Get it on Google Play
Download on the App Store

खुनाची वेळ प्रकरण 2

प्रकरण २.

 पाणिनी पटवर्धन झपाट्याने ऑफिस मधे आला तेव्हा सौम्या सोहोनी टपालातून आलेली पत्रे बघत होती.

“ तुम्ही चक्क लौकर आलाय आज.” ती म्हणाली.

“ मी आजची वर्तमान पत्रे जरा बारकाईने पाहण्यासाठी आलोय लौकर.”

“ वर्तमान पत्रांचे काय?”

“ काल मध्यरात्री नंतर मला रिटेनर म्हणून दोन  हजाराच्या दोन नोटा आणि आणखी एका नोटेचा एक तुकडा मिळाला.एका बुरखाधारी स्त्री बरोबर माझी उत्कंठावर्धक अशी भेट झाली.आणि तिच्या बरोबरचा तो माणूस. सतत काहीतरी काळजीत असल्यासारखा होता.त्याने सांगितलं की आजच्या वर्तमान पत्रात काहीतरी सनसनाटी बातमी आहे.”

“ आणि तुम्हाला ती सापडली नाहीये असंच ना?” सौम्या ने विचारले.

“ खरं म्हणजे मी ती बघितली नाहीये.” “ कामातच सगळा दिवस निघून जातो.”

“ कोण होती ही रात्री भेटलेली माणसं ? “

“ जो पुरुष होता त्याचे नाव राजेंद्र पळशीकर होत.आर्किटेक्ट आहे. मी त्याची खरी ओळख शोधून काढल्याचे त्याला आवडलेलं दिसलं नाही. मी त्याला ५६१९,युनियन युनियन बँकेजवळ च्या  स्नेह शिल्प या पत्त्यावर राहणारा जय कारखानीस  समजावं अशी त्याची इच्छा होती.डिरेक्टरीमधे त्या नावाचे कोणी नव्हते. ती त्याची एक चूक झाली.पण त्याने बाकीचे सर्व एवढे कौशल्याने हाताळले होते की तो एवढी छोटी चूक करेल असे वाटत नाही.त्या ऐवजी डिरेक्टरीमधे अस्तित्वात असलेले एखादे नाव त्याने सांगितले असते तर तात्पुरता का होईना पण मी फसलो असतो.” नंतर पाणिनी ने तिला काल घडलेला प्रसंग सविस्तर सांगितला.

“ त्याला आपला डिरेक्टरीमधे नसलेला फोन नंबर  कसा मिळाला?” सौम्या ने महत्वाचा प्रश्न विचारला.

“ मी म्हंटल्या प्रमाणे त्याने योजनाबद्ध रीतीने आखलेल्या त्या भेटीचा एक भाग होता.”

“ म्हणजे त्याला अचानक सुचलेली ती बाब नव्हती ?” सौम्या.

“ मला वाटतंय की ज्या गोष्टी मुळे मला फोन करावा लागला त्याला ती गोष्ट अनपेक्षित पणे लौकर घडली असावी.कडी काळी वकिलाची गरज लागली तर मलाच बोलवायचं हे त्याने आधीच ठरवले होते आणि त्या नुसार आपली योजना आखली होती पण त्याची गरज तातडीने लागेल असे त्याला वाटले नसावे.या सर्वावरून तो काय प्रकारचा माणूस आहे याचा अंदाज बांधता येईल तुला.”

“ पण मग त्या लिफ्ट ची काय भानगड आहे?”

“ मी म्हणीन की त्या बाबतीत ते नशीबवान ठरले. तो या इमारतीच्या कंपनीच्या शेअर होल्डर पैकी मोठा शेअर होल्डर आहे , या कारणास्तव  त्याच्या कडे सर्वच ऑफिस च्या , अगदी लिफ्ट च्या सुध्दा, चाव्यांचा दुसरा संच असणार.त्यामुळेच मी दहा हजाराच्या नोटेचा तुकडा ऑफिस मधल्या तिजोरीत ठेवला नाही. न जाणो त्याच्याकडे माझ्या ऑफिस च्या चाव्यांचा एक संच त्याच्याकडे असू शकतो.! “

“ त्या बाईचे काय? तुम्हाला वाटत का त्याने तिच्या संदर्भातच तुमच्याशी सल्ला मसलत केली असावी का?”

