Get it on Google Play
Download on the App Store

०३ दोलायमान ३-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)              

काल आपण सौंदर्य प्रसाधन गृहात गेलो होतो.आज आपण काळजीपूर्वक कपडे केले.नेहमीपेक्षा  थोडा जास्तच मेकअप केला.प्रतापकडून त्याची पावती मिळाल्यामुळे त्या सर्वांचे चीज झाल्याचे समाधान तिला मिळाले.

रेवा भरकटू लागली होती.भरकटत शेवटी ती कुठे जाणार होती कुणास ठाऊक?

रेवाची गाडी पटरीवरून घसरू लागली होती.

ती पुन्हा पटरीवर येणार होती की नाही ते भविष्य काळच ठरविणार होता.  

त्या दिवसापासून प्रताप व रेवा यांचे अफेअर सुरु झाले असे म्हणता येईल.प्रत्यक्षात तसे कांहीही इतरांना दिसत नव्हते.अफेअर मानसिक पातळीवर होते असे आपण म्हणूया.रेवाने एखादी नवी हेअरस्टाईल केली की प्रताप आसपास कुणी नसताना त्याला पावती देत असे.तिने नवीन कपडे घातले की तिच्या निवडीला दाद देत असे.हे सर्व तो कुणीही नसताना इतक्या सहजरीत्या करीत असे की त्या मागे कांही विशिष्ट भावना  आहे की तो सहजोद्गार आहे उत्स्फूर्त उद्गार आहे याचा पत्ता इतरांनाच काय परंतु ज्याची तारीफ केली तिलाही,रेवालाही लागू नये.तीही संभ्रमात असे.प्रतापच्या डोळ्यात मात्र तिला प्रेमभावना दिसत असे.आपण त्याला आवडतो हे तो स्पष्टपणे तिला कळू देत असे.आपली भावना तिच्यापर्यंत बरोबर पोहचवीत असे.

दुपारी लंच टाइममध्ये सर्वच कॅन्टीनमध्ये जेवायला जात असत.तिथे जो तो जशी जागा मिळेल त्याप्रमाणे टेबलवर बसत असे. येथे सीनिअर ज्युनिअर साहेब नोकर असे कांही नव्हते.जुळवून आणल्यामुळे असो किंवा दैवयोगाने असो बऱ्याच वेळा प्रताप व रेवा एका टेबलवर दुपारच्या जेवणासाठी बसत असत.त्यावेळी सहजपणे गप्पा मारतो असे दाखवत प्रताप बऱ्याच गोष्टी उघड करीत असे.

त्याचा प्रेमविवाह झाला होता.त्याची पत्नी अपघातात मृत्यूमुखी पडली होती.याला जवळजवळ दहा वर्षे झाली होती.त्याला विवाह करण्याच्या ऑफर्स निरनिराळय़ा जणांकडून येत होत्या.त्याचे आईवडील,मुलीचे आईवडील,प्रत्यक्ष त्याच्या सहवासात आलेल्या मुली, आतापर्यंत सर्वांना तो नकार देत आला होता.हे सर्व सांगताना त्याने आतापर्यंत या शब्दावर जोर दिला होता.भविष्यकाळात एखाद्या बाईकडून त्याला विवाह सूचना(ऑफर) आली तर तो त्यावर गंभीरपणे विचार करील.तो विवाह करू शकतो असेही त्याने सूचित केले होते.त्याचा रोख अर्थातच रेवाकडे होता. तो हे सर्व आपल्याला उद्देशून बोलत आहे याची जाणीव रेवाला होती.रेवाने घटस्फोट घ्यावा आणि आपल्याशी विवाह करावा अशी अप्रत्यक्ष सूचनाही त्याने केली  

होती.हे सर्व तो इतक्या तरलपणे करीत होता की त्यावर ऐकणारा कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्शन(आक्षेप) घेऊ शकत नव्हता.

तो प्रत्यक्ष रेवाच्या संदर्भात कांहीच बोलत नसे.हल्ली त्याचे मतपरिवर्तन झाले आहे.एखादी घटस्फोटिता, विधवा,काही कारणाने विवाह न केलेली किंवा न झालेली पस्तिशीतील चाळिशीतील कुमारिका,त्याला पसंत पडली तर तो विवाह करील असे रेवाजवळ बोलत असे.शहाण्याला इशारा पुरेसा असतो(समझदारको इशारा काफी है।) रेवाला तो हे कां बोलत आहे ते बरोबर समजत असे.दुपारी कॅन्टीनमध्ये जेवताना सहज गप्पा मारीत असल्यासारखा प्रताप या सर्व गोष्टी बोलत असे.केव्हांही सलगरित्या तो कांहीच बोलला नाही.एखाद्या सिनेमाच्या संदर्भात, गप्पांच्या संदर्भात,वर्तमानपत्रातील बातमी किंवा लेख या संदर्भात,आपले विचार मांडत असताना तो बोलण्याला बरोबर वळण देत असे.थोडक्यात वरती सांगितलेल्या गोष्टी तुटक तुटक, तुकडय़ा तुकडय़ाने,पूर्ण शिताफीने, त्याने रेवाच्या कानावर घातल्या.रेवाला त्याला काय सांगायचे आहे,तो काय सुचवितो आहे, ते बरोबर कळत असे.

प्रताप ऑफिस प्रमुख म्हणून येवून जवळजवळ सहा महिने झाले होते.सुरुवातीला तिला पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यात दिसलेली चमक, चेहऱ्यावर स्वाभाविकपणे उमटलेले भाव,याचे कारण एक दिवस त्याने सांगितले.रेवाला बघितल्यावर त्याला  त्याची पत्नीच पुन्हा जिवंत होऊन त्याच्या समोर आली असे वाटले होते.दोघींमध्ये कमालीचे साम्य होते.असे म्हणतात की एका सारख्या एक जगात सात व्यक्ती असतात.खरे खोटे माहीत नाही परंतु रेवा व त्याची पत्नी सीमा या दोघींमध्ये कमालीचे साम्य होते.ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची जेव्हा निवृत्त होत असलेल्या साहेबांनी ओळख करून दिली त्या वेळी रेवाला पाहिल्यावर तो त्यामुळेच चमकला होता. आपल्याला सोडून गेलेली पत्नीच साक्षात पुन्हा पुढे उभी आहे असे त्याला वाटले होते.

एकदा प्रताप बोलता बोलता असेही म्हणाला होता की त्याच्या पत्नीशी साम्य असलेली स्त्रीच त्याची पत्नी होवू शकते.तो बोलण्यात इतका कुशल होता कि त्याच्या मनात असलेले भाव तो बरोबर दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असे.

प्रतापला काय म्हणायचे आहे ते त्याने रेवापर्यंत पोहोचवले होते.आता तिने निर्णय घ्यायचा होता.अजूनही प्रत्यक्षात त्याने तिला केव्हाही स्वतंत्रपणे डिनरला निमंत्रित केले नव्हते.तिला केव्हांही स्वतंत्रपणे कुठेही बाग मॉल थिएटर रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी तो भेटला नव्हता.त्याच्या बोलण्यात आक्षेप घेण्यासारखे कांहीही कधीही नसे.तो केवळ हुशारीत सुप्त सूचना देत असे. 

रेवा द्वंद्वात सापडली होती.तिची मुले,ज्याच्यावर एकेकाळी जिवापाड प्रेम केले तो कृष्णकांत,समाज, नातेवाईक, एकाबाजूला आणि प्रतापबद्दल वाटणारी व दिवसेंदिवस वृध्दिंगत होणारी ओढ दुसर्‍या  बाजूला असे ते द्वंद्व होते. 

