Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १३१ ते १३५

बन्ध: मोक्ष: सुखं भोग: अयोग: सत्यम्‌ अणु: महान्‌ ।
स्वस्ति हुंफट स्वधा स्वाहा श्रौषट वौषट नम: ॥१३१॥
८००) बन्ध---आत्मवस्तूवर अनात्मवस्तूचा भ्रम होणे म्हणजे बन्ध. बन्धरूप. जन्म-मरणरूप चक्रात बद्धता.
८०१) मोक्ष---अविद्यानाशरूप. कर्मबंधनातून सुटका.
८०२) सुखम्‌---विशुद्धानन्दरूप.
८०३) भोग---आत्मसुखाचा अनुभव. अपरोक्ष साक्षात्कार असा भोगरूप.
८०४) अयोग---आत्मा सङ्गरहित आहे तो अयोग. अयोगरूप.
८०५) सत्यम्‌---त्रिकालाबाधित तत्त्व.
८०६) अणु---अतिसूक्ष्म म्हणून अगोचर. ‘अणोरणीयान्‌ महतो महीयान्‌’ म्हणजे आत्मा हा अणूहूनही सूक्ष्म आणि मोठयात मोठा आहे असे आत्म्याचे कठोपनिषदात वर्णन येते. अणुस्वरूप.
८०७) महान्‌---ज्याच्याहून दुसरा कोणी मोठा नाही असा.
८०८) स्वस्ति---कल्याण, आशीर्वादस्वरूप. सम्यक्‌ सत्तावान्‌.
८०९) हुं---निर्लेपत्वामुळे ब्रह्म इतरांस दूर करते म्हणून हुम्‌. मंत्रामध्ये शक्तिप्रदायक रूपात हुं बीज येते.
८१०) फट्‌---मन्त्रातील विघ्ननिवारणार्थ उद्‌गार. (फट्‌ म्हणून टाळी वाजवली जाते.)
८११) स्वधा---श्राद्धरूप.
८१२) स्वाहा---यज्ञकर्मरूप.
८१३) श्रौषट्‌ ८१४) वौषट्‌ ८१५) वषट्‌---हे तीनही यज्ञात आहुती टाकताना करावयाचे शब्द आहेत. तत्स्वरूप.
८१६) नम---नमस्कारस्वरूप.
ज्ञानं विज्ञानम्‌ आनन्द: बोध: संवित्‌ शम: यम: ।
एक: एकाक्षराधार: एकाक्षरपरायण: ॥१३२॥
८१७) ज्ञानम्‌---मोक्षदायक ब्रह्मज्ञानस्वरूप. शब्दजन्य ज्ञान.
८१८) विज्ञानम्‌---ब्रह्मज्ञानाखेरीज अन्य शिल्प इ. शास्त्रांचे ज्ञान.
एकदा ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, विष्णुपत्नी लक्ष्मी आणि शिवपत्नी पार्वती यांच्यात खरी पतिव्रता कोण? असा वाद झाला. तो देवर्षी नारदांना कळला त्यांनी या तिघींना लोखंडाच्या दाण्यांपासून लाह्या फोडून खायला देण्यास सांगितल्या त्या तिघींनाही ते जमले नाही. देवर्षी नारदांनी अत्रिपत्नी अनसूयेकडे जाऊनही अशीच मागणी केली. अनसूया मात्र जाज्वल्य पतिव्रता असल्यामुळे तिला त्या लोखंडी दाण्यांपासून लाह्या करता आल्या. सावित्री. लक्ष्मी आणि पार्वतीसमोरून देवर्षी मुद्दामच त्या लाह्या खात निघाले आणि अनसूयेने ह्या लाह्या फोडल्याचे सांगितले तेव्हा त्या तिघींनीही असूयेने आपल्या पतींना अनसूयेचे पातिव्रत्यभंग करण्यास पाठविले. ते तिघेही ब्राह्मण वेशात जेवणाच्या वेळी क्षुधार्त होऊन अनसूयेकडे भिक्षायाचना करू लागले. अनसूयेने स्वयंपाक तयार करून पाटपाणी घेतले पण तेवढयात ते तिघे म्हणाले, ‘तू वस्त्रहीन होऊनच आम्हाल जवेण वाढावयास हवे.’ तेव्हा विचार करून तिने तिघांवरही पाणी शिंपडले त्याक्षणी त्यांची तान्ही बाळे झाली. तिने त्यांना नग्नावस्थेत पोटभर स्तन्य पाजले. वस्त्र नेसले. ही घटना नारदांनी त्या तिघींपर्यंत पोहोचवली. त्या तिघींनी अनसूयेची क्षमा मागितली व बाळे झालेल्या आपल्या पतींना पूर्वावस्थेत पाहण्याची इच्छा प्रकट केली. अनुसूयेने पातिव्रत्याच्या बळावर त्या तिघांवर पाणी शिंपडताच ब्रह्मा-विष्णु-महेश मूळरूपावर आले. अनसूयेने त्यांना अंशावतार स्वरूपात आपले पुत्र म्हणून घरी राहावयास सांगितले. तिथे तीन मुखांचे मिळून एक बालक झाले. अत्रि अनसूयेने त्याला दत्तात्रेय म्हणून हाक मारली. अत्रिंनी आपल्या या मुलाला वैदिक गणेशोपासनेच्या मंत्रांची दीक्षा दिली. एकदा दत्तात्रेय ध्यानावस्थेत असता त्यांच्यासमोर ॐ कारस्वरूप प्रकटले त्याने दत्तात्रेयांच्या डोक्यावरून हात फिरवला. अत्रि-अनसूयेनेही ॐ कार गणेशाचे दर्शन घेतले. अत्रि ऋषींच्या मुखातून शब्द बाहेर पडले - ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ असा हा ज्ञानविज्ञान संपन्न गणेशावतार!
