Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णसखा उद्धव

सन १९८२.हैदराबादचे दोन फोटोग्राफर मित्र हिमालयात फोटो काढत फिरत होते. आणि अचानक त्यांना वाघ दिसला. ते त्या वाघाच्या मागे गेले असता वाघ एका गुहेत शिरला. त्याच वेळी त्यांना एक जराजर्जर अवस्थेतील एक योगी दिसला. त्यांचं ते रुप पाहून एक मित्र तिथेच बेशुद्ध पडला. मात्र दुसऱ्याने फटाफट काही फोटो काढले. (तेव्हा ३६ फोटोंचा रोल होता. ) आणि तोही बेशुद्ध पडला.

      मात्र जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा दोघेही डोंगराच्या पायथ्याशी होते!

     नंतर जेव्हा त्यांनी ते फोटो डेव्हलप केले तेंव्हा एकच फोटो व्यवस्थित आला होता. तो म्हणजे हा फोटो! (फोटो झूम करून बघितल्यावर वाघ दिसेल. )

     हा फोटो फिरत फिरत नाना महाराज तराणेंच्या एका भक्ताकडे आला. तेव्हा नानांनी सांगितले, "हे तर उद्धव! कृष्णसखा उद्धव! "

         नानांना कसे माहिती कि हे उद्धवच आहेत म्हणून? तर खरी गोष्ट अशी आहे की, नाना उद्धवांना प्रत्यक्ष भेटले होते! सन १९२० साली नाना हिमालयात गेले होते. त्यावेळी नानांचे वय २३-२४ असेल. नाना एकटेच होते. त्या दरम्यान बद्री केदार मार्गे गंगोत्रीला जाताना नाना वाट चुकले. अत्यंत बिकट अशी वाट. दुर्गम, दुस्तर मार्ग! हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात नाना एकटेच फिरत होते. प्रचंड थंडी! त्यातही घशाला कोरड पडलेली. दिवस मावळत आलेला. त्याच वेळी नानांना एका गुहेतून प्रकाश दिसला. नाना प्रकाशाच्या दिशेने गेले.

   गुहेच्या दारी पोहोचताच तेथे दोन मोठे वाघ बसलेले नानांनी  . जणू साक्षात मृत्यू समोरच होता! पण दत्त भक्त नाना निश्चल उभे राहिले. तेवढ्यात त्या दोन वाघांना आतून बाजूला होण्याची आज्ञा झाली. आणि ते दोन्ही वाघ बाजूला झाले!

     नाना आत गेले. तर आतमध्ये एक विलक्षण दृश्य नानांनी बघितले. आत वाघां समवेत एक योगी सिद्धासनात बसले होते. दिव्य, तेजस्वी असे ते रुप होते!

     नानांशी त्यांनी संस्कृत मधून संवाद साधला. त्या योग्याने नानांना जल दिले. आणि सांगितले की, मी महाभारत कालीन योद्धा आहे. निजधामाला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी मला एक मंत्र देऊन इथे तप करण्यास सांगितले आहे. पुढील निर्देश येई पर्यंत मी इथेच रहाणार आहे!

    उद्धवजींनी एक कंदाचा लहान तुकडा नानांना खायला दिला. त्यामुळे पुढे आठवडाभर नानांना भुक लागली नाही!  नानांची ती रात्र सत्संगात गेली. नानांच्या विनंतीला मान देऊन उद्धवजींनी ओघवत्या शैलीत संस्कृत भाषेतून उपनिषद समजावले! त्या दैवी वाग् गंगेचे अमृत नानांनी आकंठ प्राशन केले!

     पहाटे उद्धवांनी नानांना डोळे मिटून पायाशी बसायला सांगितले. आणि काही क्षणातच नानांना गंगोत्रीला पोहचते केले!

       आता अजून एक प्रश्न पडतो की, उद्धवांनी नानांनाच का दर्शन दिले?

      तर...... नाना महाराज हे गत जन्मातील  एकनाथ महाराज होय! उद्धवजी कृष्ण आज्ञेने बद्रीनाथ इथे आहेत, हे एकनाथ महाराजांना माहीत होते. त्यांच्या दर्शनासाठी ते हिमालयात खूप भटकले. पण दुर्दैवाने उद्धवजींचे दर्शन झाले नाही. ती अपुरी इच्छा या जन्मी पूर्ण झाली!

     आता आपल्या लक्षात आले असेल की, कोणत्याही योग्याचे दर्शन हे स्वस्त नसते!

     आपणास सर्वांना कल्पना आहे की, केदारनाथ व बद्रीनाथ इथले मंदिर सहा महिने बंद असते. यावेळी त्यांची पूजा कोण करतं? तर केदारनाथ इथे नारद पूजा करतात आणि बद्रिनाथ इथे उद्धवजी पूजा करतात.

     माझे मित्र डॉ. होनकळसें यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची ३७वी केदार यात्रा पूर्ण केली. या यात्रें दरम्यान त्यांची एका योग्याशी ओळख झाली होती. जे जवळ जवळ २४ वर्षे केदारखंडात रहात होते. अगदी बर्फ पडला तरीही! तर त्या योग्याने  डॉ. होनकळसेंना सांगितले होते की, इथे त्या सहा महिन्याच्या कालावधीत केदारनाथ मंदिरात पूजेचा, व अगम्य भाषेतील संवादाचा अनुभव त्यांनी घेतला होता.

       उद्धव आजही तिथेच आहेत. श्रीकृष्णाच्या पुढील आदेशाची वाट बघत!

 (संदर्भ :सिद्ध आणि सिद्धाश्रम(अप्रकाशित )  लेखक :डॉ. संजय होनकळसे  )