Get it on Google Play
Download on the App Store

खुनाची वेळ प्रकरण-10

खुनाची वेळ

प्रकरण १०

टोपे चा सेक्रेटरी मंदार याने दारावर टकटक झाली म्हणून दार उघडले.दारात पाणिनी पटवर्धन ला बघून तो उडालाच !  “ अरे पटवर्धन तुम्ही?  या आत या. काय विशेष काम काढलंत?”

“ मी कोणाची नावे घेत नाही पण असं म्हंटल जातंय की शेअर चा व्यवहार ब्रोकर च्या ऑफिस मधून केल्यावर तू टोपे च्या केबिन मधे गेलास, तिथे त्याने तुझ्यावर आरोप केला की तुझा या व्यवहारात वैयक्तिक स्वार्थ होता, तुमचं त्यामुळे भांडण झालं आणि त्यात तू त्याचा खून केलास.”

“ हे हास्यास्पद आहे.”

“ म्हंटल तुला या गोष्टीची आधी कल्पना दयावी म्हणजे तू स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकशील.”

“ पाहिली गोष्ट म्हणजे मी ब्रोकर च्या ऑफिसातून निघाल्या पासून प्रत्येक मिनिटाचा हिशोब देऊ शकतो. कारण जेव्हा टोपे गेला तेव्हाच मला वाटलं की जे जे आठवतंय ब्रोकर चे ऑफिस सोडल्या पासून, ते ते लिहूनच ठेवावे.”

“ चांगली आहे कल्पना.” पाणिनी म्हणाला.

“ ब्रोकर चे ऑफिस मी अकरा-आठ ला सोडलं.व्यवहार पूर्ण झाला तेव्हा वेळ नोंदून ठेवावी अस मला वाटलं म्हणून ती लक्षात आहे.तिथून मी माझ्या ऑफिस ला आलो, दुपारी टोपे ने मला फोन केला.त्याला मी व्यवहार व्यवस्थित पूर्ण झाल्याचे सांगितले आणि मिसेस टेंबे त्याला भेटू इच्छित असल्याचे सांगितले.त्या नंतर बारा –पाच ला मैत्रिणी बरोबर जेवायला बाहेर गेलो.एक ला पाच मिनिटे बाकी असताना परत ऑफिस ला आलो.”

“ ती मैत्रीण तुझ्या या म्हणण्याला पुष्टी देईल ना?”

“ नक्कीच, इ ज्या ऑफिस मधे काम करते इथे प्रत्येक गोष्ट अगदी वेळेनुसार होते आहे की नाही हे तपासले जाते.”

“ बर एक नंतर काय केले?”  - पाणिनी

“ नंतर मी ऑफिस ला परतलो, काही विषय इमारतीच्या व्यवस्थापकाकडे न्यायचे होते म्हणून त्याच्या सेक्रेटरी मार्फत एक-पंचवीस ची भेट ठरवली.त्याच्याशी मी पंधरा मिनिटे बोललो.जाताना त्याच्या सेक्रेटरी ला पुन्हा सांगितले की कबूल केल्या प्रमाणे मी बरोबर पंधरा मिनिटातच आवरलंय बोलणं. त्यामुळे माझ्या लक्षात आहे., त्या नंतर मला घड्याळ घ्यायचे होते म्हणून दुकानात गेलो,तिथला एक जण माझ्या ओळखीचा आहे.मी जवळ जवळ अर्धा तास घड्याळ बघण्यात घालवला.”

“ तुझा तिथला जो मित्र आहे तो याला दुजोरा देईल? प्रसंग आणि वेळे बाबत?”

“ हो नक्की देईल कारण, घड्याळ लावताना मी त्याला म्हणालो देखील की माझे जुने घड्याळ आहे ते अर्ध्या तासात एक सेकंद सुध्दा चुकीची वेळ दाखवत नाही.”

“ हा तुला दोन –तीस पर्यंत चा हिशोब देता आला. त्या नंतर चे काय?” पाणिनी ने विचारले.

“ टोपे च्या आयकराचे काम पाहणाऱ्या माणसाला मी माझ्याकडे बोलून घेतले होते.पावणे तीन ते पाच पर्यंत आम्ही एकत्र होतो.”

“ आणि पाच नंतर?”

