Get it on Google Play
Download on the App Store

सुभाषिते

डोंगर चढून
भेटावे देवाला
यत्नाने यशाला
मिळवावे ॥१॥

नको ग कधीही
संसारी बोलू खोटे
त्याने गेले मोठमोठे
अधोगती ॥२॥

नको ग कधीही
संगती दुर्जनांची
भेट ती नरकाची
मृत्युलोकी ॥३॥

रामाच्या नावाचा
पापी कंटाळा करिती
निवळ टाकून
पाणी गढूळ भरिती ॥४॥

माझे माझे म्हणून
प्राणी संसारी भुलतो
निवळ सोडून
पाणी गढूळ भरीती ॥५॥

साखर मुंगीला
मध तो माशीला
तैसे सज्जन चित्ताला
रामनाम ॥६॥

शिकती तराया
पाण्यात पडून
संसारी वावरुन
मुक्त व्हावे ॥७॥

वाण्याच्या दुकानी
भाव नाही कापराला
मुर्खाशी बोलता
शीण येई चतुराला ॥८॥

चंदना पडती
विळखे सर्पाचे
तैसे दुर्जनांचे
सज्जनांना ॥९॥

बळीचिये दारी
तिष्ठतो वामन
भक्ताचे आधीन
भगवंत ॥१०॥

भक्ताला जवळ
दुष्टा सदा लांब
प्रल्हादासाठी खांब
स्वीकारीला ॥११॥

कुणी नाही रे कुणाचा
आत्मा नव्हे रे कुडीचा
आहे संसार घडीचा
नाशिवंत ॥१२॥

कुणी नाही रे कुणाचा
पुत्र नव्हे ग पोटीचा
येईल कामाला
धर्म पाचा ग बोटीचा ॥१३॥

कुणी नाही रे कुणाचा
कशाला हसा रडा
आहे संसार बुडबुडा
नाशिवंत ॥१४॥

कुणी नाही रे कुणाचा
कशाला खोटे बळ
संसार मृगजळ
नाशिवंत ॥१५॥

वृद्ध मायबाप
सेवावे पूजावे
हेच समजावे
धर्मसार ॥१६॥

वृद्ध मायबाप
जशी पिकलेली फळे
तयांची चरणकमळे
नित्य वंदू ॥१७॥

रामराम म्हणूनी
जपतो माझे ओठ
जिव्हेबाई घ्यावा घोट
अमृताचा ॥१८॥

रामराम म्हणूनी
जपती माझ्या दाढा
घेई अमृताचा काढा
जिव्हेबाई ॥१९॥

कुतरा भुंकतो
मांजर देखून
गर्जतो पंचानन
हत्तीसाठी ॥२०॥

कुतरा भुंकतो
भुंकतो भीतभीत
रानात हुंकारत
पंचानन ॥२१॥

हंस धीर गती
कावळे कोकलती
मुर्खांना उपेक्षिती
बुद्धिमंत ॥२२॥

नको तीर्थयात्रा
नको चारी धामे
मुख्यी घ्यावे नामे
विठ्ठलाची ॥२३॥

नको तीर्थयात्रा
नको सप्त पुर्‍या
मुखी ओव्या गाव्या
विठ्ठलाच्या ॥२४॥

नको तीर्थयात्रा
नको अन्य नेमव्रत
माझे पवित्र दैवत
मायबाप ॥२५॥

रामराम म्हणुनी
राम माझ्या ह्रदयात
जसे मोती करंड्यात
वागविते ॥२६॥

चंद्राच्या प्रकाशी
लोपून जाती तारा
थोरापुढे तोरा
मिरवू नये ॥२७॥

चांदण्यांनो तुम्ही
अवसे राज्य करा
थोर नसता गलबला
करावा की ॥२८॥

कुतरा भुंकतो
घराच्या सभोवती
घर रानी गर्जती
सिंह व्याघ्र ॥२९॥

आज काय जाले
खळे पडले चंद्राला
कोणी पापी का संताला
छळिताहे ॥३०॥

पुराणींच्या गोष्टी
गोड ऐकायला
तसे वागायला
अवघड ॥३१॥

पुराणींच्या गोष्टी
देवळात गोड
संसाराची ओढ
कोणा सुटे ॥३२॥

पुराणींच्या गोष्टी
सखी पुराणी राहती
जन हे वागती
यथातथा ॥३३॥

आकाशामधून
केवढा तारा तुटे
पतनावाचून
कोणी ना जगी सुटे ॥३४॥

फुले कोमेजती
तारे वरचे तुटती
सर्वांना आहे च्युती
संसारात ॥३५॥

फुले सुकतात
तारे गळतात
असे कोण गं अच्युत
संसार ॥३६॥

चूल सारवीती
जशी नित्य गं नेमाने
तसे मन हे भक्तीने
सारवावे ॥३७॥

सारे बुडबुडे
काही संसारी टिकेना
हे गं मरण कुणाही
कधी काळी चुकेना ॥३८॥

जो जो प्राणी आला
माउलीच्या पोटी
धरित्रीच्या पोटी
तो तो जाई ॥३९॥

तिकीट संपता
सोडती आगीनगाडी
सोडावे लागे जग
आयुष्याची सरता घडी ॥४०॥

अमृत विषयाचे
विष अमृताचे
ईश्वराच्या इच्छे
होत असे ॥४१॥

पो पो गं पो पो
जशी करते मोटार
तसा जगी अहंकार
प्राणिमात्रा ॥४२॥

पो पो गं पो पो
मोटार पुढचे पाहिना
तसा कोणा जुमानीना
अहंकार ॥४३॥

समुद्राच्या काठी
विष्णू मळीतसे माती
ब्रह्मा घडवितो मूर्ती
नाना परीच्या ॥४४॥

समुद्राच्या काठी
विष्णू वाळू मळी
घडवी बाहुली
ब्रह्मदेव ॥४५॥

वेळी सारवावे
वेळीच शिवावे
हा गं देह आहे
तोच सार्थक करावे ॥४६॥

वेळीच जपावे
वेळच्या वेळी काम
हा गं देह आहे
तोच स्मरु मनी राम ॥४७॥

ज्यांच्या दारी आहे
कंदर्पाचे रोप
त्याच्या हाती सारे पाप
जमा होते ॥४८॥

कोणाचे कोण आहे कोण
माझा आहे भगवान
शेवटा जाऊ दे
मूर्खा तुझा अभिमान ॥४९॥

कोणाचे आहे कोण
माझा आहे भगवान
त्याच्या गं आधारे
जाऊ संसार तरुण ॥५०॥

संकटात कामा
येई जो मैत्र खरा
अभंग राहे हिरा
घाव पडता ॥५१॥

इवलीशी पणती
प्रकाशा देतसे
इवलेसे पुण्य
जिवा आधार होतसे ॥५२॥

सुंठ घासायला
खापरी येते कामी
जगात निकामी
वस्तू नाही ॥५३॥

वरुनी आरशाचे
आत परी भांडे काळे
सर्वच जिवांचे
आता बाहेर निराळे ॥५४॥

संकटात कामा
येईल तो खरा
त्याची कास धरा
जन्मवेरी ॥५५॥

संसारी मानावे
लागते समाधान
सगळे मनीचे
होईना कधी कोण ॥५६॥

संसारी मानावे
लागते सखी सुख
नाही तर सदा दुःख
चोहो बाजू ॥५७॥

पिकतात केस
गळते बत्तिशी
वासना राक्षसी
जैशीतशी ॥५८॥

पांढुरले केस
परी वासना हिरव्या
कळेना कोणाला
त्या कैशा जिरवाव्या ॥५९॥

फुलात सुगंध
कमळी मकरंद
ह्रदयी गोविंद
असो तेची ॥६०॥

नवतीची नार
नार चाले दणादणा
नवती गेली निघून
माश्या करिती भणाभणा ॥६१॥

समुद्रा रे बापा
किती करिशी बढाई
नाही पाण्याला गोडाई
तिळमात्र ॥६२॥

गोड बाळपण
गेले बागडोनी
पाखराच्यावाणी
सदोदित ॥६३॥

मरणाच्या वेळे
रामनाम घ्यावे
त्याने मुक्त व्हावे
चारी लोकी ॥६४॥

राम राम म्हणा
राम साखरेचा खडा
त्याने माझ्या दंतदाढा
गोड केल्या ॥६५॥

राम राम म्हणता
राम साखरेचा खड
रामाचे नाव घेता
दिवस आनंदात जावा ॥६६॥