७ चकवा २-२ (युवराज कथा)
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .वास्तवातील घटना किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
( चकवा म्हणजे फसवणूक जे प्रत्यक्षात नाही परंतु आहे असे वाटणे भास होणे म्हणजे चकवा.)
या घाटातील वळणाबद्दल युवराजांनी बरेच काही वाचले होते त्यांना कुठलीच मीमांसा पटत नव्हती .याचा केव्हातरी छडा लावण्याचे त्यांनी मनाशी निश्चित केले होते .अनायासे ती संधी चालून आली होती .त्याना कोकणात जायचे होते. त्यांनी वाकडी वाट करून त्या घाटातून जायचे ठरविले.
या घाटाची तपासणी करण्यासाठी युवराज यांना कुणीही विनंती किंवा सूचना केली नव्हती .कोकणात काही खाजगी कामासाठी युवराजांना जायचे होते .त्यावेळी गोवा मार्गाने सरळ न जाता पुण्यावरून वाट वाकडी करून या घाटातून प्रवास करावा असे त्यांनी ठरविले .भुताटकीचा घाट त्यांना पाहायचा होता .त्यांना जाण्याची कोणतीही इमर्जन्सी नव्हती .तरीही त्यांनी रात्री बारा ते दोन या वेळात त्या ठिकाणी काय घडते ते पाहायचे ठरविले होते.या घाटात एकदा दिवसा व एकदा मध्यरात्री प्रवास करावा व त्या अफवांचे मूळ कारण शोधून काढावे असा त्यांचा विचार होता .केवळ जिज्ञासा व साहसाची आवड एवढीच प्रेरणा त्यामागे होती .
तर रीतसर परवानगी घेऊन त्यांनी रात्री बारा वाजता घाटात प्रवेश केला.युवराज गाडी चालवीत होते .त्यांनी बरोबर संदेशलाही घेतले होते .रहस्य उलगडण्यासाठी त्याची मदत होईल त्याचप्रमाणे सोबतही होईल असा हेतू त्यामागे होता.विजयालाही त्यांच्याबरोबर यायचे होते .परंतू काही कारणांमुळे ती येऊ शकली नाही .
युवराज मधून मधून डॅशबोर्डवरील घड्याळाकडे नजर टाकीत होते.त्यांना त्या एक किलोमीटरच्या डेंजर झोनमध्ये एक वाजता प्रवेश करायचा होता.युवराजांचा भुताटकीवर विश्वास होता असेही नाही आणि नव्हता असेही नाही.केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना त्या सर्व घटना व रस्ता याकडे पाहायचे होते .आणि जमल्यास त्यातून काही निष्कर्ष काढायचा होता .आवश्यक वाटल्यास खात्री पटल्यास ते शासकीय अधिकाऱ्यांकडे सूचना करणार होते .
त्यांनी बरोबर एक वाजता डेंजर झोनमध्ये प्रवेश केला .ते मुंगीच्या गतीने गाडी चालवित होते .नक्की तिथे काय होत असावे याबद्दल त्यांचे स्वतःचे म्हणून काही तर्क होते.गाडी चालविताना ते समोर दरीमध्ये व विरुद्ध बाजूला वारंवार पाहत होते. त्यांना समोरून एक मोटार मुंगीच्या गतीने येताना दिसली .त्यांनी थोडी गती वाढविल्याबरोबर ती गाडीही गती वाढवीत होती.युवराज थांबल्याबरोबर ती गाडीही थांबत होती. युवराजांच्या गाडीला मागच्या बाजूलाही पूर्ण ताकदीचे दिवे होते .ते चालू करून त्यानी गाडी थोडी मागेही घेतली.त्याबरोबर समोरच्या गाडीनेही तसेच बरोबर केले .ते सर्व पाहात असताना युवराजाना समोर एक धूसर आरसा आहे आणि त्यात आपण प्रतिबिंब तर पाहत नाही ना असा भास झाला .जरा वेळाने त्या भासाचे संशयात रूपांतर झाले.त्यांनी हळुवारपणे ते वळण पार केले.समोरच्या गाडीनेही तसेच केले .
सुमारे दोन किलोमीटर घाट उतरल्यावर त्यांनी पुन्हा गाडी वळवून उलट दिशेने प्रवास सुरू केला .यावेळी काय होते हे त्यांना पाहायचे होते .यावेळी अगोदरप्रमाणे समोरून गाडी आली .मात्र ती एकदम अदृश्य झाली .ते गाडी थांबवून तसेच तिथेच थांबले .थोड्याच वेळात गाडी पुन्हा दिसू लागली .जसे काही आपण आरशात पाहत आहोत असा भास त्यांना होत होता.एवढ्यात त्यांना एकाऐवजी दोन मोटारी दिसू लागल्या .केव्हा एक मोटार दिसे तर केव्हा दोन दिसत एकदा तर त्यांना तीन मोटारी क्षणभर दिसल्या .केव्हा मोटारी स्पष्ट दिसत तर केव्हा अस्पष्ट दिसत .
चढावर पुढे गेल्यावर युवराजांनी पुन्हा उलट दिशा घेतली .पुन्हा ते त्या वळणावर आले.या वेळी ते योग्य गतीने गाडी चालवीत होते . यावेळी त्यांना समोरून गाडी येऊन त्यांना क्रॉस करून गेल्याचे दिसले .त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले .त्यांच्या लक्षात शास्त्रीय कारण आले होते .कोकणातील त्यांचे खासगी काम संपल्यानंतर ते पुन्हा त्या घाटातून दिवसा आले.त्या वळणावर गाडी थांबवून त्यांनी सर्व परिसराचे नीट निरीक्षण केले. .नंतर पुण्याला येऊन ते पुढे मुंबईला आपल्या घरी आले .
कोकणात गोवा हायवेने न जाता ते मुद्दाम वाकडी वाट करून पुण्यावरून त्या कुप्रसिद्ध घाटातून मुद्दाम गेले व आले होते.त्या घाटासंबंधीच्या वर्तमानपत्रातील विचित्र बातम्या त्यांना त्या घाटाकडे खेचून नेण्यास कारणीभूत झाल्या होत्या .
मुंबईला आल्यावर त्यांनी रस्ते व वाहतूक मंत्र्यांची भेट मागितली.त्या भेटीत त्यांनी त्या वळणावरील रहस्य उलगडले .त्यांच्या मताप्रमाणे रात्र झाल्यावर खोऱ्यातील बाष्प मिश्रित हवा हळुहळू वर येते.त्या हवेचे कमी जास्त घनतेचे थर असतात .त्या थरामुळे गाडी चालविणार्याला आपण आरशात पाहतो त्याप्रमाणे समोरील दृष्य दिसते .समोरून गाडी येत आहे व ती आपल्यावर आपटणार असे वाटते.ती प्रत्यक्षात नसलेली गाडी चुकविण्याच्या नादात अपघात घडतो.हवेच्या विविक्षित घनतेच्या अनेक थरांमुळे काही वेळा एकाहून जास्त गाड्या असल्याचा भास होतो .हा भास क्षणिक असतो .एकाच वेळी वळणावर एकाहून जास्त गाड्या आल्यास सर्व ड्रायव्हरांचा प्रचंड गोंधळ उडतो .त्यातून अपघात घडतात.हे विशिष्ट घनतेचे हवेचे थर व त्यामुळे उडणारा गोंधळ साधारणपणे त्या खोऱ्याच्या विशिष्ट रचनेमुळे रात्री बारा ते दोन या काळात होतो .
भूत वगैरे काही नाही .या घटनांना शास्त्रीय कारण आहे .कदाचित हा उडणारा गोंधळ वेगळ्या वेळेतही घडू शकतो.हे वळण काढून टाकावे . त्याऐवजी मोटारीसाठी एक छोटासा बोगदा काढावा .तो बोगदा कुठे काढावा वगैरे गोष्टी यंत्रज्ञ व तंत्रज्ञ ठरवतील.
युवराजांच्या सूचनेच्या आधारावर मंत्री महोदयानी एक समिती नेमली .युवराजांच्या सूचनेचा त्या समितीने विचार केला .युवराजांच्या सूचनेत तथ्य आहे असा अहवाल त्यांनी दिला . विशिष्ट परिस्थितीत असे भास होऊ शकतात .असा तज्ञांचा अहवाल होता .
त्यानंतर सरकारने एक नवीन बोगदा काढला .
ते वळण बंद करण्यात आले .
*सर्व वाहने नव्या बोगद्यातून नव्या मार्गाने जाऊ लागली.*
*त्यानंतर पुन्हा अशा घटना झाल्या नाहीत.*
*आता तो घाट चौवीस तास वाहनांसाठी मोकळा असतो*
१२/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन