Get it on Google Play
Download on the App Store

खुनाची वेळ प्रकरण ४

प्रकरण चार

 

कनक ला घेऊन पाणिनी शहराच्या दक्षिण बाजूला असलेल्या टेकडी च्या दिशेने गाडीने चालला होता.

पुढे गेल्यावर आठ –दहा बंगली वजा घरांचा समूह दिसायला लागला.” या पैकीच एक बंगला असणार” ओजस म्हणाला.

पाणिनीने अनुक्रमांक पाहिले आणि म्हणाला,” या रांगेतला शेवटचा दिसतोय. .. हाच तो.”

बंगल्याचे तोंड आग्नेय दिशेला होते.त्याच्या वरील बाजूला पश्चिमेकडे टेकडीचे टोक दिसत होते तर पूर्वे कडे खालील बाजूस शहर पसरले होते, पांढऱ्या इमारतींवर सूर्य किरणे पडून त्या चमकत होत्या.वर तिरके लाल छत आणि त्याखाली स्वच्छः पांढऱ्या आणि उन्हात चमकणाऱ्या भिंती असे मनोहर दृष्य होते.घराची घंटा वाजवण्यापूर्वी पाणिनीने ते दृष्य मनात साठवून ठेवले.त्या प्लॉट चे जिथे दोन भाग पडत होते त्यापासून दोनशे फुटाच्या आतच हे घर होते.त्याच्या अगदी पलीकडून टेकडीच्या उतारावरून छानसे वळण घेऊन रस्ता खाली उतरून दिसेनासा होत होता.उबदार सूर्य प्रकाश होता,आकाश निरभ्र आणि निळेशार होते.

“ पडदे अगदी खाली घट्ट ओढून घेतलेले दिसताहेत , कोणी आत असेल असे वाटत नाही.” पाणिनी उद्गारला.

“ तो इथे असेल तर तो लपून बसलाय असा अर्थ होईल.” –ओजस

पाणिनीने पुढे सिमेंट च्या रस्त्यावरून पुढे जाऊन दारावरची घंटेचे बटण दाबले.आत मधे घंटेचा नाद ऐकू आला पण उत्तर दाखल कोणाच्याच पावलांची चाहूल लागली नाही.एखाद्या पडक्या घरात जाणवते तशी  एक भयाण शांतता जाणवत होती.

“ मागच्या बाजुने जाऊन प्रयत्न करू.” ओजस ने सुचवले.  

“ नको.” पाणिनी म्हणाला.” पुन्हा वाजवून बघू “

घंटा वाजवण्या साठी हात लावणार तेवढ्यात त्याला काहीतरी जाणवलं ! “ हे बघ कनक, काय आहे ते “ तो उद्गारला. त्याच्या नजरेच्या दिशेने ओजस ने बघितलं तर दाराच्या फटीतून एक रक्ताचा ओघळ दिसला.

“ हा बघ , आणखी एक आहे इथे.” ओजस म्हणाला.

“ दाराच्या पायरी पासून आठ इंचावर आहेत सगळे.” पाणिनीने लक्षात आणून दिले.” कोणीतरी रक्त बंबाळ अवस्थेत आत गेलं असेल”

“ किंवा आतून बाहेर आले असेल” ओजस ने पुस्ती जोडली.” आता ? “

पाणिनीने दाराशी खटपट करत म्हंटले, “ अरे हे दार घट्ट लावून घेतलेले नाहीये.”

“नाही त्या लफड्यात अडकायला नकोय आपण “ पाणिनीपुढे काय करणार आहे हे लक्षात येताच ओजस ने सावध केले.

“ हे डाग सुकले आहेत सगळे.  म्हणजे तसा बराच वेळ झालेला दिसतोय डाग सांडून. दुपारनंतर ऊन पडत असावे इथे “ पाणिनीने अंदाज येण्यासाठी घराच्या वरील बाजूला नजर टाकली. गच्चीच्या स्लॅब चा एक भाग बाहेर काढून दारावर एका प्रकारे छत निर्माण केले होते ,पण तो उपयोगा पेक्षा सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न होता.

