मला व्हॅनिला आईस्क्रिम सगळ्यात जास्त आवडतं!
मला व्हॅनिला आईस्क्रिम सगळ्यात जास्त आवडतं!
साधं, पांढरं, प्लेन व्हॅनिला आईस्क्रिम !
>>> निरुपमा महाजन
गोदरेजचं शुटींग संपलं.
फार मोठं शेड्युल.. उत्कृष्ट झालं.
टीम खुष!
मी मेकअप उतरवण्यासाठी 'मेकअप दादां'च्या समोर बसले होते. अचानक १५-२० जणांचा घोळका आत आला.
"हॅपी बर्थडे!"
सरप्राईज केक!
"निरुपमा. . कम से कम आईस्क्रिम पार्टी तो बनती है. . "
" चलो. . तुम लोग भी क्या याद रखोगे!"
निघालो. .ते नेतील तिथे!
कार पार्क केली आणि वळून पहाते तर काय! पावसाळी संध्याकाळच्या स्वप्नवत पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेलं सुंदर आईस्क्रिम पार्लर!
आत गेलो.
कितीतरी स्वाद आणि रंग यांची मैफल जमलेली.
" मॅम, तुमच्यासाठी कोणता फ्लेवर? यांचे जवळपास सगळेच फ्लेवर्स हिट आहेत" संदेश सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आॅर्डर्स फिक्स करत होता.
मी निवांतपणे पुर्ण मेन्यूवरुन नजर फिरवली आणि सांगितलं,
" व्हॅनिला. . प्लेन व्हॅनिला!"
"व्हॅनिला? कम आॅन मॅम. . यू आर द बर्थडे गर्ल! व्हॅनिला काय?"
"असू दे रे. . मला तेच आवडतं. . प्लेन व्हॅनिला"
सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पहात होते. संदेश खांदे उडवत आॅर्डर द्यायला निघून गेला.
शांतपणे मी समोर आलेल्या शुभ्र, प्लेन, मधुर सुवासाच्या त्या आईस्क्रिमचा चमचा भरुन तोंडात घेतला. समाधान, शांतता, गोडवा देहभर पसरत गेला. आपसुक डोळे ओलसर झाले!
मन कितीतरी वर्षं मागे गेलं. . .
मी ५ वर्षांची होते. . इयत्ता पहिलीत!
आजीकडे होते शिकायला!
वडीलांची नोकरी दूर लहानश्या गावात. . तिथे शाळा नाही. शिवाय परिस्थिती बेताची!
आजी आजोबा तर अगदीच गरीबीत! दोन वेळेचं जेवण सोडून दुसरा कुठलाच खर्च परवडणे अवघड! पण शाळेसाठी मला तिथे ठेवलं.
आजोबा अतिशय संतापी. .कदाचित परिस्थितीनं तसे झालेले! आजीसकट सगळे त्यांच्या धाकात. .
धाकात म्हणजे काय. . अगदी दहशतीतच!
आजी मला आजोबांची भिती घालून गप्प बसवायची. . 'त्यांना नाव सांगेन हं' म्हणलं की मी आजीलाही घाबरायची! शांत बसायची. .
शांत म्हणजे अगदी शांत. . चिडीचुप!
मग स्वत:शीच विचार करत रहायची. . मनातल्या मनात मनाशीच गप्पा, हसणं, रडणं वगैरे. .!
काही दिवसांनी शेजारच्या वाड्यातल्या २-३ मुलींनी गल्लीत खेळायला बोलावलं.
आनंदानं गेले. त्यांचे रंगीबेरंगी फ्राॅक, रिबीनी. . आहा! किती छान! मला तर दोनच फ्राॅक. . जुने आणि फारच साधे!
असू दे की, खेळायला मिळतंय ते काही कमी नाही. मग रोजच एकत्र खेळणं सुरु झालं.
कधी पाणी प्यायच्या निमित्यानं त्यांच्या घरी जायची. लोखंडी काॅट, गाद्या, चकचकीत स्टिलची भांडी, सुंदर साडीतली आई, एखादं लोखंडी कपाट, वर्तमानपत्रं, पुस्तकं. . हे ऐश्वर्य बघून मी थक्कं व्हायची. .!