मराठवाडयातील जालना स्टेशनपासून सुमारे ४५ कि.मी. वर राक्षसभुवन येथे विज्ञान गणेशाचे स्थान आहे, हे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. तसेच तेथे प्रसिद्ध शनी मंदिर. दत्तात्रेय आणि विज्ञानेश्वर शंकर यांचीही मंदिरे आहेत.
८१९) आनन्द---आत्मानन्दस्वरूप.
८२०) बोध---प्रत्यक्‌बोधस्वरूप.
८२१) संवित्‌---बाह्यवृत्ती, बहिर्मुख वृत्तीचा निरास केल्यावर आनन्द व ज्ञानरूप चित्तवृत्ती उरते तिला संवित्‌ म्हणतात. असा संवित्‌रूप. संवित्‌ म्हणजे भावनारहित जाणीव.
८२२) शम---मनोनिग्रह.
८२३) यम---इन्द्रियसंयमन.
८२४) एक---एकमेव. अद्वितीय. स्वगत-सजातीय-विजातीय भेद नसलेला. भेदशून्य.
८२५) एकाक्षराधार---एक अक्षर ॐ मध्ये राहणारा किंवा ‘गं’ बीजमंत्रातच स्थित राहणारा.
८२६) एकाक्षरपरायण---ॐ या एकाक्षरमात्रात स्थित.
एकाग्रधी: एकवीर: एकानेकस्वरूपधृक्‌ ।
द्विरूप: द्विभुज: द्वयक्ष: द्विरद: द्वीपरक्षक: ॥१३३॥
८२७) एकाग्रधी---केवळ आत्मप्रवण बुद्धी असणारा.
८२८)  एकवीर---अद्वितीय वीररूप.
८२९) एकानेकस्वरूपधूक्‌---एक असूनही अनेक रूपे धारण करणारा. चन्द्र एकच. पण पाण्याच्या लाटांवर पडलेल्या त्याच्या अनेक प्रतिबिम्बांमुळे अनेक चन्द्रांचा भास होतो त्याप्रमाणे एकानेकस्वरूपधृक्‌ असणारा.
८३०) द्विरूप---सगुण व निर्गुणब्रह्मरूप.
८३१) द्विभुज---दोन बाहू असणारा.
८३२) द्वयक्ष---दोन नेत्र असणारा.
८३३) द्विरद---दोन दात असणारा.
८३४) द्वीपरक्षक---जम्बु-कुश-प्लक्ष-शाल्मली-क्रौञ्च-शक-पुष्कर या सप्तद्वीपांचे रक्षण करणारा.
द्वैमातुर: द्विवदन: द्वन्द्वातीत: द्वयातिग: ।
त्रिधामा त्रिकर: त्रेतात्रिवर्गफलदायक: ॥१३४॥
८३५) द्वैमातुर---उमा आणि हस्तिनी अशा दोन माता ज्याला आहेत असा. मुखाची माता हस्तिनी. बाकी शारीराची माता उअमा.
८३६) द्विवदन---अग्निरूपमुख व गजमुख असा द्विवदन.
८३७) द्वन्द्वातीत---शोतोष्णादी द्वन्द्‌वांपलीकडे असणारा.
८३८) द्वयातिग---द्वैताच्या पलीकडचा.
८३९) त्रिधामा---रवि-चन्द्र-अग्नि या तिन्हींमध्ये राहणारा. किंवा धाम म्हणजे घर. तीन देहात राहणारा. स्वर्ग-पृथ्वी-पाताळ ही तीन ज्याची घरे आहेत असा.
८४०) त्रिकर---त्रैकोक्यकर्ता. त्रिपुटिकर्ता, तीन कर असणारा.
८४१) त्रेतात्रिवर्गफलदायक---त्रेता म्हणजे दक्षिणेय-गार्हपत्य-आहवनीय हे अग्निहोत्र्याचे तीन पवित्र अग्नी. या त्रिविध अग्नी उपासनेने प्राप्त होणारे धर्म-अर्थ आणि कामरूपी (त्रिवर्ग) फल देणारा.
त्रिगुणात्मा त्रिलोकादि: त्रिशक्तीश: त्रिलोचन: ।
चतुर्बाहु: चतुर्दन्त: चतुरात्मा चतुर्मुख: ॥१३५॥
८४२) त्रिगुणात्मा ;--- सत्त्व-रज-तम ही त्रिगुणांची प्रकृति (साम्यावस्था) धारण करणारा.
८४३) त्रिलोकादि---त्रैलोक्याचे आदिकारण.
८४४) त्रिशक्तीश---‘श्री’, ‘ही’, ‘क्ली’ या त्रिविध मन्त्रांचा अथवा प्रभुशक्ती, उत्साहशक्ती व मन्त्रशक्तीचा ईश्वर. रमा-लज्जा-अनड्गा याही त्रिशक्ती (बीजांची). यांचाही ईश्वर.
८४५) त्रिलोचन---तीन नेत्र असणारा.
८४६) चतुर्बाहु---चार हातांचा.
८४७) चतुर्दन्त---चार दात असणारा.
८४८) चतुरात्मा---आत्मा, अन्तरात्मा, ज्ञानात्मा व परमात्मा असे चार भेदरूपी आत्मे असणारा. आत्मोपनिषदान वर्णिलेला चतुरात्मा असणारा.
८४९) चतुर्मुख---चार मुखे असणारा अथवा चारही वेद ज्याच्या मुखात नांदतात.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५