पाणिनीने पुन्हा दारावर टकटक केली आणि त्याचं वेळी गुढग्याने  जरा जोर देऊन दार आत ढकलले.ते उघडले गेले. “ पाणिनी काय करणार आहोत आपण? मला नाही आवडलं हे सर्व “ ओजस ने त्याला सावध केले.

पाणिनी आत गेला.” कोण आहे का घरात?” त्याने मोठ्याने आवाज दिला.

आतून तो एक शानदार बंगला होता. रुंद खिडक्या, जेवायची खोली आणि स्वयंपाकघर असे दोन भाग करणारे नक्षीदार असे  अर्धे पार्टीशन, दिवाणखान्यात उघडणारी दोन दारे, म्हणजे सकृत दर्शनी दोन वेगळ्या खोल्यांची, बहुदा झोपण्याच्या खोल्यांची असावीत .कोणी रहात असल्या सारखे वातावरण होते.टेबलावर काही मासिके दिसत होती,टेबला जवळ एक आराम खुर्ची ओढून घेतलेली दिसत होती.

पाणिनीची नजर जमिनीवरील उंची कार्पेट कडे गेली.त्यावर तसच एक रक्ताचा ठिबका होता. थोड्या अंतरावर आणखी एक.  त्यापुढे फरशीवर ठराविक अंतरावर बारिक बारिक डाग बेडरूम च्या दाराजवळ डावी कडे गेले होते. त्याचा मागोवा घेत पाणिनीपुढे गेला. “ काय चाललंय तुझं? आत जाणार आहेस तू? “ ओजस ने विचारले.

उत्तर द्यायच्या ऐवजी पाणिनीदार उघडून आत गेला. दार उघडताच त्यांच्या नाकात एक उग्र दर्प शिरला.हवा नसलेली खोली उघडल्यावर येईल तसा. मृत्यूचे अस्तित्व दाखवणारा दर्प !!

अंथरुणावर पूर्ण कपड्यानिशी पडलेल्या त्या आकृतीकडे नजर जाताच त्या वासाची सर्व उत्तरे मिळाली.

“ तिथे फोन आहे बघ, पोलीस स्टेशन ला फोन कर कनक “ –पाणिनी

ओजस फोन कडे धावला.पाणिनीने खोलीकडे नजर टाकली. ती स्त्रियांची खोली वाटत होती.ड्रेसिंग टेबल वर क्रीम, लोशन सारख्या वस्तू होत्या.जमिनीवर रक्ताचे डाग होते. अंथरुणावर घातलेली चादर रक्तात भिजून वाळली होती.झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर करडया रंगाचा थ्री पीस सुट होता.कोटाची बटणे उघडीच होती. लाल ओघळ  पॅन्ट पर्यंत खाली उतरून सुकून  त्याची भयावह आकृती तयार झाली होती. पायात बूट नव्हते, करडया रंगाचे, सुटाच्या रंगाचेच मोजे होते.माणूस पाठीवर झोपला होता, डोळे अर्धवट बंद अवस्थेत होते.जबडा आत गेला होता आणि अर्धवट उघडे राहिलेले तोंड काळे निळे पडलेले होते.ओठाला किरमिजी रंगाचा डाग पाडला होता.कदाचित तो लिपस्टिक चा असू शकत होता.जीवंत अवस्थेत तो लक्षातही नसता आला पण म्लान पडलेल्या मृत शरीरावर तो उठून दिसत होता.

गॅस ची शेगडी पूर्ण क्षमतेने खदखदत होती.खिडक्या घट्ट बंद केलेल्या होत्या.त्याच्या झडपा खाली होत्या.खोलीत कुठेतरी माशी घोंगावत होती.

