Get it on Google Play
Download on the App Store

०७ विधिलिखित २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

मी अविनाशच्या प्रेमात प्रथमदर्शनीच पडले होते.सहवासाने ते दृढ होत गेले होते.

त्याला सर्वकांही एकदा सांगून टाकावे असे मला वाटत होते.परंतु माझी जीभ रेटत नव्हती.

मी त्याला किंवा तो मला कां कोण जाणे परस्परांच्या घरी बोलावण्याला उत्सुक नव्हतो.

माझा साखरपुडा झाला होता.हे अविनाशला सांगून टाकावे असे मला अनेकदा वाटले होते.परंतु माझी जीभ रेटत नव्हती.

माझे शिक्षण पुरे झाले आणि घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली.मला घरातून घालवायला तुम्ही एवढे उत्सुक कां आहात असे मी बाबांना विचारले.कांही दिवस मला मोकळेपणाने मित्रमैत्रिणींबरोबर जगू द्याना असे मी म्हटले. त्यावर  मी उत्सुक नाही तुझ्या आईलाच घाई झाली आहे असे ते म्हणाले.त्यावर आई फणकाऱ्याने म्हणाली,आपण ठरवले म्हणजे लगेच लग्न होते असे थोडेच आहे.या योगायोगाच्या गोष्टी असतात.स्वर्गात गाठ मारली जाते.इथे आपण ती शोधत असतो.कधी ती लवकर सापडते कधी उशीर लागतो.

मला बाबांनी तुझे कुठे कांही ठरलेले नाहीना असे स्पष्टपणे विचारले.मी त्यांना तसे काहीही नाही असे सांगितले होते.शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत मला अनेक मित्र होते.त्यातील कांहीच्या संपर्कात मी अजूनही आहे.परंतु त्यातील कुणाशी लग्न करावे असे मला कधी वाटले नाही.मॅरेज मटेरियल विवाह योग्यता कुणातच वाटली नाही.कुठेतरी अंतरीची खूण पटते तसे काही झाले नव्हते.कुणाबद्दलही ओढ वाटली नव्हती.

बाबांनी माझे नाव एका विवाह मंडळात नोंदविले.त्यातून एक जण बाबांच्या आईच्या व माझ्या पसंतीस उतरला.राजीवला व मला पारंपरिक पध्दतीने(त्याला तो चहा पोह्यांचा कार्यक्रम म्हणत असे)   एकमेकांना पाहणे रुचत नव्हते.आम्ही दोघेही परस्परांच्या संमतीने एका हॉटेलात भेटलो.त्यानंतर अामच्या दोन चारदा अशाच भेटी झाल्या.आमचे विचार आमच्या कल्पना जुळल्या.कथा कादंबऱ्यांतून हृदयाची हृदयाला ओळख पटते.पूर्व जन्मींच्या संबंधांची स्मृति होते.असे काहीतरी वाचले होते.तसे कांही जाणवले नाही.आम्ही दोघांनीही एकमेकांना जन्माचे जीवनसाथी म्हणून पसंत केले एवढे मात्र खरे.त्यामध्ये बुद्धीचाच भाग जास्त असावा.अर्थात मनाच्या वाटा इतक्या अनाकलनीय व गूढ असतात की नक्की कांही सांगणे मोठे कठीण आहे.आमच्या दोघांच्या होकारानंतर    परस्परांच्या कुटुंबांचा संवाद झाला.शेवटी साखरपुडा करण्याचे ठरले.साखरपुडाही संपन्न झाला.राजीव आणि मी साखरपुड्यानंतर अधूनमधून भेटत होतो.दोघांचेही एकमेकांच्या कुटुंबात येणे जाणे होते.राजीव मला जीवनसाथी म्हणून पूर्णपणे पसंत होता.आणि अकस्मात आता अविनाश माझ्या जीवनात आला होता.अविनाशला सर्वकांही सांगून टाकावे असे मला वारंवार वाटत असे .परंतु अविनाशशी सर्व संबंध सुटतील असे वाटून जीभ रेटत नसे. त्याला भेटण्यासाठी कुठेतरी मन ओढत असे.

मी एकटी असे त्यावेळी माझ्या मनात अविनाश व राजीव यांची तुलना चालत असे.राजीवपेक्षा अविनाशकडे माझे मन जास्त ओढ घेत असे.हे अयोग्य आहे असे मला अनेकदा वाटे.परंतु मनाने काय करावे आणि काय करू नये ते आपल्या हातात नसते.बुद्धीने आपण फक्त त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.तेही किती ते सांगणे अशक्य आहे.

एक दिवस मी राजीव बरोबर असताना अविनाश भेटला.मी  एकमेकांची ओळख करून दिली.राजीवची ओळख माझा मित्र अशी करून दिली.त्यावेळी राजीवने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले.भावी पती म्हणून त्याची ओळख करून देईन अशी त्याची कल्पना असावी.त्याच्या जागी तो बरोबरच होता.असे सांगण्याला कां कोण जाणे माझी जीभ रेटत नव्हती.राजीवनेही माझ्या बोलण्यात दुरुस्ती केली नाही.त्यालाही कुठे तरी माझ्या मनाची द्विधा स्थिती जाणवत असावी.मला माझा निर्णय मोकळेपणाने घेता यावा असाच त्याचा विचार असावा.त्याचा स्वभाव मला माहित झाला होता.दुसऱ्यावर कोणतीही गोष्ट लादणे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होते.माझ्या मनातील उलघाल त्याला कदाचित स्पर्श करून गेली असावी.      

