२ ठकास महाठक १-२ (युवराज कथा)
( यातील सर्व पात्रे व कथा काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
"अमोल टाइल्स" ही एक नामवंत टाइल्स बनवणारी कंपनी होती.मनोज सावंत तिचे मालक होते .ही कंपनी सर्व प्रकारच्या टाइल्स बनवीत असे .भिंतीवरच्या टाइल्सपासून ते बाथरूममध्ये लागणाऱ्या टाइल्सपर्यंत, निरनिराळ्या डिझाइन्सच्या ,कमी जास्त मजबुतीच्या, कमी जास्त लांबी रुंदीच्या' कमी जास्त जाडीच्या ,कमी जास्त गुळगुळीत,निरनिराळ्या विशेष कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या टाइल्स ,इत्यादी ही कंपनी बनवत असे.या कंपनीचे एक आर अँड डी डिपार्टमेंट होते.तिथे तीन चार जण काम करीत असत .कॉम्प्युटरवर निरनिराळी डिझाइन्स अगोदर तयार केली जात.नंतर त्या डिझाइन्स प्रमाणे नमुना टाइल्स बनवण्यात येत असत.अशा टाइल्सची मजबुती गुळगुळीतपणा टिकाऊपणा इत्यादी गोष्टी तपासल्या जात.प्रयोग मनाप्रमाणे पूर्णपणे समाधानकारक झाल्यानंतरच तशा टाइल्स मोठ्या प्रमाणात कारखान्यात तयार केल्या जात.टाइल्सची वाहतूक करणे खर्चिक असल्यामुळे या कंपनीने देशात निरनिराळ्या ठिकाणी आपले कारखाने काढले होते .तिथे दिलेल्या नमुन्याप्रमाणे टाइल्स बनविल्या जात .
संशोधन व विकास, उत्पादन,विक्री,वाहतूक,हिशेब, इत्यादी अनेक विभाग होते. प्रत्येक विभागात अर्थातच कॉम्प्युटर्स संगणक होते .हे सर्व विभाग कन्सिल्ड वायरिंगच्या साह्याने परस्परांशी जोडलेले होते .त्यामुळे माहितीची देवाण घेवाण जलद होत असे.शक्यतो कागदाचा वापर अत्यंत कमी करायचा असे कंपनीचे धोरण होते. कंपनीने अनेक ब्रॅन्ड विकसित केले होते. निरनिराळ्या राज्यांमध्ये निरनिराळे ब्रँड प्रसिद्ध होते .कंपनीची उलाढाल अब्जावधी रुपयांची होती .मनोजने आपला मुलगा अमोल यांच्या नावावरून कंपनीचे नाव ठेवले होते .दरवर्षी नफा कोट्यवधी रुपये मिळत असे .
देशात टाइल्स बनवणाऱ्या अनेक कंपन्या होत्या .परंतु या कंपनीची स्पर्धा मुख्यत्वे "अभिनव टाइल्स"या कंपनीबरोबर होती .या कंपनीचीही उत्पादन केंद्रे निरनिराळ्या ठिकाणी होती .या कंपनीचेही अनेक विभाग होते .कोणती कंपनी जास्त नाविन्यपूर्ण टाइल्स बनवते याबाबत चढाओढ असे .किंमत ,गुणवत्ता, विविधता,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन ,प्रत्यक्ष ग्राहकाला दिला जाणारा डिस्काऊंट,जाहिराती, या सर्वच बाबतीत चढाओढ होती .जी कंपनी कमी किमतीत, विविधता टिकवून, गुणवत्तापूर्ण माल देई ,त्या कंपनीला जास्त टर्नओव्हर जास्त नफा मिळत असे.
कमी जास्त प्रमाणात बहुतेक कंपन्यांत (काही सन्माननीय अपवाद वगळून )उत्पादनात एकमेकांची डिझाइन्स चोरण्याची प्रवृत्ती असते .आर अँड डी विभागात आपला माणूस घुसवून किंवा लाच देऊन किंवा अन्य मार्गाने दुसऱ्याची डिझाइन्स चोरण्याची व त्याप्रमाणे उत्पादन करून प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देण्याची प्रवृत्ती असते .अशा प्रकारच्या चौर्यामुळे मूळ संशोधक कंपनी आपला वैशिष्टय़पूर्ण माल बाजारात आणण्याच्या अगोदरच ही चोरणारी कंपनी तसाच माल बाजारात आणू शकते.अशी चोर कंपनी यामुळे एक पाऊल नेहमी पुढे रहाते.
मनोजचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता .अशा पद्धतीने आपण आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीवर मात करावी असे त्याला कधीही वाटत नसे .जास्त जास्त संशोधन व प्रयोग करून आपण नवनवीन डिझाइन्स बाजारात आणावी व आपली गुणवत्ता ,विविधता,कमी किंमत,या मार्फत प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर द्यावी ,असे त्याचे धोरण होते .स्वस्त व मस्त असा त्याचा लोगो होता.आणि त्याप्रमाणे कटाक्षाने वागण्याचे त्याचे धोरण होते . चोरी लाच कॉपी अशा अयोग्य गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता .मनोज आपल्या कंपनीतील लोकांना आकर्षक पगार देत असे .सचोटी व प्रामाणिकपणा याला तो महत्त्व देत असे .आपले कामगार, संशोधक ,कारकून,ऑफिसर्स ,इत्यादी कधीही दगाबाजी करणार नाहीत यावर त्याचा विश्वास होता . त्यासाठी तो सर्वांशी योग्य संबंध ठेवीत असे.आकर्षक बोनस, योग्य प्रकारचे संबंध, इत्यादी मार्गानी तो सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये अापण कंपनीचे एक घटक आहोत अशी दृढ भावना निर्माण करीत असे.असे असले तरी तो आपल्या डिझाइन्सची, कल्पनांची, चोरी होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेत असे .सर्व कामगारांना त्यांचे मोबाइल्स कंपनीत शिरताना जमा करावे लागत.खबरदारी म्हणून कंपनीत शिरताना व कंपनीतून बाहेर पडताना स्कॅनिंग केले जाई.कंपनीत अनेक विभागात सीसीटीव्ही बसवलेले होते.त्यामुळे मनोजला बसल्या जागी कुठे काय चालले आहे ते दिसत असे .त्यामुळे निरनिराळ्या विभागातील कमतरता दोष त्याच्या लक्षात येत असत.ते दूर करण्यासाठी तो प्रामाणिक प्रयत्नही करीत असे.
निरनिराळ्या उत्पादन केंद्रांमध्ये त्याने आपले विश्वासू व्यवस्थापक नेमले होते .एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी अनेक प्रामाणिक व्यक्तींची गरज होती .योग्य माणसे निवडण्यात आणि त्यांची योग्य जागी नेमणूक करण्यात मनोज अत्यंत कुशल होता. इतरांच्या मानाने तो व्यवस्थापकांना भरपूर पगारही देत असे.पैसा ,प्रेम वआपुलकीची वर्तणूक, यांनी माणसे बांधली जातात यावर त्याचा गाढ विश्वास होता व त्याचा तसा अनुभवही होता. प्रथम साधी कंपनी ,नंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आणि नंतर पब्लिक लिमिटेड कंपनी ,अशा पायऱ्या गेल्या काही वर्षांत या कंपनीने चढल्या होत्या .मनोज कंपनीचा सीईओ व अध्यक्ष होता .
*अशा या नामवंत कंपनीला गेल्या काही महिन्यांपासून एका विचित्र समस्येला तोंड द्यावे लागत होते*
कंपनीच्या संशोधन व विकास या खात्यातील बित्तंबातमी प्रतिस्पर्धी कंपनीला मिळत होती .नवीन डिझाइन्स बाजारात येण्याअगोदरच प्रतिस्पर्धी कंपनी ,बरोबर तशीच डिझाइन्स बाजारात आणीत असे .त्यामुळे अमोलच्या कंपनीचा माल, डिझाइन्स, जुनी ठरत.त्यामुळे अर्थातच विक्रीवर अनिष्ट परिणाम होत असे .प्रतिस्पर्धी कंपनीला, डिझाइन्स,त्यातील बदल, प्रयोग, त्यांची यशस्विता ,अयशस्वीता ,या सर्वांची बित्तंबातमी अगोदरच माहित होते असे आढळून आले होते .त्यामुळे मनोज व संचालकमंडळ हैराण झालेले होते .सुरक्षितता वाढवून, गुप्तता वाढवून,सीसीटीव्हीची कडक नजर ठेवून,इत्यादी अनेक प्रकारची काळजी घेऊनही डिझाइन्सची कॉपी व अगोदरच तशा मालाची बाजारात एंट्री थांबत नव्हती.कारखान्यातील विशेषतः संशोधन व विकास या विभागातील माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला कशी कळते ते कुणाच्याही अजिबात लक्षात येत नव्हते . कोण फितूर आहे? तो फितुरी कशी करतो? अंतर्गत सर्व गुंतागुंतीची माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला तंतोतंत लगेच कशी कळते? याचा उलगडा होत नव्हता
संशोधन आपण करायचे फायदा दुसऱ्याने घ्यायचा.प्रयोग आपण करायचे त्याचा उपयोग दुसऱ्याने करायचा.आपल्या अपयशापासून धडा घेऊन दुसऱ्याने यशाचे शिखर सहज प्राप्त करायचे ,असा सगळा सिलसिला होता.कुणीही व्यक्ती दोषी म्हणून सापडत नव्हती.आपल्या सर्व यंत्रणेत कोणता दोष आहे?कुठे दोष आहे? ते कळत नव्हते .दोष सापडल्याशिवाय, एखाद्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणा शोधून काढल्याशिवाय, फितुरी कशी होते त्याचा सुगावा लागल्याशिवाय ,आपल्या कंपनीतील बित्तमबातम्या प्रतिस्पर्धी कंपनीला कशा कळतात, ते शोधून काढल्याशिवाय कंपनीचा गडगडणारा डोलारा सावरू शकला नसता .कंपनीची बाजारातील पत घसरत होती .कंपनीचा बाजारातील दबदबा कमी झाला होता . कंपनीच्या भागांची किंमत बाजारात घसरत होती .असेच चालू राहिले तर कंपनीला आपला गाशा कदाचित गुंडाळावा लागला असता.कर्जाचा बोजा वाढला असता. त्यांची प्रत्येक हालचाल प्रतिस्पर्धी कंपनीला कळत होती.त्यावरील डावपेच प्रतिस्पर्धी कंपनी अगोदरच आखत होती.मनोजच्या कंपनीला स्वतःच्या पातळीवर दोष कुठे आहे ते शोधून काढता येत नव्हते.यामुळे फायदा दर वर्षी कमी होत होता .कंपनी भागधारकांना डिव्हिडंड कमी देत होती. कंपनीचे भागमूल्य बाजारात घसरत होते .