पाणिनीने गुढग्यात वाकून कॉट खाली पाहिले.काही दिसले नाही.कपाट उघडले, आत स्त्रियांच्या प्रसादनांची भरपूर पुस्तके होती.त्याने बाथरूम उघडली, बेसिन जवळ सुकलेले डाग होते.जमिनीवरचा टॉवेल घट्ट रक्ताने सुकून गेला होता. पाणिनीने शेजारच्या खोलीचा दरवाजा उघडला.ती खोली बहुदा पाहुण्यांसाठी असावी आणि एवढ्यात ती वापरली गेल्या सारखे जाणवत नव्हते.

ओजस फोन करून त्याच्याच कडे येत होता.” टोपे ? “

मला माहिती नाही, बहुतेक असावा.”-पाणिनी

“ त्याचे कपडे तपासलेस का?” –ओजस

“ नाही.” –पाणिनी

“ तेवढा तरी आगाऊ पण न केल्या बद्दल आणि अति उत्साहात धाडस न दाखवल्या बद्दल धन्यवादच तुझे ! “ –ओजस म्हणाला.” ते दार आधी बंद कर. खिडक्या उघड आधी पाणिनी.”

“ नाही आधी बाहेर जाऊ आपण, सर्व गोष्टी होत्या तशाच ठेऊ.” –पाणिनी

“ आपण आपल्या बोटांचे ठसे सर्वत्र उमटवून ठेवलेत ! पोलीस कधीही येतील......गाडी आलीच पाणिनी.”

एक झोकदार वळण घेऊन गाडी आत आली.

ओजस खिडकी च्या जवळच होता, त्याने झडप बाजूला सारून बाहेर बघितलं.

“ ओह ! काय दृष्य आहे !  सुंदर पायाची, हातात हेलकावणारी बॅग, तपकिरी कोट.त्याची झुबकेदार कॉलर . उतरलीच ती खाली ! “   ओजस उद्गारला. “ पाणिनी पटकन सांग काय करू मी? ती घंटा वाजवेल, दार उघडू ?” –ओजस

“ ते दार आधी बंद कर कनक. ते ढकल पायाने, त्याला स्प्रिंग असल्याने दार आपोआप बंद होईल.त्या गाडीचा नंबर बघ.”

“ नाही, मला इथून दिसत नाहीये तो .ती जाताना गाडी वळेल तेव्हा बघेन.”

“ तसाच शांत रहा , आणि गप्प बस “

तिच्या बुटांच्या टाचांचा आवाज जवळ जवळ येत दार पर्यंत आला. ते दोघे घंटा वाजायची वाट बघत असतानाच दारात किल्ली घातल्याचा आणि ती फिरवून दार आत ढकलल्याचा आवाज आला.आणि एक स्त्री आत आली.

आतला मंद उजेड तिच्या डोळ्यांना अंगवळणी पडायला जरा वेळ लागला , तो पर्यंत दोघेजण तिच्या दृष्टीला पडले नाहीत.ती झोपायच्या खोलीकडे क्याला निघाली होती तेवढ्यात तिचे डोळे सरावले,आणि पाणिनीला तिने पाहिले आणि दचकली.हातातील बॅग आणि कोट गळून पडला, ती घाबरून दाराकडे निघाली आणि हातातून किल्ल्यांचा जुडगा पडला.ओजस दारात तिची वाट अडवून उभा राहिला. ती किंचाळली.

“ थांब, ओरडू नको.” पाणिनी  जोराने म्हणाला.

आवाज ऐकून ती चक्रावली, “ ओह ! “ एवढेच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले.

“ मी वकील आहे, आणि हा माणूस गुप्तहेर आहे. म्हणजेच कोणी चोर नाही. “ पाणिनी म्हणाला.” तू कोण आहेस ? “

“ तुम्ही आत असे आलात?”

“ सरळ चालत आलो. दार उघडंच होतं”

“ मी आत आले तेव्हा ते बंद होत. या सगळ्याचा मला हादरा बसलाय चांगलाच. काय आहे हे सगळे?”

ती साधारण वीस ते तीस वयाच्या दरम्यान होती , दाट तपकिरी केस, कपडे आरामदायी पण त्यामुळे तिचे सौष्ठव उठून दिसणारे.

“तुम्ही इथे राहता का? “ –पाणिनी

“ हो.”

“ म्हणजे तुम्ही.....”

“ मी मिसेस टोपे.”

“ तुमचा नवरा पण इथे राहतो का?”

“ तुम्ही हे असले प्रश्न मला का विचारताय माहीत नाही, तुम्हाला काय अधिकार आहे त्याचा ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही असे दार फोडून आत कसे आलात?”

“ आम्ही दारातून सरळ आत आलो , दार फोडून नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे हे तुमच्याच फायद्याचे आहे. तुमचा नवरा पण इथे राहतो का?” –पाणिनी

“नाही. आम्ही विभक्त झालोय.”

“ तुमच्यातले जे गैरसमज होते ते एवढ्यात दूर झालेत का?”

“ नाही.”

“ त्या दृष्टीने काही बोलणी चालू होती का?”

“ तुमचा या सर्वाशी काही संबंध नाहीये पण असेल तर माझ उत्तर ‘ नाही’  असे आहे.”

तिचा घाबरलेला चेहेरा पूर्व पदावर यायला लागला होता.

“ जरा शांत पणे बसून विचार करा.पोलीस येत आहेत इथे.”

“ ते कशाला येणार आहेत? त्यांचा काय संबंध? “

“ आम्हाला बेडरूम मध्ये जे काही आढळलं , त्या संदर्भात.” पाणिनी त्या रक्ताच्या डागा कडे निर्देश करत म्हणाला.

“ काय आहे हे? काय पडलंय माझ्या जमिनीवर? शाई? ....अरे बापरे! “ ती  त्या डागाच्या दिशेने गेली, घाबरून तिच्या  हातातला मोजा दाता खाली चावला गेला. “ कोण...कोण...काय....” ती बरळली.

“ शांत व्हा.” पाणिनी म्हणाला.” तुम्ही धक्का पचवण्याची तयारी ठेवा. कोणीतरी तुमच्या ओळखीचे आहे.”

“ नाही...नाही...असे असू शकत नाही, देवा रे! तो... “

“ तुमचा नवरा.”

“ माझा नवरा ! “ ती उद्गारली. तिच्या आवाजात अविश्वासपणा आणि एक मोकळे झाल्याची भावना अशा दोन्ही चे मिश्रण होते.

“ मला वाटतंय की ते प्रेत तुमच्या नवऱ्याचे आहे.” –पाणिनी

ती लटपटत बेडरूम च्या दिशेने धावली.” मला बघायचं..” असे काहीतरी पुटपुटत.पाणिनीने तिचा हात पकडला.” असे काही अत्ताच करू नको, त्या दाराच्या मुठीवर तुमचे  ठसे उमटतील.”

“ पण मला अधिकार आहे मला ते पाहण्याचा, तुम्हाला कळत नाहीये का , की कसे...”

“तुमच्या नजरेतून तुम्ही विचार नका करू,  पोलिसांच्या दृष्टीने करा.” पाणिनीम्हणाला.

तिने काही क्षण त्याच्याकडे चमकून पाहिले. नंतर थकून जवळच्या स्टुलावर बसली.” काय झालंय?” तिने विचारलं.

“ सकृत दर्शनी त्याला गोळी घातली गेल्ये.” –पाणिनी.

“ कधी?”

“ माहीत नाही, काल सकाळी तो त्याच्या ऑफिस मधे होता,आम्ही बोललो होतो फोन वर, त्या नंतर तो थोड्याच वेळात इकडे आला असला पाहिजे. तुम्हाला काय माहिती आहे त्या बद्दल?” –पाणिनी

“नाही.सोमवार दुपार पासून मी बाहेरच होते.”

“ सोमवारी किती वाजल्या पासून?” –पाणिनी

“ का?”

पाणिनी हसला.”पोलीस हे प्रश्न विचारतील शेवटी हे घर तुमचं आहे.पोलीस इथे येऊन प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्हाला विचार करायला संधी मिळावी असा माझा प्रयत्न होता..”

“ती आत्महत्या तर नसेल ना”

सांगता नाही येणार मला,मी त्या दृष्टीने तपासणी केली नाही.”

“ तुम्ही इथे का आलात?”

“ आम्हाला वाटलं की मंगळवारी ऑफिस सोडल्यावर तो इकडे आला असावा.तुम्ही एवढ्यात त्याला भेटला होता का?” –पाणिनी

“ नाही भेटलो. आमचे चांगले संबंध नाहीयेत.”

“ सोमवारी दुपारी  तुम्ही कुठे गेला  होतात हे मला सांगायला काही हरकत आहे का?” –पाणिनी

“ मी जवळ जवळ रात्रभर गाडी चालवत होते, मी खूप अस्वस्थ होते.”

“ कुठे गेला होतात ?”

“ मैत्रिणीकडे. तिच्या कडे मी दोन दिवस घालवले.”

“ तुम्ही फार सामान घेतले नव्हते बरोबर.” पाणिनीने तिच्या निदर्शनाला आणून दिले.

“ मी अचानकच ठरवले.मला बरेच त्रास होत होते.”

“ कुठे राहते ही मैत्रीण”

“ रेणापूर “

“ सोमवारी तुम्ही रेणापूर ला जायला निघालात?”

“ हो , आणि मंगळवारी सकाळी उजेड पडायच्या आत पोचले.”

“ आणि नंतर अत्ता पर्यंत तिथेच होतात?”

“ काल रात्री दहा पर्यंत तिथे होते. दहालाच निघाले.”
“रात्री कुठे राहिलात”

ती हसली.” मी जेव्हा कुठे जाण्यासाठी प्रवास करते तेव्हा रात्रीचाच प्रवास पसंत करते आणि रात्रभर प्रवास करते, जेव्हा झोप येत्ये असे वाटते तेव्हा गाडी रस्त्याच्या बाजूला लावते आणि काही काल झोपते आणि पुन्हा गाडी चालवणे चालू करते.”

“ काल येताना तुम्ही झोपलात वाटेत?”

“ हो , थोड्या थोड्या वेळाने, एखादी डुलकी काढली.”

“ पोलीस तुमच्या या सर्व कालावधीची माहिती घेतील. तुम्ही त्यांना सर्व तपशील दिलात,तर तुमचे काम हलके होईल.एक मित्र म्हणून तुम्हाला सांगतोय. हे काय आलेच पोलीस.” -पाणिनी.

टेकडीवर सायरन चा आवाज किंचाळला. थोड्याच वेळात घराजवळ पोलिसांची गाडी आली आणि त्यातून एक अधिकारी उडी मारून खाली उतरला आणि टांगा टाकत घराकडे निघाला.ओजस ने दार उघडले.” तुमच्या पैकी कोणी फोन केलं होता चौकीत?” आल्या आल्या त्याने विचारले

“ मी केलं,  मी ओजस,खाजगी गुप्तहेर.”

“ ही बाई आणि हा दुसरा माणूस कोण?”

“ या मिसेस टोपे आहेत , मी चौकीला फोन केल्या नंतर लगेचच या आल्या.” –ओजस

पोलिसाने तिच्याकडे संशयाने पाहिले. “ मी अगदी एका मिनिटा पूर्वीच रेणापूर हून आले. मी गाडी चालवत आले.”

“ तिकडून कधी निघालात तुम्ही?”

“ त्या इथे राहतात. हे त्यांचेच घर आहे.दोन दिवसांकरता त्या रेणापूर ला मैत्रिणीकडे गेल्या होत्या.”  -पाणिनीने खुलासा केला

“ तुम्ही कोण आहात?” पोलिसाने पाणिनीला विचारले.तो काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात पोलिसाच्या लक्षात आले.” ओह , आत्ता नीट पाहिल्यावर आठवले, तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात.वकील. इथे काय करताय?”

“आम्ही टोपे ला भेटायला आलोय.” –पाणिनी

“ भेटला तो तुम्हाला?”

“तो आतल्या खोलीत मृत अवस्थेत पडलाय.”

“माझ्या माहिती प्रमाणे,तुम्ही अस म्हणालात की या बाई तुम्ही आल्या नंतर इथे आल्या.”

“ होय बरोबर.”

“ मग तुम्ही आत कसे आलात?”

“ दाराला कुलूप नव्हतं, थोडीशी फट होती .”

“ एक दोन मिनिटात गुन्हा अन्वेषण चे पोलीस येतील.त्यांनी आम्हाला इथे आधी पाठवलं,परिस्थिती जैसे थे ठेवायला.तुम्ही कशाला स्पर्श तर नाही नं केलेला?”

“ नाही, महत्वाच्या कशालाच नाही.” –पाणिनी

“ दाराच्या मुठीला वगैरे?”

“कदाचित.”

“ ठीक आहे , सगळ्यांनी बाहेर थांबा, छान आहे बाहेर हवा. म्हणजे अजून कशाला स्पर्श होणार नाही कोणाचा.तुम्ही कोणी प्रेताला स्पर्श नाही नं केला?”

“ नाही केला.”

“ प्रेताच्या कपड्याला वगैरे?’

“ नाही.”

“ ठीक आहे , कुठे आहे ते? “

“ त्या बेड रूम मधे.”

अरे, हे काय आणि?”

“ रक्ताचे डाग. त्याचा माग काढतच आम्ही बेड रूम पर्यंत गेलो.”

“ ठीक, तुम्ही आता बाहेर थांबा, मी आत डोकावून येतो.” त्याने आत जाऊन दार लोटून घेतले.

“ तो टोपे आहे असे म्हणायला वाव आहे, पण इथे त्याची बायकोच हजर आहे तर तिच्याकडूनच स्पष्टच ओळख का पटवून घेऊ नये?” –पाणिनी

“ गुन्हे अन्वेषण चे लोक आले की ते करतील हे काम. तुम्ही आता बाहेर व्हा “

पाणिनी,ओजस आणि मिसेस टोपे बाहेर आले, तेव्हा  त्याने दार बंद करून घेतले.

पाणिनीने सिगारेट बाहेर काढली,, एक तिला दिली.ओजस ला हव्ये का विचारले, त्याने मानेनेच नकार दिला. पाणिनीने स्वतःच्या आणि तिच्या सिगारेटला लायटर ने एकाच वेळी पेटवले.तेवढ्यात खालून वर गाडी येत असल्याचा आवाज आला. गाडी आल्यावर त्यातून इन्स्पेक्टर  इन्स्पे.होळकर उतरला.” सुप्रभात पटवर्धन.” तो म्हणाला.पाणिनी ने ही त्याला अभिवादन केले.

“ तुझं इथे कसे येणे झाले पटवर्धन? -  इन्स्पे.होळकर

“ टोपे बरोबर व्यवसायाचे निमित्त काम होत. मला एक बातमी कळली होती की तो इथे आहे म्हणून.”

“ मग? झाली का भेट?”

“ मृत अवस्थेत ! माझ्या अंदाजानुसार काल दुपार पासून तो इथे पडलाय.गॅस चा हिटर चालू  आहे.खिडक्याची दारे घट्ट बंद आहेत. मृत्यू ची वेळ ठरवण्य साठी या गोष्टी तुझ्या उपयोगी ठरतील.”

“ इथे कधी आलास तू?”

“ साधारण अर्ध्या तासापूर्वी.”

“आपल्याला इथे मृत व्यक्ती दिसेल असा तुला काही अंदाज नव्हता ना?”

“ नाही.” –पाणिनी

“ त्याला पाहिले होतेस का आधी?”
“पाहिले नव्हते,पण काल त्याच्याशी फोन वर बोललो होतो,अकरा वाजण्यापूर्वी,त्याच्या ऑफिस ला फोन केला होता, ठरवलेली भेट रद्द करण्यासाठी” –पाणिनी

“ तुझं त्याच्याकडे काम काय होत?”

पाणिनीने मानेने नकार दिला उत्तर द्यायला.

“ अरे बाबा, सांग, आपल्याला खुनाचा तपास करायचाय तर बोल.

पाणिनीने काही उत्तर दिले नाही. इन्स्पे.होळकर  काय ते ओळखून गेला.” मी सांगे पर्यंत इथून जाऊ नकोस. बाहेर गाडी दिसत्ये ती तुझी आहे?”

“ हो.”

“ आणि ती दुसरी गाडी?” - इन्स्पे.होळकर

“ ती मिसेस टोपे यांची आहे.” पाणिनी तिची ओळख करून देत म्हणाला.

“ हा जो गेला आहे तो तुमचा कोण होता?” - इन्स्पे.होळकर

“ माझा नवरा “ तिने उत्तर दिले.

‘’ त्याच्या बरोबर रहायचात इथे?”
नाही, आम्ही विभक्त होतो, म्हणजे अजून मी त्याला घटस्फोट नाही  दिलेला.”

“ का ? “ - इन्स्पे.होळकर

“ मला याची चर्चा नाही करायची.”

“ केव्हातरी सांगावच लागेल तुम्हाला, मला तुमच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसायचे नाही पण तपास कामात ही माहिती लागेलच. मी आत जातोय आता, तुम्ही जाऊ नका इथून.”

तो आत गेला, पाणिनीने संपत आलेली आपली सिगारेट बुटाच्या टाचेवर घासून विझवली.” उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारतो मिसेस टोपे, “ पाणिनी म्हणाला.” तुमचा नवरा या जागी या आधी आला होता? “

“ एकदाच, व्यावसायिक कामासाठी.”

“ तुमच्या दोघांत पोटगी वरून वाद होता?” –पाणिनी

“ नाही. म्हणजे तो फारसा गंभीर नव्हता.त्याची मी फारशी फिकीर केली नव्हती.”

“ तुम्हाला स्वातंत्र्य हवे होते?” –पाणिनी

“ तुम्ही हे असले प्रश्न का विचारताय मला?”

‘’ कारण मला माझ्या अशीलासाठी त्याची उत्तरे उपयोगी पडणार आहेत. तसही पोलिसांना, ही उत्तरे द्यावीच लागतील तुम्हाला.”

“कोण आहे तुमचे अशील?”

“ मी त्या बद्दल काही भाष्य करू इच्छित नाही .”

“ ती बाब्रस तर नाही?”

“ ती असेल असे का वाटते तुम्हाला.?” –पाणिनी

“ तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.”

“ आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचे दिले नाही.” –पाणिनी

फुटपाथ च्या कडेवरून सौम्या पासून दूर  पाणिनी जाऊन उभा राहिला,एकाग्र पणे विचार करत. ओजस शांत पणे उभा होता, पूर्ण पणे या विषयाशी संबंध नसल्या सारखा.अचानक पाणिनीवळला आणि  एकेरीवर येत,तिला म्हणाला,” “ तशी तू चांगली मुलगी दिसतेस.”

“ धन्यवाद “

“ तू कोणाला फसवत असशील असे वाटत नाही. नाही का ? “ –पाणिनी

“ का? काय म्हणायचं आहे तुम्हाला?”

तेवढ्यात इन्स्पे. होळकरबाहेर आला , टोपे ला उद्देशून म्हणाला, “  इकडे या तुम्ही ”

पाणिनीने सहज हालचाल करतोय असे दाखवत  पाकिटातून सिगरेट काढली. अगदी हळू आवाजात तिला म्हणाला.” सांभाळून ” “ तुला काही सांगायचं असेल तर अत्ताच  मला सांगणे तुझ्या हिताचे आहे.”

मिसेस टोपे ने त्याच्याकडे पाहत ठाम पणे मानेने नकार दिला आणि आत्मविश्वासाने पावले टाकत घरा कडे निघाली.

(प्रकरण ४ समाप्त.)