अध्याय १२
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥
आज सुकाळ जाहला त्रिभुवनीं ॥ जे भक्तविजयमेघ ओळला गगनीं ॥ चिदाकाशीं गर्जना करूनी ॥ स्वानंदजीवन वर्षत ॥१॥
सत्वशील जे का चातक ॥ ते आधींच तृप्त जाहले देख ॥ इतर जे जन त्रिगुणात्मक ॥ त्यांसी धान्यें अनेक निपजलीं ॥२॥
केवळ तमोगुणी पशूसमान ॥ त्यांसी उठलें अपार तृण ॥ सखोल भूमीं पडलें जीवन ॥ तें पडलें उपयोगीं बहुतांच्या ॥३॥
अनार्ताच्या खडकावरी ॥ वाहूनि गेलें वरिचेवरी ॥ तो लोट येऊनि सत्वरी ॥ ज्ञानसागरीं राहिला ॥४॥
तेथें सज्ञान भाविक जन ॥ तेचि तळपत होते मीन ॥ स्वानंदलोट येतां जीवन ॥ प्रेमआल्हादें क्रीडती ॥५॥
मागील अध्यायीं कथिली गोष्टी ॥ कबीर नामयाची जाहली भेटी ॥ चतुर्मास क्रमूनि गंगातटीं ॥ मग तेथूनि परतले ॥६॥
गया प्रयाग पाहूनि सत्वरीं ॥ येते जाहले अयोध्यापुरीं ॥ मथुरा गोकुळ देखोनि झडकरी ॥ द्वारावतीस पैं गेले ॥७॥
परतोनि येतां मार्गीं जाण ॥ मारवाड देश लागला कठीण ॥ तृषाक्रांत होऊनि दोघेजण ॥ धुंडिती जीवन सेवावया ॥८॥
तंव एक कूप देखिला अवचित ॥ सखोल पहातां न कळे अंत ॥ उदक घ्यावया उपाव तेथ ॥ कवण युक्ति करावी ॥९॥
मग नामयासी म्हणे ज्ञानदेव ॥ मज साध्य असे एक उपाव ॥ लघिमेचें करून लाघव ॥ प्रवेश केला कूपांत ॥१०॥
उदक प्राशून ते अवसरीं ॥ सत्वर निघाला बाहेरी ॥ नामयासी तृषा लागली भारी ॥ परी उपाय कांहीं न सुचेचि ॥११॥
ज्ञानदेव म्हणे तयाप्रती ॥ तूं चिंतातुर कासया चित्तीं ॥ उदक आणूनि तुजप्रती ॥ आतांच देईन सत्वर ॥१२॥
लधिमालाघव करावयासी ॥ उपाय ठाऊक नाहीं तुजसी ॥ आतां द्वैतभाव न धरून मानसीं ॥ उदक प्राशन करावें ॥१३॥
माझें हातींचें घ्यावया जीवन ॥ चित्तीं न धरावा अनमान ॥ आत्मा व्यापक चैतन्यघन ॥ सर्वां घटीं एकचि ॥१४॥
नामा बोले प्रत्युत्तरीं ॥ विठ्ठलआत्मा सर्वांतरीं ॥ तरी माझी चिंता दूरी ॥ तो काय न करी स्वामिया ॥१५॥
धीर धरून नावेक ॥ दृष्टीस पाहावें कौतुक ॥ मग नेत्र लावूनियां देख ॥ यदुनायक आठविला ॥१६॥
हृदयीं आणूनि पांडुरंगमूर्ती ॥ नामा बोभाय सप्रेमगतीं ॥ धांव धांव गा रुक्मिणीपती ॥ कां मजप्रती मोकलिलें ॥१७॥
तूंचि माझा माता पिता ॥ तूंचि इष्ट मित्र बंधु चुलता ॥ तूंचि माझा कुळदेवता ॥ आजि कां अनाथा मोकलिलें ॥१८॥
तूंचि माझें संपत्तिधन ॥ तूंचि माझें सिद्धांतज्ञान ॥ तूंचि माझें योगसाधन ॥ आणीक न जाणें सर्वथा ॥१९॥
आतां झडकरी येईं धांवत ॥ झणीं पाहासील माझा अंत ॥ अनाथानाथा कृपावंत ॥ मज दीनातें सांभाळीं ॥२०॥
ऐसें म्हणतां ते वेळीं ॥ अश्रु लोटले नेत्रकमळीं ॥ म्हणे धीर न धरवे वनमाळी ॥ जीव तळमळी तुजवीण ॥२१॥
कायावाचामनेंकरून ॥ मी तुझें बाळक अज्ञान ॥ आज तृषा लागतां जाण ॥ जाऊं शरण कोणासी ॥२२॥
पुंडलीकवरदा रुक्मिणीरमणा ॥ जन्मूनि म्हणवितों तुझा पोसणा ॥ आतां मोकलितां करुणाघना ॥ लाज कवणासी येईल ॥२३॥
अनाथनाथा म्हणूनि ॥ असे वर्णिलें वेदपुराणीं ॥ ती कीर्ति लटिकी आजिचे दिनी ॥ येईल होऊनि दिसताहे ॥२४॥
नक्रें गांजितां गजेंद्रासी ॥ सत्वर धांवला हृषीकेशी ॥ तैसेंचि मजला आजिचे दिवसीं ॥ अतिवेगेंसीं पावावें ॥२५॥
द्रौपदीसी संकट पडतां जाण ॥ सत्वर पावलासी तिजलागून ॥ तें अवघेचि कृपाळूपण ॥ गेलासी विसरून दिसतसे ॥२६॥
तीर्थासी पाठवितां रुक्मिणीपती ॥ दिधलें ज्ञानदेवाचे हातीं ॥ आज कां उदास धरूनि वृत्ती ॥ कृपामूर्ति येसीच ना ॥२७॥
कृपाळू तूं जगदीश ॥ झणीं करिसी माझा त्रास ॥ धांव धांव नामा कासावीस ॥ जाहला उदास तुजविण ॥२८॥
जरी तूं न येसी आजि येथें ॥ तरी पिशुन हांसतील सर्व मातें ॥ आता धांवूनि त्वरितें ॥ मज दीनातेंसांभाळीं ॥२९॥
इकडे भूवैकूंठपंढरपुरीं ॥ निजभुवनीं असतां श्रीहरे ॥ निजभक्ताचें आर्त अंतरीं ॥ नित्यानित्य सारिखा ॥३०॥
कृपेचा ओसर असतां पोटीं ॥ तंव रखुमाईस म्हणे जगजेठी ॥ एक वेळा नामा पडता दृष्टी ॥ मग जीवापरता न करतों ॥३१॥
रुक्मिणी म्हणे जी देवराया ॥ आजि कां तयाची आली माया ॥ काय कष्ट जाहले नामया ॥ म्हणोनि तुम्ही उद्विग्न ॥३२॥
ऐकूनि म्हणे जगज्जीवन ॥ आजि माझा लवतो डावा लोचन ॥ वाम बाहु करितो स्फुरण ॥ म्हणोनि चिंता वाटते ॥३३॥
उद्वेग चित्तीं बहु वाटती ॥ कवण्या भक्तासी कष्ट होती ॥ हें कळेना मजप्रती ॥ ऐसें श्रीपति बोलिले ॥३४॥
वाजतां वारा न लागे त्यांसी ॥ माझिया रजसां निजभक्तांसी ॥ न कळे ताहान भूक त्यांसी ॥ लागली मज कळेना ॥३५॥
वचन ऐकोनियां रुक्मिणी ॥ नावेक पाहे विचारूनी ॥ तंव नामयाचा शोकशब्द कानीं ॥ अकस्मात पडियेला ॥३६॥
मग म्हणे देवाधिदेवा ॥ तृषाक्रांत नामा करितो धांवा ॥ वेगें जाऊनि सांभाळावा ॥ विलंब न करावा क्षणभरी ॥३७॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ वेग केला मनाहून ॥ तंव गडबडीत कूप भरून ॥ उचंबळोन वर आला ॥३८॥
कौतुक देखोनि ज्ञानदेव ॥ म्हणे हें जाहलें अभिनव ॥ नाम्यानें केला ऋणी देव ॥ कैशा रीतीं कळेना ॥३९॥
मग सावध करूनि तये क्षणीं ॥ आलिंगिला प्रीतीकरूनी ॥ म्हणे तुज पावला चक्रपाणी ॥ अघटित करणी दाविली ॥४०॥
नळें पाषाण तारिले उदकीं ॥ कां दंड तापविला वसिष्ठादिकीं ॥ गाधिसुतें प्रतिसृष्टि केली कीं ॥ आपुल्या जैसी प्रतापें ॥४१॥
कीं भगीरथें प्रयत्नयुक्ती ॥ भूतळीं आणिली भागीरथी ॥ कां प्रसन्न करूनि उमापती ॥ गोदा आणिली गौतमें ॥४२॥
त्याहूनि अघटित केलें पाहें ॥ हस्तनापुरीं उठविली मृत गाय ॥ आतां तृषाक्रांत होतां पाहें ॥ पाताळगंगा आणिली ॥४३॥
ऐसें बोलोनि नामयाप्रती ॥ किंचित आणिली देहस्फूर्ती ॥ मग उदक प्राशूनि निगुती ॥ ज्ञानदेवासी बोलत ॥४४॥
म्हणे मीं जी घ्यावी आळ ॥ ती पुरवितो देव सकळ ॥ कधीं देखेन तमालनीळ ॥ निवतील डोळे तैं माझे ॥४५॥
यापरी ज्ञानदेव बोलत ॥ योगी बैसले समाधिस्थ ॥ तयांसी देखोनि माझें चित्त ॥ विश्रांती न पावेचि सर्वथा ॥४६॥
तुझीच लागली अत्यंत प्रीती ॥ आणिक कांहीं नाठवें चित्तीं ॥ तूं विष्णुभक्त सप्रेममूर्ती ॥ रुक्मिणीपती वश केला ॥४७॥
केशव परमात्मा तुजजवळ ॥ धन्य नामया तुझें कुळ ॥ धेनूसी देखोनि तान्हें बाळ ॥ संतोष वाटे ज्या रीतीं ॥४८॥