“ नाही मला वाटत की ते आयत्या वेळी काहीतरी झाल्यामुळे घडले असावे.उदाहरणार्थ,तो बुरखा.तो एखादे सोंग वटवताना घालतात तसा होता. काळ्या रंगाचा, कलाबूत लावलेली शिवण, आपल्या खास खजिन्यात मुली एखादा पेहेराव ठेवतात तसा वाटत होता.”

“ तिच्या बद्दल काही सांगू शकणार नाही का?”

“ ती तिशीच्या वर नव्हती.चांगली देह यष्टी होती. हात  लहान होते पण तिने घातलेले हातमोजे खूप मोठे होते.उजव्या हातात दोन अंगठ्या होत्या.आणि डाव्या हातात एक.हात मोज्यातूनही त्या अंगठ्याचा अंदाज येत होता.”

“ लग्नाची अंगठी?”

 सौम्या ने विचारले.

“ मला नाही वाटत तसं, आणि आपला आवाज मला ऐकू येईल का याची तिला भीती वाटत होती.”

“ तस असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला ती माहीत असावी. म्हणजे तिला भीती वाटत असावी की आवाज ऐकलात तर तुम्ही तिला ओळखाल.” सौम्या म्हणाली.

“ एक तर पूर्वी भेटलो असू किंवा भविष्यात भेटणार असू. मला दुसरी शक्यता जास्त वाटत्ये.”

“ का?” सौम्या ने विचारले.

“ कारण नाही. फक्त एक अंदाज.”

“ह्या रकमेचे हिशोब पुस्तकात काय दाखवायचे?”

पाणिनी ने तिला त्या फाडलेल्या  नोटेचा तुकडा दिला .” हिशोब पुस्तकाचे तू बघ पण हा नोटेचा तुकडा म्हणजे मोठे आमिष आहे .”

“ पैशापेक्षा तुम्हाला त्या गूढ बुरखा धारी स्त्री ची जास्त उत्सुकता आहे  आणि आजच्या पेपरात त्याचे उत्तर आहे?”

“ उत्तर नाही, काहीतरी सुगावा लाऊन देणारी खूण.”

“ मी शोधून द्यायला मदत करायची आहे का तुम्हाला?” सौम्या ने विचारले.

“ तू अर्धा भाग घे, मी अर्धा घेतो. काहीही दृष्टीआड करू नको; जन्म- मृत्यू वार्ता, विवाहाच्या नोटीसा, घटस्फोटाच्या बातम्या खास करून.”

दोघांनी बराचसा पेपर चाळला. ” सापडले काही?” सौम्या ने विचारले.

“ नाही अजून.”   -पाणिनी  .

“ सहज न दिसणारे असे काही असेल असे पळशीकर म्हणाला होता का?” –सौम्या.

“ नाही, उलट कोणाच्या नजरेतून न सुटण्याजोगे , कदाचित पहिल्याच पानावर असेल अशा प्रकारचा इशारा त्याच्या बोलण्यातून मिळाला मला.”

“ तसे असेल तर आज काही आलेल नाहीये.”

“ तस झालं तर गोष्टी अजून क्लिष्ट होतील.त्याला माझ्या कडून नेमके काय करून घ्यायचं होत ते अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही.  उद्या मी एखाद्या  नवऱ्याच्या वतीने  त्याच्या बायको विरुद्ध  घटस्फोटाचे प्रकरण घेईन आणि ती बायको त्या नोटेचा , माझ्या कडील तुकड्याशी जुळणारा तुकडा घेऊन येईल आणि म्हणेल, “  पटवर्धन, अशिला जवळ व्यवहार करायची ही काय रीत झाली?”

“ किंवा तुम्ही मला अकार्यक्षम असल्या बद्दल रागाने भडीमार कराल आणि मी  नोटेचा तुकडा तुमच्या तोंडावर फेकून म्हणेन, “ ऑफिस चालवायची ही काय रीत झाली.! –सौम्या.

