Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 13

 

सावध प्रकरण १३

पाणिनीची हाताची बोटे वाळायच्या आधीच रिसेप्शन आत आली “पटवर्धन साहेब, बाहेर आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी वैशाख इंगळे आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे”

“सौम्या त्यांना आत घेऊन ये.”

दोघेही आत आले वैशाख इंगळेने पाणिनीशी हस्तांदोलन केले पाणिनीने दोघांना खुर्चीत बसा म्हणून सांगितलं

“मिस्टर तोंडवळकर तुमची हरकत नसेल तर बोलण्याचं काम मी करतो तुम्ही बोलू नका” वैशाख तोंडवळकर ला म्हणाला

“माझी काही हरकत नाही” तोंडवळकर म्हणाला

“मिस्टर पटवर्धन मला वाटतं तुम्ही पण बोलायला इच्छुक आहात” 

“नक्कीच” पाणिनी म्हणाला

“तुम्हीच आधी विषय काढला तर बरं होईल मिस्टर पटवर्धन” वैशाख इंगळे म्हणाला

“मिस्टर वैशाख इंगळे शेवटी पैसा बोलतो हेच खरं”

“मला मान्य आहे मिस्टर पटवर्धन, थेट विषयाला हात घाला”

“विषय असा आहे मिस्टर वैशाख गाडीतल्या त्या मुलाला फार गंभीर दुखापत झाली. त्याचे खुब्याचं हाड मोडलं मला वैद्यकीय खर्चासाठी म्हणून दोन लाख रुपये शिवाय नुकसान भरपाई म्हणून साडेतीन लाख रुपये आणि वकिलाची फी म्हणून म्हणजे माझी फी म्हणून वेगळे दीड लाख रुपये पाहिजेत. याशिवाय त्याच्या आईला जो मानसिक धक्का बसलाय त्यासाठी दीड लाख रुपये गाडीच्या झालेल्या नुकसानीसाठी एक लाख रुपये अशी एकूण रक्कम. साडेनऊ लाख एवढी होते यापैकी मिस्टर तोंडवळकरने माझ्याकडे एक चेक आधीच देऊन ठेवलेला आहे त्यामुळे उरलेल्या रकमेचा चेक मला तुमच्या विमा कंपनीने द्यावा.”

वैशाख कुत्सितपणे हसला. “मिस्टर पटवर्धन मी समजू शकतो की तुम्हाला हे सगळं हवंय पण शेवटी विमा कंपनीच्या ही काही जबाबदारी आहेत आम्ही वाटेल तेवढी रक्कम खर्च नाही करू शकत आम्हाला आमच्या सभासदांना उत्तरे द्यावी लागतात. अर्थात अपघात झाला ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे हे मी मान्य करतो पण आपण या सगळ्याकडे प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून बघूया अपघातात सापडलेला हा मुलगा किती कमाई करत होता या मुलाच्या जागी तुम्ही जर अपघातात सापडला असतात तर तुमची कमाई खूप मोठी असल्यामुळे अर्थातच आमची आर्थिक जबाबदारी वाढली असती.” वैशाख म्हणाला

"आता अपघातात सापडलेला मुलगा हा अगदी तरुण असल्यामुळे माझ्या दृष्टीने एक लाख एवढी नुकसान भरपाई पुरेशी आहे त्याच्या एकंदरीत दुखापतीचे स्वरूप बघता तीन महिन्यांमध्ये तो पुन्हा आपल्या कामावर हजर राहू शकेल असं मला वाटतं "

"हे बघा मिस्टर वैशाख इंगळे, अशा सगळ्या बतावण्या मी यापूर्वी विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून अनेक वेळा ऐकलेले आहेत,"

“मान्य आहे मला. तुम्ही अशा अनेक केसेस हाताळल्या असतील”

“मला ते पुन्हा तुमच्याकडून ऐकायचं नाहीये.””

हे बघा मिस्टर पटवर्धन तुमचा शब्द या प्रकरणात निर्णायक असणार नाहीये याची कृपया जाणीव ठेवा”

"माझाच शब्द निर्णायक असणार आहे तुम्हीच लक्षात ठेवा" पाणिनी म्हणाला

वातावरणातला तणाव वाढत जातोय हे लक्षात येतात तोंडवळकर थोडासा खाकरला.

“ मिस्टर इंगळे, शेवटी असं आहे,या केस मधे घटनाच अशा....” तोंडवळकर बोलायचा प्रयत्न करत म्हणाला पण इंगळेने मधेच त्याला तोडलं, “ आपण फक्त गाडीच्या नुकसान भरपाई बद्दल बोलू.”

“ पण त्या व्यतिरिक्त माझ्यावर काय येऊ शकते?” तोंडवळकर ने विचारलं.

