Get it on Google Play
Download on the App Store

०९ शोकांतिका १-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

सकाळचे दहा वाजले होते.हॉटेल हिल टॉपच्या तिसऱ्या मजल्यावरचा देखभाल करणारा मुलगा कृष्णा, रूम नंबर तीनशेपंधरावरून येरझारा घालत होता.त्यामध्ये उतरलेले सारंगधर  साहेब अजून कुठले नव्हते.बेल वाजवली दरवाजा ठोठावला आणि साहेब रागावले तर काय करायचे?त्यांनी मॅनेजर जवळ तक्रार केली तर आपल्या नोकरीवर गदा येईल.आपण त्यांना उठवले नाही तरीही मॅनेजर रागावण्याचा संभव होता.इतका उशीर झाला तरी तू त्यांना का उठविले नाही.त्यांनी मला उठवू नको असे सांगितले असते तर गोष्ट वेगळी.त्यांची अकस्मात तब्येत बिघडली असेल.आणखी कांही झाले असेल.कदाचित त्यांनी झोपताना जास्त घेतली असेल.नाष्ट्याची वेळ सकाळी साडे दहा पर्यंतच असते.साधारणपणे सकाळी आठ साडेआठपर्यंत सर्वजण रूमवर चहा कॉफी मागवतात.फार तर नऊ.नंतर आवरून नाश्त्याला हॉलमध्ये येतात.त्यानंतर मंडळी फिरण्यासाठी बाहेर पडते.सर्वसाधारणपणे सर्वजण संध्याकाळीच हॉटेलवर परत येतात.या साहेबांनी सकाळी चहा मागवला नाही.अजूनही खोलीत कांही हालचाल दिसत नाही.तू त्यांना उठवून काय झाले ते पाहायला हवे होते.असेही मॅनेजर म्हणाले असते.कृष्णाला काय करावे ते कळत नव्हते.त्याने रिसेप्शनला फोन करून की बोर्डवर तीन शे पंधरा नंबरची चावी आहे की नाही ते विचारले.चावी तिथे नव्हती.म्हणजेच साहेब खोलीत होते.

शेवटी त्याने बेल दाबली.बेलचा खोलीत घुमलेला आवाज बाहेर ऐकू आला.आंतून कुणीही प्रतिसाद दिला नाही.त्याने पुन्हा बेल वाजवली.शेवटी त्याने पुन्हा पुन्हा बेल वाजवली.दरवाजा अनेकदा ठोठावला.आंतून कुणीही प्रतिसाद देत नव्हते.शेवटी त्याने मॅनेजरना इंटरकॉमवर सांगितले.मॅनेजर स्वतः तिथे आले.त्यांनीही बेल वाजवून दरवाजा ठोठावून पाहिले.शेवटी डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडण्याचे त्यांनी ठरविले.साहेबांनी आतून कडी लावली असेल तर दरवाजा उघडणार नव्हता.किल्ली लावून त्यांनी फिरविली.हळूच दरवाजा ढकलला.दरवाजा सताड उघडला.

बेडवर साहेब गाढ झोपलेले वाटत होते. टेबल लॅम्प जळत होता.टीपॉयवर दोन तीन कागद पडले होते.त्यावर कांहीतरी लिहिलेले होते. कागदांवर झोपेच्या गोळ्यांची बाटली,पेन,पेपरवेट होते.साहेबांची कांहीही हालचाल दिसत नव्हती.मॅनेजरना भलतीच शंका आली.त्यानी पडदे बाजूला करण्यास नोकराला सांगितले.साहेबांच्या नाकाजवळ बोट धरले.श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबलेला वाटत होता.साहेबांची कांहीही हालचाल दिसत नव्हती.मॅनेजरने एकदा लक्ष देवून साहेबांच्या छातीकडे पाहिले.साहेब उताणे पडले होते.त्यांची छाती खाली वर होत नव्हती.साहेब केव्हांच हे जग सोडून गेले होते.

त्यांनी कृष्णाला कोणत्याही वस्तूला हात लावू नको म्हणून सांगितले.तिथेच उभे राहून  मोबाईलवर पोलिस स्टेशनचा नंबर फिरवला.