तैसे देखोनि तुझे सद्गुण ॥ सप्रेम आनंदे माझें मन ॥ तीर्थयात्रा नावडे जाण ॥ तुझें कीर्तन ऐकतां ॥४९॥
श्रुति रमृति आणि पुराणें ॥ वेडावलीं हरीचे गुणें ॥ विसर्जिलीं योगध्यानें ॥ तुझें प्रेम देखोनी ॥५०॥
ऋषिगण आणि गंधर्व ॥ विरिंचि आणि इंद्रादि देव ॥ लक्षितां अरूपाचा ठाव ॥ सप्रेमभाव धरूनी ॥५१॥
तयांसी प्राप्त नव्हेचि जाण ॥ तो त्वां केला आपुले स्वाधीन ॥ ऐसें ज्ञानदेवें म्हणून ॥ धरिले चरण नामयाचे ॥५२॥
नामा जाहला तृषाक्रांत ॥ ते स्थळीं अद्यापि कूप वाहत ॥ यात्रा मारवाड देशांत ॥ मार्गशीर्षांत भरतसे ॥५३॥
तें तीर्थमाहात्म्य वर्णितां सार ॥ तरी ग्रंथ वाढेल थोर ॥ असो ज्ञानदेव नामा सत्वर ॥ निघते जाहले तेथुनी ॥५४॥
नानादेशींचें तीर्थें अनेक ॥ दृष्टीस देखती सवेग ॥ बद्रिकाश्रम देखोनि सांग ॥ हिमाचळासी पातले ॥५५॥
देखिला ओढ्या जगन्नाथ ॥ जेथें बौद्धरूपें देव नांदत ॥ कलियुगीं चमत्कार अद्भुत ॥ अद्याप होत ते ठायीं ॥५६॥
पाहूनि ओंकार अमलेश्वर ॥ केदारासी गेले सत्वर ॥ मग उज्जयिनीस महंकाळेश्वर ॥ देखिला साचार निजदृष्टीं ॥५७॥
तें स्थळ पाहूनि नयनीं ॥ परतले मग तेथुनी ॥ परळीवैजनाथ देखोनी ॥ सोरटीसोमनाथासी पावले ॥५८॥
श्रीशैलपर्वतीं मल्लिकार्जुन ॥ वसत तेथें पार्वतीरमण ॥ साठ वरुषेंपर्यंत जाण ॥ वाट पाहे भक्तांची ॥५९॥
तें स्थान देखोनि सत्वर ॥ मग पाहिला घृष्णेश्वर ॥ सेवाळतीर्थींचा महिमा थोर ॥ नये साचार वर्णितां ॥६०॥
मग नासिक त्र्यंबकासी येऊन ॥ कुशावर्तीं केलें स्नान ॥ पंचवदनासी करूनि नमन ॥ सत्वर तेथूनि निघाले ॥६१॥
पश्चिमसमुद्र देखोनि सत्वरीं ॥ मग पावले श्रीभीमाशंकरीं ॥ जनार्दन वंदोनि रामेश्वरीं ॥ जाते जाहले तेधवां ॥६२॥
ऐसी एकाहूनि एक आगळीं ॥ तीर्थें आहेत भूमंडळीं ॥ त्यां हीं वरिष्ठ जीं बोलिलीं ॥ पुराणप्रसिद्ध नामांकित ॥६३॥
अयोध्या मथुरा आणि कांती ॥ काशी द्वारावती अवंती ॥ सातवी पुरी मोक्षदाती ॥ पाहिल्या प्रीतीं अनुतपएं ॥६४॥
आणि बारा ज्योतिर्लिंगें थोर ॥ इतुकींच सांगितलीं साचार ॥ इतर राहिलीं पृथ्वीवर ॥ तीं पुस्तकीं कोठवर लिहावीं ॥६५॥
जेवीं दृष्तीस पाहतां निशां पती ॥ नक्षत्रें अनायासेंच दिसतीं ॥ कीं वृक्ष उपडोनि देतां हातीं ॥ शाखा येती अनायासें ॥६६॥
कां सुधारस प्राशितां त्वरित ॥ सकळ औषधी आल्या त्यांत ॥ कीं पठन करितांचि वेदांत ॥ कळती अर्थ श्रुतीचे ॥६७॥
कीं अश्वत्थ नमिता साचार ॥ वनस्पती पूजिल्या अठरा भार ॥ नातरी दृष्टीस पडतां धरणीधर ॥ इतरही नाग देखिले ॥६८॥
कीं विष्णूसी वाहतां तुळसीहार ॥ त्यांत आले षोडशोपचार ॥ कीं दृष्टीं देखतां मृडानीवर ॥ सकळ तापसी देखिले ॥६९॥
कीं ऐरावताचें होतां दर्शन ॥ सकळ पृथ्वीचे देखिल वारण ॥ कीं तृप्त जाहलिया शचीरमण ॥ इतर सुरगण तोषती ॥७०॥
नातरी दृष्टीं देखतां विनतासुत ॥ सकळ अंडज आले त्यांत ॥ कीं नयनीं पाहतां हिमालयपर्वत ॥ स्थावर विदित जाहलें कीं ॥७१॥
तेवीं मोक्षदायक सप्तपुरी ॥ आणि द्वादशलिंगांची वर्णिली थोरी ॥ अन्य तीर्थें असतीं महीवरी ॥ तींही घडलीं अनायासें ॥७२॥
असो रामेश्वर दृष्टीं देखोनी ॥ उभयतां परतले तेथूनी ॥ प्रेमळभक्त आणि ज्ञानी ॥ नागनाथासी पैं आले ॥७३॥
माघवद्य चतुर्दशीस ॥ शिवरात्री पर्वकाळ विशेष ॥ नामा ज्ञानदेव त्या स्थळास ॥ येते जाहले अवचित ॥७४॥
जेवीं चैत्रशुद्ध प्रतिपदेसी ॥ साठ संवत्सर आले घरासी ॥ कीं माघशुद्ध द्वितीयेसी ॥ आला घरासी धर्मराव ॥७५॥
कीं अक्षयतृतीयेसी जाण ॥ पाहुणे आले पितृगण ॥ कीं वरद चतुर्थींकारण ॥ गजवदनचि पातला ॥७६॥
श्रावणशुद्ध पंचमीस ॥ फणिवरचि आला घरास ॥ नातरी चंपाषष्ठीस ॥ म्हाळसाकांत भेटले ॥७७॥
कीं माघशुद्ध सप्तमीस जाणा भास्कर आला पाहुणा ॥ कीं जन्माष्टमीस यादवराणा ॥ पहुडला पाळणां येऊनि ॥७८॥
कीं रामनवमीस कौसल्यासुत ॥ खेळत पातला अकस्मात ॥ नातरी विजयादशमीस ॥ आली त्वरित जगदंबा ॥७९॥
कीं आषाढी एकादशीप्रती ॥ दृष्टीस देखिली श्रीविठ्ठल मूर्ती ॥ प्रेमळ भक्त आनंद मानिती ॥ संतोष चित्तीं न समाये ॥८०॥
कीं कार्तिकशुद्ध द्वादशीस ॥ श्रीकृष्ण येती वृंदावनास ॥ कीं मृडानीनायक त्रयोदशीस ॥ प्रदोषकाळीं पैं येती ॥८१॥
कीं श्रावण अमावास्येसी साचार ॥ गोठणीं आला नंदिकेश्वर ॥ त्यापरीच नामा आणि ज्ञानेश्वर ॥ शिवरात्रीस पातले ॥८२॥
पुण्यक्षेत्र अवंढानागनाथ ॥ दुजें कैलास म्हणती भक्त ॥ त्या स्थळीं पातले त्वरित ॥ प्रेमानंदें ते काळीं ॥८३॥
तये तीर्थीं करूनि स्नान ॥ सारिला नित्यनेम जाण ॥ महाद्वारीं लोटांगण ॥ सप्रेम भावें घातलें ॥८४॥
मग अंतर्गृहीं निजप्रीतीं ॥ दर्शना चालिले सत्वरगती ॥ नागनाथासी पुनरावृत्ती ॥ दंडवत घातले ॥८५॥
म्हणती अनाथनाथा पार्वतीवरा ॥ स्मशानवासी खट्वांगधरा ॥ कैलासपते दिगंबरा ॥ विश्वेश्वरा विश्वपते ॥८६॥
ऐसें म्हणोनि ते वेळीं ॥ मौळ स्पर्शिलें करतळीं ॥ प्रेमळ जाणूनि चंद्रमौळी ॥ संतुष्टला निजचित्तीं ॥८७॥
मग नामदेवें येऊनि महाद्वारीं ॥ कीर्तन आरंभिलें ते अवसरीं ॥ टाळ वेणा घेऊनि करीं ॥ गर्जत गजरीं नामाचे ॥८८॥
हृदयीं चिंतूनि विठ्ठलमूर्ती ॥ दोनी लाविलीं नेत्रपातीं ॥ किंचित नाठवेचि देहस्फूर्ती ॥ विदेहेस्थिती जाहलासे ॥८९॥
सांडोनियां मानापमान ॥ सांडोनि दांभिक लोकाचरण ॥ सांडूनि वासनेचें लक्षण ॥ करीं कीर्तन निजप्रीतीं ॥९०॥
सांडोनियां भेदाभेद ॥ द्वेतकल्पनेचा करूनि छेद ॥ तोडूनि आशापाशबंध ॥ नाचे स्वानंद प्रीतीनें ॥९१॥
टाळ मृदंग वीणा वाजत ॥ सप्रेमभावें कीर्तन होत ॥ जन मिळाले असंख्यात ॥ श्रवण करावया आवडीं ॥९२॥
जैसा पौर्णिमेसी रोहिणीकांत ॥ संपूर्णकळा सुशोभित ॥ देखोनि सागरा भरतें येत ॥ प्रेमआल्हादें जैसें कां ॥९३॥
कां स्नेहसूत्र घालितां फार ॥ दीपक उंचावे होय थोर ॥ अर्ध्यदान देतां द्विजवर ॥ होय दिनकर जेवीं सुखी ॥९४॥
कां सुधारस करितां पान ॥ देह राहे अमर होऊन ॥ कीं उदार दाता वांटितां धन ॥ याचक जाण आल्हादती ॥९५॥
नातरी पर्जन्य वर्षतां जाण ॥ अरण्यांत उंचावे जैसें तृण ॥ कीं ब्राह्मणां मिळतां मिष्ट पक्वान्न ॥ परम संतुष्ट होताती ॥९६॥
तेवीं नामयाचें कीर्तन ऐकून ॥ सुखी होती श्रोतेजन ॥ प्रेम आल्हादें ऐकतां गुण ॥ नेत्रीं अश्रु पडताती ॥९७॥
कंठी होऊनि सद्गदित ॥ अंग जाहलें रोमांचित ॥ श्रोतयांची विदेहस्थित ॥ जाहली निश्चैत ते समयीं ॥९८॥
राजयानें टाकितां शौर्यतेज ॥ सेना तैसीच होय सहज ॥ कां मनेंच सांडिता विषयलाज ॥ मग इंद्रियेंही विसरती ॥९९॥
तेवीं नामदेवें टाकितां देहभान ॥ श्रोत्यांसी तैसें जाहलें जाण ॥ श्रवणीं ऐकतां श्रीहरीचे गुण ॥ विदेही होऊन बैसले ॥१००॥
ध्यानांत आणूनि जगजेठी ॥ आल्हादें टाळीया पिटिती ॥ विठ्ठलनामें गर्जना करिती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥१॥
तंव विप्रीं करून स्नान ॥ सर्वांगासी भस्म चर्चून ॥ रुद्राक्षमाळा गळां घालून ॥ धोत्रें ओलीं पांघुरले ॥२॥
अग्रोदक घेऊनि करीं ॥ पूजा घेतली षोडशोपचारीं ॥ अभिषेक करावयासी सत्वरीं ॥ महाद्वारासी पैं आले ॥३॥
तंव तेथें नामा कीर्तन करित ॥ प्रेमानंदें गात नाचत ॥ यात्रा मिळाली अगणित ॥ न दिसे मार्ग जावया ॥४॥
वरीवरी केलें संध्यास्नान ॥ अंतरीं विकल्पें विटाळे मन ॥ लोकांसी म्हणती आम्हांलागून ॥ स्पर्श कराल व्हा परते ॥५॥
अंतरीं असतां क्रोध खळ ॥ त्यासी अवघेंचि भासे अमंगळ ॥ दृष्टीस कोणी न दिसे निर्मळ ॥ विकल्पजाळीं पडियेले ॥६॥
हरिकीर्तनीं विटाळ नाहीं ॥ तैसाचि ब्रह्मसभेचिया ठायीं ॥ शिवविष्णूचें दर्शनास पाहीं ॥ जातां विटाळ न मानावा ॥७॥
गीता भागवत पुस्तकासी ॥ स्पर्श म्हणेल तो पापराशी ॥ दूषण ठेवील वेदांतासी ॥ तोही तैसाचि जाणावा ॥८॥
ऐसें न जाणून ते समयीं ॥ ब्राह्मणीं चिकित्सा मांडिली पाहीं ॥ सक्रोध होऊनि लवलाहीं ॥ लोकांसी बोलत अपशब्द ॥९॥
म्हणे व्यर्थचि कां रे गाइतां ॥ टाळ्यां पिटोनि हांका मारतां ॥ हें तंव पंढरीसचि होय मान्यता ॥ नागनाथासी नावडे ॥११०॥
ज्याचें त्यासच बोलणें जण ॥ दुग्धांत कासया पाहिजे लवण ॥ भाजीस शर्करा लावितां जाण ॥ रुची नयेचि सर्वथा ॥११॥
कर्णासी दावितां परिमळ ॥ तया नहेचि तो केवळ ॥ नेत्रालागोनि गोष्टी प्रांजळ ॥ व्यर्थ कासया सांगाव्या ॥१२॥
जिव्हेसी दाविला आरसा ॥ तीस पाहतां न दिसे सहसा ॥ नेत्रांसी दावितां स्वादरसा ॥ नये जेवितां तयासी ॥१३॥
तेवीं कैलासपति उमारमण ॥ त्यासी नावडे हरिकीर्तन ॥ आतां पंढरीस जाऊन ॥ नाचा निर्लज्ज होउनी ॥१४॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ श्रोते देती प्रत्युत्तर ॥ भिन्न न म्हणावे हरिहर ॥ तुम्ही विचार करून ॥१५॥
जैसें तीर्थ आणि जळ ॥ भिन्न नसेचि अळुमाळ ॥ नातरी गोडी आणि गूळ ॥ अभिन्न केवळ सर्वदा ॥१६॥
दीप आणि प्रकाश जाण ॥ पुष्प मकरंद नव्हती भिन्न ॥ कीं वासरमणि आणि किरण ॥ अभिन्नपणें असती ॥१७॥
कीं मेघ आणि जळ ॥ भिन्न न म्हणावें केवळ ॥ कीं रत्न आणि त्याची कीळ ॥ निवडूं नये सर्वथा ॥१८॥
कीं पक्वान्न आणि त्याचा स्वाद ॥ दोहींत निवडावा काय भेद ॥ नातरी वाद्य आणि नाद ॥ असती अभेद सर्वदा ॥१९॥
तेवीं शिव विष्णु दोनी एक ॥ ऐसें बोलती सर्वज्ञ लोक ॥ कीर्तन ऐकूनि मदनांतक ॥ आनंदें डोलत निजप्रीतीं ॥१२०॥