“ एका तरुणीला मी पाच-वीस ला बोलावले होते, सिनेमाचा आणि रात्री च्या जेवणाचा कार्यक्रम आखला होता.”

“ जिच्या बरोबर दुपारी जेवण घेतले तीच मुलगी का?”

“ नाही ही वेगळी होती.”

पाच वीस अशी विशिष्ट वेळ का दिली? ”

“ काही खास अस नव्हत कारण. साडेपाच ला निघायचं म्हणून दहा मिनिटे आधी बोलावले एवढंच”

“ जेवायला जाण्यासाठी साडेपाच ही फार लवकर ची वेळ नव्हती का?”

“ आधी सिनेमा बघायला जाणार होतो, नंतर जेवायला.”

“मंगळवारचे सांग आता “

“मंगळवारी मी सकाळी नऊ ला आलो ऑफिसला.सव्वा नऊ ला टोपे आला.आम्ही साडे दहा पर्यंत पत्र व्यवहार हाताळला,नंतर त्याला मी वेस्टर्न माईन च्या व्यवहाराची माहिती दिली. तेव्हाच तुमचा फोन आला.त्यामधून मिसेस टेंबे चा विषय निघाला आणि टोपे ची चिडचिड झाली.नंतर टोपे बाहेर गेला आणि मी शेअर्स च्या व्यवहार पूर्ण करायला बाहेर पडलो.”

“ मंगळवारी टोपे खेरीज कोणाला भेटला का?”

“ ब्रोकर्स ना, आणि मिसेस टेंबे ना, अकरा नंतर.”

“ मला म्हणायचय, अकरा पूर्वी.”

त्याने थोडा वेळ विचार केला, मग मान हलवली.” नाही अकरा पूर्वी नाही आले कोणी ऑफिसला.”

“ दुपारच्या नंतरच्या वेळेचा तुझ्याकडे चोख हिशोब आहे.’’

“ मधला साधारण वीस मिनिटाचा कालावधी सोडला तर मी पूर्ण बिझी होतो आणि त्या वेळेमधे ज्या  ठिकाणी टोपे चे शव मिळाले,त्या बंगल्यात जाऊन येणे शक्य च नाही .”

“ हा खूप महत्वाचा मुद्दा आहे , नाही का? “ पाणिनी ने विचारले.

“ म्हणजे? मी नाही समजलो”

“तुझ्या कडे अकराच्या आधीचा हिशोब नाहीये. पण सकाळी अकरा नंतर तुझ्याकडे प्रत्येक मिनिटाचा हिशोब आहे आणि त्या मधे  तुझ्या बरोबर प्रत्येक प्रसंगी जे मित्र मैत्रिणी होते, त्यांच्या बरोबर तू किती वाजता आणि किती वेळ होतास हे त्यांच्या लक्षात पक्के ठसेल अशी व्यवस्था तू केलीस.! उदा. इमारतीच्या सेक्रेटरी तर्फे व्यवस्थापकाच्या भेटीची वेळ ठरवणे,पंधरा मिनिटे कधी संपली ते तिला निक्षून सांगणे, घड्याळ वाल्या बरोबरचा वेळेचा उल्लेख केलेला संवाद,मैत्रिणीला पाच-वीस अशी लक्षात राहील अशी वेळ देणे “ पाणिनी ने स्पष्ट केले.

 

मंदार चे डोळे भीतीने मोठे झाले. पाणिनी, पुढे म्हणाला, “ तुला त्या शेअर्स च्या व्यवहारात रस होता. ब्रोकर च्या ऑफिस ला जाण्यापूर्वी,  टोपे मेल्याचे तुला माहिती होते,पण शेअर्स चा व्यवहाराचा करार पूर्ण होण्यापूर्वी टोपे जीवंत आहे हे दाखवणे तुला आवश्यक होते. अकरा पर्यंत तो जीवंत होता असे तू दाखवलेस की पोलीस स्वाभाविकच असे समजणार की तो अकरा नंतर मेला, आणि अकरा नंतर तुझ्या कडे प्रत्येक मिनिटाचा हिशोब तयारच आहे.”

