Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 7

 

प्रकरण ७

पाणिनी आणि सौम्या तिथून बाहेर पडले. वाटेत गाडी चालवत असताना पाणिनी सौम्याला म्हणाला, “ठीक आहे सौम्या, मी तुला वाटेत एका ठिकाणी सोडतो. तू तिथून टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये जा आणि कनक ओजसला इथे घडलेल्या सगळ्या घटनांचा तपशील सांग. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो मी आत्ता पुन्हा कीर्तीकर ला भेटायला जातोय”

“काळजी घ्या सर. या सगळ्या घटना म्हणजे एक मोठा सापळा वाटतोय मला”

“लक्षात आलय माझ्या. कोणीतरी गेम टाकतय आपल्यावर आणि मला ते शोधून काढायच कोण आहे ती व्यक्ती” पाणिनी म्हणाला

त्यानंतर दोघे एकमेकांशी फारसे बोलले नाहीत पाणिनी शांतपणे गाडी चालवत राहिला. एका विशिष्ट ठिकाणी पाणिनीने गाडी थांबवली. सौम्या गाडीतून खाली उतरली.

“ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आपल्या ऑफिसला जाते. कनकला सर्व सांगते तुम्हाला पुढच्या कामासाठी बेस्ट लक ”-सौम्या.

पाणिनी हसला. “तुझ्या शुभेच्छांची गरजच आहे मला सौम्या. आपल्याकडे दोन ड्रायव्हर आहेत जे अपघातात गुंतलेत आणि अपघात मात्र एकच आहे”

सौम्याला निरोप देता देता पाणिनी म्हणाला. सौम्याने गाडीच दार लावल्यानंतर शांतपणे गाडी चालवत तो पुन्हा कीर्तीकर च्या पत्त्यावर गेला. आता पार्किंग मध्ये कीर्तीकर ची गाडी नव्हती. पाणिनीने दारावरची बेल वाजवली त्याला काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी कंटाळून त्याने नाद सोडून दिला. पुन्हा आपल्या गाडीत बसला आणि तिथून मायरा कपाडिया च्या. पत्त्यावर आला पण आपली गाडी तिच्या घराजवळ न लावता एक चौक अलीकडेच लावली आणि चालत तिच्या अपार्टमेंट कडे निघाला. पुढच्या दारापाशी न जाता आधी तो मागील बाजूला गेला. तिथल्या गॅरेज पाशी त्याने एक नजर मारली. गॅरेजचं दार बंद होतं पण त्याला कुलूप नव्हतं आत अंधार होता त्यांने दार ढकललं. आत मध्ये गाडी नव्हती. तिथून तो बाहेर आला. सौम्याला फोन लावला “ सौम्या, मी आता मायरा च्या अपार्टमेंट मधील गॅरेज तपासलं. गॅरेजमध्ये गाडी नाहीये. बहुतेक ती गाडी घेऊन बाहेर गेली असावी. मी परत तिच्या अपार्टमेंट मध्ये जाऊन ती वही शोधणारे.”

“ मला तीच काळजी वाटत होती सर, की तुम्ही नसते उद्योग करायच्या मोहात पडाल. किती वेळ लागणार आहे तुम्हाला ही सगळी भानगड करायला?”

“फार वेळ नाही लागणार”

“ऐका सर, कीर्तीकर इथे आपल्या ऑफिसच्या वेटिंग रूममध्ये थांबलाय. प्रचंड अपसेट झाल्यासारखा दिसतोय.”

“काय होतंय त्याला? पाणिनी ने विचारलं.

“त्याची सारासार विवेक बुद्धी त्याला त्रास देते आहे असं वाटतंय”—सौम्या

“किती वेळ झाला त्याला तिथे येऊन?”

“तो म्हणतोय की तुम्ही त्याला भेटून गेल्यानंतर तो लगेच तिथून निघाला त्याला खरंच कसली तरी काळजी सतावते आहे असं वाटतंय. त्याला, तुम्हाला तातडीने भेटायचं आहे. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्याकडे गेला होतात तेव्हा त्याला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता आलं नाही.”

“का बोलता आलं नाही मोकळेपणाने? ” पाणिनी ने विचारलं.