“ एखादा तुमच्यावर क्रिमिनल करू शकतो.अत्ताच कसं सांगणार?” पाणिनी म्हणाला

“ हे पहा पटवर्धन, विमा कंपनी क्रिमिनल बद्दल विचार करणार नाही.” इंगळे म्हणाला.

“ पण परिस्थितीचा तर विचार करेल की नाही?” पाणिनी ने विचारलं.

“ कसली परिस्थिती?”

“ कोर्टात प्रकरण गेले तर न्यायाधीश काय विचार करतील याचा.” पाणिनी म्हणाला

तोंडवळकर एकदम नर्व्हस झाला. “ पटवर्धन, मला आणि इंगळेला जरा खाजगीत बोलायचं आहे.” तो म्हणाला.

“ सौम्या, त्यांना आपल्या लायब्ररीत घेऊन जा.” पाणिनी म्हणाला

सौम्या त्यांना लायब्ररीत घेऊन गेली. आल्यावर तिने पाणिनी ला विचारलं, “ जेव्हा त्यांना कळेल की एकाच अपघातासाठी त्यांच्या शिवाय आणखी एक व्यक्ती नुकसान भरपाई द्यायला तयार आहे, तेव्हा काय होईल?”

“ मला नाही सांगता येणार. यापूर्वी असं कधीच घडलं नाही.आपल्याला आधी या तडजोडीचा विचार करायला हवा आणि तेही लगेच निपटून टाकायला हवं.” पाणिनी म्हणाला आणि विचारत गढून सवयीने फेऱ्या मारायला लागला. थोड्याच वेळात लायब्ररीचं दार उघडलं गेलं आणि दोघेही आत आले.यावेळी मात्र तोंडवळकर ने बोलायला सुरुवात केली.

“ पटवर्धन, विमा कंपनी आणि तुमच्यातला वाद कधी मिटणार नाही. मी तुम्हाला अपेक्षित असलेली सर्व रक्कम देतो. म्हणजे या पूर्वी मी तुम्हाला चेक ने दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अत्ताच चेक ने देतो. नंतर मी विमा कंपनीशी चर्चा करून माझी रक्कम त्यांचे कडून वसूल करीन. मला तुम्ही या सर्व रकमेच्या बदल्यात या प्रकरणातून पूर्णपणे मुक्त केल्याचं पत्र द्या. म्हणजे त्यात गाडीचे झालेले नुकसान, वैयक्तिक रित्या अपघातात सापडलेल्या मुलाचे,आईचे झालेले शारीरिक व मानसिक नुकसान, या सर्वातून मला मुक्त केल्याचं पत्र पाहिजे, तसच भविष्यात माझ्यावर सिव्हील, क्रिमिनल कुठलाच दावा लागणार नाही याची लेखी खात्री हवी.”

पाणिनी ने या गोष्टी मान्य केल्या, तसे पत्र तोंडवळकर ला दिले आणि चेक ताब्यात घेतला.

“ जे काय घडलं ते मी विसरू शकत नाही, अपघाताच्या दिवशी.मला काल रात्री सुध्दा झोप लागली नाही.” तोंडवळकर म्हणाला.

“ हो , खरंच , मला पण आली नाही झोप काल रात्री. ” पाणिनी म्हणाला

“ तुम्हाला झोप न यायचं काय कारण?” इंगळेने विचारलं.

“ विमा कंपनीच्या काळजीने ” पाणिनी मिस्कील पणे म्हणाला आणि त्याने दोघांना निरोप दिला.

“ मी बँकेत जाऊन हे चेक्स भरून येऊ का?” सौम्या ने विचारलं.

“ नाही.हे काम मी करून येणार आहे. त्या निमित्ताने मला बाहेर जायला निमित्त मिळेल. म्हणजे मला जरा शांतपणे दुसऱ्या पर्यायाचा विचार करता येईल.” पाणिनी म्हणाला

तेवढ्यात फोन वाजला. सौम्या ने घेतला. “ कनक आहे. त्याला बोलायचं आहे तुमच्याशी.”

पाणिनी ने फोन घेतला.

“ पाणिनी, तुला मी उदक प्रपात कंपनीच्या मालकाबद्दल म्हणजे हसमुख बद्दल बोललो होतो आठवतंय ना? ”

“ अर्थातच.”

“ पोलिसांनी त्याला चौकीत बोलावलं. रिव्हॉल्व्हरची विक्री होतांना ज्या रजिस्टर बर सह्या कराव्या लागतात ते रजिस्टर पोलिसांनी तपासलं. हसमुख ने हिराळकर ला रिव्हॉल्व्हर विकली तेव्हा रजिस्टर वरची सही जरी हिराळकर ची वाटत असली तरी ती हिराळकर च्या नमुन्याशी जुळत नाही. ”

“ अरे बापरे ! ” पाणिनी म्हणाला

“ तुझी मायरा कपाडिया ही आदित्य कोळवणकर बरोबर फिरते हे पोलिसांनी शोधून काढलंय.त्या दोघांत नेमके संबंध काय आहेत ते अजून त्यांना माहीत नाहीत.पण जेव्हा त्यांनी आदित्य ला आणि हसमुख ला समोरासमोर आणलं तेव्हा त्याने लगेच ओळखलं की याच माणसाने रिव्हॉल्व्हर खरेदी केली म्हणून. ”

“ आदित्य चं काय म्हणणं आहे त्यावर?” पाणिनी ने विचारलं.

