विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 2
ब्रह्मवैवर्त पुराण –
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणार्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले. शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.
ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.
पद्मपुराण –
पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.
लिंगपुराण –
लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.