अध्याय ५ एक महान आक्रमण
राजा पोरस चिडला. ब्राह्मणही संतापला. पण मलयकेतु आनंदाने हसत होता.
"माणसाचा बळी?" पोरस म्हणाला. "परंतु मानवी बलिदान बर्याच काळापासून दिले जात नाही."
मलयकेतुने सहमती दर्शवली, "नक्कीच पिताश्री! आणि म्हणूनच आता मानवी बलिदान दिले पाहिजे!"
"परंतु....." पोरस म्हणाला आणि मग तो विचार करू लागला.
"देवता प्रसन्न होतील!" मलयकेतुने ठामपणे म्हणाला "आणि देव प्रसन्न झाल्यावर काय होते हे तुम्हाला माहित आहेच. देवता आपल्याला आशीर्वाद देऊन सुखी करतात."
पोरस म्हणाला, "पण तो एक राजकुमार आहे." मग त्याने मला पहिले आणि मग नंतर मलयकेतु कडे पाहिले.
"तो एक राजकुमार होता...." मलयकेतुने राजाचे वाक्य दुरुस्त केले.
राजा पोरसने मान हलवली. "त्या मुलाला बलिदानासाठी घ्या," तो ब्राह्मणला म्हणाला. "मुलगा खूपच धाडसी आहे."
मला सत्य लक्षात आले. मला भीती वाटली, पण मी भीतीचा सामना करण्यास तयार होतो. दोन सैनिकांनी माझे हात पकडले आणि ते मला यज्ञकुंडाकडे घेऊन गेले.
"फक्त तुझ्यासाठी, चेतक!" मी पुटपुटलो
मग मलयकेतुने डोळे बारीक करून माझ्याकडे कटाक्ष टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दुष्ट असुरी हास्य होते.
"किंवा.... कदाचित आपण त्या दोघांचाही बळी दिला पाहिजे," तो म्हणाला "मुलगा आणि घोडा दोघांचा."
"नाही!" मी किंचाळलो,
पण राजा पोरस त्याच्या विचारांमध्ये गढून गेला होता. "असे केले तर ते देवांना अधिक प्रसन्न करेल का?" त्याने ब्राम्हणाला विचारले. ब्राह्मणाने होकारार्थी मान हलवली.
मलयकेतुने आपली कुऱ्हाड हवेत उंचावली. गर्दी नि:शब्द होती. माझ्या आईच्या रडण्याशिवाय दुसरा आवाज नव्हता. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. तेवढ्यात मला कळले की हा माझ्या हृदयाचा ठोका नाही. तो घोड्याच्या टापांचा आवाज होता.
"आता काय?" मलयकेतु ओरडला. सैनिकांचा एक गट गर्दीतून वाट काढत पुढे आला.
"राजा पोरस!" त्यांच्यापैकी एकजण ओरडला "अलेक्झांडरची फौज पौरवाच्या दिशेने चाल करून येत आहे!"
मी हसलो. अलेक्झांडर द ग्रेट!
वर्षानुवर्षे आम्ही मॅसेडोनियाचा अलेक्झांडर आणि त्याच्या निर्भय सैन्याच्या शौर्याच्या कथा ऐकल्या होत्या. अलेक्झांडरने अनेक राज्य जिंकली होती आणि अनेक लोकांना ठार मारले होते. आणि आता तो पौरववर विजय मिळवण्यासाठी इथे आला होता.
"अश्वमेध यज्ञ थांबवा!" पोरसने आदेश दिले. "आपण अलेक्झांडरशी लढण्याची तयारी केली पाहिजे."
माझे वडील पुढे गेले आणि म्हणाले,
"माझे सैन्य तुमच्या सैन्यात सामील होईल. आपण एकत्र अलेक्झांडरला झेलम नदी ओलांडण्यापासून रोखू."
सैनिकांनी त्यांच्या घोड्यांवर टांग टाकून उडी मारली. इतर सैनिक युद्धातील हत्ती सज्ज करण्यासाठी धावले. या गोंधळात लोक चेतक आणि मला पुरते विसरले. मी चेतकच्या दिशेने पळालो.
"माझ्यामागे ये. आपण इथून पळून जाऊ!" मी त्याला आग्रह केला. पण चेतक तिथून अजिबात हलत नव्हता.
माझ्या वडिलांनी माझा खांदा धरला आणि म्हणाले.
"राजकुमार ऋषिकेश, तू आज रात्री अतुलनीय धैर्य दाखवलेस. तू पुन्हा एकदा धैर्य दाखवणार नाहीस का? तू इथेच थांबून अलेक्झांडरशी लढणार नाहीस का?"
मला भीती वाटायला हवी होती. पण आता मला कोणतीही भीती नव्हती. "मी लढणार," मी म्हणालो आणि मी चेतकच्या मानेवर थाप मारली. "आम्ही एकत्र लढा देऊ."
आम्ही झेलम नदीच्या दिशेने जात असताना हत्तींची गर्जना सुरु झाली..
मुसळधार पाऊस झाला. घोड्यांना रथ चिखलातून बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
चेतक आणि मी सैन्याबरोबर गेलो. जेव्हा आम्ही नदीजवळ पोहोचलो, तेव्हा मला अलेक्झांडरचे सैन्य पलीकडच्या किनाऱ्यावर पसरलेले दिसले.
माझे हृदय धडधडू लागले. हजारो सैनिक आमच्या समोर होते. आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नव्हतो. पण आमच्याकडे असे काहीतरी होते जे अलेक्झांडरकडे नव्हते - हत्ती.
अलेक्झांडरच्या घोड्यांनी हत्तींना पाहिले तेव्हा ते भयभीत झाले.
त्याने पाहिले की हत्ती नदीच्या दिशेकडे पाहून सोंड हलवत आहेत.
"प्रतिघात!" पोरस ओरडला. लढाई सुरू झाली.
एक भाला माझ्या कपाळाजवळून गेला. पण चेतकने तिथून उडी मारली. मी चेतकाच्या पाठीला चिकटून बसलो होतो आणि जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा मी बाण मारणे चालू ठेवले.
चेतक इतका वेगवान होता की बाण मला पकडू शकले नाहीत. मला माहित होते की जर माझ्यासोबत चेतक नसता तर मी अनेकवेळा मृत्यू पावलो असतो. जरी आमच्याकडे हत्ती होते, अलेक्झांडरचे सैन्य मोठे आणि शक्तिशाली होते. थोड्याच वेळात ते नदीच्या काठावर पोहोचले.
जेव्हा आम्ही अलेक्झांडरला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून अनेक बाण हवेत चालवले गेले. मी राजा पोरसचा रथ चिखलात अडकलेला पाहिला.
"चsssला...!" पोरस ओरडला, पण घोडे रथ ओढू शकले नाहीत.
रथ चिखलात अडकला होता. मी मदतीसाठी चेतकला पोरसकडे वळवले. मी तसे केल्यावर पोरस उभा राहिला आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या घोड्यांकडे शस्त्र उगारले इतक्यात एक बाण पोरसला लागला आणि तो तिथेच कोसळला.