शेवटी संचालक मंडळाने एखाद्या हेर कंपनीला याची कारणे शोधून काढण्याचे काम द्यावे असे ठरविले.त्या दृष्टीने कोणत्या कंपनीची नेमणूक करावी असा प्रश्न संचालक मंडळाच्या सभेमध्ये चर्चेला आला. निरनिराळ्या हेर कंपन्यांच्या गुणवत्तेबद्दल चर्चा चालू असताना सहजच एका संचालकाची नजर त्या दिवसाच्या वर्तमानपत्रातील मुख्य मथळ्यावर पडली.युवराजांनी कोणती तरी केस यशस्वीपणे कशी जिंकली. आयत्या वेळी आपल्या वकिलीच्या कौशल्याने त्यांनी प्रतिपक्षाची भंबेरी कशी उडविली .इत्यादी हकीगत सविस्तरपणे छापून आली होती .त्या बातमीतील एका ओळीकडे एका संचालकांचे लक्ष गेले .युवराजांची कुणीतरी मुलाखत घेत असताना ते म्हणाले होते की जर "संदेश प्रायव्हेट डिटेक्टीव कंपनी" या खाजगी गुप्तहेर कंपनीची मला मदत झाली नसती तर मी या केसमधील सत्य उजेडात आणू शकलो नसतो .त्या संचालकाने चर्चा थांबवून ती बातमी सर्वांना वाचून दाखविली.आपण या हेर कंपनीला सर्व हकिगत सांगून आपल्या सर्व बातम्या,सर्व चाली, सर्व संशोधन ,सर्व प्रयोग,अगोदरच प्रतिस्पर्धी कंपनीला कशा कळतात ते शोधण्याचे काम देऊ .त्यात ही कंपनी नक्की यशस्वी होईल असा प्रस्ताव मांडला.त्यावर चर्चा करताना बर्याच संचालकांनी युवराज व संदेश या दोघांचेही नाव कोणत्या ना कोणत्या संदर्भात यशस्वी वकील व यशस्वी हेर म्हणून ऐकलेले होते .आपल्याला अगोदरच यांचे नाव कसे सुचले नाही असे एक जण म्हणाला .शेवटी सर्वानुमते संदेशला बोलावण्याचे ठरले .त्या कंपनीकडे हे सर्व काम सोपवावे असा ठराव पास करण्यात आला .या संदर्भात कंपनीचे कायदेशीर सल्लागार म्हणून युवराजांची नेमणूक करावी असाही ठराव करण्यात आला. या बाबतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष म्हणून मनोजला देण्यात आले .
मनोजने, जो संचालक मंडळाचा स्वयंभू अध्यक्ष होता, लगेच युवराजांचा नंबर फिरविला व त्यांची अपॉइंटमेंट घेतली .दोन दिवसांनी संध्याकाळची वेळ मनोजला मिळाली .त्या दिवशी सर्व सविस्तर माहिती बरोबर घेऊन तयारीनिशी मनोज युवराजांच्या ऑफिसमध्ये गेला .
प्रथमच युवराजांनी यासंदर्भात संदेशची मदत घ्यावी लागेल म्हणून सांगितले .आम्ही दोघेही एकत्र बसून आपली समस्या कशी सोडवायची ते निश्चित करू असेही सांगितले .मनोजला अर्थातच ते सर्व मान्य होते.सर्व काही निश्चित करण्याचे अधिकार संचालक मंडळाने मनोजला दिलेच होते . युवराजांनी लगेच संदेशला बोलवून घेतले.
मनोज, संदेश व युवराज यांनी एकत्र बसून चर्चा करून एक अॅक्शन प्लॅन तयार केला.अशा प्रकारचे काम यांच्याकडे सोपवले आहे हे कुणालाही कळू नये .अत्यंत गुप्तता पाळावी असे ठरविण्यात आले .कारण प्रतिस्पर्धी कंपनीला हे सर्व कळले तर ती सावध होइल आणि आपल्याला फितुरी शोधून काढणे कठीण होईल .
*स्पर्धा कंपनी सावध होऊ नये जो फितूर आहे तो अलगद जाळ्यामध्ये सापडावा अशी त्यामागे कल्पना होती.*
(क्रमशः)