“ मी असले काही नाही केलेले. खात्री देतो मी.”- मंदार

“ मी एक लढवय्या वकील आहे, आणि जेव्हा मी लढतो तेव्हा समोरच्याच्या पट्ट्याच्या खाली  मारतो. टोपे च्या खूनाचा आरोप ज्याच्यावर येऊ शकतो त्या व्यक्तीची वकीली मी घेतली आहे.”

“ आणि त्याला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या सारख्या निरपराध माणसाला अडकवणार?”

“ मी तुझ्यावर आरोप करत नाहीये, मी एवढंच सांगतोय की मंगळवारी दुपार पूर्वी तो मेलाय हे तुला माहीत होत.पण व्यवहार होई पर्यंत तो जीवंत असल्याचे नाटक वठवणे भाग होते तुला. पण कोर्ट विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर.”

“का नाही ठेवणार” 

“ सविस्तर सांगतो तुला. “ पाणिनी म्हणाला. “ असे समज की मंगळवारी सकाळीच टोपे त्याच्या त्या बंगल्यावर असणार आहे हे तुला माहीत झालं होत.तू त्या बंगल्यात कागद पत्रांची बॅग घेऊन सह्या आणण्यासाठी आणि काही सूचना असतील तर ते विचारण्यासाठी गेलास.तुला त्या बंगल्यात टोपे अंथरुणावर अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तू कोणालाही न दिसता बाहेर पडलास,त्याच्या मृत्यूची बातमी बाहेर येणे म्हणजे शेअर्स चा व्यवहार थांबवणारे ठरेल याची तुला जाणीव झाली,म्हणून तू असे भासवायचे ठरवलेस की तो दुपार नंतरच मेला.सुदैवाने मी टोपे ला केलेला फोन म्हणजे तुला संधीच मिळाली ते सिध्द करायला.कारण मी टोपे चा आवाजच कधी ऐकलं नव्हता.तूच आवाजात बदल करून टोपे म्हणून माझ्याशी बोललास. मी अत्ता जे तुला सांगितलं ते मी न्यायाधीशांना सांगीन कोर्टात केस उभी राहील तेव्हा, त्यांना शंभर टक्के हे पटेल, की तूच टोपे ला सकाळी अकरा पूर्वी मारलेस,डॉक्टर सुध्दा हेच म्हणताहेत की टोपे अकरा वाजल्या नंतर जीवंत नव्हता.”

“ हे सर्व खोटे आहेच, पण जरी ते सत्य आहे हे सिध्द करायचे झाले तुम्हाला तरी ते कसे करणार?”

पाणिनी हसला, “ माझे सर्व पत्ते मी थोडेच उघडे करणार आहे अत्ता ? पण लक्षात ठेव मी असे सांगीन की बोरगीकर हा तुझा साथीदार होता टोपे च्या खुनात, तू आणि बोरगीकर ने ब्रोकर ना सुध्दा अंधारात ठेऊन पैसे हडप केले. बोरगीकर ला खुनाच्या प्रकरणात अडकवलं की तो ओरडून सांगेल की त्याचा संबंध फक्त शेअर्स च्या व्यवहारात होता खुनात नाही.  बस्स मला एवढंच सांगायचं होत की माझ्या अशिलाला वाचवण्यासाठी मी काय करू शकतो.

” तू मला असे दमात घेतलस  हे मी न्यायमूर्ती ना सांगीन.” मंदार एकेरीवर येत म्हणाला.

“ तू  सांगायची गरज नाही मित्रा, मीच सांगेन ते.अजून एक, आज मी तुला भेटायला यायचं कारण म्हणजे मी या आधी तुझा आवाज ऐकलं नव्हता, आता मला खात्री पटली आहे की तुझा मूळ आवाज कसा आहे आणि तू बदलून टोपे च्या आवाजात कसा बोलला असशील. हे पण मी न्यायाधीशांना सांगीन “ पाणिनी ने दम दिला.

