Get it on Google Play
Download on the App Store

विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका 4

ब्रह्मवैवर्त पुराण –

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार , परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.

शिवपुराण –


शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.

तन्त्र –

तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.

महाभारत –

महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला.[२९] पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.