मैत्री
" तुझी नि माझी एक गाठ असावी,
मतभेदांना तेथे वाट नसावी "
सध्या कोरोनाशी ही आपल्याला मैत्री करावी लागेल अगदी सामाजिक अंतर राखून क्षणभंगुर का होईना पण हे वास्तव....!!
मैत्री म्हणजे व्यक्तीचे व्यक्तीशी असलेले आपुलकीचे नाते. मनाचा मोठेपणा मी, मला,माझेपासून सुटून आपण, आपले, आमचे, पर्यंतचा प्रवास असेही म्हणता येईल. मैत्री एक वर्तन आहे. ज्यामुळे दोघांनाही तेवढाच आनंद होतो. जगमित्र व्यक्ती सर्वांनाच प्रिय असते. अनेकांच्या मनात घर करून स्नेहाची ज्योत तेवत ठेवते ती मैत्री. आप्त नातेवाईक, भाऊबहिण ही नाती असतातच, पण मैत्रीचे नाते मिळवावे लागते.
मैत्रीची खरी सुरुवात स्वतःपासून करायला हवी स्वतःच स्वतःचे मित्र होणे गरजेचे असते , स्वतःला कमी लेखणारा दुसऱ्याशी काय मैत्री करणार ? आळस , राग , अज्ञान , यापासून मैत्री म्हणजे स्वतःशी अप्रामाणिक राहणं , वैर भावना विसरायला लावते ती मैत्री की जी उच्च प्रतीच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते , की जी वैचारिक दैवी पातळी दर्शविते . मैत्री अशी असावी जी सुरुवातीला साथ देईलच पण दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होईल .
डोळ्यात आलेल्या अश्रूंना पुसणारी , चुकले तर तेवढीच कान उघडणी करणारी व चांगुलपणाची वाट दाखविणारी मैत्री असावी , आपल्या सहवासात नसतानाही आपली आठवण काढणारी , तर गर्दीत सैरभैर होऊन फक्त आपल्यालाच शोधणारी मैत्री असावी ,
एकांतात आपला दिवा होऊन पाऊलवाट दाखवणारी , तर यशात पाठीवर शाबासकीची थाप देणारी असते ती मैत्री .
मात्र , कोणती मैत्री हितकारक व कोणती मैत्री अहितकारक हे समजून घेता यायला हवे , कधी कधी ही मैत्री औषधासारखी कडूही लागेल मात्र त्याचा होणारा परिणाम गोड असतो. मैत्री ही सर्व नात्यापेक्षाही मौल्यवान असते. आयुष्याच्या टप्प्यावर चांगली मैत्री होणे हे खूपच दुर्मिळ , मैत्री गरजेनुसार बदलत जाणारी नव्हे तर निष्ठावान असावीच पण ज्याला अशी मैत्री व असे मित्र लाभतात ते खरोखर भाग्यवानच . मैत्रीमुळे आयुष्य घडते व बिघडते देखील, त्यातील फरक समजून मैत्री करता यायला हवी. मैत्रीमध्ये निंदा , लोभ, क्रोध , वर्ज्य असावा कारण त्यामुळे मैत्रीची ही विण कुठेतरी तुटक होऊ शकते .
आयुष्यात आपल्याला असंख्य माणसे भेटतात , की ज्यांच्यामुळे आपले आयुष्य खूप सुंदर बनते व जग किती सुंदर आहे याची कल्पना देते . मात्र , त्यासाठी योग्य निखळ मैत्रीची गरज भासते की जी आपल्याला या प्रवाहातून कधी अलग पार करते हे कळतही नाही . मैत्री म्हणजे आत्मा , श्वास , चिरंतन चिंतन की जे आपल्यात आनंद लहरी निर्माण करते व जगण्याची उमेद देते .
आई ही पहिली मैत्रीण असते , की जी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपली साथ देते चांगल्या वाईटाची जाणीव करून देते व योग्य दिशेने आपल्याला जावयास लावते . नंतरच्या काळात असंख्य व्यक्ती भेटतात मात्र एखाद्याशीच आपली दाट मैत्री होते व ते आपल्या आयुष्यात वाटाड्यासारखे काम करतात मग ती पुस्तके असतील , विचार असतील , माणसे असतील .
मैत्री माणसातल्या माणुसपणाला घडवते ,
मैत्री म्हणचे एक भावना निसर्गाशी मैत्री जगाचे उदात्तीकरण दर्शवते , पक्ष्यांशी मैत्री आकाशात उंच झेपण्यासाठी पंखाचे बळ देते तर निर्झराशी मैत्री सतत वाहात राहण्याचा कानमंत्र देते प्रवाहाच्या दिशेने राहणे शिकवते तर मनाला चिंब करणारा सैरभैर वारा आयुष्यात वेगाचं महत्व काय हे सांगून जातो . निळेशार निरभ्र आकाश मनाचा मोठेपणा दर्शवते , पावसाशी मैत्री मनाला चिंब भिजवून प्रेमभावनेशी एकरूप व्हावयास लावते . मैत्री अनेक रुपात आपल्या सतत बरोबर असते अगदी एकांतात माणूसदेखील त्या एकांताशी कधी मैत्री करेल व जीवनाची गूढ क्षितिजे पार करेल हे सांगता येत नाही , शब्दांची मैत्री भाषा समृद्ध करते व काव्य भावना जागृत करते , बघा , किती व्यापकता दडली आहे या मैत्रीमध्ये
" आनंदात असताना हसते ती मैत्री ,
एकाकी असताना सोबत करते ती मैत्री
सोबत नसतानाही आठवणीत राहते ती फक्त मैत्रीच "
©मधुरा धायगुडे