ऐकूनि श्रोतयांचें उत्तर ॥ संतप्त जाहले द्विजवर ॥ आम्हांसी ज्ञान सांगती पामर ॥ चित्तीं बडिवार धरूनी ॥२१॥
आम्ही ब्राह्मण उंचवर्ण ॥ शास्त्राधिकारी सर्वज्ञ ॥ नामदेवाचें सिद्धांतज्ञान ॥ आमुचें मना न ये कीं ॥२२॥
आतां सत्वर जावें येथून ॥ नाहीं तरी करूं ताडन ॥ ऐसें बोलतांचि ब्राह्मण ॥ कोणीच उत्तर न देती ॥२३॥
विलंब जाहला शिवपूजेसी ॥ मार्ग न होय जावयासी ॥ एक म्हणती नामयासी ॥ पिटोनि लावा सत्वर ॥ २४॥
स्पर्श झाला आपणांकारण ॥ तरी पुनः करूं सचैल स्नान ॥ ऐसें म्हणूनि दोघे जण ॥ कीर्तनरंगीं प्रवेशले ॥२५॥
जैसें दान देतां सत्पात्राप्रती ॥ कुपात्र चित्तीं चरफडती ॥ तेवीं नामयाच्या कीर्तनाप्रती ॥ विप्र अवचित चालिले ॥२६॥
सक्रोध म्हणती नामयाला ॥ व्यर्थ कासया गलबला मांडिला ॥ शिवदर्शनालागीं जावयाला ॥ मार्ग आम्हां न फुटेचि ॥२७॥
तुवां टाकूनि देहभान ॥ आपुल्याऐसेचि केलें जन ॥ आमुचें बुडविलें कर्माचरण ॥ सिद्धांतज्ञान कथूनियां ॥२८॥
आतां देउळामागें उभा राहून ॥ तेथें निर्लज्जा करीं गायन ॥ नामदेवें ऐकूनि वचन ॥ केलें नमन विप्रांसी ॥२९॥
अवश्य म्हणूनि बोलूनि उत्तर ॥ तेथूनि निघाला वैष्णववीर ॥ कीर्तनरंग साचार ॥ वितळोनि गेला ते समयीं ॥१३०॥
जैसा कुंभ भरला तीर्थें करून ॥ त्यांत मद्य पडे येऊन ॥ कीं दुग्धामाजी घालितां लवण ॥ नासोनि जाय तत्काळ ॥३१॥
कीं उगाळूनि ठेविला चंदन ॥ तयांत अवचिता पडला लसुण ॥ कीं कस्तूरींत कालविला हिंगण ॥ नाश होय सहजचि ॥३२॥
तेवीं उठोनि चालतां विष्णुदास ॥ वितळोनि गेला कीर्तनरस ॥ देखोनि श्रोतयांच्या चित्तास ॥ वाटले क्लेश बहुतचि ॥३३॥
जैसें पक्वान्न पात्रीं वाढिलें ॥ तें अवचित कागें उचलिलें ॥ कीं प्रवासाहूनि येतां भलें ॥ तस्करें लुटिलें अवचित ॥३४॥
यापरी विषाद मानूनि मनीं ॥ सभा उठिली तेथूनी ॥ नामदेवाच्या मागुनि ॥ जाते जाहले सकळिक ॥३५॥
शिवालयाचे पृष्ठभागीं ॥ नामदेवाचे सत्संगीं ॥ जाऊनि बैसले कीर्तनरंगीं ॥ अवघेचि जन तेधवां ॥३६॥
अस्तमान होतां दिनकरासी ॥ किरणही जाती तयासरसी ॥ कीं नृपवर जातां अरण्यासी ॥ सेनाही सरसी जातसे ॥३७॥
कीं ज्या दिशे धांवें पवन ॥ मेघही तिकडेचि करी गमन ॥ तेवीं नामदेवाचे मागून ॥ श्रोतेजन आलें कीं ॥३८॥
आल्हादें गर्जोनि ते वेळीं ॥ हरिनामें पिटिली टाळी ॥ विष्णुदासाचे नेत्रकमळीं ॥ अश्रुपात लोटले ॥३९॥
म्हणे धांव वेगीं पतितपावना ॥ अनाथनाथा रुक्मिणीरमणा ॥ मज विदेशीं जगज्जीवना ॥ कां मोकलून दिधलें ॥१४०॥
आज हरिणीनें टाकिलें पाडस ॥ कीं पक्षिणी विसरली अंडजास ॥ कीं निजमायेनें बाळकास ॥ अरण्यांत टाकिलें ॥४१॥
चातकासी मेघ विसरला ॥ कीं चकोरावरीं चंद्र क्षोभला ॥ नातरी कमळिणीवरी राग धरिला ॥ वासरमणीनें ज्यापरी ॥४२॥
आजि चैतन्यें देहासी टाकिलें ॥ कीं दृष्टीनें नेत्रांसी अव्हेरिलें ॥ कां वायूनें प्राणासी मोकलिलें ॥ तैसेंचि जाहलें विपरीत ॥४३॥
अहो पंढरपुरनिवासिनी ॥ विठाबाई कुळस्वामिनी ॥ माझा विसर तुजलागुनी ॥ कवणेपरी पडियेला ॥४४॥
समुद्रवलयांकित हिंडोनी ॥ सकळ तीर्थें पाहिलीं नयनीं ॥ परी तुजाइसें दृष्टीं कोणीं ॥ दैवत नाहीं देखिलें ॥४५॥
