Get it on Google Play
Download on the App Store

साधू 7

पहाट झाली. साधू उठला. त्याने नित्याप्रमाणे शौचमुखमार्जन केले. त्याचा कार्यक्रम ठरलेला असे. बारा महिने तेरा काळ त्याप्रमाणे चालायचे. तो पहाटे उठे. नंतर झाडांना पाणी घाली. फुलझाडांना पाणी घाली. काही सुंदर फुले तोडून घेई. मग थोडी भाकर खाऊन तो गावातील गरीब वस्तीत हिंडायला निघे. साधू येण्याची लहानमोठी माणसे वाट  बघत असत. सूर्याचे किरण येताच फुले फुलतात, त्याप्रमाणे साधूची प्रेमळ मुखमुद्रा पाहाताच सर्व गोरगरिबांना आनंद होई. तो सर्वांची चौकशी करी. कोणी आजारी वगैरे नाही ना? विचारी. कोणी आजारी असेल त्याच्याकडे जाई. त्याचे जरा पाय चेपी; तोंडावरून, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवी. केव्हा एखादे सुवासिक फूल त्याच्या अंथरुणाजवळ ठेवील. खिडक्या उघडया टाकील, घाण असली तर दूर करील, काही औषध सांगेल, जवळ असेल तर देईल, मुलांना गोष्टी सांगेल. कोणाला खाऊ देईल, अशा रितीने त्याचा वेळ जाई. अकरा वाजेपर्यंत सर्व दरिद्रीनारायणाच्या वस्तीतून हिंडून आल्यावर तो स्नान करी. नंतर प्रार्थना करून जेवे. थोडा वेळ वामकुक्षी करी. नंतर काही वाची. पुन्हा एकदा गावातून हिंडून येई. सायंकाळी घरी येई. पुन्हा झाडांना, फुलझाडांना पाणी. नंतर बाहेर खाट टाकून पडे. जेवण व प्रार्थना झाल्यावर तो बाहेरच निजे. पाऊस असला तरच तो आत निजे. बाहेर खाटेवर पडून आकाशातील मंगल व पवित्र तारे पाहात पाहात तो झोपी जाई. साधू म्हणे, 'माझं काम एकच. दिवसा पृथ्वीवर फुलं फुलवणं व रात्री देवाच्या अंगणात  आकाशातील फुलं बघणं.' साधू याप्रमाणे खरोखर वागे. तो पहाटे व सायंकाळी फुलझाडांना पाणी घालून त्यांच्यावर फुले फुलवी. इतकेच नव्हे तर गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन तेथील स्त्री-पुरुषांना, लहानथोरांना सहानुभूतीचे पाणी देऊन त्यांची जीवने फुलवी, त्यांची मुखकमले फुलवी.

साधूची मोठी बहीण होती ती विधवा होती. तिला ना मूल ना बाळ. ती आपल्या भावाला मदत करी. तिचे त्याच्यावर फार प्रेम. त्याचे दुखले खुपले ती बघे. स्वयंपाक करी. मिळेल वेळ तेव्हा जप करीत बसे.

दु:खी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
साधू 1 साधू 2 साधू 3 साधू 4 साधू 5 साधू 6 साधू 7 साधू 8 साधू 9 साधू 10 अभगिनी व तिची लहान मुलगी 1 अभगिनी व तिची लहान मुलगी 2 अभगिनी व तिची लहान मुलगी 3 अभगिनी व तिची लहान मुलगी 4 अभगिनी व तिची लहान मुलगी 5 अभगिनी व तिची लहान मुलगी 6 अभगिनी व तिची लहान मुलगी 7 अभगिनी व तिची लहान मुलगी 8 अभगिनी व तिची लहान मुलगी 9 अभगिनी व तिची लहान मुलगी 10 अघटित घटना 1 अघटित घटना 2 अघटित घटना 3 अघटित घटना 4 अघटित घटना 5 अघटित घटना 6 अघटित घटना 7 अघटित घटना 8 अघटित घटना 9 अघटित घटना 10 अघटित घटना 11 अघटित घटना 12 अघटित घटना 13 अटक 1 अटक 2 अटक 3 समुद्रात 1 समुद्रात 2 लिलीची भेट 1 लिलीची भेट 2 लिलीची भेट 3 लिलीची भेट 4 लिलीची भेट 5 लिलीची भेट 6 लिलीची भेट 7 लिलीची भेट 8 तो तरुण 1 तो तरुण 2 तो तरुण 3 तो तरुण 4 भूत बंगला 1 भूत बंगला 2 भूत बंगला 3 भूत बंगला 4 भूत बंगला 5 भूत बंगला 6 भूत बंगला 7 भूत बंगला 8 भूत बंगला 9 भूत बंगला 10 प्रेमाचा अंकुर 1 प्रेमाचा अंकुर 2 प्रेमाचा अंकुर 3 प्रेमाचा अंकुर 4 प्रेमाचा अंकुर 5 क्रांतीची ज्वाला भडकली 1 क्रांतीची ज्वाला भडकली 2 क्रांतीची ज्वाला भडकली 3 क्रांतीची ज्वाला भडकली 4 क्रांतीची ज्वाला भडकली 5 क्रांतीची ज्वाला भडकली 6 अंमलदाराचा शेवट 1 अंमलदाराचा शेवट 2 लिलीचे लग्न 1 लिलीचे लग्न 2 शेवट 1 शेवट 2 शेवट 3 शेवट 4