संग्रह २
२६
जातं ओढतांना, अंगाचं झालं पाणी
बया माझ्या माउलीचे वारू जुपल्याती दोन्ही
२७
दळण दळीयेते, अंगाचं झालं पाणी
बया माउलीनं चारिलं दुधलोणी
२८
दळन दळतांना करूं नये कुचराई
माऊलीच्या दुधाची दाखवावी चतुराई
२९
ओढेना मोठं जातं, ओढून पाहीन
माऊलीचं दूध कारनी लावीन
३०
बारीक दळसई पीठ जायाचं दूरवरी
दीर थोरला कारभारी
३१
बारीक दळावं, बुक्यापरीस किसावं
गरती बघुन बसावं
३२
दळन दळीते, दळीते ओले गहू
बंधुजी नको अंतर मला देऊं
३३
दळन दळीते जुनं जुंधळं नवं गहू
बंधुच्या पंगतीला आलं नारायन देऊ
३४
काळं कुरुंद जातं, कुठ केलंस सांग मला
कळीचं दांतवन कुन्या नारीनं दिलं तुला
३५
दळन दळीते दानं घेते शेरशेर
घरी हाईती नंदादीर
३६
दळन दळीते, जुंधळं मोतीदानं
माझ्या घराला आलं पाहुणं मेहुणं
३७
नको मला दळु लागुं बैस माझ्या जवळी
लाडके मैनाबाई तुझी मनगटं कवळी
३८
दळन दळीते पीठ पडे रवारवा
माझ्या बंधुजीला धाडूं मेवा
३९
दळन दळीते बसुन अंगनांत
माझ्या सोबतीला मुलं बसली चांदन्यांत
४०
द्ळन दळीते, धान्य पडलं खंडीवर
तान्हुलं बाळ माझं, खेळतं मांडीवर
४१
दळन दळीते, आणीक मापटं
मांडीवर तान्हं निजलं धाकुटं
४२
लेकुरवाळीचं पाळन्याखाली जातं
राजसबाळ माझं त्याच्या नादानं झोपी जातं
४३
दळन दळीते, दळीते मेतकूट
माझ्या बाळराजा पान तुझं वाढूं कुठं !
४४
दळप माझं झालं सुपांत पाच गहू
आलं जेवाया माझं भाऊ
४५
दळन दळीते घालूनिया मांडी
शेताचं धान्य आलंया खंडाखंडी
४६
दळन दळीते बैसुनिया माडी
शेतावरनं धान्याची येई गाडी
४७
पिठाची झाली पाळ नको मोडूंस बोटानं
तान्हुला भाऊ तुझ्या पाठीचा पठाण
४८
दळनाची शीग मोड्न्या न्हाई मुभा
पाठीशी बंधुजी चंद्र उभा
४९
दळनाची शीग मोडंना गव्हाची
सयानु किती सांगू मी बहिणाई भावाची
५०
सरलं दळन सरलं कशी म्हनुं
हाईती पाठचं लक्षुमणूं