊन पैसे घेऊन जातात....
आम्ही जैहरिकल गावात पोहोचलो. थोड्या वेळाने टॅक्सी थांबली. आम्ही खाली उतरलो. टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाहीत. न विचारताच तो निघून गेला. मी मागे वळून बघितलं तर दोन मजली मोठा बंगला. "दानत" बंगल्याचे नाव. माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आम्ही आत आलो. चहापान झालं. म्हणाला," वहिनी आणि मुलांना घेऊन ट्रिप संपेपर्यंत इथेच राहायचं. शपथ आहे तुम्हाला. नाही म्हणू नका. मोबाईल काढला, म्हणाला नंबर सांगा वहिनीचा.
रात्री बाहेरून जेवण मागवलं.सगळी जेवली. गप्पा मारताना म्हणाला दरवर्षी अपंगांना 51 हजार रुपये देतो. गावी पण पैसे देतो. गोरगरिबांना मदत करतो. दिवसभर गाणी म्हणायची. भिक्षा मागायची. कधी मिळते. कधी नाही. पण कधीकधी दोन-दोन हजार मिळतात. जगण्यापुरते ठेवतो. बाकी गरजवंतांना देऊन टाकतो.
मी म्हणालो, " मग एवढा मोठा बंगला ?" तो हसत-हसत म्हणाला, "गैरसमज आहे तुमचा.
हा अंध मुलांचा आश्रम आहे. सध्या १३५ मुले मुली आहेत. भिक्षा मागून मी चालवलाय. सरकारही देणगी देतय. माझ्यासाठी असं मी काहीच केले नाही. तो भरभरून बोलत होता..... आणि आम्ही ऐकत होतो.
नंतर अखंड ट्रीप मध्ये आम्ही कुठल्याच देवाला गेलो नाही. दोन दिवस तेथेच थांबलो.
तिसऱ्या दिवशी चिनाप्पाच्या पायाला स्पर्श केला. जड अंतकरणाने त्याचा निरोप घेतला. आणि परतीच्या प्रवासाला निघालो.
रेल्वे भरधाव चालली होती. दिवस मावळतीला निघालेला. आभाळ दाटून आलेलं. आत्ता पाऊस सुरू होईल अस झालेलं. वेगळ्याच भावना निर्माण झालेल्या.
चिनाप्पा डोळ्यासमोरुन हालत नव्हता. आता परतताना प्रश्न पडत होता, भिकारी कोणाला म्हणायचं?
ॲड. कृष्णा पाटील.
विटा रोड, तासगाव.
जि. सांगली.
मोबा. 9372241368.