“त्याबद्दल तो काही बोलत नाहीये”

“मला वाटतं त्याचे एकमेव कारण असणार त्याचा तो ड्रायव्हर ”

“तसं होतं तर तुम्ही तिथे असताना त्याने त्याला तिथून जायला का सांगितलं नाही?”—सौम्या

“तेच समजत नाही. त्या दोघांच्या परस्पर संबंधाबद्दल काहीतरी विचित्र प्रकार वाटतोय मला.” पाणिनी म्हणाला

“मी जेव्हा ऑफिसमध्ये आले तेव्हा गाडीत त्याचा तो स्वयंपाकी उर्फ ड्रायव्हर बसलेला होता कीर्तीकर ने खाली जाऊन पुन्हा त्याला सांगितलं की तुला थांबायची गरज नाही तू जाऊ शकतोस. मी कीर्तीकर ला सांगितलं की तुम्ही कुठे आहात मला माहित नाही आणि कधी याल तेही माहित नाही. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही येईपर्यंत मी इथेच थांबेन कितीही वेळ लागू दे.”

“ठीक आहे सौम्या. मी निघतो आधी मायरा च्या अपार्टमेंटला भेट देतो नंतर आपल्या ऑफिसला येतो तोपर्यंत तू त्याला तिथे थांबवून ठेव.” पाणिनी म्हणाला

पाणिनी तिच्याशी बोलून झाल्यानंतर मायरा च्या अपार्टमेंटच्या दारापाशी गेला. आधी दारावरची बेल वाजवली. कोणीच प्रतिसाद दिला नाही. परत त्याने कॉरिडॉर मध्ये कोणी नाही ना हे पाहिलं आणि शांतपणे आपल्या जवळची किल्ली लॅच च्या पटीत घालून लॅच फिरवलं आणि पटकन आत मध्ये प्रवेश केला. आत मध्ये दिवे लावलेले होते. पाणिनी पटकन हॉल मधल्या टेबलापाशी गेला. आणि वरचा ड्रॉवर उघडला. दोन्ही वस्तू गायब होत्या, छोटी वही आणि रिव्हॉल्व्हर. पाणिनीने वैतागून तिथून काढता पाय घेतला.. आणि बेडरूम कडे वळला पण पटकन थांबला. तो जिथे उभा होता तिथून त्याला बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा असलेला दिसत होता. उजेडाची तिरीप आजपर्यंत गेली होती. बेडरूम मधल्या बाथरूम मध्ये एक मुलगी शॉवर बाथ घेत असतांनाची आकृती झिरझिरीत पडद्यातून दिसत होती. नुकताच शॉवर बंद केलेला दिसत होता. बाथ टब शेजारी एक पांढर स्टूल ठेवलेलं होतं आणि त्यावर रिव्होल्वर ठेवलेलं होतं. पडद्यामागून एक उघडा हात रिव्हॉल्व्हर जवळ आलेला त्याने पाहिला आणि पाणिनी तिच्या दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेत चार पावलं मागे सरकला.

“ कोणी आत आहे?” त्यानं आवाज दिला.”

कोण?..... कोण आहे...? ” बाथरूम मधून आवाज आला.

“मी, अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन ”

“तुमच्या बरोबर कोण आहे की एकटेच आहात तुम्ही? ”

“एकटाच आहे मी”

“मी शॉवर घेते आहे. पण पटवर्धन तुम्ही आत कसे काय आलात?”

“मी आधी बेल वाजवली कोणी उत्तर दिलं नाही मी दरवाजा ढकलला आणि आत आलो”

“ओह, म्हणजे दरवाजा माझ्या हातून उघडा राहिला होता तर ! कधी कधी लॅच नीट लागत नाही. बसा मिस्टर पटवर्धन. अगदी आरामात घरच्यासारखं बसा. पण प्लीज बेडरूमचे दार बंद करून घ्या. मी बाथरूम मधून बाहेर येणारे ”

“मला तुम्हाला भेटायचंय तातडीने ” पाणिनी म्हणाला

ती हसली. “नाही तातडीने नाही भेटू शकणार तुम्ही ”

“ पण माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये थांबायला ” पाणिनी म्हणाला

“फारच घाईत असता तुम्ही कायम. आणि संयम नाही अजिबात तुम्हाला. मला कपडे तर करू द्यात. तो दरवाजा बंद करा आधी. मी लगेचच येते बाहेर कपडे करून.” ती म्हणाली.