समचरण कटिकर ॥ ठाण गोजिरें सुकुमार ॥ पाहतां ध्यान दिगंबर ॥ समूळ विरे देहभान ॥४६॥
टाळ वीणा मृदंग वाजती ॥ गरुडटके पताका शोभती ॥ दृष्टीस पाहतां नेत्रपातीं ॥ लवों विसरती चपळत्वे ॥४७॥
ऐसा नामा सद्गदित ॥ होऊनि चिंतिला रुक्मिणीकांत ॥ तों नवल वर्तलें अति अद्भुत ॥ ऐका पवित्र भाविक हो ॥४८॥
नवलक्ष पताका स्वर्गींहूनी ॥ उतरल्या जैशा सौदामिनी ॥ कीर्तनरंगीं येऊनी ॥ उभ्या ठाकल्या अकस्मात ॥४९॥
त्या नवलक्ष ध्वजा नव्हेति केवळ ॥ नवविधा भक्तीचें उतरलें फळ ॥ कें नवरसचि होऊनि प्रांजळ ॥ आले तत्काळ कीर्तनीं ॥१५०॥
ऐसें कौतुक देखोन ॥ विस्मित जाहले सकळ जन ॥ तटस्थ पाहत राहिले नयन ॥ नाठवे देहभान कोणासी ॥५१॥
तेणें आनंद विष्णुदासासी ॥ उल्हासूनि निजमानसीं ॥ विठ्ठलनामेंकरून हर्षीं ॥ नाचे कीतनी निजप्रेमें ॥५२॥
कृष्णापक्षींची यामिनी ॥ दाटली होती तमेंकरूनी ॥ पताकातेजें दिशा भरूनी ॥ कोंदटल्या सकळिक ॥५३॥
नामया मनीं आल्हाद थोर ॥ टाळियानादें भरलें अंबर ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥ कौतुक अपार जाहले ॥५४॥
आनंदें कर उभारूनी ॥ टाळ्या चुटक्या वाजविती ध्वनी ॥ चौसष्टी कळा उभ्या राहूनी ॥ तटस्थ पाहती कौतुकें ॥५५॥
तंव नामा कल्पी निजमनांत ॥ सर्व साहित्य अनुकूल येथे ॥ करीतसे पंढरीनाथ ॥ परी न्यून दिसे एकचि ॥५६॥
नागनाथें विमुख होऊनी ॥ पाठ दिधली हरिकीर्तनीं ॥ काय अपराध आला घडोनी ॥ मजकडूनी कळेना ॥५७॥
शिवालय असतें समोर ॥ तरी कथेसी रंग येता फार ॥ कां न पावेच रुक्मिणीवर ॥ कोप मजवर कां धरिला ॥५८॥
म्हणे जय क्षीरसागरविहारा ॥ लक्ष्मीकांता अति उदारा ॥ अनाथनाथा करुणाकरा ॥ पाव सत्वर मजलागीं ॥५९॥
जय गजेंद्रमोचका करुणालया ॥ विधिजनका यादवराया ॥ नाममात्रें निरसोनि माया ॥ पाव सत्वर मजलागीं ॥१६०॥
उपमन्यें घेतली आळ ॥ त्यासी दिधला क्षीरसागर ॥ तैशा रीतीं होऊनि दयाळ ॥ पाव सत्वर मजलागीं ॥६१॥
द्रौपदीची रक्षावया लाज ॥ तिजला केली चतुर्भुज ॥ तैसाचि कृपाळू होऊन आज ॥ पावसत्वर मजलागीं ॥६२॥
अविंधें मारिली कीर्तनीं गाय ॥ तैं तुज संकट घातलें माय ॥ तेव्हां पावलीस लवलाह्य ॥ जीवविली धेनु क्षणमात्रें ॥६३॥
तृषा लागतां वनांतरीं ॥ तैं तूं पावलासी झडकरी ॥ आतां कां निष्ठुर अंतरीं ॥ न येसी लवकरी विठ्ठला ॥६४॥
मजकडे करून पाठी ॥ राउळीं बैसला धूर्जटी ॥ आतां पाहूनि कृपादृष्टीं ॥ पाव जगजेठी मजलागीं ॥६५॥
ऐसा नामा प्रेमभरित ॥ कीर्तनामाजी विलपत ॥ तों नवल वर्तलें अद्भुत ॥ परिसा भक्त भाविक हो ॥६६॥
पूर्वाभिमुख होतें देऊळ ॥ तें पश्चिमेस फिरलें तत्काळ ॥ आश्चर्य करिती लोक सकळ ॥ धन्य काळ सुदिन तो ॥६७॥
प्रेमानंदंदें पिटोनि टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ म्हणती चंद्रमौळीं ये काळीं ॥ नामया निश्चयें पावला ॥६८॥
नामयाचें ऐकोनी कीर्तन ॥ देउळासमवेत पार्वतीरमण ॥ पश्चिमदिशेस मुख करून ॥ करीत श्रवण निजप्रीतीं ॥६९॥
नामयाची भक्ति अद्भुत ॥ देखोनि श्रोते आनंदभरित ॥ तयांप्रति नामा विनवित ॥ कर्ता दयाळ श्रीहरी ॥१७०॥
शिवरात्रीचे यामिनींत ॥ कीतन केले अति अद्भृत ॥ तों वासरमणि उदयासी येत ॥ तेजयुक्त देखिला ॥७१॥
पूजाविसर्जन होतांचि जाण ॥ देउलाबाहेर आले ब्राह्मण ॥ तों सन्मुख नामयाचें कीर्तन ॥ प्रेमानंदें होतसे ॥७२॥
तीर्थीं करूनि प्रातःस्नान ॥ देऊं पाहाती अर्घ्यदान ॥ म्हणती पश्चिमदिशे सहस्रकिरण ॥ उदयासी आला दिसताहे ॥७३॥
कीं आपणा पडली दिशाभुली ॥ कीं जागृतीनें भ्रांति पडली ॥ नातरी नामयासी चंद्रमौळी ॥ प्रसन्न जाहला वाटतें ॥७४॥
मग विवेक करूनियां चित्तें ॥ पाहते झाले सभोंवतें ॥ तों तीर्थ तैसेंचि पाहती खालतें ॥ न दिसे समवेत त्या ठायीं ॥७५॥
देऊळ मात्र फिरूनि देख ॥ जाहलें नामयासन्मुख ॥ आणि दिव्यपताका अनेक ॥ चपळेऐशा दीसती ॥७६॥
ऐसें देखोनि सत्वर ॥ आश्चर्य करिती द्विजवर ॥ म्हणती नामयाचा पार ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥७७॥
आपण धरूनि कर्माभिमान ॥ वायांचि केलें त्याचें छळण ॥ ऐसा अनुताप मनीं धरून ॥ कीर्तनरंगीं पावले ॥७८॥
नामयासी म्हणती द्विजवर ॥ धन्य तूं प्रेमळ वैष्णववीर ॥ पूर्ण उद्धवाचा अवतार ॥ कळलें साचार आम्हांसी ॥७९॥
नाहीं ऐकिलें देखिलें नयनीं ॥ तैसीचि करूनि दाविली करणी ॥ धन्य नामया तुझी जननी ॥ सभा भाग्यें आथिली ॥१८०॥
ऐसी अद्भुत तुझी कीर्ती ॥ फांको आतां त्रिजगतीं ॥ पृथ्वी चंद्र आणि गभस्ती ॥ जोंवरी दिसती साकार ॥८१॥
तोंवरी हें तुझें चरित्र ॥ मुखें गाती भक्त पवित्र ॥ कानीं ऐकती त्यांचे श्रोत्र ॥ पावन होती क्षणमात्रें ॥८२॥
ऐसें बोलोनि द्विजवर सद्भावें करिती नमस्कार ॥ म्हणती नामया तुझा पार ॥ ब्रह्मांदिकां न लगेचि ॥८३॥
दुर्वासें अभिमान धरून ॥ अंबरीषाचें केलें छळण ॥ संकट जाणोनि जगज्जीवन ॥ गर्भवास अंगीं सोशिले ॥८४॥
कीं प्रतिष्ठानींचे द्विजवर ॥ तिंहीं छळिला ज्ञानेश्वर ॥ मग रेड्यामुखीं साचार ॥ वेद जैसे बोलविले ॥८५॥
तैसेंचि अघटित तुवां केलें ॥ शिवालयासी साक्षात फिरविलें ॥ तंव नामयानें नेत्र उघडिले ॥ सद्गद होऊनि तेधवां ॥८६॥
मग प्रेमें करूनि आरती ॥ ओंवाळिला रुक्मिणीपती ॥ साष्टांग नमस्कारूनि प्रीतीं ॥ खिरापती तेव्हां वांटिल्या ॥८७॥
पताका उडोनि तये क्षणीं ॥ सत्वर गेल्या वैकुंठभुवनीं ॥ उर्ध्व मुख करूनि नयनीं ॥ जन पाहाती कौतुक ॥८८॥
शिवालय फिरविलें ते अवसरीं ॥ तें तैसेंचि असे अद्यापवरी ॥ भक्ताभिमानी श्रीहरी ॥ संकट निवारी निजांगें ॥८९॥
देवांत श्रेष्ठ रुक्मिणीकांत ॥ कीं वैष्णवमाजी नामा भक्त ॥ याचे साम्यतेसी निश्चित ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥१९०॥
उपमा द्यावी अमृतास ॥ ऐसा कोणता आहे रस ॥ सागराचे उपमेस ॥ सरितां कोठोनि आणावी ॥९१॥
पुढील अध्यायीं रस अद्भुत ॥ ग्रंथ वदवील रुक्मिणीकांत ॥ महीपति त्यांचा मुद्रांकित ॥ शरणागत संतांचा ॥९२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्वादशाध्याय रसाळ हा ॥१९३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