Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 16



 

सावध प्रकरण १६

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पाणिनी आपल्या टेबलवर वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचत होता.

‘ वकिलाच्या हाताचे ठसे खुनी हत्यारावर सापडले.खुलासा करण्यास वकिलाचा नकार. स्त्री अशिलाला पोलिसांनी खुनाच्या आरोपात पकडले. वकिलाने किल्ली वापरून अशिलाच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याचे निष्पन्न.’

“ सर तुम्ही तारकरला त्या पत्राची आणि किल्लीची माहिती द्यायला नको होती.” सौम्या म्हणाली.

“ तो एकमेव मार्ग होतं माझ्याकडे, मायरा ला सांगण्याचा,की मला तिला काय टिप द्यायची होती ते.” पाणिनी म्हणाला

“ मला नाही समजलं.” –सौम्या.

“ समज मायरा ने नाही तर वेगळ्याच कोणीतरी ती दोन्ही पत्रे लिहिली असतील आणि किल्ली पाठवली असेल तर? मायरा ने पाठवली असेल किल्ली तर मी तिच्या परवानगीनेच अपार्टमेंटमध्ये शिरलो असे होईल पण दुसऱ्याने किल्ली पाठवली असेल तर? माझ्यावर चोरीचा आरोप येऊ शकतो.म्हणून मला तिच्या मनात अशी कल्पना घुसवायची होती की दुसऱ्याच कोणीतरी टेबलाच्या ड्रॉवर ची किल्ली पाठवली होती मला.आणि त्या ड्रॉवर मधे रिव्हॉल्व्हर होतं. असं केल्यामुळे मी तारकरच्या डोक्यात भुंगा सोडला हे नक्की.” पाणिनी म्हणाला

“ मायरा ला हे समजलं असेल का पण?” –सौम्या

“ कोण जाणे.” पाणिनी म्हणाला तेवढ्यात कनक ने दार ठोठावलं आणि आत आला.

“ तू त्या रुद्रांश गडकरी ला ओळखू द्यायला मज्जाव का केलास पाणिनी?” हातातल्या पेपरातली बातमी दाखवत कनक ने विचारलं. “ तू किती टाळणार त्याला? केव्हातरी तू बाहेर जाणारच ,तो तुला उभा असताना,चालताना बघणारच. आता पेपरात बातमी आल्यामुळे त्याचं आता तुझ्याबद्दल मत वाईट झालं असणार. म्हणजे तुझ्या ऑफिसात त्याने तुझी ओळख पटवली असती तर कदाचित त्याला संशयाला थोडीतरी जागा राहिली असती आता ती संधी गेली. ”

“ तू आता तारकर सारखच बोलायला लागलास कनक.” पाणिनी म्हणाला “ हिराळकर ची माहिती आली का? कसा आहे तो?”

“ चाळीस पंचेचाळीशीचा, उंच असा आहे, जाड भुवया आहेत.त्याचा फोटो मिळवतोय मी लौकरच.”-कनक

“ आपल्या प्रकारणात आणखी एक उंच माणूस आहे रुद्रांश गडकरी ने त्यालाच पाहिलं असणार.

दुग्गल, ज्याने बँकेतून पैसे काढून परब ला दिले, तो कसा आहे शरीरयष्टीने?” पाणिनी ने विचारलं.

“ तो तीस पस्तीस वयाचा आहे. मध्यम उंच.जाडसर.” –कनक

“ ठीक आहे तात्पुरता आपण त्याचा विषय बाजूला ठेऊ.पण रुद्रांश गडकरी ने या हिराळकर ला बघणे आवश्यक आहे.”

“ हा महत्वाचा मुद्दा आहे पाणिनी.तो हिराळकर होता?” –कनक

पाणिनी गप्प राहिला.

“ दुग्गल चं काय कनक ? पोलिसांनी शोधून काढलं त्याला? पैशाबद्दल काय म्हणतो तो?” पाणिनी ने विचारलं.

“तो आणि हिराळकर भागीदारीत धंदा करतात हे नक्की.सोमवारी ते दोघे बाहेरगावी गेले होते कामासाठी.नेमके कुठे गेले ते गुलदस्त्यातच आहे. ”-कनक

“ हा गुरुवार आहे सहा तारीख. ते सोमवारी गेले त्यांच्या हातात तीन दिवस होते कनक सोमवारी रात्री ते किती वाजता गेले असतील?”

“बहुतेक संध्याकाळी सहा वाजता कारण हिराळकरच्या स्वयंपाक्याने साडेचार वाजता घर सोडलं काम संपवून. त्यानंतर हिराळकर दुग्गल येण्याची वाट बघत होता तो सहा वाजता बाहेर जाणार होता. वेळेबाबत मी खात्री देतो कारण हिराळकर च्या स्वयंपाक्याने हिराळकर फोनवर दुग्गल शी बोलत असताना ऐकलं. तो सांगत होता की अगदी सहाच्या ठोक्याला तो बाहेर पडणार आहे आणि हिराळकर वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होता. इथून उठून जायला दुग्गल ला तासाभरापेक्षा थोडा जास्त वेळ लागला असता.” कनक म्हणाला

“कनक मला या इमारतीतून बाहेर पडायला लागणारे कुणालाही न दिसता” –पाणिनी

“तुला ते करता येणे अवघड आहे हा रुद्रांश गडकरी नावाच्या साक्षीदाराला त्यानं गाडीत बसवून ठेवलय. तुझी वाट बघत” कनक म्हणाला

“कनक मला सांग या इमारतीत २४ तास उघडं असलेलं तुझं एकमेव ऑफिस आहे ना?”

“हो त्याचं काय?”

“ मी खाली येणारे आणि तुझ्याबरोबर बाहेर पडणारे”

“मला समजलं नाही तुझ्या डोक्यात काय आहे?” –कनक

“आपण हे ऑफिस आता बंद करणार आहोत तुझं ऑफिस आणि माझं ऑफिस याच्यामध्ये आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही ना याची सौम्या खात्री करेल नंतर मी तुझ्या ऑफिसमध्ये जाईन मग माझं ऑफिस बंद करून सौम्या तिच्या घरी जाईल ती घरी जायला निघेल तेव्हा साहजिकच पत्रकार तिला वाटेत अडवतील आणि चौकशी करतील. ती फक्त त्यांच्याकडे बघून हसेल आणि एवढेच सांगेल की अर्ध्या तासापूर्वीच पाणिनी पटवर्धन इथून बाहेर पडलेत जाताना त्यांनी अशी व्यवस्था केली की ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत आणि त्यांना या खटल्याचं काम कोणताही अडथळा न येता करता येईल ”. पाणिनी म्हणाला

“तुला वाटतं तिच्या शब्दावर ते विश्वास ठेवतील?”—कनक

“नाही ठेवणार विश्वास. ते इथे वर येतील बघायला तेव्हा त्यांना दिसेल की आपला ऑफिस बंद आहे आत मध्ये अंधार आहे”.पाणिनी म्हणाला

“आणि त्याना समाधान वाटेल की तू आतच आहेस.” कनक म्हणाला

“त्याना नक्कीच तसं वाटेल व त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकून जाईल ते आपल्या लिफ्ट मन ला विचारतील तो सांगेल की पटवर्धन बाहेर पडले नाहीत. इथे झाडलोट करणारी कामवाली बाई जेव्हा येईल तेव्हा हे पत्रकार आणि फोटोग्राफर आत मध्ये जातील. अर्थात ते बेकायदेशीर असेल पण ते नक्की करतील त्यांना आपले फोटो घ्यायचे असतील मुलाखती घ्यायच्या असतील.” पाणिनी म्हणाला

“अरे पण त्यांना तुझी आणि माझी मैत्री माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल की तू माझ्या ऑफिसमध्ये असशील म्हणून” कनक म्हणाला

“मी त्यांना असं भासवीन की मी इमारतीच्या बेसमेंट मधून बाहेर पडलो” पाणिनी म्हणाला

“असं कसं भासवशील तू?”कनक नं विचारलं.

“या ठिकाणी तुझी भूमिका सुरू होईल. एक प्रचंड मोठा खोका म्हणजे कंटेनर एका ट्रकमध्ये चढवण्याचे काम तू आणि तुझी माणसं करतील आणि हा मोठा खोका मी ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या गॅरेजमध्ये तू हलवशील. हा खोका खूप जड असेल आणि त्याला आत मध्ये हवा आरपार जाण्यासाठी काही भोकं पाडलेली असतील तुझा एखादा खास माणूस, ज्याच्यावर तू पूर्ण भरोसा ठेवू शकतोस, तो माणूस ट्रक बरोबरच माझ्या अपार्टमेंट मध्ये गॅरेज पर्यंत जाईल आणि तिथे खोका उतरवून घ्यायची व्यवस्था करेल. खोका उतरून घेतल्यानंतर तो खोका उघडायची जबाबदारी देखील तोच घेईल तोपर्यंत वर्तमानपत्राचे पत्रकार आणि फोटोग्राफर तिथे आलेली असतील आणि त्यांच्या लक्षात येईल की तो खोका पूर्ण रिकामा आहे.” पाणिनी म्हणाला

“पण समजा खोका हलवताना त्याला संशय आला आणि त्यांनी तो खोका उघडून बघितला तर?” .कनक नं विचारलं

“त्यांनी उघडून बघितला तर आपण दुसरी काहीतरी शक्कल लढवू. पण त्यांनी नाही उघडून बघितला तर त्यांच्या मनात नक्कीच संशय येईल की मी त्या खोक्यातूनच माझ्या अपार्टमेंट पर्यंत पोहोचलो.” पाणिनी म्हणाला

“मला नाही वाटत की या सगळ्याचा तुला फारसा उपयोग होईल या सगळ्याचा परिणाम म्हणून तुझ्यावर जास्त संशय लागेल त्यानंतर वर्तमानपत्र वाले तुझ्याबद्दल काय छापून आणतील विचार कर म्हणजे आता आहे त्यापेक्षा वाईट पुरावा तू स्वतः विरुद्ध निर्माण करून घेशील कारण तूच नेहमी म्हणतोस ना पळून जाणं हा गुन्हा केल्याचा पुरावा असतो म्हणून?” कनक नं विचारलं

“बरोबरच आहे ते ” पाणिनी म्हणाला

“हे सगळं करून तू तारकर च्या हातात आयता सापडणार आहेस तू माझ्या ऑफिसमध्ये फार काळ राहू शकत नाहीस.”कनक म्हणाला

“ते माहिती मला. सौम्या बाहेर जाऊन बघ कोणी आहे का.” –पाणिनी

सौम्यान बाहेर जाऊन बघितलं

" बाहेर कोणीही नाही सर" ती म्हणाली

" चला तर मग कनक महाशय तुमच्याकडे पाणिनी पटवर्धन नावाचे पाहुणे येणार आहेत " पाणिनी म्हणाला

(प्रकरण १६ समाप्त)