पाणिनीने तिने सांगितल्याप्रमाणे बेडरूमचा दरवाजा बंद केला बाहेरचं मुख्य दारही बंद असल्याची खात्री केली आणि पुन्हा त्या टेबलाच्या ड्रॉवर कडे एक नजर मारली तिथे खरोखर रिव्हॉल्व्हर आणि वही नव्हती तो पुन्हा हॉलमध्ये येऊन खुर्चीत बसला चार-पाच मिनिटांनी बेडरूमचे दार उघडलं आणि मायरा कपाडिया बाहेर आली. पाणिनी तिला भेटण्यासाठी उठून उभा राहिला.

तिने पुढे येऊन त्याला शेक अँड केला पाणिनीने तिच्या हातात हात मिळवण्याऐवजी तिच्या कंबरे भोवती हात टाकले.

“अहो ! पटवर्धन काय करताय? हे तुमच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हतं. काय हवंय तुम्हाला?”

“आत्ता तरी मी रिव्हॉल्व्हर शोधतोय तुमच्याकडे कुठे लपवली असेल तर.”

तिच्या चेहऱ्यात एकदम फरक पडला. पुन्हा एकदा तिचा निरागस चेहरा दिसला.

“ओह, म्हणजे तुम्ही बघितली होती आंघोळ करताना माझ्याजवळ मी ठेवलेली रिव्हॉल्व्हर.”

“हो बघितली होती. पण आता कुठे आहे ती?”

“बेडरूम मधल्या माझ्या बॅगेत”

“चल, आत जाऊन बघूया”

“मी आणते”

“ ‘मी’ नाही, आपण जाऊन आणू या ” पाणिनी म्हणाला

“काय झालय काय पटवर्धन तुम्हाला? माझ्यावर विश्वास नाही तुमचा?”

“नाही”

“असे कसे बदललात तुम्ही एकदम?”

“मी फक्त काळजी घेतोय. सावध राहतोय एवढच”

ती हसली. “माझा मित्र आदित्य माझ्याबद्दल असंच म्हणतो त्याचं म्हणणे की मी अति सावध अशी स्त्री आहे”

“तुम्हाला सावध स्त्री म्हणण्याजोगा कुठला विषय तुमच्या आणि त्याच्या संभाषणात निघाला?” पाणिनी ने विचारलं.

उत्तरा दाखल ती फक्त हसली. तिने दरवाजा उघडला आणि ती बेडरूम मध्ये गेली. तिने आपली हॅन्ड बॅग हातात घेईपर्यंत पाणिनीने ती पटकन पकडली.

“मिस्टर पटवर्धन माझ्यापासून ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊ नका”

“तुला काय गरज आहे रिव्हॉल्व्हरची?”

“माझ्या संरक्षणासाठी”

पाणिनी पटवर्धन ने हॅन्डबॅग मधून ती रिव्हॉल्व्हर बाहेर काढली त्याचा सिलेंडर उघडून आतल्या गोळ्या आपल्या खिशात टाकल्या आणि रिकामी झालेली रिव्हॉल्व्हर परत तिच्या पर्समध्ये टाकली.

“अहो पटवर्धन काय केलं तुम्ही? हे बरोबर नाही तुमचं वागणं ”

“आपण बोलू याविषयी” पाणिनी म्हणाला

“आपण बोलतोच आहोत. पण तुम्हीच ऐकत नाहीयात माझं ”

“हे रिव्हॉल्हर कुठून घेतलंस तू?”

“मला दिलय ते एकाने”

“कुणी?” पाणिनी ने विचारलं.

“मिस्टर हिराळकर. नाही.. नाही.. मी नाही सांगू शकत तुम्हाला”

“कधीपासून आहे हे तुझ्याकडे?”

“दोन-तीन आठवडे झाले”

“हिराळकर ला का वाटलं की तुला त्याची गरज आहे म्हणून?” पाणिनी ने विचारलं.

“हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पटवर्धन”

“हे बघ,काही गोष्टी आपण सरळ सरळ स्पष्ट करून घेऊ . मला दुसऱ्या कोणाच्या हातातलं खेळणं बनलेलं कधीच आवडत नाही” पाणिनी म्हणाला

“बरोबर आहे त्यात तुमचं काही चूक नाही कोणालाच आवडत नाही तसं”

“तू मला सांगितलंस की तुझा हिराळकर बरोबर साखरपुडा झालाय म्हणून”

“हो बरोबर आहे मी लग्न करणार आहे त्याच्याशी” –मायरा

“तो कुठे आहे आत्ता?”

“म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आत्ता या क्षणी?” –मायरा

“हो”

“मला नाही माहिती ते”

“त्यांन तुला फोन नाही केला?”

“नाही केला.”

“तू प्रेम करतेस त्याच्यावर?” पाणिनी ने विचारलं.

“पटवर्धन साहेब तुम्ही माझ्या खाजगी गोष्टीत का डोकावताय?”

“कारण मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या आसपास घडणाऱ्या घटनेबद्दल बरच काही जाणून घ्यायचय” पाणिनी म्हणाला

“हिराळकर हा एक सज्जन माणूस आहे मी त्याच्यावर प्रेम करते. त्याच्याबद्दल मला खूप आदर वाटतो तो स्टोन क्रशिंग च्या व्यवसायात आहे. म्हणजे दगडाच्या खाणी खरेदी करणे आणि विकणे असा त्याचा व्यवसाय आहे या कामानिमित्त आठवड्यातनं एक दोन दिवस तो बाहेर असतो कधी कधी महिनाभर सुद्धा बाहेर जातो.”

“अच्छा आणि जेव्हा हिराळकर असा बाहेर जातो त्या वेळेला तू आदित्य बरोबर लफडं चालू ठेवतेस?” पाणिनी ने विचारलं.

“मिस्टर पटवर्धन तुम्ही आता फारच स्पष्टपणे बोलायला लागलाय”

“मला उत्तर नाही मिळालं माझ्या प्रश्नाचं” पाणिनी म्हणाला

तिने नकारार्थी मान हलवली

“नाही तुम्हाला वाटते तसं काही नाही आदित्य कोळवणकर हा हिराळकर चा भागीदार आहे पण तुम्हाला का एवढा रस आहे त्यात?”

“कारण मला काही गोष्टी शोधून काढायच्यात काय घडतय आसपास ते” पाणिनी म्हणाला

“का?”—मायरा

“कारण मला असं वाटतंय त्याचा माझ्याशी संबंध आहे आणि मला असं वाटतंय की तुझ्या अंदाजापेक्षा सुद्धा यात बरच काही रहस्य दडलय किंवा तुला ते माहित असून सुद्धा तू ते माझ्यापासून दडवते आहेस”

“पटवर्धन, तुम्ही काय आणि कशाबद्दल बोलताय तेच मला समजत नाहीस झालय. इथे आल्यापासून तुम्ही एकदम गूढ पणे आणि विचित्रच वागत आहात. माझ्या जुन्या नवऱ्याबरोबर म्हणजे कपाडिया बरोबर चालू असलेलं माझं पोटगीच प्रकरण तुम्ही हाताळावं अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते प्रकरण हाताळण्याच्या निमित्ताने तुम्ही संबंध नसलेल्या गोष्टींची चौकशी करावी. अर्थात हे तुमच्याविषयी पूर्ण आदरानेच मी हे बोलते आहे”

“ठीक आहे तर मग अशा परिस्थितीत आदित्य कोळवणकर बरोबर मला जरा सविस्तर सांग.”

“काय सांगू त्याच्याबद्दल?” मायरा ने विचारलं.

“त्याच्या व्यवसाया बद्दल नाही इतर सगळेच मला सांग.” पाणिनी म्हणाला

“तो एक मित्र आहे. फक्त मित्र. माझ्यापेक्षा तो त्वरिता चा मित्र आहे”

“आता ही त्वरिता कोण?”

“त्वरिता जामकर. माझ्या माहितीची एक मुलगी”

“तिचं वर्णन कर जरा” पाणिनी म्हणाला

“एक छोटीशी काळ्याभोर डोळ्यांची, काळ्याभोर केसांची एक गोड मुलगी आहे नेहमी चांगले ड्रेस घालायला तिला आवडतं तुम्हालाही ती आवडेल तुम्ही पाहिलंत तर एकदम क्यूट आहे”

“ इतर सटरफटर विषयावरच आपण जास्त बोललो परत माझ्या मूळ प्रश्नाकडे मी येतो आपण आदित्य कोळवणकर बद्दल बोलूया ”

“त्याच्याबद्दल काय?” –मायरा

“कधीपासून ओळखतेस तू त्याला” पाणिनी ने विचारलं.

“फार जुनी ओळख नाहीये एक संशोधक आहे सतत काही ना काही तरी करत असतो स्वप्न बघत असतो त्याला वाचनाची आवड आहे रात्रंद रात्र तो संशोधनात घालवतो वाचनात घालवतो त्याला सुचलेल्या कल्पना कागदावर उतरवून काढतो.”

“कसलं संशोधन करतो तो एवढं?”

“वेगवेगळी उपकरण” –मायरा

“कसल्या प्रकारची उपकरण?”

“खूप वेगवेगळ्या प्रकारची. उदाहरणार्थ आत्ता त्यांना इन्फ्रारेड परिणाम बद्दल एक संशोधन केलंय आणि त्याच उपकरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याच्या आधी दरवाजा उघडणारं आणि बंद करण्याचं एक उपकरण त्यांन विकसित तयार केलं होतं. अशा पद्धतीच तो काही काही करत असतो.”

“इन्फ्रारेड किरणाचा संशोधन म्हणजे नेमकं काय?”

“म्हणजे अदृश्य प्रकाश. म्हणजे त्याच्या भाषेत तो त्याला जांभळा उजेड किंवा ब्लॅक लाईट असे म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या खोलीत तो अशा काळ्या दिव्याचा झोत सोडतो, जो साध्या डोळ्यांना दिसत नाही त्या झोताच्या पलीकडे एखादी वस्तू गेली की त्याची नोंद एखाद्या उपकरणात होते आणि त्या उपकरणाला जोडलेल्या दुसऱ्या एखाद्या उपकरणाला चालना मिळून एखादी गोष्ट चालू किंवा बंद होते.”

“एखाद उदाहरण सांग” पाणिनी म्हणाला

“आंघोळीसाठी मी बाथरूम मध्ये जायला निघाले आणि तो झोत ओलांडून पलीकडे गेले की लगेच शॉवर चालू होईल. किंवा बेडरूम मध्ये गेले आणि तो दिव्याचा झोप माझ्याकडून ओलांडला गेला की आपोआप रेडिओ चालू होईल किंवा लाईट चालू होईल अशा पद्धतीच्या वस्तू तो बनवतो.”

“आणि तुला त्याच्यामध्ये एवढा रस का आहे?” पाणिनी ने विचारलं.

“मी तुम्हाला म्हणाले ना त्याप्रमाणे मी त्याच्या या संशोधनाला आर्थिक मदत करते माझ्या परीने होईल तेवढी.”

“पण तू का करते आहेस मदत त्याच्या संशोधनाला?”

“कारण मला वाटतंय की त्यातून पुढे चांगला व्यवसाय निर्माण होणार आहे.”-मायरा

“आणि त्यासाठी तो कधीकधी इथे तुझ्याकडे मध्यरात्री पर्यंत थांबलेला असतो?” पाणिनी ने विचारलं.

“कधीकधी म्हणजे जेव्हा हिराळकर इथे नसतो तेव्हा.कधीकधी आदित्य एकदम नर्व्हस होतो.त्याला मग फार सांभाळावे लागते.”

“ पण त्याला त्वरिता आवडते?” पाणिनी ने विचारलं.

“ हो.”

“ आणि तिलाही तो आवडतो?”

“ बहुतेक. ”

“ मायरा, आता मूळ मुद्द्यावर ये आणि सत्य काय ते सांग, तुला ही रिव्हॉल्व्हर कोणी घेऊन दिली? ” पाणिनी ने विचारलं.

“ पटवर्धन,तुम्ही या मुद्द्याला अवास्तव महत्व देताय.”

“ कुठल्या मुद्द्याला?” पाणिनी ने विचारलं.

“ रिव्हॉल्व्हरच्या.”

“ मी महत्व देतोय, अवास्तव?”

“ मग काय तर !”—मायरा उद्गारली.

“ जेव्हा एखादी मुलगी आंघोळ करतांना सुध्दा बाथरूम मधे आपल्याजवळ रिव्हॉल्व्हर ठेवते तेव्हा रिव्हॉल्व्हरला अवास्तव महत्व कोण देतंय असं म्हणायचं?” पाणिनी ने प्रतिप्रश्न केला.

“ठीक आहे सांगते मी कारण.असं ऐकलंय मी, की कोणीतरी मला ठार मारायला टपलय, आदित्य ही घाबरला आहे आणि मी ही.”

“कुणीतरी म्हणजे नक्की कोण”?

“तुमच्या माहितीतलं असं कोणी नाही.”-मायरा म्हणाली

“असं समजू नकोस. मी या व्यवसायात बरीच वर्षे आहे. माझ्या अनेक ओळखी आहेत आणि अशा बऱ्याच लोकांना मी ओळखून आहे.”

“त्याचं नाव जयद्रथ परब आहे”

“अत्यंत पाताळयंत्री असा माणूस आहे. मी त्याच्याशी लग्न करून एक प्रचंड मोठी चूक करून बसले. तेव्हा मी फक्त अठरा वर्षाची होते. त्याने मला खूप आकर्षण दाखवलं. मी त्याच्या भूलथापांना बळी पडले.”

“किती वर्ष तुम्ही एकत्र राहिलात?” पाणिनी ने विचारलं.

“दोन ते तीन वर्ष”

“नंतर काय?”

“नंतर मी पळून गेले.”

“पळून गेले म्हणजे?”

“शब्दशः पळून गेले.”

“घटस्फोट मिळाला तुला?”

“लगेच नाही. नंतर”

“पळून गेलीस म्हणजे एखाद्या बरोबर त्याचा हात धरून पळून गेलीस?”

“तुम्ही फारच स्पष्ट आणि थेट प्रश्न विचारता हो पटवर्धन ! ”

“माझ्या प्रश्नाचे उत्तर दे.”

“हो गेले. एका माणसाबरोबर ”

“पुढे काय झालं?”

“जयद्रथ परब ने प्रतिज्ञाच केली जणू आम्हाला शोधून काढून ठार मारण्याची पण मी माझं नाव बदलून दुसऱ्या शहरात राहायला गेले. तो मला शोधू शकला नाही अजून पर्यंत तरी.”

“आणि तू ज्याच्याबरोबर पळून गेलीस त्या माणसाचं काय झालं पुढे?” पाणिनी ने विचारलं.

“तो मिलिटरी मध्ये होता. सैनिक. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्याचा मृत्यू झाला.” “त्याच्यानंतर मी कपाडिया बरोबर लग्न केलं”

“मला जयद्रथ परब बद्दल जरा सविस्तर सांग.”

“त्यांने मी या शहरात असल्याचं शोधून काढलय. म्हणजे माझा नेमका पत्ता त्याला सापडलेला नाहीये अजून तरी पण मी या शहरात आहे हे त्याला समजलय.”

“तोही याच शहरात आहे? कुठे आहे तो? आणि काय करतो?” पाणिनी ने विचारलं.

“कीर्तीकर नावाच्या एका माणसाकडे काम करतो. तिथे असल्याचं मला समजलंय हे त्याला माहिती नाहीये अजून. दुर्दैवाची गोष्ट अशी हा कीर्तीकर आणि परितोष हिराळकर हे एकाच क्लब चे सभासद आहेत. अनेकदा ते पत्ते खेळायला एकत्र बसतात. मिस्टर पटवर्धन मी आता नेमक्या कुठल्या अडचणीत सापडले हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी जरी हिराळकर शी लग्न केलं तरी त्यातून माझी कुठलीच समस्या संपणार नाही. कल्पना करा पटवर्धन, जेव्हा परितोष ला कळेल की त्याची बायको म्हणजे त्याच्या मित्राकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या माणसाची पूर्वपत्नी आहे, तेव्हा त्याला काय वाटेल याचा विचार करा.”

“आता माझ्या बरोबर सगळ लक्षात यायला लागलय” पाणिनी म्हणाला

“म्हणजे काय?”

पाणिनी ने तिला हलकेच बेडरूमच्या दाराच्या दिशेने ढकललं आणि म्हणाला, “बाहेर जायचे कपडे कर मायरा .आपण बाहेर चाललोय.”

“पटवर्धन अचानक तुम्ही कधी कधी असे आक्रमक का होता?”

“कारण तू माझ्यापासून अजून काहीतरी लपवते आहेस”

“मुळीच नाही.” ती किंचाळून म्हणाली

“तर मग मला सांग तुझ्या घरातलं हे सगळं फर्निचर हे तुला तुझ्या आधीच्या विवाहातून मिळालेली एक प्रकारची भेट होती?”

“वेड्यासारखं प्रश्न विचारू नका पटवर्धन. हा फ्लॅट मी फर्निचर सहित भाड्याने घेतलाय.”

“अच्छा ! फर्निचरचे एवढे अँटिक पीस,जुने टाइपिंग मशीन, भारीतल्या चादरी, रग या सकट?”

“परितोष ला उंची राहणीमान आवडतं. त्यामुळे अनेक गोष्टी म्हणजे हे महागडे रग काही अँटिक फर्निचर पिसेस हे त्याने इथे आणलय.”

“थापा मारून झाल्या असतील तर पटकन कपडे कर.” पाणिनी ने तिला बेडरूम मध्ये ढकलत म्हटलं.

पुढच्या दहा मिनिटात ती कपडे करून तयार झाली आणि पाणिनी तिला घेऊन बाहेर पडला.

“आपण कुठे जातोय हे तुम्ही मला सांगितलं असतं तर....”

अचानक ती बोलता बोलता एकदम थांबली.

“काय झालं?”

“ माझी गाडी !”

“कुठे आहे?”

“ती काय समोर रस्त्यावर ! ”

“तुझी खात्री आहे ती तुझी आहे?”

“अर्थात खात्री आहे. माझ्याच गाडी सारखी दिसते आहे.” –मायरा म्हणाली.

“कुठली आहे समोरच्या गाड्यांपैकी तुझी?”

“फिकट तपकिरी रंगाची लाल चाक असलेली”

पाणिनी आणि ती रस्ता ओलांडून पलीकडे गेले मायरा ने ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन दार उघडलं

“ अरे बापरे ! माझीच गाडी. आणि किल्ल्याही आतच राहिलेत”

“तू किल्ल्या आत ठेवत नाहीस ना कधी?”

“जेव्हा माझी गाडी गॅरेज मध्ये असते, तेव्हा मी किल्ल्या गाडीतच ठेवते पण जेव्हा मी रस्त्यात गाडी लावते तेव्हा किल्ल्या कायम काढून माझ्या पर्समध्ये ठेवते.”

“आज तू तुझी गाडी वापरलीस का?”

“नाही”

“मग माझ्या ऑफिसमध्ये कशी आलीस तू?”

“आदित्य च्या गाडीतून”

“बर. ठीक आहे. काय करायचंय आता? तुला किल्या काढून घेऊन गाडी आहे तिथेच ठेवायच्ये की...”

“नाही मला परत गॅरेज मध्ये नेऊन ठेवायच्ये.”-मायरा म्हणाली.

ती घाई घाई ड्रायव्हिंग व्हील जवळ बसली आणि किल्ली लावून गाडी सुरू करायचा प्रयत्न केला इंजिन मधून विचित्र असा आवाज झाला थोड्यावेळाने धुरांड्यातून फटफट असा आवाज आला

“काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये. मी गॅरेजचं दार उघडतो. तू तिथपर्यंत गाडी आणून ठेव. नंतर आपण बोनेट उघडून बघू काय झाले ते ” पाणिनी म्हणाला आणि रस्ता ओलांडून पुन्हा पलीकडे गेला. आणि गॅरेज चे दार त्याने उघडलं तो रस्ता ओलांडेपर्यंत मायरा ने गाडी कशीबशी सुरू करून वळवून रस्त्याच्या पलीकडे आणली होती. गाडीचा हेडलाईटचा झोत गॅरेजच्या आतल्या भागात पडला आणि गॅरेज मधल्या जमिनीवर पाय पसरून आडवं पडलेल एक शरीर दोघांच्या दृष्टीस पडलं.

(प्रकरण ७ समाप्त)