अध्याय ४ बलिदान
मला रात्रभर झोप लागली नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळपासून मला अश्वमेध यज्ञ समारंभाच्या तयारीचे काम लावले गेले.
जेव्हा मी यज्ञकुंड बांधण्यासाठी विटा उचलल्या, तेव्हा मलयकेतु ने मला पाहिले. तो म्हणाला
"तू एक चांगला राजकुमार होतास पण आता तू त्याच्यापेक्षा चांगला गुलाम आहेस."
जरी मी आतून रागाने पेटत होतो तरी मी त्याच्या टोमण्याकडे दुर्लक्ष केले.
काम संपवून मी चेतककडे आलो. कुरणात त्याला शोधणे सोपे होते. तो इतर घोड्यांपेक्षा उंच होता. त्याचे रुपेरी केस चांदण्याच्या प्रकाशात चमकत होते.
"आज रात्री तू देवांकडे स्वर्गात जाशील" मी त्याला सांगितले. त्याने मी भरवलेले गवत खाल्ले. "तू स्वर्गात महा नायक होशील."
चेतकच्या मोठ्या नाकपुड्या फुगल्या. त्याच्या विशाल बाहूतील स्नायू टर्र फुगले.
का कोण जाणे पण माझी पाठ दुखू लागली आणि माझा घसा कोरडा पडला. मला पाण्याची खूप तहान लागली होती.
मला आठवले की चेतक आणि मी काही दिवसांपूर्वी नदीत कसे पोहलो होतो. चेतक पुन्हा कधीही नदीत खेळू शकणार नाही आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हतो.
त्या रात्री अश्वमेध यज्ञ समारंभाच्या आधी, मी चेतकला भेटायला गेलो. मी त्याला निरोप दिला, जे मी आधी अतुल बरोबर करू शकलो नाही.
तो त्याच्या मागच्या पायांवर उभा राहिला. कदाचित तो मला सांगत होता की त्याला मरणाची भीती वाटत नाही आणि मीही घाबरू नये.
"जर मी तुझ्यासारखा शूर असतो तर...!" मी म्हणालो.
दुसऱ्या दिवशी एक अद्भुत मेजवानी होती, साजूक तुपातील तंदुरी रोटी, भात, निरनिराळ्या भाज्या, डाळी, पनीर, उत्तमोत्तम मिठाया आणि फळे पण मी काही खाऊ शकलो नाही आणि नंतर बलिदानाची वेळ आली.
आम्ही यज्ञकुंडाजवळ जमलो. यज्ञकुंडाच्या मधोमध आग पेटवली गेली. आगीच्या ज्वाळा आकाशापर्यंत पोहोचत होत्या. चेतकला आशीर्वाद देणारा ब्राह्मण पुजारी वाट पाहत होता. चेतकला यज्ञकुंडच्या दिशेने नेण्यात आले.
त्याने आपली मान उंच ठेवली आणि डोके वर ठेवले. त्याची शेपटी तो मागे हलवत होता. त्याच्या डोळ्यांतून ज्वाळा बाहेर पडत होत्या.
ब्राह्मणाने चेतकाच्या नाकाला स्पर्श केला. "हे देवतांनो, हा घोडा आम्ही तुम्हाला अर्पण करतो. तो दोन वर्षांपासून देशाटन करीत हिंडला आहे. तो जिथे जिथे गेला तिथे त्याने त्या त्या राज्यांवर विजय मिळवला आहे. त्याने राजा पोरसकडे महानता आणि संपत्ती संपादन करून आणली आहे. हा पुण्यात्मा आहे. याला स्वर्गात उत्तम स्थान दिले जावे अशी आम्ही प्रार्थना करतो"
मलयकेतु पुढे गेला. त्याच्या हातात युद्धात वापरतात ती कुऱ्हाड होती. आगीत त्याची धार चमकत होती.
"हा घोडा आम्ही स्वर्गाला समर्पित करतो," ब्राह्मण म्हणाला.
मलयकेतुने कुऱ्हाड डोक्याच्या वर उंचावली.
तेवढ्यात मला माझा घोडा, अतुल आठवला. मला आठवले की मी चोरांपासून अतुलला वाचवू शकलो नव्हतो.
मला मनापासून वाटते की मी थोडा साहसी असतो तर बरे झाले असते. मी एक दीर्घ श्वास घेतला.
"थांबा!" मी ओरडलो. मलयकेतु थांबला, त्याने माझ्याकडे पाहिलं. राजा पोरसने त्याच्या भुवया उंचावल्या.
"या घोड्याऐवजी माझा बळी द्या," मी म्हणालो.