“ अरे देवा, असं बोलून तू मला विचार करायला लावला आहेस.”- पाणिनी.

तेव्हड्यात स्वागतिका म्हणून काम करणारी गती ही मुलगी  दार वाजवून आत आली आणि विचारले “तुम्ही टेंबे यांना भेटणार का?”

“काय हवय  त्यांना?”

“ ‘त्यांना’ नाही ‘तिला,’ बाई आहे ती. तुम्हाला भेटायचं आहे तिला आणि ती अशा प्रकारची बाई आहे की जे हवं ते ती मिळवणारच.”

“तरुणी?”  -पाणिनी 

“साठीच्या आसपास आहे.पण आकर्षक आहे.”

“ सौम्या बाहेर जाऊन जरा अंदाज घेऊन ये तिचा, आणि काय हवय ते बघ.” –पाणिनी

पाणिनी तो पर्यंत वर्तमान पत्र चालण्यात मग्न झाला.सौम्या बाहेर जाऊन आली आणि म्हणाली “ तुम्ही भेटायला पाहिजे तिला अशी आहे ती, पैसे वाली दिसत्ये, चांगल्या चारित्र्याची आणि आकर्षक व्यक्तीमत्वाची वाटते.”

“ काय काम आहे तिचे?”

“ विश्वस्त संस्थेच्या निधीचे आणि बेकायदा दत्तक विधानाचे.”

“ आत घेऊन ये तिला, सौम्या.

“या, बसा, , मिसेस  टेंबे “ ती आत आल्यावर पाणिनी म्हणाला.” तुम्ही तुमचं नाव फक्त टेंबे असं जाहीर केलतं तेव्हा मला वाटलं की पुरुषच आहे. तुम्हाला काय चर्चा करायची होती माझ्याशी” – पाणिनी.

“एका बेकायदा आणि अनैतिक दत्तक विधाना बद्दल. मी तुम्हाला फक्त महत्वाचे मुद्दे सांगते आणि थोडक्यात सांगते पण ते सांगितल्या शिवाय तुम्हाला पार्श्वभूमी कळणार नाही.

काही वर्षांपूर्वी मी बोटीने प्रवास करत असताना माझी एका जोडप्या बरोबर खूप घट्ट मैत्री झाली.विशेषतः स्त्री बरोबर. अनेक महिन्यांचा तो प्रवास होता.त्यांच्याशी बोलताना त्यांची  लहान मुलगी रशियात अडकली आहे आणि तिच्या शी या जोडप्याची ताटातूट झाली आहे असे कळले.मी तुम्हाला अत्ता त्या ताटातुटी  मागची  कारणे सांगत बसून वेळ नाही घेत तुमचा पटवर्धन.या बोटीला  पुढे काही दिवसांनी  अपघात झाला आणि ती चिरली गेली. केव्हातरी आपला नंबर लागणार या जाणीवेने सर्व प्रवाशात घबराट पसरली  

आदल्या दिवशी ही स्त्री माझ्या कडे आली आणि मला काही दागिने देऊ केले.आणि म्हणाली की ती आणि तिचा  नवरा  बुडणाऱ्या बोटीतून वाचलो नाही आणि  मी जगले वाचले तर माझ्या मुलीला मी रशियातून आणावे व सांभाळावे .दुसऱ्या दिवशी बोट बुडाली पण जे काही प्रवासी वाचले त्यात मी होते. मी माझा शब्द पाळला ,त्या मुलीला मी रशियातून आणले.माझी इच्छा होती की माझ्या मुलीने तिला दत्तक घ्यावे पण तिला ते मान्य झाले नाही म्हणून त्या मुलीला मी  संगोपन कल्याण केंद्र नावाच्या  एका संस्थेच्या केंद्रात ठेवले.अनाथ आणि पालकांनी नाकारलेल्या लहान मुलांना ते सहारा देतात.मी तिच्या व्यवस्थे साठी दरमहा चेक देत असे. एक वर्षानंतर माझी आर्थिक घडी नीट बसल्यावर मी त्या केंद्रात त्या मुलीला आणायला गेले तेव्हा भयानक गोष्ट कळली, ती मुलगी तिथे नव्हती आणि त्यांनी त्या मुलीला एखादी वस्तू विकावी तसे विकले होते.”

पाणिनी अत्यंत सावध पणाने हे सर्व ऐकत होता. “ बोला पुढे,तो म्हणाला.”

“मी त्या केंद्रा विरुध्द  अनेक वर्षे कायद्याने  लढत बसले,गुप्त हेर नेमले नाना तऱ्हा केल्या , दरम्यान ते केंद्र आणि त्याचे चालक जणू हवेत विरून गेले. पण मला त्या मुलीचा थांग पत्ता लागला.”

“ बाब्रस नावाच्या जोडप्याने तिला दत्तक घेतलं होत, खर तर लाच देऊन विकत घेतलं होत.तिचं नाव गेयता असं ठेवलं त्यांनी.ते याच शहरात राहतात.”

“ कधी पासून ?” –पाणिनी

“ मी तिला त्या केंद्रात सोडल्या नंतर दोन महिन्यातच ते तिला घेऊन गेले.” –टेंबे

“ पण आता तर ती सज्ञान झाली असेल, तिला काय हवं ते करायला ती मोकळी आहे.”  -पाणिनी 

“ प्रश्न तो नाही ,मी ते सगळ निभावून नेऊ शकते.पण काय झालंय पुढे सांगते,बाब्रस श्रीमंत लोक होते, फणींद्र बाब्रस वारला.त्याच्या संपत्तीमधील अर्धी त्याच्या विधवा पत्नीला.अर्धी गेयता ला गेली.गेयता च्या वाट्याचा अर्धा वाटा  हा ट्रस्ट च्या निधीत गेला, ती सत्तावीस वर्षाची झाल्यावर तिला ती रक्कम मिळणार होती.दरम्यान तिला खर्चासाठी, शिक्षणासाठी मिळणार होती.बाब्रस मेल्या नंतर त्याच्या बायकोने अजित टोपे नावाच्या माणसाशी लग्न केलं.ते पाच वर्ष एकत्र राहिले. नंतर ती वारली.तीही सर्व संपत्ती तिने गेयता चे नावे ट्रस्ट मधे ठेवली.अजित टोपे ला ट्रस्टी केले.पण तो चांगला माणूस नाही.त्याला त्यातील संपत्तीचा अधिकार ही नाही.मी त्याला भेटून सर्व सांगितले.”

“ काय म्हणाला तुम्हाला तो?” –पाणिनी

“ माझ्या वकीलांना भेटा.”

“ म्हणून तुम्ही इकडे आलात?”

“ हो ‘’

“ तुम्ही गेयता ला तिच्या आई बाबा विषयी माहिती दिली आहे?

“ अगदी व्यवस्थित. तिला तो मोठा दणकाच होता.बाब्रस ना ती आपले पालक समजत होती”

“सध्या कुठे आहे ती?”

“ या शहरातच आहे.”

“ मी काय करायला हवंय तुमच्या दृष्टीने.?”

“ तुम्ही त्या टोपे च्या मागे लागा.मूळ दत्तक घेण्याची प्रक्रियाच बेकायदा होती,फसवणूक होती, लाच आणि भ्रष्टाचारातून निर्माण झालेली होती असे सिद्ध करा.त्या ट्रस्ट मधून टोपे ला बाहेर काढा.”

पाणिनी चे डोळे किंचित बारिक झाले.” याचा अर्थ तुम्हाला त्या ट्रस्ट मधे टोपे च्या जागी यायचय?”

“ असं बघा,गेयता जास्त पैसे मिळायला हवेत.तिला पर्यटनाला जाता आलं पाहिजे,जग बघता आलं पाहिजे.मुख्य म्हणजे लग्न करता आलं पाहिजे.”

“ती मोकळी आहेच की हवं तेव्हा लग्न करायला. सज्ञान झाल्ये ती.”  -पाणिनी 

“ हो , पण त्यासाठी तिने विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्ये मिसळायला हवं.तुम्ही तिच्या कडे पाहिलंत की लक्षात येईल की तिच्यामधे एक विशिष्ट जुनाट पणा आहे.”

