जून ४ - परमार्थ
शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत : इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे . परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो . या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते . परलोक साधून देणार्याला सदगुरु म्हणतात . जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो , त्यालाच सदगुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो . आपण भगवंताला शरण जात नाही , कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो . गंमत अशी की , व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून , ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो . इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा , अशी आपली कल्पना असते . पण इहलोकाचा अनुभव दु : खाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही , मग ‘ परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही ’ हे म्हणणे लबाडीचे आहे . ‘ प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही , मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ? ’ असे काहीजण विचारतात . प्रपंच सचोटीचा असला , तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार . ‘ राम कर्ता ’ म्हटल्याशिवाय , म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय , परमार्थ नाही साधणार . ‘ मी देही ’ म्हणू लागलो यात अभिमान आला . देहबुद्धीला कारण म्हणजे वासना . वासना हे सर्वांचे मूळ आहे . ‘ माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ? ’ असे वाटते . जो या वासनेचा खून करतो , तोच परमार्थाला लायक होतो . अंती जी मती , ती जन्माला कारण होते . हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले , पण प्रचीतीने हे सर्व जाणावे .
बायकोपोरांचा त्रास होतो , मन एकाग्र होत नाही , म्हणून बुवा झाला ; मठ केला . लोक येऊ लागले , त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला . पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करु लागला . मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट ! थोडक्यात म्हणजे , परमार्थ समजून जो त्याचे आचरण करी , त्याला तो लवकर साधेल . त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही . जगातले आपले समाधान अगर असमाधान , ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहातो त्यावर अवलंबून आहे . परमार्थात महत्त्व , बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून , वृत्ती स्थिर होण्याला आहे ; आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे .