Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 2



 

प्रकरण २
ऑफिस मधून निघाल्यापासून बरोब्बर अर्ध्या तासाने पाणिनी ने मायरा कपाडिया च्या दाराची बेल वाजवली होती. वाजवण्यापूर्वी त्याचा नंबर २०८ असल्याची खात्री केली.दोन तीन वेळा बेल वाजवूनही ना आतून कसला आवाज आला ना कोणी दार उघडायला आलं. पाणिनी ने सहजपणे आपल्या खिशातून किल्ली काढली आणि बोटात धरून लॅच मधे घालून फिरवली.  दार सहजपणे आवाज न करता उघडलं गेलं. आत हॉल मधे अंधार होता.पलीकडची बेडरूम लाईट लावल्यामुळे दिसतं होती. बेड नीट लावलेला नव्हता.त्यावर एक गाऊन अस्ताव्यस्त फेकलेला दिसतं होता आणि बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता.  पाणिनी ने पुन्हा दार ओढून घेऊन लावले मिनिटभर वाट पाहून पुन्हा बेल वाजवली.
“ कोण आहे?” आतून एका स्त्रीचा आवाज आला.
“ आपण मिस कपाडिया ? ”  पाणिनी ने विचारलं.
“ होय.कोण आहे बाहेर?”
“ मी पटवर्धन म्हणून आहे. वकील आहे तुमच्याशी बोलायचंय.”
“ एक मिनिट थांबा.” ती म्हणाली काही क्षणानंतर दार हळूवारपणे उघडलं गेलं. एकच फट पडली आणि त्यातून सावधपणे एक चेहेरा डोकावला. प्रसन्न हसरा चेहेरा.
“ माझं आवरायचं आहे अजून.तुम्हाला थांबावं लागेल जरा,किंवा मग तुम्ही बाहेर जाऊन थोड्या वेळाने पुन्हा या.”
“ मी थांबतो.” पाणिनी म्हणाला
“ मी ओळखत नाही तुम्हाला. पटवर्धन म्हणजे.... वकील आहे असं म्हणालात.. तुम्ही पाणिनी पटवर्धन तर नाही?” मिस कपाडिया ने विचारलं.
“ बरोबर आहे तुमचा अंदाज ”
“ ओह ! प्लीज आत या आणि आरामात बसा. मी आलेच.” ती म्हणाली आणि दार उघडून पाणिनी ला आत बोलावले. पाणिनी आत येई पर्यंत ती पटकन आतल्या खोलीत गेली सुध्दा.पाणिनी ने पाहिले हॉल मधले फर्निचर म्हणजे नवे – जुने यांचे मिश्रण होते.सहज उठून त्याने हॉल मधे चालता चालता ते सर्व नजरेखालून घातलं.पत्रात उल्लेख केल्यानुसार कोपऱ्यात टेबल होतं. त्या टेबलच्या वर एक रॅक होतं.पाणिनी ने सहज तिथपर्यंत जाऊन त्याची मूठ धरून दार ओढून बघितलं, ते घट्ट बंद होतं. तब्बल पाच मिनिटांनी मायरा कपाडिया छान पोषाख घालून हजर झाली.येताना हातात  गरमा गरम कॉफी चे दोन कप  घेऊन आली.
“ छान अपार्टमेंट आहे तुमचं. आणि फर्निचर सुध्दा.” कॉफी पिता पिता उठून  टेबला वर ठेवलेल्या कॉम्प्युटर जवळ जात जात पाणिनी म्हणाला.
“ थँक्स. मला हवं तसंच आहे घर.मोठ्ठ. खाली खाजगी गॅरेज वजा पार्किंग आहे.” मायरा कपाडिया
 म्हणाली.
“ अरे वा ,तुमच्याकडे प्रिंटर पण दिसतोय कॉम्प्यूटर ला जोडलेला. ” पाणिनी म्हणाला
“ होय.मी कधी कधी  बरंच काम करते त्यावर आणि मला ते छापायची गरज पडते त्यामुळे प्रिंटर पण घेतलाय.”
“ प्रिंटर पाहून मला आठवण झाली की मला एक पत्र तातडीने तयार करायचं आहे. मी वापरू का जरा मशीन? ”  पाणिनी ने विचारलं.
“ जरूर. का नाही,मिस्टर पटवर्धन? तुम्ही तुमचं काम करेपर्यंत मी आम्लेट बनवून आणते.मग आपण बोलू.” मायरा कपाडिया म्हणाली. मनाने ती अत्यंत मोकळी आणि निर्मळ वाटली.कोणाशीही मैत्री करायला उत्सुक अशी.ती आत गेली आणि पाणिनी ने तिच्या कॉम्प्यूटर वर एका काल्पनिक प्रकरणाचे  संदर्भात काही पत्रांचे मसुदे छापले. प्रिंटर वर त्याच्या प्रिंट घेण्यासाठी कागद आत टाकायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दोन प्रकारचे कागद तिथे ठेवले होते.ए- फोर आकाराचे पांढरे आणि किंचित गुलाबीसर छटा असलेले दुसरे. त्याला आलेले पत्र अशाच गुलाबीसर कागदावर  छापलेलं होतं! आणि प्रिंटर वरच्या अक्षरांचा फॉंन्ट पण तसाच होता. तेवढ्यात मायरा कपाडिया आम्लेट घेऊन आली.
“ बोला पटवर्धन सर, तुमच्या सारख्या प्रसिद्ध वकीलाला सकाळी सकाळी माझ्याकडे का यावसं वाटलं? माझी काही चूक झाल्ये का? ”
“ परवाच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला दुपारी तुम्ही कुठे होतात?”  पाणिनी ने विचारलं.
“ काय भानगड आहे ही? चेष्टा करताय माझी? की गंभीर पणे विचारताय?”
“ खरंच गंभीर आहे मी.” पाणिनी म्हणाला
“ जरा आठवू दे मला.ओह! नाही सांगता येणार मला.”
“ तुम्ही डायरी ठेवता का?”  पाणिनी ने विचारलं.
“ अहो एवढी जुनाट आणि वयस्कर वाटले का मी तुम्हाला? आठवणीसाठी लिहून काढायला?”
“ तुम्हाला थेट विचारतो मी आता. त्या दिवशी तुम्ही द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक यांना जोडणाऱ्या रस्त्यावर  होतात का?”
“ मला नाही वाटत मी त्या रस्त्याला गेले असेन त्या दिवशी.”
“ मला असं समजलंय की तुम्ही त्या दिवशी एका माणसाबरोबर तुमच्या गाडीत त्या ठिकाणी होता. तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणून बदलण्याचं काम तुम्ही करत होतात आणि तुमच्या समोरच फोक्स व्हॅगन ने सिटी होंडा ला धडक दिली, तुम्ही तुमच्या डायरीत त्या गाडीचा नंबर टिपून ठेवलाय. ” पाणिनी म्हणाला
पाणिनी बोलत असतांना ती सतत नकारार्थी मान हलवत होती. “ पटवर्धन, मला आठवत नाही त्या तारखेला मी त्या ठिकाणी होते वा नाही, पण मला हे नक्की माहित्ये की मी कोणताही अपघात पाहिलेला नाही गेल्या काही महिन्यात. आणि टायर पंक्चर झालेल्या कुठल्याच गाडीत मी बसले नव्हते. अशा गोष्टी माणूस विसरणार नाही.बरोबर आहे ना पटवर्धन?” मायरा म्हणाली.
“ बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.”
“ तुम्हाला का एवढा रस आहे त्यात?”
“ ज्या गाडीला म्हणजे सिटी होंडाला धडक बसली त्या गाडीतील माणसाचं मी वकील म्हणून प्रतिनिधित्व करतोय. पियुष पेंढारकर नावाच्या माणसाचे खुब्याचे हाड मोडलंय.केवळ बावीस वर्षांचा मुलगा आहे तो !” पाणिनी म्हणाला
“ अरेरे एवढया तरुणपणी अशा यातना भोगायला लागणे या सारखं दुर्दैव नाही.” आपल्या हातातील आम्लेट तिने पाणिनी ला वाढलं. “ मी तुमची मोठी चाहती आहे पटवर्धन.तुमची लढाऊ वृत्ती, हुशारी मला फार आवडते.तुमचे बरेच खटले पेपरातून वाचलेत मी.”
“ तुम्ही तीन तारखेच्या दुपारी कुठे होता हे तुम्हाला आठवायचा काही मार्ग आहे का? कधी आठवेल तुम्हाला हे?”  पाणिनी ने विचारलं.
“ पटवर्धन, तुमच्या सारखी प्रसिद्ध व्यक्ती माझ्या समोर बसून खाते आहे, हा प्रसंग मला विसरायचा नाहीये.प्लीज मला अत्ता काहीही वेगळे आठवायला लावू नका. मी नक्की सांगेन तुम्हाला तासा-दोन तासात.” मायरा म्हणाली.
“  मी तुम्हाला फोन करू की तुम्ही कराल? ”  पाणिनी ने विचारलं.
“ मी करीन तुम्हाला.पटवर्धन, मी इतकी भटकत असते ना रोज, की मी कधी कुठे होते एखाद्या दिवशी हे लक्षात रहात नाही. अगदी काल-परवा सुध्दा कुठे गेले टे नाही लक्षात रहात, म्हणजे मी ते ठेवायचा प्रयत्नही करत नाही पटवर्धन. कारण मी भटकंती आनंदासाठी करते.”
“ मला वाटतं, तुम्ही कुठे नोकरी वगैरे करत नसणार.” पाणिनी म्हणाला
“ मला पुरेसा पैसा मिळतोय त्यासाठी.”
“ पोटगी?”  पाणिनी ने विचारलं.
तिने अचानक त्याच्या नजरेवरून नजर हटवली. “ काही अडचण आहे तुम्हाला त्यात?” तिने विचारलं.
“ काहीच नाही.”
“ तुम्ही तुमच्या अशीलासाठी ज्या प्रकरणाचा शोध घेताय, त्यात या गोष्टीमुळे फरक पडणार आहे?” मायरा ने विचारलं.
“थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या खाजगी गोष्टीत मी का नाक खुपसावं? ” पाणिनी ने विचारलं. आणि जोरात हसला.
“ पटवर्धन मी तीन तारखेला तुम्ही म्हणता त्या चौकात कुठलाच अपघात पाहिलेला नाही.”
“ तुमची गाडी आहे?”
“ आहे.सिटी होंडा आहे.”
“ तुमची पण सिटी होंडाच आहे? कुठल्या रंगाची आहे.?”  पाणिनी ने विचारलं.
“ तुमची पण म्हणजे?”
“ ज्या गाडीला फॉक्स व्हॅगन ने धडक दिली ती सिटी होंडा गाडीच आहे.” पाणिनी म्हणाला
“ माझी फिक्कट करडया रंगाची आहे.”—मायरा
“ अर्थात गाडी कोणती हा मुद्दा गौण आहे, मुख्य मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही त्या वेळी, म्हणजे अपघाताच्या वेळी कुठे होतात.”
“ तुम्ही नेमके इथे, माझ्याकडेच कसे काय आलात पटवर्धन?”-मायरा
“ मला माहिती कुठून मिळाली त्याचा स्त्रोत मी नाही देऊ शकणार तुम्हाला परंतू मला देण्यात आलेलं वर्णन तुमच्याशी जुळतंय.” पाणिनी म्हणाला
“ माझं नाव सांगणाऱ्याचे नाव तुम्ही मला नाही सांगू शकत?”
“ सॉरी. नाही.” पाणिनी म्हणाला
“ तुमचा दैवावर विश्वास आहे?” अचानक तिने वेगळंच प्रश्न विचारला.
“ अर्थात आहे. का? असं का विचारलंत?”  पाणिनी ने विचारलं.
“ मला माझ्या एका कामासाठी वकिलाची गरज आहे म्हणून मी वकिलाच्या शोधातच होते आणि तुम्ही नेमके दारात हजर झालात.”
“ सॉरी, मी नवीन काम नाही स्वीकारू शकत, आधीच खूप ताण आहे कामाचा.” पाणिनी म्हणाला
“ पण मग तुम्ही ही अपघाताची केस तर दोन दिवसापूर्वीच स्वीकारलीत की ! ”
“ याची गोष्ट वेगळी आहे.त्यात आणिबाणी निर्माण झाल्यासारखी स्थिती होती, आणि मुख्य म्हणजे मला ती केस एकदम भावली.”
“ माझ्याही केस मधे तुम्हाला रस वाटेल पटवर्धन.”
“ माफ कर मला नाही मदत करता येणार, आधीच सावध करतोय.” पाणिनी म्हणाला
“ तरी तुम्हाला सांगायचं ठरवलंय मी. माझी दोन लग्न झाली आहेत.पाहिलं लग्न म्हणजे केवळ दुदैर्वी ठरलं. दुसऱ्या बाबत मी अधिक काळजी घेतली.”-मायरा म्हणाली.
“ आणि सगळ नीट झालं?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही ना पटवर्धन.पाहिलं लग्न झालं तेव्हाच मी ठरवलं होत की पुन्हा त्या नादाला लागायचं नाही.पण माझ्या जीवनात तो आला, श्रीमंत होता.आणि मी लग्न केलं पुन्हा.”
“ आणि ते पुन्हा तुटलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ पण तुम्हाला पोटगी मिळाली? किती?”
“ दरमहा पस्तीस हजार. ”
पाणिनी ने एकदम शीळ वाजवली. “ बराच श्रीमंत दिसतोय तो.”
“ आणि आता तो पुन्हा कोर्टात जाऊन ती रक्कम कमी करून घ्यायच्या खटपटीत आहे.” मायरा म्हणाली.
“ त्यात त्याचा दोष नाही वाटत मला कारण माझ्या मतानुसार पस्तीस हजार ही रक्कमच मोठी आहे मुळात.तुम्ही किती वर्षं संसार केलात त्याच्या बरोबर?”  पाणिनी ने विचारलं.
“ पाच वर्षं. मला वाटत तुम्ही त्याच्याशी बोलावं आणि.....”
पाणिनी ने मानेनेच नकार दिला. “ नैतिक दृष्ट्या मला काहीही अधिकार नाहीये त्याच्याशी बोलायचा. त्याचे वकील असतील ना ?”
“ नाही.त्याचे कोणीच वकील नाहीयेत.”
“ म्हणजे? त्याचे केस तोच लढतो कोर्टात?”  पाणिनी ने विचारलं.
“ म्हणजे सुरुवातीला अर्ज वकिलानेच सादर केला सहा महिन्यापूर्वी पण न्यायाधीशांनी तो नाकारला. त्यामुळे नंतर माझ्या नवऱ्याने म्हणजे कैवल्य कपाडिया ने आपली आपणच केस लढायचा निर्णय घेतला. ”
“तरी सुध्दा तो कुठल्यातरी वकीलाला देऊनच विषय संपवेल ” पाणिनी म्हणाला
“ मला वाटत नाही तसं कारण भयंकर हट्टी आहे तो.एकदा त्याने ठरवलं की स्वतःच खटला चालवायचा की तो ते करणारच.मला तर त्याची भीतीच वाटते कोर्टात.म्हणजे एखाद्या वकिलाची वाटत नाही एवढी त्याची वाटते.”
“ मी कौटुंबिक प्रकरणे स्वीकारत नाही. ” पाणिनी म्हणाला
“ तरी माझं जरा ऐकून घाल का दोन मिनिटं प्लीज?”—मायरा ने विचारलं.
“ ठीक आहे.” नाईलाजाने सोफ्यावर आरामात बसत पाणिनी म्हणाला
“ मला पुन्हा लग्न करायचंय पटवर्धन सर, आणि मला खात्री आहे यावेळी सर्व काही सुरळीत होणार आहे.मी निवडलेला हा माणूस वयाने मोठा आहे,सूज्ञ आहे.समजूतदार आहे.इतरांबद्दल माझ्या ज्या भावना होत्या त्यापेक्षा याच्या बद्दल वेगळ्या आहेत.”
“ ज्या क्षणी तुझं लग्न होईल, त्याच क्षणी तुला मिळणारी पोटगी बंद होईल.”
“पण मला माझ्या उत्पन्नाचं साधन बंद करायचं नाहीये.दरमहा ३५००० देण्यापेक्षा मला एकरकमी १० लाख देऊन टाकावेत आणि दरमहिना देत असलेली पोटगी बंद करावी अशी माझी इच्छा आहे.त्याने असं केलं की मी लग्न करायला मोकळी झाले.” मायरा म्हणाली.
“ आणि तुझ्या वतीने हे डील मी जमवून द्यावं असं तुझं म्हणणं आहे?”
“ तुम्हाला मी कारस्थानी मुलगी वाटेल कदाचित,पण मला माझं भविष्य सुरक्षित करायचंय”
“ तुझ्या या नव्या नवऱ्याचे नाव काय आहे?”  पाणिनी ने विचारलं.
“ परितोष हिराळकर ”
“ त्याच्या लक्षात आलं की तुला त्याच्याशी लग्न तर करायचंय पण तुझ्या आधीच्या नवऱ्याकडून मिळणारे पोटगी स्वरूपातलं उत्पन्न तुला सोडायचं नाहीये?”  पाणिनी ने विचारलं.
“ तुम्ही म्हणता तसा विचार त्याने नाही केला,पटवर्धन.त्याने एक ट्रस्ट करून माझ्यासाठी त्यात एक रक्कम टाकली आहे, जी आमच्या लग्नानंतर माझी होईल अशी तरतूद आहे.शिवाय माझ्या नावाने मोठा विमा उतरवला आहे. लग्नानंतरच्या कौटुंबिक खर्चा साठी  दरमहा एक लाख तो मला देणार आहे.आणि लग्नाच्या दिवशी एक भपकेबाज गाडी भेट देणार आहे. ” मायरा म्हणाली.
“ आणखी काय हवयं तुला?  भगवानाने  छप्पर फाड कर दिया है ! ” पाणिनी म्हणाला
“ मला परितोष हिराळकर चं प्रेम हवंय. ज्या क्षणी माझा  नवरा पोटगी कमी करण्याची मागणी करेल तेव्हा हिराळकर काही बोलणार नाही पण त्याला नक्की वाटेल की माझं उत्पन्न कमी होतंय म्हणून मी हिराळकर ला गटवायचा प्रयत्न केला.यामुळे त्याच्या माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाईल. ते मला होऊन द्यायचं नाहीये.”
“ कधी करणार आहात लग्न? जरा घाई का नाही करत?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्यात जरा अडचण आहे. परितोष हिराळकर चं आधी लग्न झालंय आणि त्याचा घटस्फोट मिळायला तांत्रिक अडचणी आहेत. पटवर्धन, तुम्ही कैवल्य कपाडिया शी जाऊन बोलाल का? प्लीज? पण त्याला जरासुद्धा संशय येऊन देऊ नका की मी कुणाशी लग्न करणार आहे.”
“ तो परितोष हिराळकर ला ओळखतो?”
“ अगदी चांगले ओळखतात ते एकमेकांना. एकाच क्लब चे ते मेम्बर आहेत. कैवल्य ला जर कळलं की मी परितोष शी लग्न करत्ये तर तो प्रचंड जळेल.तो त्याचा मोठा स्वभाव दोष आहे.त्यामुळेच आमचं लग्न टिकलं नाही.माझ्या त्यापूर्वीच्या नवऱ्यावर पण तो असाच जळत असे.त्याला कायमच संशय यायचा की मी अजूनही आधीच्या नवऱ्याची काळजी करते म्हणून. ” मायरा म्हणाली.
“ तुमचा आधीचा नवरा हयात आहे? ”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तुम्ही त्याला एवढ्यात भेटलाय?”  पाणिनी ने विचारलं.
“ हा प्रश्न का विचारताय तुम्ही मला?”
“ मलाच नाही सांगता येणार.अत्ता तरी मी फक्त माहिती गोळा करतोय.” पाणिनी म्हणाला
“ पण तेच कशासाठी?” मायरा ने विचारलं.
“ खूप हुशार आणि कल्पक आहेस तू.पण मला तुझ्या प्रकरणात नाहीये रस. पण मी हे मान्य करतो की  या प्रकरणात मला आकर्षित करून घ्यायचा तुझा जगावेगळा प्रयत्न आवडला.”पाणिनी म्हणाला
“ जगावेगळा प्रयत्न? माझा?”-मायरा ने विचारलं.
“ हो.बघ ना, तू कनक ओजस ने दिलेली पेपर मधील जाहिरात पाहिलीस.कुठून तरी तुला समजलं की मी पेंढारकर चं प्रतिनिधित्व करतोय.तुला वाटलं की आपण जर पाणिनी पटवर्धन ना काहीतरी करून इथे आणू शकलो आणि त्याला अडचणीत आणू शकलो,......” 
“ थांबा,थांबा, चुकीचं बोलताय तुम्ही. कुठल्या जाहिरातीबद्दल तुम्ही बोलताय ते सुध्दा मला माहीत नाहीये.तुम्हाला अडचणीत आणायचं मला कारणच काय? तुम्ही इथे स्वतःहून आलाय, मला तुमच्या येण्याचे कारण सुध्दा माहीत नाहीये. असो, पटवर्धन सर, मी कोण आहे असं तुम्हाला वाटतंय?” मायरा ने विचारलं.
“ खरंच, कोण आहेस तू?”  पाणिनी ने विचारलं.
“ मी प्रेमात बुडालेली आणि फसवली गेलेली एक हताश तरुणी आहे.मला मिळणारी पोटगी मला कमी होऊन द्यायची नाहीये.तुम्ही केवळ माझ्या बाजूने आहात एवढं जरी माझ्या पूर्वीच्या नवऱ्याला समजलं तरी त्याची गाळण उडेल.” मायरा म्हणाली.
पाणिनी उठून उभा राहिला. “ सॉरी,मायरा, माझा विश्वास बसत नाहीये तू म्हणतेस त्यावर आणि मला वेळही नाहीये. मला वाटत की तुझ्या या घरी आज दोन ते पाच या दरम्यान आलो असतो तर मला कदाचित तुझी केस घेणं भाग पडलं असतं. छान कॉफी पाजल्याबद्द्ल धन्यवाद.” पाणिनी म्हणाला आणि उठून बाहेर जायला वळला, दारापर्यंत पोचून दार उघडल्यावर म्हणाला, “ आणि मायरा, परवा तू नेमकी कुठे होतीस अपघात झाला तेव्हा हे तुला आठवत नसल्याचा अभिनय हा फारसा चांगला वठला नाही. दुसरा कुठलातरी वकील गाठ आणि त्याच्यासमोर चांगला अभिनय कर.म्हणजे कदाचित तो गळाला लागेल.” पाणिनी पटवर्धन उद्गारला आणि दार लावून बाहेर पडला.मायरा चा रागाने लाल झालेला चेहेरा त्याला तो पाठमोरा असल्याने दिसला नाही..
प्रकरण २ समाप्त.