“ मी पण सांगीन यावर विश्वास ठेऊ नका म्हणून “  मंदार

“ सांग ना, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवतील ते पाहू,”

पाणिनी उठला, सहज बोलतोय असे  भासवून म्हणाला, “ येनपुरे नावाच्या इन्स्पेक्टर शी संबंध आलाय कधी? मस्त माणूस आहे, आयकर विभागात काम करतो,  माझा मित्र आहे. तुझा येईल संबंध लौकरच. जे आयकर चुकवणारे असतात त्यांच्या मागे लागण्याचे काम करतो. सरकार ची एक चांगली पद्धत आहे, त्यांना एखादी टिप मिळाली ना, की कोणीतरी आयकर चुकवला आहे, की ते त्याचे सर्व उदयोग , बँकांचे तपशील, खणून काढतात. आणि त्यांना त्या टिप च्या आधारे आयकर वसुली करता आली ना, की त्यातले काही टक्के ते टिप देणाऱ्याला देतात.”

मंदार घाबरून उद्गारला.” तुम्ही त्या इन्स्पेक्टर ला काहीही सांगणार नाही. बरोबर ना?”

“ का बर नाही सांगणार?”  - पाणिनी

“ अहो मी तुम्हाला एवढे सहकार्य केलं ना ! “

“ तू त्या बोरगीकर शी संधान साधून त्या पन्नास लाखात जर काही लोचा केलं नसशील तार तुला अजिबात घाबरायचे कारण नाही.”   एवढे बोलून पाणिनी ने बाहेर जाण्यासाठी दार उघडले.

“ अहो, जाऊ नका असे, आत या आणि बसा पुन्हा.”

“ बसा? का बर बसू पुन्हा?” पाणिनी ने भाबडे पणा चा  आव आणून विचारले.

तुम्ही पकडलत मला बरोब्बर “ मंदार म्हणाला. “मला त्या व्यवहारातून पंचवीस  लाख मिळाले,रेस मधे मी हरलो होतो त्या मुळे मला गरज होती फार.”

पाणिनी आता आरामात आत येउन बसला.”बोरगीकर तुझ्याशी संपर्कात आला तू बोरगीकर च्या आलास?”

“ मी त्याला गाठले.मला शेअर मधले कळते , मी त्याला प्रस्ताव दिला.टोपे ला त्यात आकर्षण वाटेल अशी व्यवस्था मी करायची होती, बोरगीकर ने त्याचा हिस्सा विकायचा होता.आणि मला पन्नास टक्के मिळायचे होते.”

“ पण तुला पन्नास टक्के नाही मिळाले?”

“ नाही ना, तो हरामखोर बोरगीकर, तो म्हणाला, मलाच जास्त खर्च आलाय या सगळ्यात, आणि बँकेतील माणसाला पण काही लाच द्यायला लागली.त्यामुळे  आता पंचवीस  लाखाच्या ऐवजी मी दहा लाखावरच समाधान मानावे.”

“ आता मग मला सांग टोपे मेला हे तुला कसे कळले?”

“ मला नाहीच कळले. प्रामाणिक पणाने  सांगतो. सर्व काही खरं सांगतोय आता.”

“ तुझ्या खोटारडे पणाचा मला वीट आलाय आता. मी सरळ सरकारी वकिलांकडे जाऊन त्यांना टीप देईन तुझ्या बद्दल.”

“ तुमच्या कडे काहीच सांगण्या सारखं नाही माझ्या विरोधात.”

“ तुला ते पंचवीस लाख हवे होते कारण तू चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेस.”

“ अनेक जण हरतात रेस मध्ये , त्यात काय एवढे?” मंदार म्हणाला

“ पण तुला रेस मध्ये हरलास म्हणून नव्हे तर रेस खेळण्यासाठी पैसे हवे होते.” – पाणिनी

“ शेवटी पैसे मिळणे महत्वाचे होते मला,”

“ माझा अंदाजच नाही तर खात्री आहे की रेस वर या पूर्वी लावलेले पैसे हे तू टोपे च्या आणि ट्रस्ट च्या खात्यात अफरातफर करून मिळवले होतेस.ऑडीटर ने तुला बरोबर पकडले असते , जर तू तो पंचवीस लाखाचा झोल केला नसतास तर.”

मंदार  च्या  चेहेऱ्यावर भीती आणि नैराश्येचे भाव उमटले. पाणिनी ला वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच.

“ तर तू केलेला हा उपदव्याप टोपे ला समजला होता.” पाणिनी ने पुढे तोफ डागली.” त्याने तुला मंगळवारी सकाळी त्याच्या बंगल्यावर बोलावले.तुला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. तुला माहिती होते की आणखी थोडा वेळ काढू पणा  केला तर शेअर्स चा व्यवहार पूर्ण होईल आणि अफरातफरीची रक्कम भरून देता येईल.तुझा अंदाज होता की हिशोबाच्या पुस्तकात काही तरी मखलाशी करून मूळ अफरातफरीची रक्कम भरून काढता येईल. तू खूप उद्दीपित झालास आणि टोपे वर बंदूक रोखलीस. तो तुझ्या अंगावर आला आणि तू चाप ओढलास.”

“नाही ssss” मंदार जोरात ओरडला.” कोणीच विश्वास ठेवणार नाही यावर “

“ तू मला चांगलाच मार्ग दाखवला आहेस मंदार, आता मला माझ्या अशीलाची काहीच चिंता नाही वाटत.” पाणिनी म्हणाला आणि उठून उभा राहिला.

“ थांबा पटवर्धन. मी वस्तू स्थिती सांगतो तुम्हाला., मी तिथे गेलो तेव्हा आधीच तो मेलेला होता.कितीतरी आधी.”

“ नेमका कधी?”

“ मंगळवारी सकाळी साडे आठ च्या सुमारास. तिथेच त्या अंथरुणावर.”

“ काय झाल?”

“ टोपे मला म्हणाला की तो त्याच्या बायको बद्दल काहीतरी शोधून काढायचा प्रयत्न करत होता.ती एका माणसामध्ये गुंतली होती पण घटस्फोटाचे [प्रकरण चालू असल्याने,त्या माणसाला पुढे आणणे श्रेयस्कर नव्हते.टोपे म्हणाला की त्या माणसाची माहिती त्याने शोधून काढली होती आणि  बायको समोर तो शहानिशा करणार होता. काही महत्वाच्या कागदावर त्याला सह्या करायच्या होत्या आणि त्याने मंगळवारी सकाळी साडे सात ला ऑफिस मध्ये यायचे ठरवले होते.आठ वाजे पर्यंत तो ऑफिस ला आला नाही तेव्हा मी ब्रीफ केस मध्ये ती सर्व कागद पत्रे भरली आणि त्याच्या बायकोच्या बंगल्यावर गेलो. दार उघडेच होते ,मी आत गेलो. फरशीवर रक्ताचे डाग होते.मी त्याचा माग काढत आत गेलो. जे बघितले त्याने माझ्या अंगावर काटाच आला. मनात आले की संपले सर्व. आता टोपे मेल्यामुळे सर्व हिशोब पुस्तके जप्त होतील ऑडीट होईल आणि माझी अफरातफर उजेडात येईल.मला वाटल की प्रेत मिळायलाच जर बराच वेळ गेला आणि तो पर्यंत शेअर्स चा व्यवहार पूर्ण झाला तर सगळ्यातूनच माझी सुटका होईल.” –मंदार

“ म्हणजे टोपे म्हणून माझ्याशी फोन वर तूच बोललास तर.”  - पाणिनी

“ हो , पूर्वी मी नाटकात कामे केली आहेत.आवाजातले चढ उतार , कंपने आणि बदल मला चांगले जमतात.आधी मी तुम्हाला सांगणार होतो की टोपे ऑफिस मध्ये नाहीयेत पण मग तो जिवंत असल्याचे सिद्ध करता नसते आले मला., तुम्ही टोपे चा आवाज कधीच ऐकला नाहीये हे मला त्याच क्षणी सुचले आणि माझ्या मनात कल्पना आली की त्याच्या आवाजात बोलावे तुमच्याशी म्हणजे तो जिवंत असल्याचा पुरावा निर्माण करता येईल.”

“या सर्वातून जिल्हा सत्र न्यायालयाच्या दृष्टीने सर्वात संशयी व्यक्ती म्हणून तुला धरले जाईल.”

“ मी खरच निरपराधी आहे हो. “ त्याच्या डोळ्यात करून दाटली होती.

“मंदार ,मला तू खरा खुनी शोधायला मदत कर.तुझ्या सुटकेची तीच एकमेव संधी आहे.”

“ तुम्ही  म्हणाल ते करीन , माझ्यावर भरोसा ठेवा.”

त्या दोघांनी हात मिळवणी केली.!!!

 

( प्रकरण १० समाप्त)