२ 

इन्स्पेक्टर श्रीकांत   त्यांच्या नेहमींच्या कामात व्यस्त होते.टेबलावरील रिंग वाजली म्हणून त्यांनी फोन उचलला.फोन हॉटेल हिल टॉपमधून होता.रूम नं तीन शे पंधरामध्ये उतरलेले साहेब कांहीही हालचाल करीत नव्हते.मॅनेजरला भलतीच शंका येत होती.त्याने ताबडतोब पोलिस स्टेशनला फोन केला होता.इन्स्पेक्टर श्रीकांतनी कोणत्याही वस्तूला हात लावू नका.  आम्ही तिथे पोचतच आहोत अशी सूचना केली.अशावेळी नेहमी जाणारी त्यांची ठसेतज्ज्ञापासून कॅमेरामनपर्यंत सर्व टीम तयारच होती.इन्स्पेक्टर श्रीकांतकडून सूचना मिळताच दहा मिनिटांत सर्वजण तयार होऊन पोलीस व्हॅनमध्ये बसले.सायरन वाजवत पोलिस व्हॅन निघाली.पोलिस व्हॅनमधूनच इन्स्पेक्टर श्रीकांतनी डॉक्टरना फोन केला.त्यांना श्रीकांतनी थोडक्यात कारण सांगून  हॉटेल हिल टॉपवर येण्यास सांगितले.

पोलीस व्हॅन व पाठोपाठ डॉक्टर हॉटेल हिल टॉपवर पोचले.रूम नंबर तीन शे पंधरामध्ये सर्व टीम पोहोचली.श्रीकांतनी सर्व परिस्थितीचा ताबा घेतला.डॉक्टरांनी  मनस्वी सारंगधरला मृत घोषित केले.मृत्यूच्या कारणासाठी अर्थातच पोस्टमार्टेम करावे लागणार होते.वरवर पाहता,सकृतदर्शनी, झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे जाणवत होते.शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण कळणार होते.

३  

इन्स्पेक्टर श्रीकांतनी खोलीचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली.पोस्टमार्टेम केल्यावर मृत्यूचे कारण कळणार होते.परंतु अपघात, घात,आत्महत्या,नैसर्गिक मृत्यू, यातील एखादे किंवा अन्य आणखी कांही,कोणते कारण आहे ते इन्स्पेक्टर श्रीकांतनाच शोधून काढावे लागणार होते.

खोलीच्या खिडक्या बंद होत्या.खिडक्यांना ग्रील्स होते. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार,त्यांना माहित झाल्याशिवाय खोलीत कोणीही येऊ जाऊ शकत नव्हते.तरीही सर्व दृष्टिकोनातून विचार करावा लागणार होता.खोलीला आंतून कडी नव्हती. कुणीही बाहेरून आंत येऊ शकत होते.तेव्हां बाहेरून कुणी तरी येऊन खून केला असण्याचा संभव नव्हताच असे नाही.अर्थात मृताच्या मानेवर कांही वळ,खुणा,दिसत नव्हत्या. मृत्यूचे कारण कळल्याशिवाय उगीचच कांहीतरी तर्क करण्यात अर्थ नव्हता.गादीवरील चादर विशेष विस्कटलेली नव्हती.कॉटवर गादीवर कांही हातापायी झाली असती तर चादर विस्कटली गेली असती.संभाव्य खुनाचा विचार इन्स्पेक्टर श्रीकांतनी तूर्त बाजूला ठेवला.आणि इतर दृष्टीनी विचार करायला सुरूवात केली.त्यांनी मॅनेजरला हा मनस्वी सारंगधर येथे एकटाच उतरला होता का म्हणून विचारले.त्यावर व्यवस्थापकांनी तो व त्याची पत्नी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती असे सांगितले.पत्नी रोहिणीने काल सकाळी फिरायला जाण्यापूर्वी एक बंद लखोटा व्यवस्थापकांजवळ दिला होता.मी जर हॉटेलवर परत आले नाही तर हा पोलिसांकडे सुपूर्त करा असे सांगितले होते.त्यांचे बोलणे मला चमत्कारिक वाटले.मी कामाच्या गर्दीत असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष दिले नाही.संध्याकाळी साहेब हॉटेलवर एकटेच आले.मी त्यांना बाईसाहेब कुठे आहेत म्हणून  विचारले.त्यावर त्यांनी तिची एक मैत्रीण भेटली तिच्याकडे ती गेली आहे उद्या परत येईल असे सांगितले.अजून त्या आलेल्या नाहीत.

एवढ्यात इन्स्पेक्टर श्रीकांतना एक फोन आला.सनसेट पॉईंटवरून पडल्यामुळे एका बाईचा मृत्यू झाला आहे.तिचे शव दरीत पडले आहे.ट्रेकरसच्या सहाय्याने आम्ही शव वर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत असा तो फोन होता.इन्स्पेक्टर श्रीकांतना भलतीच शंका आली.या मनस्वीने पत्नीला कड्यावरून खाली ढकलून तर दिले नसेल ना?गडी साखसूरत हॉटेलवर आला.पत्नी मैत्रिणीकडे गेली म्हणून सांगितले.रात्री बहुधा त्याने आत्महत्या केली.अशी त्यांची रास्त शंका होती.

चौकशी करता मनस्वीने रात्री जेवण घेतले नव्हते.बाहेर खाल्ल्यामुळे भूक नाही असे उत्तर दिले होते. खोलीवर फक्त मिल्क चॉकलेट मागविले होते.त्याचा ग्लास टेबलावर पडलेला दिसत होता.त्याच्या तळाशी कसला तरी पांढरा साखाही होता.ग्लासवरील  ठसे पुसले जाऊ नयेत,आंतील पांढरा साखा सांडून जाऊ नये   म्हणून,ग्लास व्यवस्थित पॅक करून नंतर तो एका कागदात गुंडाळून त्यांनी तपासासाठी तो पोलिस चौकीत पाठवून दिला.ग्लासवरील ठसे,आतील द्रवपदार्थातील वस्तू,इत्यादी सर्वच माहिती फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून कळणार होती.मृत्यूचे कारण कळण्यास त्याची मदत झाली असती.

टेबलावर रोहिणी सारंगधरने काल सकाळी हॉटेलातून बाहेर जाताना व्यवस्थापकाजवळ दिलेला लखोटा पडला होता.जर मी संध्याकाळी परत आले नाही तर तो पोलिसांकडे द्यावा असे तिने तोंडी सांगितले होते.ती गोष्ट व्यवस्थापक विसरून गेले होते.आज सकाळी त्याना ती आठवली. तिच्या सांगण्यानुसार कालच तो लखोटा पोलिसांना द्यायला हवा होता.पत्नी मैत्रिणीकडे गेली आहे असे साहेबांनी सांगितले त्यामुळे त्याचे तिकडे दुर्लक्ष झाले होते.

टेबलावर आणखीही कांही कागद होते.इन्स्पेक्टर श्रीकांतनी ते वरवर चाळले.

त्यातील एक रोहिणीने साहेबांना लिहिलेले पत्र होते.

एक पत्र साहेबांनी कोणाचाही उल्लेख न करता त्यांच्या मनातील मळमळ व्यक्त करण्यासाठी लिहिलेले दिसत होते.त्यावर मायना दिसत नव्हता.ते पत्र अमुक एका व्यक्तीला उद्देशून असे लिहिलेले नव्हते. 

श्रीकांतनी अजून लखोटा उघडला नव्हता.ते तिन्ही पत्रांकडे पाहात होते.

पहिले रोहिणीने पोलिसांना लिहिलेले.

दुसरे रोहिणीने तिच्या पतीला मनस्वीला लिहिलेले.

तिसरे साहेबांनी कुणालाही उद्देशून न लिहिता लिहिलेले.  

इन्स्पेक्टर श्रीकांतनी प्रथम पोलिसांसाठी रोहिणीने लिहिलेला लखोटा वाचावा.नंतर रोहिणीने मनस्वीला लिहिलेले पत्र वाचावे.व शेवटी मनस्वीने लिहिलेले पत्र वाचावे असे ठरविले.मनस्वीचे पत्र लांबलचक होते.त्यामुळे ते शेवटी वाचावे असे त्यांनी ठरविले होते.

त्या अगोदर त्यांनी हॉटेलमधील कांही जणांच्या मुलाखती घ्यायचे ठरविले.पत्रे वाचल्यानंतर वाटले तर ते हॉटेलमधील नोकरांची पुन्हा चौकशी करू शकणार होेते.

साहेब व बाईसाहेब यांच्यामधील संबंध कसे होते ते त्यांना जाणून घ्यायचे होते.मनस्वीचे वय पाहता ती दोघे हनीमूनला आलेली वाटत नव्हती.तरीही कदाचित उशीरा लग्न झाले असेल,दोघेही घटस्फोटित असतील व नंतर विवाह केला असेल,अशा अनेक शक्यता होत्या.

*कृष्णाच्या,व्यवस्थापकाच्या व स्वागतिकेच्या,मुलाखतीतून पुढील गोष्ट स्पष्ट झाली.*

*दोघांच्याही परस्परांशी  असलेल्या वर्तनावरून त्या दोघांतील संबंध विशेष प्रेमाचे नव्हते.*

*संबंध सामान्य होते.ती हनीमूनला निश्चितच आलेली नव्हती.मधुचंद्रासाठी आलेली जोडपी जशी एकमेकात हरवलेली असतात. एकमेकांजवळ गुलुगुलू बोलत असतात. तसे हे जोडपे अजिबात नव्हते*

*इन्स्पेक्टर श्रीकांतनी प्रथम रोहिणीने पोलिसांसाठी लिहिलेला लखोटा उघडून वाचावा असे ठरविले आणि तो लखोटा उघडला* 

(क्रमशः)

२७/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन