रामचंद्राचीं आरती - बंबाळ कर्पुराचे । दीप रत्...
बंबाळ कर्पुराचे । दीप रत्नकीळांचे ॥
उजळले दिग्मंडळ । मेघ विद्यूल्लतांचे ॥
भासती तयांपरि । भालचंद्रज्योतीचे ॥
अवचिते झळकताती ।घोंस मुक्ताफळाचे ॥ १ ॥
जय देवा दीनबंधू । राम कारुण्यसिंधू ॥
आरति ओवाळीन । शिव मानसी वेधु ॥ धृ. ॥
त्राहाटिली दिव्य छत्रें । लागल्या शंखभेरी ॥
तळपताती निशाणें । तडक होतसे भारी ॥
तळपती मयूरपिच्छें । तेणें राम थरारी ॥ जय. ॥ २ ॥
मृदंगटाळघोळ । उभे हरिदासमेळ ॥
वाजती ब्रह्मवीणे । उठे नादकल्होळ ॥
साहित्य नटनाट्य । भव्यरंगरसाळ ॥
गर्जती नामघोष लहानथोर सकळ ॥ जय. ॥ ३ ॥
चंपकपुष्पजाती ॥ मेळविले असंख्यांत ॥
दुस्तर परिमळाचे ॥ तेणें लोपली दीप्ती ॥
चमकती ब्रह्मवृंदे ॥ पाउलें उमटती ॥
आनंद सर्वकाळ ॥ धन्य जन पाहाती ॥ जय. ॥ ४ ॥
ऋषिकुळी वेष्टित हो ॥ राम सूर्यवंशीचा ॥
जाहलीं अतिदाटी ॥ पुढे पवाड कैसा ॥
सर्वही एकवेळ ॥ गजर होतो वाद्यांचा ॥
शोभती सिंहासनीं ॥ स्वामीं रामदासाचा ॥ जय. ॥ ५ ॥