मला दोघेही आवडत होते.त्यातून एकाची निवड करणे मोठे कठीण होते.पुरुषाचे एकाचवेळी दोन स्त्रियांवर समान प्रेम असू शकते.या कल्पनेला समाज विशेष विरोध करीत नाही.बहुपत्नीत्व समाजाला एकूण  मान्य आहे असे इतिहास पाहिला तर लक्षात येते.ती नैसर्गिक आहे असेही कांही समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ म्हणतात.परंतु बहुपतीत्व समाजाला एकंदरीत मान्य नाही.स्त्री तेवढ्याच उत्कटपणे दोघांवर पती म्हणून प्रेम करू शकते यावर समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांची एकवाक्यता नाही.

अर्थात मी एकाशीच लग्न करणार होते.दोघांशी लग्न करण्याची कल्पनाही माझ्या मनात कधी आली नव्हती.समाजाला व त्या दोघांना ते मान्य असते तरी ते मी मान्य केले नसते.

परंतु या दोघांपैकी कुणाशी लग्न करावे याबाबत माझी मनःस्थिती द्विधा होती.  

शेवटी मी मनाशी निर्णय  घेतला.जर अविनाशने मला मागणी घातली तर त्याला होकार द्यायचा.आई वडिलांना व राजीवला अविनाशबद्दल व आपल्या त्याच्यावरील प्रेमाबद्दल स्पष्ट सांगून टाकायचे.ठरलेले लग्न मोडायचे.माझ्या पाठीशी आईवडील उभे राहतील याची मला खात्री होती.राजीवचा उमदा स्वभाव लक्षात घेता त्यानेही ते मान्य केले असते.याच त्याच्या उमद्या व मनमिळावू स्वभावामुळे मी त्याला होकार दिला होता. परंतु जर अविनाशने मागणी घातली नाही,मला प्रपोझ केले नाही,त्याचे मन माझ्याशी मोकळे केले नाही, तर आपणही कांही हालचाल करायची नाही.यदृच्छेने जे जसे होत आहे तसे होऊ द्यायचे.

अविनाशने मला प्रपोज केले नाही.मला मागणी घातली नाही.त्याचेही कारण मला एक दिवस कळले.माझ्यासारखाच त्याचाही साखरपुडा झाला होता.माझ्या सारखाच तो द्विधा मन:स्थितीत होता.बहुधा माझ्यासारखेच त्याने ठरवले असावे.मी त्याला सुचविले, मी त्याच्याशी लग्न करण्याचा कल दाखवला, तर तो मान्य करावा.अन्यथा स्वस्थ बसावे.  

आज या घटनेला दहा वर्षे झाली आहेत.आमचे दोघांचेही विवाह अगोदर ठरल्याप्रमाणे झाले आहेत.आम्ही मोकळय़ा मनाने एकमेकांच्या लग्नात हजर होतो.नुसतेच हजर नाही तर उत्साहाने भागही घेतला होता.मला आठ वर्षांचा एक मुलगा आहे.राजीवच्या सहवासात मी पूर्ण सुखी व आनंदी आहे.

अविनाशलाही एक मुलगी आहे.त्याच्या पत्नीची व माझी चांगली मैत्री आहे.सण, समारंभ, घरगुती समारंभ, यामध्ये आम्ही एकमेकांकडे जातो.दोघांच्या  मनात असे कांही घोळत होते ते आम्ही विसरून गेलो आहोत.जास्त खरे बोलायचे तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही.मनाने त्यावर पडदा टाकला आहे.आमच्या जोडीदारानाही त्याची कांहीही कल्पना नसावी असे वाटते.  परिस्थितीचा, दैवाचा,विधिलिखिताचा,यदृच्छेचा  आम्ही स्वीकार केला आहे.कसे कोण जाणे,मनोमन आम्हा दोघांनाही काय वाटत होते आणि आम्ही एकच निर्णय कां घेतला,त्याची जाणीव दोघांनाही आहे .    

आमच्या सर्वांच्या आयुष्यात एक असे अवघड वळण आले होते की जर कुणी एखाद्याने वेगळा निर्णय घेतला असता,सर्व काही यदृच्छेवर सोपविले नसते.तर आमच्या सर्वांच्याच वाटा निराळ्या  झाल्या असत्या.परंतु विधिलिखितच सर्वकांही यदृच्छेवर सोपवावे असे असावे.  

आम्ही आताही पूर्ण सुखात आहोत. त्या वेळी वाटा बदलल्या असत्या तरीही पूर्ण सुखात राहिलो असतो असा अंदाज आहे.

*शेवटी दैव म्हणून काही एक चीज आहेच.जर मी अविनाशला प्रपोझ केले असते किंवा त्याने मला प्रपोज केले असते.तर आम्ही वेगळा निर्णय घेतला असता.*

त्याचा परिणाम सर्वांवर,(अविनाशची त्या वेळची संभाव्य व आता प्रत्यक्षातील पत्नी जिच्याशी त्याचा साखरपुडा झाला होता.राजीव व आम्हा सर्वांचे कुटुंबीय) काय झाला असता सांगता येणे मोठे कठीण आहे.*

*आता सर्व कांही आठवले की हाच विचार मनात येतो.झाले ते एका अर्थी ठीकच झाले.*

*जर आम्हा दोघांची आमच्या साखरपुडय़ाच्या अगोदर   भेट झाली असती तर आमच्या वाटा निश्चितच एक झाल्या असत्या.* 

*आई म्हणते त्याप्रमाणे माझी गाठ राजीवशी बांधलेली होती!*

(समाप्त) 

१९/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन