इस्लामच्या उदयापूर्वी
इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानातील लोक, जे मुख्यत्वेकरून टोळ्यांचे जीवन जगत होते, ते ज्यू, ख्रिस्ती वा आदिवासी धर्मांचे अनुयायी होते. अनेक दैवते उपासली जात असत. काबाची उपासना त्यात फार महत्वाची होती. तिला इस्लाममधे मानाचे स्थान दिले गेले. इतर लहान मोठी दैवते मात्र टाकून दिली गेली. महंमदाला अब्राहामपासूनच्या सर्व ज्यू व ख्रिस्ती प्रेषितांबद्दल अतिशय आदरभाव होता. मात्र तो स्वत:ला त्यांच्या परंपरेतला अखेरचा प्रेषित मानत असे व यापुढे दुसरा कोणी प्रेषित येणार नाही, मीच शेवटचा असे त्याचे सांगणे असे. सर्व मुसलमान यावर दृढ श्रद्धा ठेवतात.