“ तुम्ही सांगितलेली पार्श्वभूमी पाहता त्याचा कायदेशीर बाबीवर फारसा परिणाम होणार नाही.ट्रस्ट हा दत्तक प्रक्रियेवर अवलंबून नाही.गेयता आता मोठी झाली आहे.तुम्हाला स्वत:ला कायदेशीर स्थान काही नाही.तुम्ही तिची नातेवाईक लागत नाही.तिच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं की तिला रशियामधून आणा आणि सांभाळ करा, तुम्ही तो केलात.एखादा हुशार वकील असे म्हणेल की तुम्हाला तिच्या आईबाबांकडून दागिने मिळाले त्या बदल्यात तिला तुम्ही रशियातून पळवून आणलेत, नंतर तुमचा तिच्यातील रस संपला आणि तुम्ही त्या केंद्राला दरमहा चेक देत राहिलात त्या व्यतिरिक्त तुम्ही तिच्या बाबतीत निष्काळजी च होतात.”

“ मी निष्काळजी नव्हते, मी त्या केंद्राला अधून मधून पत्र लिहून तिची चौकशी करायचे. ते ही मला उत्तर द्यायचे की ती चांगली आणि हुशार मुलगी आहे वगैरे.”

“तुम्ही ती पत्रे जपून ठेवली आहेत?”
“हो, आहेत माझ्याकडे.”

“अर्थात फसवणुकीने झालेल्या दत्तक विधानात टोपे चा काही संबंध नव्हता.आणि गेयता ला तक्रार करायला कारणच नाहीये कारण तिला वारसा हक्काने संपत्ती मिळाली आहे.”  -पाणिनी  .

“ पटवर्धन, परंतू ती अधिकृत रित्या दत्तक घेतली गेलेलीच नाही.तिच्या पालकांनी तिला जेव्हा दत्तक घ्यायचे ठरवले तेव्हा ती दत्तक जायला योग्य नव्हती वयाचे दृष्टीने.पण त्यांनी खूपच आग्रह धरला ,पैसे देऊ केले केंद्राला तेव्हा केंद्राच्या वकिलांनी सल्ला दिला की दत्तक विधान न करताच तिला फक्त त्यांच्या बरोबर राहू दे,म्हणजे तेच आपले आई वडील आहेत असे तिच्या मनात बिंबेल. त्यांची संपत्ती जी तिला भविष्यात दत्तक या नात्याने मिळाली असती ती त्या ऐवजी त्यांच्या मृत्यू पत्रानुसार तिच्या नावे करता येईल.”

“ तुम्ही तिला रशियातून बाहेर कसे काढले?”  -पाणिनी 

“ माझे काही उच्च पदस्थ अधिकारी असलेले  स्नेही  जोडपे रशियाला चालले होते, त्यांच्या कडील पासपोर्ट वर त्या दोघांबरोबर त्याचे लहान मुलीची ही नोंद होती. ती वारली तेथे असतानाच, तिच्या जागी मी या मुलीला आणायला लावले त्यांना.अर्थात मी हे जेवढे सहज सांगितले तेवढे सोपे नव्हते प्रत्यक्ष जमवणे, पण त्यांचा सरकार दरबारी मोठा वचक असल्याने त्यांनी हे जमवले.मी कोणाचीच नावे तुम्हाला सांगू नाही शकणार कारण आम्ही तो गुन्हाच केलाय.”

“मी त्या ट्रस्ट मधे अद्ययावत हिशोब ठेवायला भाग पडू शकतो.ट्रस्ट च्या उत्पन्नातील व्याज गेयता ला मिळेल असे करू शकतो.आणि शक्य झाल्यास मुद्दलातील काही भाग सुध्दा.नंतर च्या एक दोन वर्षात त्या तरुणीला ट्रस्ट च्या तरतुदी नुसार सर्व रक्कम मिळेलच.दरम्यान टोपे जर दोषी आढळला तर त्याला दूर करता येईल.”

“ अगदी हेच करावं तुम्ही अशी अपेक्षा होती माझी.अजित टोपे बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर त्याचा एक जवळचा मित्र आहे तो तुम्हाला देऊ शकतो. एका विद्यापीठाच्या संचालक मंडळात ते  दोघं एकत्रच काम करतात.”

“ हे फारच उत्तम झालं. काय नावं आहे त्या मित्राचं?”- पाणिनी “

तो खूपच श्रीमंत आहे समाजात प्रतिष्ठित समजला जाणारा आहे.तुमचा चाहता आहे. खरं म्हणजे त्यानेच मला तुमच्या कडे पाठवलं.”

“नाव काय आहे पण?” –पाणिनी

““राजेंद्र पळशीकर.”

सौम्या सोहोनी बसलेल्या दिशेने पाणिनी ने बघायचं सुध्दा टाळले.” ठीक आहे मिसेस टेंबे, मी तुमच प्रकरण घेण्यापूर्वी एकदा पळशीकर शी बोलून घेतो.”

“ त्याला विचारून प्रकरण स्वीकारायचे म्हणजे? त्याचा काय संबंध? तो फक्त तुम्हाला काही माहिती मिळायला उपयोगी पडेल अस म्हंटल मी.प्रकरण मीच देणार आहे तुम्हाला .त्याची आगाऊ फी मी तुम्हाला देऊन ठेवते.”

हातातील सिगारेट ची राख पाणिनी ने झटकली. तो म्हणाला,” मी तुम्हाला मगाशी म्हंटल्या प्रमाणे, तुम्हाला या प्रकरणात कोणताच  कायदेशीर अधिकार नाही, तुम्ही बायलर  च्या नात्यातल्या पण नाही.मला जर काही पुढे जायचं असेल तर त्याचे अधिकार मिस गेयता बाब्रस कडून मिळायला हवेत मला.”

मिसेस टेंबे चा अविर्भाव एकदम व्यावसायिक स्त्री प्रमाणे बदलला.हातातल्या घडाळ्यावर नजर टाकत ती म्हणाली,” उद्या दुपारी २ वाजता जमेल का?”

“ नक्कीच जमेल , आणि आवडेल भेटायला तिला.”  -पाणिनी  .

“ मी एक महत्वाचे सांगायला विसरले, पटवर्धन, “ ती म्हणाली.” जेव्हा टोपे मला म्हणाला की, माझ्या -म्हणजे त्याच्या वकीलाला भेटा, तेव्हा मी त्याला सांगितलं की पाणिनी पटवर्धन हे माझे वकील आहेत आणि ते तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता फोन करतील. बरोबर केलं नं मी?”

पाणिनी ने तिच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिले नाही.” तुम्ही याच शहरात राहता का?”  -पाणिनी 

“ नाही मी इथे नाही रहात ,गेयता इथे आहे म्हणून मी नुकतीच इथे आल्ये. श्रेयस हॉटेल मधे उतरल्ये.”

पाणिनी ने सहज बोलतोय असे भासवून विचारले,” तिचा पत्ता आहे का तुमच्या कडे?”

“ अर्थातच आहे तिचा पत्ता. व्हिस्टा एंजलीस अपार्टमेंट........

हे सगळ निस्तरले गेले की मी तिला फिरायला बाहेर घेऊन जाणारे. दरम्यान तिच्यासाठी पैशाची ही जरा व्यवस्था करणारे.पटवर्धन, लक्षात घ्या, तीच तुमची अशील असेल पण तुमची फी मी देणार आहे आणि तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्या मीच देणार आहे.”

“ तिच्या नावाची नोंद डिरेक्टरी मधे आहे?”  -पाणिनी 

“ हो आहे.”

“ ठीक आहे तर, उद्या दुपारी दोन ला भेटू.” -पाणिनी

“ मग टोपे ला कधी भेटायचे ?”

“ मी त्याच्याशी संपर्क करीन आणि सांगीन की माझा सल्ला एकाने घेतलाय त्याच्याशी  आधी भेटायचं ठरल्याने मला नंतरची वेळ दे भेटायला.” -पाणिनी

“ तिने पाणिनी शी हस्तांदोलन केले.” तुम्ही मला खरंच आत्मविश्वास दिलात.तुम्ही इतर वकिलां सारखे नाही.मला या वकिली पेश बद्दल रागच होता.पण पळशीकर म्हणाला तुम्ही वेगळे आहात त्याला तुमच्या बद्दल बरीच माहिती आहे असं दिसतंय. तुम्ही भेटला असाल मला वाटत या पूर्वी.”

पाणिनी हसला.,“मी बऱ्याच लोकांना भेटतो या पेशामुळे. खूप जण मला ओळखतात मला,पण सर्वाना ओळखत नाही.”

“खरं आहे ! प्रसिद्ध वकील असल्याचं हे लक्षणच आहे.” बाहेर पडण्याच्या तयारीत  टेंबे म्हणाली.” भेटू तर मग उद्या दुपारी.”  ती  बाहेर जाताना सौम्या आणि पाणिनी काही न बोलता बघत होते.उंबऱ्या पर्यंत आल्यावर तिने पुन्हा आठवण केली,” टोपे बरोबर अकरा वाजता बोलायचंय लक्षात ठेवा”

“ मजाच आहे सगळी, हो की नाही? “ –सौम्या उद्गारली

“ मला वाटलंच होत पत्त्याच्या या खेळात जोकर प्रवेश करेल म्हणून.” -पाणिनी

“ हा एक योगायोग असेल असंच वाटत.” –सौम्या.

“अगदी गणिती भाषेत सांगायचे तर एक कोटीत एक अशी शक्यता आहे.”

“ मला वाटत नाही की त्या  नोटेचा तुकडा त्या टेंबे बाईकडे असेल म्हणून.”  -सौम्या   .

“ पण गेयता कडे तो नसेल या बद्दल पैज लावायला तू तयार आहेस?” -पाणिनी .

“ नको पैज नको, तुमचा त्या बुरखाधारी स्त्री बद्दलचा अंदाज जास्त चांगला आहे.गेयता बाब्रस ला जर माहीत असेल की टेंबे तुमची भेट घेणार आहे, तर त्यामुळेच तुम्ही तिचा आवाज ऐकणार नाही याची तिने काळजी घेतली असावी. पण मला एक कळत नाही की एवढी गोपनीयता कशासाठी?”  -सौम्या  

“ कारण, तिचे आणि पळशीकर चे चांगले संबंध आहेत हे टेंबे बाईना कळू नये अशी गेयता ची इच्छा असेल.”

पाणिनी ने पुढे देलाला सूचना दिल्या,” त्या वर्तमान पत्राच्या जाहिरात विभागाला फोन कर आणि उद्याच्या पेपरात छोट्या जाहिराती या सदरात पळशीकर ला उद्देशून , म्हणजे नुसते  प  या अक्षराला उद्देशून जाहिरात द्यायला सांग,गेयता चे नाव डिरेक्टरी मधे ज्या पानावर,ज्या रकान्यात आणि ज्या क्रमांकावर आहे, त्याचा संकेत नंबर बनवून तिची वकिली घ्यावी का अशी विचारणा कर.

मला असं सारखं वाटतंय की ज्या क्षणी मी असे करीन , त्या क्षणी मी एखाद्या सापळ्यात अडकेन की काय.” -पाणिनी

“ त्या जाहिरातीची भानगड न करता तुम्ही तिची वकिली नाही का घेऊ शकत?”  -सौम्या   .

“ शकतो. पण मला नाही घ्यायची.ती मोठी रक्क्म मला काल  रात्री मोठी देणगी वाटली होती पण आता मला त्याची कटकट वाटायला लागल्ये.,  तू जाहिरातीचा विषय मार्गी लाव.कनक ला टोपे कडे बघायला सांग, आणि मला टोपे चा नंबर लाऊन दे.” -पाणिनी

थोड्या वेळाने सौम्या दारातून डोकावली आणि म्हणाली,” ती जाहिरात देण्या साठी  आज दुपारी दीड वाजेपर्यंत मुदत आहे., त्या मुळे मी ती तयार केली आहे, मला घाई करावी लागेल, अजित टोपे च्या सेक्रेटरी ने फोन उचललाय ,टोपे येतोय बोलायला.”

सौम्या ने पाणिनी ला फोन जोडून दिला..दरम्यान टोपे च्या सेक्रेटरीने टोपे ला फोन दिला. त्याचा त्रासिक स्वर पाणिनी च्या कानावर आला.” कोण, बोलणारे? काय कटकट आहे ! “

पाणिनी पटवर्धन ,अॅडव्होकेट.” पाणिनी म्हणाला. “ टेंबे बाईनी तुमच्याशी केलेल्या बोलण्या संदर्भात मी फोन केलाय.त्यांनी सांगितलं होत मला,अकरा वाजता तुम्हाला फोन करायला........ अजित टोपे च बोलताय ना?” –पाणिनी

पलीकडून जरा सावध पणे बोलल्या सारखा आवाज आला. “ टोपे च बोलतोय.तुम्हाला काय हवंय मला सर्व माहित्ये... आणि,.....” टोपे म्हणाला.

“मिसेस टेंबे माझ्या ऑफिस मधून  नुकत्याच बाहेर पडल्या आहेत,”  टोपे मधेच थांबल्यामुळे, संवाद पुढे चालू ठेवण्याचे दृष्टीने  पाणिनी म्हणाला.”त्या बाई म्हणाल्या की अकरा वाजता आपण दोघांनी एकमेकांची भेट घेऊया, तसे त्या जुळवून आणणार होत्या., अर्थात मला आधी न सांगताच त्यांनी तुम्हाला सांगून टाकले.”

“ मला बरोबर समजलंय पटवर्धन., मी च तुम्हाला फोन करणार होतो. हे सगळे भंकस आहे. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. मी पण माझा घालवणार नाही.मला मला माहीत होत एखाद्या म्हातारीच्या सांगण्यावरून तुम्ही एवढे कष्ट तुमचा धंदा सोडून एवढे लांब येणार नाही. पण मी त्या म्हातारीला काही बोललो नाही.पण मी मनाशी ठरवलं होत की या विषयात फार लक्ष द्यायचं नाही.पण मी माझ्या सेक्रेटरी ला सांगून ठेवलं होत तुम्हाला फोन लावायला.” टोपे म्हणाला.

“ या संदर्भात च  मला तुमच्या वकिलाशी बोलायला आवडेल.तुम्ही त्याचा फोन देऊ शकाल का मला.”

“ माझ्याकडे बऱ्याच वकिलांचा ताफा आहे.” –टोपे

“ हा विषय कोण हाताळतय त्याचे  नाव सांगा.

“ त्यातले कोणीच नाही करणार. ही सगळी मूर्खपणाची बडबड आहे.पण मी तुम्हाला सांगतो पटवर्धन, त्या म्हातारीने जर तिची ती कुजबुज थांबवली नाही ना, तर मी हात धुवून तिच्या मागे लागेन.गेयता ठीक आहे, आमचं जमत एकमेकांशी,पण स्वत:च्या फायद्यासाठी ती थेरडी आमच्या दोघांत काड्या लावू पाहते.तुम्ही अगदी हे मी म्हणालो म्हणून त्या टेंबे बाईला सरळ सरळ सांगा.”-टोपे

“ तुम्हीच सांगा तिला, मी आपली भेट रद्द झाली आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला होता.” -पाणिनी

टोपे हसला.” ठीक आहे ठीक आहे ! मला अगदी शब्दशः तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा भेटा, आपल्या दोघांच्या सेक्रेटरी एकत्र येऊन ठरवतील आपली भेट.अच्छा.”-टोपे

पाणिनी ने फोन ठेऊन दिला, आपल्या आराम खुर्चीत जरा मागे रेलून बसला, हात आणि पायाला जरा ताण दिला,आळस दिला, पुन्हा उठला, आणि अस्वस्थ पणे ऑफिस मधे येरझऱ्या घालायला लागला.

( प्रकरण २ समाप्त)