जर एकाच वेळी एक पुरुष दोन स्त्रियांवर सारख्याच उत्कटतेने प्रेम करू शकतो असे म्हटले जाते तर एकाच वेळी एक स्त्री दोन पुरुषांवर सारखेच प्रेम करू शकत नाही का?असा विचार रेवाच्या मनात येत असे.तिचा प्रेमविवाह होता.कृष्णकांतवर तिने मनापासून प्रेम केले होते.तिचे अजूनही त्याच्यावर तितकेच प्रेम होते.त्याचेही बहुधा असावे.प्रेम असून नुसते चालत नाही ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त व्हावे लागते.तुमच्या बोलण्यातून, तुमच्या देहबोलीतून, तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून,ते व्यक्त व्हावे लागते.निखाऱ्यावर जशी राख धरावी तशी कांहीशी अवस्था कृष्णकांतच्या प्रेमाची झाली होती.आत स्फुल्लिंग होता परंतु बाहेर तो जाणवत नव्हता.कृष्णकांतचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असा रेवाला संशय  येऊ लागला होता.                निरनिराळ्या कारणांमुळे नात्यांमधे येणारा तोचतोचपणा,  वाढत्या कामाचा व्याप,त्यामुळे येणारी व्यग्रता,परिणामी कांही गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, हे त्याचे कारण असावे.

ती कांही कारण पाहात नव्हती.विश्लेषणही करीत नव्हती. तिला तसे वाटत होते.त्यांच्या म्हणजे कृष्णकांत व रेवाच्या नात्यामध्ये पूर्वीची उत्कटता राहिली नव्हती.असा विचार करीत असतानाही रेवाच्या वर्तणुकीबद्दल कृष्णकांतला काय वाटते तो विचार रेवा करीत नव्हती.जे तिला वाटते तेच कृष्णकांतलाही वाटत असण्याचा संभव होता.संभव काय त्याला तसे वाटतच होते.दोघेही एकमेकांना पूर्वीची ती ओढ राहीलेली नाही म्हणून मनातल्या मनात दूषणे देत होती.ही कोंडी फुटायला हवी होती.कदाचित या सर्वांचा परिणाम म्हणून रेवा प्रतापकडे आकर्षित होत असावी. मानसिक विश्लेषण कांहीही असो रेवा मनातून खट्टू होती.ती प्रताप कडे आकर्षित होत होती. ही वस्तुस्थिती होती.

रेवाची घरातील वर्तणूक विशेष कांही बदल दाखवीत नव्हती.फक्त तिच्या दिनचर्येत फरक झाला होता.सकाळी ती नियमितपणे फिरायला जात होती.आठवड्यातून तीन दिवस तरी नियमितपणे योगा व इतर व्यायाम करीत होती.शिवाय तिने आपल्या खाण्यापिण्यावर बंधने घालून घेतली होती.अगोदरच सुंदर असलेली ती या सर्वामुळे आणखीच आकर्षक सुंदर व तरुण दिसू लागली

होती.एक दिवस ती व सुकन्या मॉलमध्ये गेल्या होत्या.तिथे सुकन्याला तिच्या कॉलेजमधील एक मैत्रीण भेटली.तिने सुकन्याला ही तुझी मोठी बहीण का? असे विचारले.सुकन्या आई म्हणून संबोधित होती तर तिची मैत्रीण ते ताई समजत होती.इतका विलक्षण बदल रेवामध्ये गेल्या सहा महिन्यात झाला होता.ऑफिसातही सर्व बायका तिला तू व्यायाम कोणता करतेस? डाएटिंग काय करतेस? तुझ्या या बदलाचे रहस्य काय असे विचारीत असत.

प्रताप व रेवा यांनी अजून कोणतीही अयोग्य पायरी ओलांडली नव्हती.ऑफिसबाहेर अजून कुठेही ती दोघे भेटली नव्हती.भेटावे असे प्रतापला वाटत होते.परंतु रेवाचा प्रतिसाद काय येईल याची त्याला आशंका असावी.रेवाचा तर स्वत:हून पुढाकार घेण्याचा प्रश्नच नव्हता. ती चाळीस वर्षांची मध्यमवयीन स्त्री होती.दोन मोठी मुले असलेली, कर्तबगार नवरा असलेली,नवर्‍यावर प्रेम असलेली अशी ती प्रौढा होती.मनातून कितीही वावगे पाऊल तिने कदाचित उचलले असले तरी व्यवहारात प्रत्यक्षात ती वावगे वागण्याचा प्रश्नच नव्हता.

शेवटी एक दिवस प्रतापने पुढाकार घेतला.आज रात्री आपण स्वीट होम रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ तू येशील का असे विचारले.थोडक्यात त्याने तिला डेटवर बोलाविले होते.रेवाने एकदम होकार दिला नाही.घरची परिस्थिती पाहते. मेसेज करीन असे सांगितले.आज तिला काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार होता.ती घसरगुंडीला लागणार होती.नंतर स्वत:ला रोखणे कठीण होणार होते.घरी येताना ती चिंतामग्न होती.शेवटी सुहासने तिला विचारले एवढी कसल्या काळजीत तू पडली आहेस.धड बोलत नाहीस. प्रश्नाला उत्तर देत नाहीस. कित्येक वेळा तुला मी काय बोलते ते ऐकायला गेले नाही असे मला वाटते.

या बाबतीत सुहासचा सल्ला घेणे शक्य नव्हते. योग्यही नव्हते.तिचा तिलाच निर्णय घ्यायचा होता. विचारात असतानाच ती घरी आली.तिच्याजवळ आता फार वेळ नव्हता.होकार किंवा नकार कांहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता.आरशासमोर फ्रेश होऊन तयारी करून ती उभी होती.अजून कृष्णकांत ऑफिसमधून आला नव्हता.मुलेही कुठेतरी बाहेर गेली होती.मैत्रिणीकडे पार्टी आहे. तिकडे मी जात आहे असा मेसेज करून आणि तसाच सुशीलामावशीजवळ निरोप देऊन जावे असा विचार ती करीत होती.एवढय़ात तिला पाठीमागून कुणीतरी अलगद मिठी मारली.आरशात तिला हसतमुख कृष्णकांत दिसला.

मावशीना मी घरी पाठवून दिले आहे.मुले त्यांच्या मित्र मैत्रिणींकडे गेली आहेत.उद्यापासून मी तुझ्याबरोबर लवकर उठून फिरायला येण्याचे ठरविले आहे.तू इतकी सुंदर आकर्षक दिसतेस मलाही तुला शोभेल असे दिसले   पाहिजे.आज आपण बाहेर जेवायला जाणार आहोत.मी माझ्या कामाचा व्याप कमी करणार आहे.या कामांमुळे आपल्याला एकमेकांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.आपल्या दोघांच्या नात्यावर गंज चढत चालला आहे की काय असा संशय येतो.मी दार्जिलिंगचे दहा दिवसांचे बुकिंग केले आहे.आपल्या येथे आईबाबा येऊन राहतील.मुले मोठी झाली आहेत त्यांचे ती पाहतील.आपण पुन्हा हनीमूनसाठी दार्जिलिंगला जात आहोत.

(एवढ्यात तिच्या फोनवर  डिनरला येत आहेस ना असा संदेश झळकला.त्यावर तिने लगेच "मला शक्य होणार नाही माफ करा" असा संदेश पाठविला")   

*या कृष्णकांतच्या बोलण्यावर,बोलण्यासारखे कांहीच शिल्लक राहिले नव्हते.तिला तिचा पूर्वीचा कृष्णकांत भेटला होता.*

*तो तिला प्रेमाची साद घालीत होता.*

*त्याच्या बोलण्याला संमती दर्शवीत, होकार देत, ती त्याच्या कुशीत अलगद  शिरली.  

*अभ्रे दूर झाली होती.स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.*(रेवा घसरगुंडीला लागण्याअगोदरच सावरली होती.)

समाप्त 

१०/९/२०२१©प्रभाकर पटवर्धन