Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १०

राहते हंसुन खेळुन, जन म्हणती सुखाची

पित्याच्या नांवापायी ध्याई जळते लाखाची

रांडपण आलं कुन्या अशिलाची तान्ही

ज्वानी जळे दिव्यावाणी

आपुल्या भरताराचं स्वर्गी झालं सोनं

मागं बाईल, तुळशीचं वाळवण

देव न्हाई देव्हारी, पायां कुनाच्या पडायाचं ?

आपुल्या नशिबाचं कोडं कुनाला घालायाचं ?

काय करायाची दीराभायाची पालखी ?

भरतारावांचून नार दिसती हालकी

वाटचा वाटसरू निंदा करीत माझी गेला

बहीण पाठची न्हाई त्याला

पापी चंडाळ ! कसं पापाचं बोललास

राळ्याच्या कणीवाणी नेतरी सललास

वाईट बोलशील न्हाई मी तुझ्या बोलाची

पित्या दौलतीची कळी उत्तम वेलाची

मूर्खाच्या बोलन्यानं मन माझं गेलं मोडी

साखर घातल्यानं कडू कारल्या येईना गोडी

१०

डोंगरी वणवा आग लागली तणाला

जळती कीडामुंगी शान्या उमज मनाला

११

म्यापल्या मनासारिखं मन शोधून गेले पाह्या

सोन्याच्या नादानं खरं रेशीम गेलं वाया

१२

जल्मामंदी जल्म बाळपणचा ब्येस

तरुणपनामंदी हुभं र्‍हाईल्याचा दोस

१३

वळीवाचा पाऊस कुठं पडतो कुठं न्हाई

भरताराचं सुख दैवलागून हाये बाई

१४

पीर्तीचा भरतार नको पीर्तीवरी जाऊ

पान्यांतली नाऊ कांही कळंना अनुभवु

१५

कडू विंद्रावण, डोंगरी त्याचा राहावा

पुरूषाचा कावा मला वेडीला काय ठावा ?

१६

कडू विंद्रावण आपुल्या जागी नटे

त्याचे अंगीचे गुन खोटे

१७

कडू विंद्रावण मला वाटं खावंखावं

त्याचे हे असे गुन, मला वेडीला काय ठांव ?

१८

किती नटशील, नटणं गेलं वाया

जूनजरबट झाली काया

१९

जीवाला देते जीव बाळपणीच्या सजणाला

सोन्याच्या नादानं मोती लागला झिजणीला

२०

जीवाला देते जीव, देऊन पाहिला

पान्यांतला गोटा, अंगी कोरडा राहिला

२१

संसाराचा वेढा वेडयाबाई वंगाळ

पान्यांतली नांव, आवल्या संभाळ

२२

कावळ्यानं कोट केलं बाभूळवनामंदी

पुरूषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी

२३

संचिताची रेघ कवाळीच्या आंत

अस्तुरीची वेडी जात जोशाला दावी हात

२४

निंदक निंदक बसले शेजारी

परनारीची केली निंदा, काय पडले पदरी

२५

बोलक्या बोलशील शब्द निंदेचे एकदोन

उलटून देईन जाब, कुठं र्‍हाईल श्यानपन