आजी अधुनमधुन म्हणायची, "जरा अंतर ठेव! आपण त्यांच्या बरोबरीचे नाही. आपला अपमान नको व्हायला कधी!" मग मी त्यांच्यात असताना फारशी बोलायची नाही. फक्त सगळं ऐकायची, पहायची आणि खेळायची!
एक दिवस आम्ही चौकात खेळत असताना गारेगारवाला अाला. . त्याची छोटी चौकोनी ढकलगाडी घेऊन. गारेगार म्हणजे आईस्क्रिम ! त्या काळात आईस्क्रिम हा शब्द कोणाला माहितीच नव्हता त्या छोट्या गावात!
तर तो आल्याबरोब्बर सगळी मुलं पळाली. . घरी जाऊन १०- १० पैसे घेऊन आली. पांढर्या रंगाचं, दुधाचं, काडीवालं गारेगार विकत घेऊन चवीनं खाऊ लागली!
माझ्याही तोंडाला पाणी सुटलं! मी पण घरी गेले.
"आज्जी गं, १० पैसे दे ना, गारेगार घ्यायचंय"
" गप गं . . ह्यांनी ऐकलं तर खवळतील. कशाला खेळतेस त्या पोरींच्यात? आपल्याकडं तेवढा पैसा नाही. हे बघ राणी. . आपण आपल्या पायरीनं रहावं!"
मी परत बाहेर गेले. त्यांचं गारेगार संपलं होतं पण खेळताना त्यांच्या हातांना त्याचा मधुर, सुंदर सुवास येत होता. मला फार फार म्हणजे फारच आवडला! त्या वासासाठी कितीतरी वेळ त्यांच्याशी खेळत राहिले.
पुढं सुट्टीला आईबाबांकडे गेले तेंव्हा परत येताना आईकडं १० पैसे मागितले. मला पोटाशी घेऊन निरोप देताना आईनं १० पैशाचं नाणं हळूच माझ्या हातात दिलं. "जपून ठेव बाळा . . योग्य ठिकाणीच वापर हं!"
अाईला सोडून परत जाताना डोळ्यांत इतकं पाणी भरुन आलं की लाल बसमधे बसताना हातातलं नाणं सारखं धूसरच दिसत राहिलं! डोळ्यांत झोप उतरल्यानंतर मात्र ते नाणं फ्राॅकच्या खिशात जपून ठेवलं आणि स्वप्नांच्या जगात हरवून गेले.
स्वप्नात पण तोच गारेगारचा पांढराशुभ्र रंग आणि तोच मधुर सुवास!
सकाळी आजीच्या घरी पोचले. खिशात हात घातला तर काय! पैसे गायब! खिसा फाटका होता. . भोकातून नाणं कुठंतरी पडून गेलं होतं.
वेड्यासारखी सगळीकडे शोधत राहिले. नाहीच मिळालं. उलट मी पैसे हरवले म्हणून आजोबा भयंकर संतापले. मी फार रडले. रात्री स्वप्नात पण तेच नाणं दिसायचं आणि त्या गारेगारचा सुगंध पसरायचा. खरोखरच जणू मला वेड लागलं होतं!
आमच्या वाड्याच्या समोरच एक मोठ्ठा बंगला होता.. कोणा व्यावसायिकाचा! गल्लीत सर्वात श्रीमंत तेच. कोणाशी त्यांचे फारसे संबंध नव्हते. बडे लोग. . बडी बातें!
तर गावाहून त्यांची नातवंडे आली होती . . लाडावलेली पण खेळकर. त्या दिवशी आम्ही चौकात खेळत होतो तर तीही आमच्याशी खेळायला आली. दोन मुली आमच्याच वयाच्या आणि त्यांचा एक छोटा भाऊ. श्रीमंतांची मुलं म्हणून सगळे जरा दबकूनच होते. लिंगोर्चाचा डाव अगदी रंगात आला होता. आणि तेवढ्यात "गारेगाsssर. . . गारेगाsssरवाला" अशी हाळी ऐकू आली.
सगळी मुलं हुर्र्sssयो करत पैसे आणायला आपापल्या घरी पळाली. बंगलेवाल्या मुलांच्या आजीनेही त्यांना पैसे दिले. गारेगारवाल्याभोवती एकच घोळका झाला. सगळ्यांनी तेच पांढरेशुभ्र, त्या मधुर सुवासाचे, दुधाचे गारेगार घेतले. " मी आधी, मी आधी" करत सगळेजण आपापले गारेगार घेऊन विजयी मुद्रेने परत येत होते.
मी मात्र एकटीच आमच्या वाड्याच्या पायरीवर येऊन बसले होते. बिचार्या आजीकडे पैसे मागण्यात काही अर्थ नव्हता. मातीत बोटाने रेघोट्या मारता मारता मधेच तो गोड सुवास यायचा आणि तोंडाला पाणी सुटायचं. मनाला आवर घालून डोळ्यांतलं पाणी कसंबसं थोपवत मी अगदी शांत बसले होते.
तितक्यात त्या बंगलेवाल्या तीन भावंडांमध्ये काहीतरी बिनसलं. वादाचं रुपांतर मारामारीत झालं. त्या दोन्ही मुली लहान भावाला फटका देऊन बंगल्यात निघून गेल्या. रागारागाने त्यानं आपलं गारेगार तिथंच चौकात फेकून दिलं आणि तोसुध्दा मोठ्यांदा रडत बंगल्यात निघून गेला. आपल्यावर नाव नको म्हणून गल्लीतली सगळी मुलं आपापल्या घरी पळून गेली. मी हे सगळं आश्चर्याने बघत एकटीच तिथे बसून होते.
अाता चौकात फक्त मी आणि ते गारेगार! हळूहळू वितळत चाललेलं!
माझ्या मनात द्वंद्व चालू झालं. एक मन म्हणत होतं, 'घ्यावं का उचलून ते गारेगार? जरासं पुसून घेतलं की झालं! नाहीतरी ते वायाच जाणार आता. .'
लगेच दुसरं मन सांगत होतं ,' याला हावरटपणा म्हणतात, कदाचित चोरी पण! आपल्या आजी आजोबांना हे आजिबात आवडणार नाही. . नको मग. . नकोच!'
'पण आजीआजोबांना कोण सांगणार? इथे तर पहायला कोणीच नाहिये! आणि मला तर ते किती आवडतं. . बहुतेक देवानंच पाठवलं असेल माझ्यासाठी! अाणि फेकून दिलेलं गारेगार घेतलं तर ती चोरी नाही ना होत. .'
मीच माझ्याशी लढत होते. आणि शेवटी माझ्यातल्या मोहाचा संस्कारांवर विजय झाला. मी ते गारेगार घ्यायचं ठरवलं.
आजुबाजूला कोणी नाही ना, हे आधी नीट पाहून घेतलं! मग हलक्या पावलांनी त्या गारेगारपाशी गेले. हळूच ते हातात उचलून घेतलं. त्याला लागलेली माती नीट पुसून टाकली. डोळे मिटून दिर्घ श्वास घेतला. त्याचा सुगंध माझ्या मनभर पसरला. शरीरात आनंदाचा उत्सव केव्हाच सुरु झाला होता.
आता तोंडाजवळ नेऊन मी ते खाणार तेवढ्यात माझ्या हातावर एक जोराचा तडाखा बसला. . ते गारेगार हातातून उडून दूर जाऊन पडलं! नजर वर करुन पाहिलं तर आजोबा संतापानं थरथरत माझ्याकडे पहात उभे होते.
दुसर्याच क्षणी माझ्या पाठीत जोरदार धपाटा बसला. त्याच्या झिणझिण्या मेंदूपर्यंत पसरत गेल्या. मन आणि शरीर दोन्ही बधिर झालं होतं. डोळ्यांतून बांध फुटला पण ओठांना कुलूप लागलेलं. चूक माझी होती. अवाक्षरही न काढता हुंदका गळ्यात थोपवून मी निश्चल उभी होते. " जीव गेला असता का तुझा गारेगार खाल्लं नसतं तर? घरचे संस्कार विसरलीस? स्वत:चा घाम गाळून जे विकत घेता येतं, फक्त तेच मानानं घ्यावं. .स्वाभिमान विकलास की काय? लाज काढलीस आज" आजोबा माझ्या हाताला धरुन मला ओढतच घरी घेऊन गेले.
जाताना वाड्यातील सगळे लोक आमच्याकडे आश्चर्याने पहात उभे होते. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आजीच्या अंगावर मला रागानं ढकलून आजोबा तिलाही खुप बोलले. पुढचे चार पाच दिवस माझं बाहेर खेळणं बंद! पुढेही कितीतरी दिवस आजोबा माझ्यावर नाराजच राहिले.
काही वर्षांनी माझ्या वडीलांची बदली एका शहरात झाली. मी आईवडीलांच्याबरोबर तिकडे रहायला गेले. त्यांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारली होती. चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. मोठी शाळा, नवे शिक्षक, नव्या मैत्रिणी आणि आई-बाबा-भावंडांचा सहवास! दिवस आनंदात चालले होते.
एके दिवशी वर्गातील एका मुलीच्या वाढदिवसाचं बोलावणं आलं. आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्या घरी गेलो. खाणं झाल्यानंतर तिच्या आईने प्लॅस्टिकच्या कपमधून एक गोड पदार्थ दिला. तसाच शुभ्र, त्याच मधुर सुवासाचा, गारेगारसारखा. . मन बेचैन करणारा! आनंद, दु:खं, राग, भिती, लाचारी, वेदना. . न जाणे किती गोष्टी मनात दाटून आल्या.
"अगं निरु, खा ना आईस्क्रिम! विचार कसला करतेस?"
पण मला ते खावसंच वाटेना.
" नको मला. . मला आवडत नाही ते"
" आवडत नाही? अगं व्हॅनिला आईस्क्रिम आहे ते! खा ना गं"
मैत्रिणींचा आग्रह. . मी खाल्लं. तो सुगंध जेवढा सुंदर तेवढीच त्याची चवही स्वर्गिय होती. आईस्क्रिमचा तो मऊसूत थंड स्पर्श जिभेला सुखावत होता, पण मनाला समाधान देत नव्हता. . हे मात्र खरं!
त्यानंतर कितीतरी वर्षं गेली. एव्हाना बाजारात व्हॅनिलाशिवाय स्ट्राॅबेरी, पिस्ता, केशर, चाॅकलेट, अंजिर असे बरेच स्वाद आले होते. माझं शाळा, काॅलेजचं शिक्षण संपलं. नोकरी मिळाली.
पहिला पगार हातात अाला. त्या दिवशी काम संपल्यावर घराजवळच्या दुकानात गेले. घरच्या सगळ्यांसाठी व्हॅनिला आईस्क्रिम घेतलं. घरी आल्या आल्या त्यातला एक कप देवासमोर ठेवला. लोक पहिल्या पगाराचे पेढे ठेवतात पण माझ्यासाठी ते आईस्क्रिम पेढ्यांपेक्षा कमी नव्हतं! घरात सगळ्यांना आईस्क्रिम दिलं. आनंदीआनंद!
मी माझा कप उघडला. अधिरतेनं एक घास तोंडात घेतला आणि. . आणि मन अपार विलक्षण समाधानानं भरुन गेलं. तीच ती पांढर्याशुभ्र, दुधाच्या, मधुर सुवासाच्या गारेगारची चव! ते लहानपणीचे दिवस, त्या मैत्रिणी, तो गारेगारवाला, ते १० पैशांचं नाणं, ते जमिनीवर पडलेलं गारेगार, तो आजोबांनी संतापाने दिलेला तडाखा, ती वेदना. . सारं सारं आठवलं! आजच्या या घासानं त्या सगळ्या जखमांवर मलम लागल्यासारखं झालं. आजोबांची तीव्रतेनं आठवण आली. डोळ्यांतलं पाणी थांबेचना!
चट्कन उठून आतल्या खोलीत गेले. मनातल्या मनात आजोबांना हात जोडले, "आजोबा, अाज तुमच्यामुळं समाधान या शब्दाचा खरा अर्थ कळाला. मी माझ्या कष्टाच्या पैशानं आज माझी आवडती गोष्ट मिळवली. थॅंक्यू सो मच आजोबा! आणि मी प्राॅमिस करते तुम्हाला. . ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर जीव जात नाही, अशा कोणत्याही गोष्टीसाठी मी कधीच आगतिक, लाचार होणार नाही.. ."
आणि आज शुटींगच्या युनिटला इतक्या तर्हतर्हेच्या आईस्क्रिम्सची पार्टी देताना, मी मात्र, फक्त त्या व्हॅनिला आईस्क्रिमनेच का समाधानी होते. . . हे कोणाला कसं कळणार होतं?