९ खुनी कोण २-२ (युवराज कथा)
( ही कथा काल्पनिक आहे.या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.वास्तवाशी कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
युवराजांचे ध्येय केवळ अशिलाला सोडविणे एवढेच कधीही नव्हते .खरा गुन्हेगार कायद्यासमोर यावा आणि त्याला शिक्षा व्हावी असा त्यांचा हेतू असे .युवराजांनी शामरावांना फोन केला .शामराव फोनवर येताच त्यांना खुनाची जागा दाखविण्याची विनंती केली .शामराव व युवराज यांची मैत्री फार जुनी व दाट होती .युवराजांनी शामरावांना अनेक केसेस सोडविण्यात मदत केली होती .शामरावांनी युवराजांना संपतच्या बंगल्यावर येण्यास सांगितले .शामराव व युवराज एकदमच तिथे पोचले .आऊट हाऊस तूर्त पोलिसांनी सील केलेले होते .सील उघडून दोघेही आत गेले .युवराजांनी प्रथम हॉलचे निरीक्षण केले .नंतर दोघेही बेडरूममध्ये जिथे दोन खून झाले होते तिथे गेले .युवराजानी टॉर्च काढून फोकस सर्वत्र फिरविण्यास सुरुवात केली .जरी खोलीमध्ये प्रकाश भरपूर असला तरीही टॉर्चच्या फोकसमध्ये काही गोष्टी लक्षात येऊ शकतात असे ते बोलता बोलता म्हणाले.
त्यांना एका कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसले .जवळ गेल्यावर ती एक सोन्याची अंगठी अाहे असे लक्षात आले .युवराजांनी अंगठी उचलण्याआधी त्या जागेचा लांबून एक फोटो काढला .
नंतर पुन्हा खोलीचे निरीक्षण करताना त्यांना कॉटखाली काहीतरी पडलेले दिसले .ते उचलण्यापूर्वीही त्यांनी त्याचा एक फोटो काढला. ते एक ड्रायव्हिंग लायसन्स होते .विश्वास बनसोडे असे त्यावर नाव होते .या दोन्ही गोष्टी शामराव व त्यांचा स्टाफ यांच्या निरीक्षणातून सुटल्या होत्या .
आऊट हाऊस बंद करून बाहेर आल्यावर त्यांना मोटारसायकलच्या चाकांचे काही सुकलेले ठसे आढळले.ठसे दोन प्रकारच्या मोटारसायकलींचे होते .
संपत कोठडीमध्ये होता. प्रताप तूर्त तिथे राहात नव्हता .त्यामुळे त्यांच्याजवळ ठशांबद्दल काही चौकशी शक्य नव्हती .
युवराज ऑफिसवर आल्यावर त्यांनी संदेशला बोलावून घेतले .त्याला पुढील माहिती गोळा करण्यास सांगितले .
१)संपतच्या बंगल्यावर जावून टायरच्या ठशांबद्दल माहिती गोळा करणे.
२)विश्वास बनसोडे याच्या बद्दल सर्व माहिती गोळा करणे .तो अंडरवर्ल्ड पैकी असावा आणि सुरा फेकीत निष्णात असावा असा युवराजांचा अंदाज होता. त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो त्यांनी संदेशला पाठविला .ड्रायव्हिंग लायसन्स व अंगठी तूर्त शामरावांच्या जवळ होती.
३) संपतच्या बंगल्यातील मांजर आक्रमक आहे का ?कुणी त्याला मारत आहे असे त्याला वाटल्यास ते बोचकारते का ?
४)संपत, प्रताप व सुहासिनी यांच्या मोबाइलवरील खून झाला त्या दिवसाचे कॉल रेकॉर्ड व मिळाल्यास संभाषण .
५)प्रतापच्या कारखान्यातून आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी गेटवर नोंद केल्याशिवाय एखदा गुप्त मार्ग आहे का ?
६)संपतचे चारित्र्य कसे आहे ?
७)लांबून सुरा फेकून लक्ष्यभेद करण्यात अंडरवर्ल्डपैकी किंवा एरवीही शहरात कोण कोण वाकबगार आहेत? विश्वास बनसोडे सुराफेक करू शकतो का?
युवराजांनी संदेशला ही सर्व माहिती शक्य तितक्या लवकर गोळा करून देण्यास शंगितले.
शामरावानी भवानरावाना ती अंगठी त्यांच्या घरातील कुणाची आहे काय असे विचारता ती त्यांची नाही असे त्यानी सांगितले . ती अंगठी प्रतापकडीलही नव्हती .
शामरावांनी संपतला केलेली अटक विनाकारण आहे असे युवराजांनी सुचविले.शामरावांनी कारणे विचारता पुढील प्रमाणे कारणे दिली
१)पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सुवासिनीच्या नखातील अवशेष संपतच्या रक्ताशी जुळत नाहीत .
२)खुनाच्या जागी सापडलेली अंगठी व ड्रायव्हिंग लायसन्स संपत गुन्हेगार नसल्याचे दर्शवितो
३)पोस्टमार्टेम रिपोर्ट प्रमाणे खुनाची वेळ रात्री एक नंतर आहे .ओढाताण करूनहि ती साडेअकराच्या अगोदर आणता येणे शक्य नाही .साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठपर्यंत संपत सासर्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात व नंतर हॉस्पिटलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात मग्न होता .त्या काळातील त्याची अॅलिबी पक्की आहे .
४)संपतचे ताजे ठसे आऊट हाऊसमध्ये कुठेही सापडलेले नाहीत .
नंतर पुढे शामराव म्हणाले मी संदेशला आणखी माहिती गोळा करण्यास सांगितले आहे.ती माहिती आपल्याला हवी तशी मिळाली तर संपत निर्दोष असल्याचे सिद्ध होईलच परंतु खरा गुन्हेगारही आपल्याला सापडेल .
शामरावांनी आतापर्यंतचा युवराजांबद्दलचाअनुभव, पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि नवीन मिळालेला पुरावा यांच्या आधारे संपतला जामिनावर सोडण्याची तयारी दर्शविली .
* अशाप्रकारे युवराजांनी जामीन देऊन संपतला जामिनावर मोकळे केले .*
आता ते संदेशच्या भेटीची वाट पाहात होते .दोन दिवसांनी संदेश युवराजांना हवी असलेली माहिती घेऊन आला .त्याने त्यांना पुढीलप्रमाणे प्रमाणे रिपोर्ट दिला.
१) गाडीच्या दोन ठशांपैकी एक ठसा प्रतापच्या गाडीचा आहे .दुसरा बुलेटचा असून तो विश्वास बनसोडे याच्या गाडीचा आहे.
२)विश्वास बनसोडे हा सुहासिनीचा माहेरपासून ओळखीचा आहे .
प्रतापच्या घराबाहेर आढळलेला ठसा बनसोडेच्या बुलेटचा आहे .
बनसोडे हा सुराफेकीमध्ये निष्णात समजला जातो.
बनसोडे अंडरवर्ल्डमध्ये प्रसिद्ध आहे .
३)संपतच्या बंगल्यातील मांजर आक्रमक आहे.त्याला कुणी डिवचल्यास ते त्याच्या अंगावर चाल करून जाते.व बोचकारते.भवानरावांच्या बोलण्यातही त्या मांजराचा उल्लेख आला . त्यांनाही एकदा त्या मांजराने बोचकारले होते.ते मांजर संपतच्या पत्नीचे लाडके असल्यामुळे कुठे पोचविता येत नव्हते.
४)त्याने त्या दिवसातील कॉलरेकार्ड व संभाषण आणले होते.
संपतला त्याच्या बायकोकडून सव्वा अकरा वाजता तिचे वडील सिरियस असल्याबद्दल फोन आला होता आणि त्यामुळे तो लगेच तिकडे गेला.
सुहासिनीला विश्वासने पाउणेबारा वाजता फोन करून मी काही महत्त्वाच्या कामासाठी येत आहे असे सांगितले .
सुहाससिनीला बारा वाजता तिच्या एका मैत्रिणींचा फोन आला होता .त्यावरून ती तो पर्यंत जिवंत होती .
यावरून संपतने तिचा खून केलेला नाही हे सिद्ध होते .
५) संपतचे चारित्र्य निष्कलंक असावे असे वाटते.त्याच्या चारित्र्याबद्दल कोणताही निगेटिव्ह पुरावा मिळाला नाही.
६)प्रतापच्या कारखान्यामधून आतबाहेर जाण्यासाठी कोणताही गुप्त मार्ग नाही.
वरील सर्व पुरावा युवराजांनी शामरावांपुढे ठेवला.
या सर्व पुराव्यावरून संपत संपूर्णपणे निर्दोष आहे असे सिद्ध होते असेही सांगितले .
विश्वास बनसोडेला पकडल्यास त्याच्या रक्ताचा गट व सुहासिनीच्या रक्ताचा गट एकच आढळून येईल .
सापडलेली अंगठी त्याचीच आहे असे सिद्ध करता येइल.
त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तर बेडरूममध्येच सापडले आहे.
त्याच्या बोटांचे ठसे चहाच्या कपबशीवरील ठशांशी जुळतील याची मला खात्री आहे .
पुढे युवराज म्हणाले: विश्वास माहेरचा माणूस असल्यामुळे व त्याने काही महत्त्वाचे काम आहे असे सांगितल्यामुळे एवढ्या मध्यरात्री सुहासिनीने त्याला आत घेतले.
चहाचिवडा झाल्यावर, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,विश्वासने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असावा.नक्की काय झाले असावे ते सांगता येत नाही.
सुहासिनी निष्कलंक चारित्र्याची वाटते .
विश्वास बनसोडेला पकडल्यास त्याच्या हातावर व चेहऱ्यावर ओरखडे आढळून येतील.
सुहासिनीच्या नखातील अवशेष व बनसोडेंचा रक्तगट हे जुळतील.
आवाज व धडपड एेकून त्यांचा मुलगा जागा झाला असावा .तो अकस्मात आई आई करीत आल्यामुळे त्याचा आवाज बंद करण्यासाठी,त्याने आरडाओरड करू नये म्हणून विश्वासने सुरा फेकला असावा.त्यात त्याचा मृत्यू झाला .विश्वास हा सुराफेकीमध्ये निष्णात आहे.
या सर्व धामधुमीमध्ये त्याच्या वरच्या खिशात ठेवलेले ड्रायव्हिंग लायसन्स पडले असावे.आणि अंगठीही कोपऱ्यांत उडाली असावी .
विश्वास बनसोडेची झडती घेतल्यास तो सुरा कदाचित मिळेल.त्यावर मुलाच्या रक्ताचे अवशेष मिळाल्यास तो निर्णायक पुरावा ठरेल .
विश्वासचा सुहासिनीला आलेला फोन कॉल, विश्वासच्या बुलेटच्या टायरचे बागेत आढळलेले ठसे ,चहा चिवड्याच्या कपबशी वरील विश्वासचे बहुधा जुळणारे ठसे ,बेडरूममध्ये सापडलेली अंगठी व ड्रायव्हिंग लायसन्स ,एवढा पुरावा त्याला पकडण्यासाठी पुरेसा आहे .उरलेले पुरावे त्याच्या तपासणीमधून मिळविता येतील .
संपत निर्दोष आहे त्याला सोडून देण्यास हरकत नाही .
हा सर्व पुरावा पाहून शामरावांनी संपतची निर्दोष म्हणून कोठडीतून मुक्तता केली.
विश्वास बनसोडेला पकडण्यात आले. त्याच्या तपासणीमध्ये बोटांचे ठसे व सुहासिनींच्या नखातील रक्तगटाशी त्याचा रक्तगट जुळला. मोटारसायकल त्याचीच होती .अंगठी त्याची होती.अपेक्षेप्रमाणे त्याच्या हातावर व चेहऱ्यावर ओरखडे होते .सुरा मात्र मिळाला नाही त्याने तो बहुधा फेकून दिला असावा.
त्याच्यावर खटला भरण्यात आला व त्याला वीस वर्षांची शिक्षा झाली.
प्रतापचा काहीही दोष नसताना त्याचे कुटुंब उद्धवस्त झाले .
कॅप्टन भवानराव जगदाळे यांच्याकडून युवराजांना घसघशीत फी व व बक्षिसी मिळाली .
(समाप्त )
१५/५/२०१©प्रभाकर पटवर्धन