Get it on Google Play
Download on the App Store

नऊ

प्रशांतने अमरच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा चौघे जण हसायला लागले.

अमर सिगारेट फुकत होता आणि नुसता हसत होता. त्याने हातानेच प्रशांतला बसण्याचा इशारा केला. चौघांपैकी एक म्हणाला-

“आता काय बाबा प्रशांत शेठ चिकार गर्लफ्रेंड असलेला माणूस झाला आहे. त्याने अमर शेठचं घर पण टाकून दिलंय.”

बाकीचे तिघेही हसले. मग दुसरा सिगारेट प्रशांत कडे देत म्हणाला –

"जाऊ द्या प्रशांतशेठ , मुली असाच चुतीया काटतात. प्रत्येकाचा कटतो. तुझा कटला. जितक्या लवकर समजलं तितकं बरं."

प्रशांतने सिगरेटचा एक झुरका घेतला आणि इतक्यात तिसरा पोरगा म्हणाला,

“प्रशांत शेठ माझं ऐक. आम्ही लोकं पण खानदानी प्रेमी आहोत. माझा बाप, आजा, पंजा सगळे प्रेमवीर होते. आमची चारशे एकर जमीन होती.सगळी प्रेम प्रकरण  करण्यात फुकून टाकली.  सब झूठ आहे. हौसच असेल पैशाचा चुराडा करण्याची तर ठीके करा प्रेम...”

चौथा खो खो हसत म्हणाला

"भावा, काही मिळत असेल तर प्रेम करून तर काही प्रोब्लेम नाही. पण प्रशांत शेठ खिडकीला लटकून प्रेम करतो,  त्याला काय मिळाले? दर्शन पण झालं नसेल कसलंच. खाया पिया कुछ नाही गिलास तोडा बाराना.”

चौघेही छद्मी हसले. सिगारेट मध्ये मिसळलेल्या मालाचा प्रशांतवर काहीच परिणाम होत नव्हता. त्याच्या मनात धुमसत असलेल्या आगीसमोर ते काहीच नव्हते.

त्याने सिगारेट संपवली आणि थोटूक वाटीत टाकले. समोर भरून ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास तोंडाला लावला आणि एकाच घोटात संपवला.

“अरे त्यात पाणी पण नव्हतं टाकलं रे बाबा...” पुढे अमर काही बोलणार इतक्यात प्रशांत ताडकन उठला आणि निघून गेला.