“ तो म्हणतो ही त्याला ओळखण्यात चूक होत आहे.” कनक म्हणाला.

“ तुला काय वाटतंय ?”

“ अजिबात चुकायची शक्यता नाही. हसमुख हा जुना मुरलेला धंदेवाईक आहे. जग बघितलंय त्याने.त्याच्याकडे येणाऱ्या बहुतेक ग्राहकांना तो ओळखतो.म्हणजे नियमित ग्राहकांना तरी.त्याने खात्रीदायक पणे आदित्य कोळवणकर ला ओळखलं आहे.पोलिसांचं त्याच्याबद्दल अनुकूल मत झालंय.” कनक म्हणाला. “ पण काय रे पाणिनी, आदित्य कोळवणकर ने रिव्हॉल्व्हर खरेदीच्या रजिस्टरवर हिराळकर चं नाव का लिहील असेल आणि त्यांची सही का केली असेल?”

“ त्याला कुणाचं तरी नाव लिहायला लागणारच होतं, त्याने विचार केला असेल की नाहीतरी मायरा कपाडिया हिराळकर शी लग्न करणारच आहे तर तिच्याकडे जी रिव्हॉल्व्हर राहणार आहे त्यावर दुसऱ्या कोणाची मालकी दाखवण्यापेक्षा, तिच्या नवऱ्याची म्हणजे हिराळकर ची असलेली बरी , असा विचार आदित्य कोळवणकर ने केलं असावा. ”

“ तू बोलतोस तेव्हा तर्काने पटण्यासारखं बोलतोस पाणिनी.”

“ आणखी काय सांगण्याजोगे?” पाणिनी ने विचारलं.

“ रिव्हॉल्व्हरतून गोळी मारताना रिव्हॉल्व्हरतून गोळीची पावडर मारणाऱ्या माणसाच्या हातावर उडतेच, तुला माहीत आहेच. ही साध्या डोळ्यांना दिसत नाही पण पॅराफिन पावडर टाकून पावडर चे अस्तित्व ओळखता येते. तर सांगायचं म्हणजे पोलिसांनी परब च्या हातावर पॅराफिन टाकून पोलिसांनी रिव्हॉल्व्हरच्या पावडरची चाचणी घेतली ” कनक म्हणाला.

“ आणि त्याच्या हातावर रिव्हॉल्व्हरतून उडालेली पावडर आढळली नाही?” पाणिनी ने विचारलं.

“ नाही.” कनक म्हणाला.

“ पण मुळात पोलिसांना संशय का आला की ही आत्महत्या नसावी?” पाणिनी ने विचारलं.

“ याचं कारण प्रेताच्या हाता शेजारी पडलेल्या रिव्हॉल्व्हरच्या अगदी खाली रक्ताचा डाग दिसला इन्स्पे.तारकरला.आता परब ने आत्महत्या केली असती तर रिव्हॉल्व्हरच्या खाली रक्ताचा डाग नसता पडला. ”

“ बरोबर आहे कनक.तारकर हुशार आहे.तर्काने बरोब्बर अंदाज करतो. बरं मला एक सांग कनक एकएक करत मला हळूहळू मोठा काही धक्का देण्याच्या प्रयत्नात नाहीयेस ना तू?” पाणिनी ने विचारलं.

“ नाही.सध्यातरी एवढेच.” कनक म्हणाला आणि फोन ठेवला.

“ काय झालं सर?” सौम्या ने विचारलं.

“ ज्या कोणी कालचा प्रकार घडवून आणलाय, सौम्या, तो मी केलेल्या कल्पनेच्या निम्म्यानेही हुशार नाहीये.जर कुंडलिनी गुप्ता आली तर तिला बक्षिसाची रक्कम दहा हजार देऊन टाक पण रोख नाही, चेकने दे.आणि तिला सांग की चेक पास झाला की मूळ चेक बँकेकडून आणून दे. ऑफिसच्या रेकॉर्ड साठी आम्हाला लागणार आहे.”

“ म्हणजे तिच्या बँकेची आपोआपच माहिती मिळेल आणि गरज लागली तर माग काढता येईल.”-सौम्या म्हणाली.

“ करेक्ट. मी जाऊन येतो बाहेरून. किल्ला लढव मी येई पर्यंत ” पाणिनी म्हणाला आणि बाहेर निघाला.

(प्रकरण १३ समाप्त.)